Thursday, 31 January 2019

‘चित्रपट चावडी’ अंतर्गत चित्रपटप्रेमींसाठी शनिवारी‘द डिस्क्रीट चार्म ऑफ द बुर्झ्वा

‘चित्रपट चावडी’
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे चित्रपटप्रेमींसाठी शनिवारी‘द डिस्क्रीट चार्म ऑफ द बुर्झ्वा’


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार २ फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध स्पॅनीश दिग्दर्शक लुई ब्युनेल यांचा ‘द डिस्क्रीट चार्म ऑफ द बुर्झ्वा’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट ब्युनेलच्या अतिवास्तवतावादाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. पॅरीसमधील उच्चभ्रू श्रीमंत वर्गातील नगरजनांभोवती कथानक फिरते. जणू काही त्यांचे जीवन म्हणजे एक सातत्याने चाललेली पार्टीच आहे. पण ही पार्टी ही यजमानाविनाच आहे. अनेक चित्रविचित्र प्रसंगांनी भरलेला हा चित्रपट हा शोधाचा अनोखा प्रवास आहे.
सन १९७२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या फ्रेंच-स्पॅनिश चित्रपटाचा कालावधी १०२ मिनिटांचा आहे.  हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष  डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

Wednesday, 30 January 2019

"गुन्हा, पुरावा आणि हस्ताक्षर तज्ज्ञ" व्याख्यान संपन्न...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, कायदे विषयक सहाय्य व सल्ला फोरमच्या वतीने " आपला कायदा जाणून घ्या" व्याख्यानमालचे अंतर्गत तिस-या पुष्पात "गुन्हा, पुरावा आणि हस्ताक्षर तज्ज्ञ"  या विषयावर हस्ताक्षर तज्ज्ञ डॉ. अँड. शैलेश चांदजकर व्याख्यान बुधवार दिनांक ३० जानेवारी २०१९ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठनमध्ये पार पडले.
अँड. शैलेश चांदजकर यांनी आपल्या व्याख्यानात स्वाक्षरी कशी असली पाहिजे तसेच कोर्टामध्ये स्वाक्षरी पेक्षा आगठ्यांचे ठसे हा पुरावा अधिक ग्राह्य धरला जातो. स्वाक्षरीवरुन स्वभाव ओळखता येतो. स्वाक्षरी करण्यासाठी महात्मा गांधी त्यावेळी पाच रुपये घेत असत ते पाच रुपये हरिजन फंडासाठी वापरले जात असत. तसेच शरद पवार यांच्या स्वाक्षरीमध्ये डॉट असतो असे त्यांनी सांगितले शरद पवार यांना पेन जमविण्याचा छंद असल्याचे त्याविषयी दालन बारामतीमध्ये आपणास पाहायला मिळू शकते. हस्ताक्षरावरुन गुन्हा सिद्ध केला जाऊ शकतो परंतु काँप्युटरमध्ये केलेले टायपिंग मध्ये फॉन्ट व साईज एकाच प्रकारची असल्यामुळे ते सिद्ध करणे फार अवघड असते असे त्यांनी सांगितले. सराईत गुन्हेगार हे काही लिहिण्यासाठी पेन्सिलचा वापर करतात असे यावेळी बोलताना ते म्हणाले. अशा वेळवेगळ्या विषयावर त्यांनी प्रकाश टाकला. प्रशोत्तराचा तासही तेवढाच रंगला. 

