Friday, 23 August 2019

‘यशवंत शब्द गौरव महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा संपन्न’


उत्तम वक्ता होण्यासाठी वाचन व सभोवतालचे सजग भान आवश्यक - प्रा. मिलिंद मुरूगकर
दि. २३, नाशिक : समाज संकेतांना धक्का देणारी माध्यमक्रांती झाल्याने लोकशाहीची प्रक्रीया तीव्र होईल अशी जाणीव निर्माण होण्याऐवजी आज आपण जास्तीत जास्त व्यक्तिवादी होत चाललो आहोत. त्यातूनच माणसांमाणसांत हिंसा उफाळून येत आहे. ते रोखण्यासाठी उत्तम वाचन आणि सभोवतालाकडे सजगपणे पाहणे गरजेचे आहे व त्यासाठी माध्यमांचा अनावश्यक वापर टाळावा. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध विचारवंत प्रा. मिलिंद मुरूगकर यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई-नवमहाराष्ट्र युवा अभियान व एच. टी. पी. कला, आर. वाय. के. विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरीता विभागीय यशवंत शब्दगौरव महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एच.पी.टी. महाविद्यालयात ही स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेत नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगांव येथील महाविद्यालयातून शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
स्पर्धेतील विजेते खालील प्रमाणे :
प्रथम क्रमांक : श्रुती बोरस्ते (एच.पी.टी. कला व आर.वाय.के. विज्ञान महाविद्यालय, नाशिक)
द्वितीय क्रमांक : सौरभ सोनार (डॉ. बाबासाहेब आंबडेर लॉ कॉलेज, धुळे)
तृतीय क्रमांक : शुभांगी ढोमसे (के.के.वाघ महाविद्यालय, पिंपळगाव (ब.)
उत्तेजनार्थ : गायत्री वडघुले (के.टी.एच.एम. महाविद्यालय, नाशिक)
उत्तेजनार्थ : महिमा ठोंबरे (एच.पी.टी. कला व आर.वाय.के. विज्ञान महाविद्यालय, नाशिक)


परीक्षक म्हणून प्रा.अनंत येवलेकर, डॉ.शंकर बोर्‍हाडे, डॉ. राजेंद्र सांगळे, डॉ.संजय चपळगावकर यांनी काम पाहिले.
पारितोषिक वितरण सोहळ्याचे स्वागत व प्रास्ताविक करतांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र, नाशिकचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यात आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी, व्यक्तिमत्व विकासासाठी वक्तृत्व कला आवश्यक आहे. त्यासाठीच अधिकाधिक वक्ते निर्माण होऊन, विविध विषयांवर सखोल वाचन आणि विचार मंथन होऊन सद्विचारांचा ओघ अखंड रहावा, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
परीक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त करतांना प्रा. अनंत येवलेकर म्हणाले की, वक्तृत्व स्पर्धेत विषयाचे नेमके आकलन, अभ्यास, आवाजातील चढउतार यांचा संगम असणे महत्त्वाचे असते. अनेक विद्यार्थ्यांनी यात उत्तम सादरीकरण केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. एन. सुर्यवंशी म्हणाले की, नवनवीन वक्ते निर्माण होण्याची गरज असून अशा स्पर्धांमधून तो शोध घेता येतो. त्यासाठी हे व्यासपीठ आहे. ते निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे.
याप्रसंगी नवमहाराष्ट्र युवा अभियानचे संघटक निलेश राऊत, उपप्राचार्या डॉ. वृंदा भार्गवे, डॉ. लीना हुन्नरगीकर,  प्रा.बी.यु. पाटील, विश्वजीत कदम, डॉ. उदया बासरकर, भूषण काळे आदिंनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महेश अचिंतलवार, बागेश्री पारनेरकर, प्राजक्ता नागपुरे यांनी केले.







No comments:

Post a Comment