Tuesday, 27 August 2019

कल्पनाशक्तीचा वापर वक्तृत्व विकासासाठी आवश्यक : आर.जे.संग्राम खोपडे


भक्ती देशमुख प्रथम परितोषिकाची मानकरी.

दि.२७ (पुणे) : वक्तृत्व कला फक्त तुमचे विचार व्यक्त करण्याचे साधन नाही, तर त्याचा उपयोग तुम्हाला आयुष्यातील विविध टप्प्यांवर तुमच्या करिअर साठी होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही अधिक चौकस राहून घडणाऱ्या गोष्टींचे निरीक्षण केले पाहिजे. तसेच विविध क्षेत्रांमधील पुस्तकांचे वाचन करून तुमच्या कल्पनाशक्तीला वाव द्यायला हवा. मनुष्य आणि प्राण्यात तो मोठा फरक आहे. मनुष्याला कल्पनाशक्तीचा वापर करता येतो. त्याचा उपयोग करून आपले वक्तृत्व अधिक सकस करावे, असे आवाहन प्रसिद्ध रेडिओ जॉकी संग्राम खोपडे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई-नवमहाराष्ट्र्र युवा अभियान व रयत शिक्षण संस्थेचे एस एम जोशी कॉलेज हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित यशवंत शब्दगौरव महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या विभागीय फेरीच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.
वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक चेतन तुपे पाटील होते, तर या कार्यक्रमास माजी स्थायी समिती सभापती व नगरसेवक विशाल तांबे, संतोषकुमार फड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगुले, विजय कान्हेकर आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील १६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. तीन सभागृहात सदरील स्पर्धेचे आयोजन करून नंतर दुसरी फेरी घेण्यात आली. अंतिम फेरी मुंबई येथे दि. १८ सप्टेंबर रोजी संपन्न होणार आहे.
सदर स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
प्रथम क्रमांक - कु.भक्ती अरविंद देशमुख, आबासाहेब गरवारे महाविद्यालय,
द्वितीय क्रमांक - तेजस दिनकर पाटील, मॉडर्न महाविद्यालय,
तृतीय क्रमांक - अंकिता संजय शिवतारे, एस.पी.कॉलेज,
उत्तेजनार्थ - शुभम सतीश शेंडे, एस. एम. जोशी कॉलेज व
शेख आतिक,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.
या स्पर्धेत परीक्षक म्हणून प्राचार्या डॉ. सुषमा चाफळकर, अॅड. हनुमंत शिंदे, संतोष सहाणे, पांडुरंग कंद,  अश्विनी पंढरपुरे आणि प्रा. महेश अचिंतलवार यांनी काम पाहिले.
स्पर्धा यशस्वीसाठी नवमहाराष्ट्र युवा अभियानाचे राज्य संघटक नीलेश राऊत, डॉ. अमित नागरे, डॉ. पांडुरंग भोसले, प्रा. ठाकरे, प्रा. दीपक गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.












No comments:

Post a Comment