Tuesday, 29 January 2019

महिला आरोग्य तपासणी शिबिर संपन्न...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केन्द्र परभणी व आरोग्य विभाग जिल्हा परिषद परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने"महिला आरोग्य तपासणी शिबिर"  आज दि. २८/०१/२०१९  रोजी परभणी जिल्हातील पिंगळी येथिल ग्रामीण रूग्णालयात ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या उदघाटनाल अध्यक्ष म्हणून मा.सौ.संध्याताई दूधगावकर(अध्यक्ष,विभागीय केन्द्र परभणी)तर उदघाटक म्हणून मा.सौ.भावनाताई नखाते(उपाध्यक्ष तथा आरोग्या सभापती,जि.प.परभणी) तर या शिबीरास महिलाची आरोग्या तपासणी करण्यासाठी तज्ञ डॉक्टर म्हणून मा. डॉ. स. मोबिन(वैद्यकीय अधिकारी,ग्रामीण रुग्णालय,पिंगळी) मा. डॉ. कच्छवे मॅडम (स्त्री रोग तज्ञ,परभणी) मा.डॉ.भालेराव (बाल रोग तज्ञ,परभणी) यानी शिबीरास आलेल्या महिलांचे हिमोग्लोबिन,गरोदर मात,बालकाची तपासणी करून सल्ला व माग॔दशन केले.या प्रसंगी ५०० महिला व १०० बालकाची तपासणी करण्यात आली आहे.या शिबीरास पिंगळी सर्कल मधिल महिला व गरोदरमाता व बालक मोठ्या प्रमाणात तपासणी करण्यासाठी उपस्थितीत होत्या.या प्रसंगी शिबीरास यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र परभणीचे  मा.विलासजी पानखेडे,मा.सुमंत वाघ व मा.प्रशांतजी दलाल यांनी  सदिच्छा भेट दिली. सदरचे शिबीर यशस्वी करण्यासाठी पिंगळी येथील आरोग्य केन्द्राचे सव॔ परिचारीका व कम॔चारी यांनी  परिश्रम घेतले.तर सदर शिबीरा मा.विजयरावजी कान्हेकर व  सव॔ सन्माननीय सदस्यांनी या प्रसंगी शुभेच्छा दिल्या असे श्री.विष्णू वैरागड यांनी कळविले आहे.

Wednesday, 23 January 2019

विनामूल्य 'आरती थाळी' सजावट कार्यशाळा...

विनामूल्य 'आरती थाळी' सजावट कार्यशाळा...यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठ तर्फे विनामूल्य आरती थाळी सजावट कार्यशाळा गुरुवार, ७ फेब्रुवारी  २०१९ रोजी दुपारी २.३० ते ४.३० वेळेत  बेसमेंट हॉल, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, सचिवालय जिमखाना  नरिमन पॉईंट, मुंबई येथे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संजना पवार - ८२९१४१६२१६, २२०४५४६०, २२०२८५९८ (२४४)

इनकन टॅक्स आणि जीएसटी संबंधीत को-ऑपरेटिव्ह सोसायटी विषयावरती विनामूल्य मार्गदर्शन...

इनकन टॅक्स आणि जीएसटी संबंधीत
को-ऑपरेटिव्ह सोसायटी विषयावरती विनामूल्य मार्गदर्शन...


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे इनकन टॅक्स आणि जीएसटी संबंधीत को-ऑपरेटिव्ह सोसायटी या विषयावरती बुधवार ६ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी २ ते ५ यावेळेत महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशन (MSWA) अध्यक्ष, सीए रमेश प्रभू हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच हा कार्यक्रम बेसमेंट हॉल, चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, सचिवालयाच्या शेजारी, नरिमन पॉईंट येथे होईल. संपर्क संजना पवार ८२९१४१६२१६, २२०४५४६०, २२०२८५९८ (२४४)

Sunday, 20 January 2019

नवव्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा शानदार शुभारंभ

नवव्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा शानदार शुभारंभ
प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल प्रमुख पाहुणेयशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे शानदार उदघाटन रविवार दिनांक २० जानेवारी रोजी सायंकाळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल उपस्थित होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरदराव पवार, सरचिटणीस शरद काळे, यशवंत चित्रपट महोत्सवाचे मार्गदर्शक व समन्वयक डॉ. जब्बार पटेल आणि कार्यकारी समन्वयक महेंद्र तेरेदेसाई यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

"मा. यशवंतराव चव्हाण राजकारण व समाजकारणात व्यग्र असले तरी साहित्य व कलाक्षेत्रात त्यांना विशेष रूची होती. यशवंतरावांच्या स्मरणार्थ हा चित्रपट महोत्सव गेली नऊ वर्षे सातत्याने आयोजित करण्यांत येत आहे” असे मा. शरद काळे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
“चित्रपट महोत्सवाला जगभरातून अतिशय भरगच्च प्रतिसाद मिळाला असे सांगून ११८ निवडक चित्रपटांतून अंतिमतः ४२ उत्तम चित्रपट आम्ही यंदाच्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यासाठी निवडले आहेत” अशी माहिती मुख्य समन्वयक डॉ. जब्बार पटेल यांनी दिली.

मा. शरद पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की “आपल्या व्यग्रतेतून चित्रपट पाहण्यासाठी यशवंतराव आवर्जुन वेळ काढत असत. चित्रपट तंत्राची त्यांना चांगली जाण होती. अनेक चित्रपट निर्माते दिग्दर्शक त्यांचे मित्र होते व त्यांचेशी चित्रपटांसंबंधी यशवंतराव चर्चा करीत असत. श्याम बेनेगल यांचे सर्व चित्रपट आपण पाहिले असून त्यातील काही चित्रपटांमुळे आपण अस्वस्थ झालो होतो” असे शरद पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले.

मा. श्याम बेनेगल यांनी आपल्या भाषणात सांगितले की “आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांची भूमिका फार महत्वाची आहे. जगभरच्या अनेक देशांत बनलेले चित्रपटच आपण त्यात पाहतो असे नाही, तर जगभरच्या संस्कृतीचे दर्शन त्यातून आंतरराष्ट्रीय समुदायापुढे सादर होत असते. यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत महाराष्ट्रात तीन ठिकाणी जगभरचे चित्रपट रसिकांना पहायला मिळतात. हा चित्रपट महोत्सव आणखीही अनेक शहरांमध्ये पसरावा” अशा शब्दात श्याम बेनेगल यांनी चित्रपट महोत्सवास शुभेच्छा दिल्या.
मा. अंबरीश मिश्र यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Wednesday, 16 January 2019

जेनेरिक मेडिसीनच्या गुणवत्तेवर भर दिला पाहिजे - शास्त्रज्ञ डॉ. ऊर्मिला जोशी

जेनेरिक मेडिसीनच्या गुणवत्तेवर भर दिला पाहिजे - शास्त्रज्ञ डॉ. ऊर्मिला जोशी
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगा कार्यक्रमांतर्गत चौतीसावे पुष्प व्याख्याते शास्त्रज्ञ डॉ. ऊर्मिला जोशी यांचे 'जेनेरिक मेडिसीन' या विषयावरील व्याख्यान चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालया समोर, नरिमन पॉईंट येथे पार पडले.
डॉ. ऊर्मिला जोशी यांनी आपल्या व्याख्यानात भारतातील १९५०-१९९० मधील मेडिसीनची वाटचाल, सिप्ला कंपनीने एडस् व कॅन्सरवर कमी किमंतीमध्ये उपलब्ध केलेली औषधाची माहिती, जेनेरिक मेडिसीनविषयी अशा अनेक मुद्यावर व्याख्यान दिले. प्रश्न उत्तराचा तासही अधिक रंगला. त्यामध्ये जेनेरिक मेडिसीनचा दर्जा, परिणामकारकता, औषधामध्ये होणारे बदल हे मुद्दे अजूनही अनुत्तरितच आहेत. व्याख्यान बघण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा. https://www.facebook.com/ybchavanpratishthan/videos/2047011055603442/

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे राज्यस्तरीय युवा पुरस्कार जाहीर...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे राज्यस्तरीय युवा पुरस्कार जाहीर...वेदांगी कुलकर्णी विशेष युवा क्रीडा पुरस्काराची; तर किसन तडवी, साक्षी चितलांगे क्रीडा पुरस्कार आणि अभिजीत दिघावकर व स्नेहल चौधरी सामाजिक पुरस्काराचे मानकरी.


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने मागील एकवीस वर्षांपासून सामाजिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या युवक युवतींना राज्यस्तरीय युवा पुरस्कार दिले जातात. यंदाच्या यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार-२०१९ ची घोषणा करण्यात आलेली असून यामध्ये राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार व राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कारांचा समावेश आहे. 
यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय विशेष युवा क्रीडा पुरस्काराकरीता डोंबिवलीतील वेदांगी विवेक कुलकर्णी या एकोणवीस वर्षीय सायकलपटूची निवड करण्यात आलेली आहे. वेदांगीने आपल्या सायकलस्वारीने संपूर्ण जगभरात भारताचे नाव उंचावले असून १५९  दिवसात सायकलवरून २९ हजार किलोमिटरचे अंतर पूर्ण करीत तिने जगाला प्रदक्षिणा घातली आहे.  गिनीजच्या नियमानुसार सायकलवरून जगप्रदक्षिणा करताना २९ हजार किलोमीटर (विषववृत्तावरील भूभागाएवढे) अंतर पूर्ण करावे लागते. वेदांगीने ऑस्ट्रेलियातून सायकलींग सुरू केल्यानंतर न्यूझीलंड, कॅनडा, ग्रीनलॅण्ड, स्पेन, फिनलॅण्ड, रशिया आणि भारत अशा चौदा देशांमध्ये तिने सायकल चालविली. स्पेनमध्ये तिच्यावर चाकू हल्ला झाला. पैसे लूटले गेले. आईसलॅण्डमध्ये ती हिमवादळातही सापडली, पण तीने जिद्द सोडली नाही. विशेष म्हणजे तीची ही जगप्रदक्षिणा शिक्षण सुरू असतानाच झाली आहे. करीअरच्या मानसिकतेतून बाहेर जाऊन केलेली वेदांगीची ही धडपड उल्लेखनीय व प्रेरणादायी आहे. या कारणास्तव प्रतिष्ठानच्या कार्यकारी समितीने वेदांगीची यंदाच्या विशेष युवा क्रीडा पुरस्कारासाठी निवड केलेली आहे. 51 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 
यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार (युवक) या पुरस्काराकरीता अक्कलकुवा, जि. नंदुरबार येथील धावपटू किसन नरशी तडवी याची निवड करण्यात आलेली आहे. बावीस वर्षीय किसनने अतिशय प्रतिकुल परिस्थितीतून येऊन जगभरात भारताचे नाव उंचावले आहे. किसनने ५२ व्या नॅशनल क्रॉसकंट्री स्पर्धेत विजेतेपद मिळविले असून तैपई, चीन येथे झालेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम मध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावलेली आहे. त्याचबरोबर 33व्या नॅशनल ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स चॅम्पीयनशिपमध्ये पाच हजार मिटर व दहा हजार मिटर स्पर्धेत किसनने विजेतेपद पटकावलेले आहे. किसन सध्या २०२० सालच्या ऑलिम्पीक गेमची तयारी करीत असून भारताला किसन कडून त्याच्या खेळ प्रकारात मोठ्या अपेक्षा आहेत. २१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे किसनला मिळालेल्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यशवंतराव चव्हाण युवा क्रीडा पुरस्कार (युवती) २०१९ ची मानकरी औरंगाबाद येथील युवा बुद्धीबळपटू साक्षी दिनेश चितलांगे ही ठरली असून अवघ्या १५ व्या वर्षी शिवछत्रपती पुरस्कार मिळविणारी सर्वांत युवा खेळाडू साक्षी ठरलेली आहे. आठ आंतरराष्ट्रीय, अकरा राष्ट्रीय व अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये पदके जिंकून साक्षीने महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. २०१५ साली जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून (एफआयडीई) वूमन इंटरनॅशनल मास्टर हा किताब तसेच याच संघटनेकडून २०१४ साली वूमन फिडे मास्टर हा किताब साक्षीने पटकाविलेला आहे. २०१७ साली एअरपोर्ट अ‍ॅथोरिटी ऑफ इंडियाकडून त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देखील साक्षीने पटकाविलेला आहे. २१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे साक्षीला मिळालेल्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार (युवक) २०१९ करीता नाशिक येथील युवा कार्यकर्ता अभिजीत सदानंद दिघावकर याची निवड करण्यात आलेली असून अभिजीतने पर्यावरण विषयक व वृक्षतोडीच्या विरोधात उल्लेखनीय कार्य केलेले आहे. तळागाळातील गरजूंना आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून आरोग्य क्षेत्रातील विविध संस्थांना सोबत घेऊन महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करून अभिजीतने गरजूंना आरोग्य विषयक लाभ मिळवून दिलेले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय युवक समितीने आयोजित केलेल्या परिषदेमध्ये अभिजीतने भारताचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. २१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे अभिजितला मिळालेल्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार (युवती) २०१९ करीता मंगरूळपीर, जि. वाशिम येथील स्नेहल चौधरी कदम या युवतीची निवड करण्यात आलेली आहे. अभियांत्रीकीचे शिक्षण झालेल्या स्नेहलने आपल्या नोकरीचा त्याग करून ग्रामिण भागातील आपल्या भगिनींकरीता क्षितीज संस्थेच्या माध्यमातून युवती व महिलांच्या मासिक पाळी संदर्भात मागील पाच वर्षांपासून ‘ब्लिड द सायलेन्स’ या अभियानाअंतर्गत स्वच्छता नियोजनाचे अनेक उपक्रम राबविले आहे. आजवर विविध शाळा, कॉलेज, ग्रामिण भागात, आदीवासी भागात, शहरी भागातील वस्त्या यामध्ये दहा हजार युवती व महिलांसमवेत संवाद साधून त्यांना मासिक पाळीत घ्यावयाची काळजी याबाबत महत्त्व पटवून दिले आहे. २१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे स्नेहलला मिळालेल्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
निवड झालेल्या सर्व पुरस्कारार्थींचे प्रतिष्ठानच्या कार्यकारी समितीने अभिनंदन केले असून फेब्रुवारी महिन्यात पुणे येथे प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या पारितोषीकांचे वितरण करण्यात येणार असल्याचे नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने कळविण्यात आलेले आहे. 

Monday, 14 January 2019

माय-लेकींचा विभागीय केंद्र परभणी तर्फे शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देवून गौरव

परभणी : रणात उतरणा-या सैनिकांना प्रेरणा देणारे दोन व्यक्तीमत्त्व मां. जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचे राष्ट्राच्या उत्थानासाठी जीवन समर्पित आहे. जिजाऊची लेखक म्हणून मला सतत प्रेरणा आहे. तर एका पर्वाचे स्वामी विवेकानंद माझे वाचनाचे विषय आहे. जगप्रवास करून स्वामी विवेकानंदांनी एकट्याने परदेशात भारतीय संस्कृती-धर्म जागृत ठेवला. जिजाऊ ही वृत्ती आहे. लेकरं घडविण्याची वृत्ती, असे प्रतिपादन कवी इंद्रजित भालेराव यांनी 'जागर मायलेकिचा' कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून बोलताना व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र परभणीच्या अध्यक्षा प्राचार्य डॉ. संध्या दुधगावकर, यांच्यासह जिल्हापरिषदेच्या उपाध्यक्षा सौ. भावना नखाते, कृषीभूषण सोपानराव, अनिल जैन, विलास पानखेडे, सुमंत वाघ, विमल नखाते, अरूण चव्हाळ, विष्णू वैरागर इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम नूकताच संपन्न झाला.

प्रारंभी जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रास्ताविक विलास पानखेडे यांनी केले. प्रख्यात गायक प्रा. डॉ. अशोक जोंधळे यांनी जिजाऊ वंदनगीत सादर केले. तर सुप्रसिध्द गायिका आशाताई जोंधळे यांनी एकुतली 'एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भाला फेक' हे प्रेरणागीत सुंदर आवाजात गायन केले. जागर मायलेकिंचा कार्यक्रमांर्गत कठीण परिस्थितीचे झुंज देत जीवनात यशस्वी ठरलेल्या वर्तमान काळातील मायलेकींचा सन्मान प्रतिष्ठानच्या वतीने स्मृतीचिन्ह, पुस्तके भेट देऊन करण्यात आला.

ज्योती गवते, लक्ष्मी गवते (क्रीडा क्षेत्र), अनुराधा पंडीत (नृत्यकला), सोनी राऊत, सुमन राऊत (मंत्रालय, मुंबई), आरती आरबाड, रंजना आरबाड (शिक्षण), तृप्ती ढेरे, शकुंतला ढेरे (लोककला व प्रशासन), डॉ. श्रृती कदम (वैद्यकीय सेवा), खान (न्याय व्यवस्था), जागृती नामदेव देशमुख, शालिनी देशमुख (न्याय संस्था), श्र्वेता यादव, सुशिला काळे (प्रशासन अधिकारी), डॉ. कल्पना डोबे, रंजना डोंबे (वैद्यकीय सेवा), पूजा कुटे, संजीवनी कुटे (पोस्ट खाते), या मायलेकीचा सन्मान टाळ्यांच्या गजरात करण्यात आला. प्रमुख पाहूण्या भावना नखाते यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी अध्यक्षणीय समारोप करताना डॉ. संध्या दुधगावकर यांनी महामानवाच्या वृत्तीने वर्तमान पारतंत्र्याला नाहीसे करा, येणा-या आव्हानाला भिडून पुढे जावे. प्रत्येकाने संवेदनशीलता जिवंत ठेऊन आपले जीवन यशस्वी करावे. अस्मिता धगधग बाजूला ठेऊन आव्हाने पेलावीत, असे मत मांडले. 'काळाचे संदर्भ तपासून महामानवाच्या विचाराने अनेक गोष्टीला सामोरे जावे. त्यांच्या संस्कारातून आचारवंत व्हावे असे डॉ. दुधगावकर म्हणाल्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ऐश्र्वर्या फुलारी तर उपस्थितांचे आभार सौरभ फटाफुळे यांनी व्यक्त केले. 

Thursday, 10 January 2019

बारामती येथील शिबीरात ज्येष्ठ नागरिकांची तपासणी

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय,भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम मुंबई, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पुणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथे राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत या शिबिरात इंदापूर भागातील ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली. आवश्यक असलेल्या ग्रस्तांना कृत्रिम अवयव आणि इतर आवश्यक साधनांचे लवकरच वाटप करण्यात येणार आहे.

'विनासायास वेटलॉस आणि मधुमेह प्रतिबंध'याविषयावरती डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे मार्गदर्शन

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या वतीने डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे 'आपले आरोग्य आपल्या हाती' हे आरोग्यविषयक मार्गदर्शनपर व्याख्यान नूकतेच आरएमडी कॉलेज, वारजे येथे संपन्न झाले. 'विनासायास वेटलॉस आणि मधुमेह प्रतिबंध' यावर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Wednesday, 9 January 2019

ठाणे विभागीय केंद्रातर्फे 'विचारकुंकू' कार्यक्रम

महापौर  मिनाक्षीताई शिंदे आणि सिनेअभिनेत्री अलका कुबल-आठल्ये यांची उपस्थिती

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र ठाणे आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने 'विचारकुंकू' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विचारकुंकू कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या कर्तत्ववान महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. मा. सौ. मिनाक्षीताई शिंदे, महापौर, ठाणे महानगरपालिका कार्यक्रमाच्या अध्यक्षा असतील. तर ज्येष्ठ सिनेअभिनेत्री अलका कुबल-आठल्ये या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहूण्या असतील. कार्यक्रमामध्ये अलका कुबल यांची मुलाखत ज्येष्ठ पत्रकार दिलीप ठाकूर घेतील. हा कार्यक्रम मंगळवारी १५ जानेवारीला सहयोग मंदीर सभागृह, पहिला मजला, घंटाळी, ठाणे येथे होईल. दिलीप दंड, विशाल लांजेकर, मुरलीधर नाले आणि अमोल नाले यांनी अधिक संख्येने लोकांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे. 

जेनेरिक मेडिसीन विषयावरती व्याख्यान

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगा कार्यक्रमांतर्गत चौतीसावे पुष्प व्याख्याते शास्त्रज्ञ डॉ. ऊर्मिला जोशी यांचे जेनेरिक मेडिसीन या विषयावरील व्याख्यान बुधवारी दि. १६ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ५. वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालया समोर, नरिमन पॉईंट मुंबई येथे गुंफणार आहे. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती.