Saturday, 28 October 2017

ग्रामीण व शहरी विभागातील कर्णबधीर मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना मोफत श्रवणयंत्र


स्टार्की फाउंडेशन अमेरिका, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, अपंग हक्क विकास मंच, आरव्हीएस एज्युकेशनल अॅण्ड चॅरिटेबल फाउंडेशन मुंबई, नरोत्तम सक्सेरीया फाउंडेशन मुंबई, ठाकरसी ग्रुप मुंबई, विद्या प्रतिष्ठान बारामती आणि महात्मा गांधी सेवा संघ, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील एकूण १२०० ग्रामीण व शहरी विभागातील कर्णबधीर मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना मोफत वैद्यकीय तपासणी करुन दिनांक ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर २०१७ या दरम्यान ग. दि. माडगुळकर सभागृह, विद्या प्रतिष्ठान, एम. आय. डी. सी. बारामती येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत आधुनिक डिजिटल श्रवणयंत्र वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात प्रत्येक कर्णबधीर मुलास व ज्येष्ठ नागरिकास रु २५,०००/- किंमतीचे (अमेरिकन मेड) आधुनिक श्रवणयंत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
या शिबिरासाठी स्टारकी फाउंडेशन, अमेरिका या संस्थेचे, पदाधिकारी व स्वयंसेवक मिळून २५ जणांची एक टीम अमेरीकेहून बारामतीमध्ये उपस्थित राहणार आहे. या कर्णबधिर मुलांना श्रवणयंत्र लावल्यानंतर ऐकू येणा-या ध्वनी लहरींमुळे त्यांना होणारा आनंद द्विगुणीत करण्यासाठी सदरील कार्यक्रमास आपली उपस्थिती प्राथनीय आहे. 

Friday, 27 October 2017

'विज्ञानगंगा'चे विसावे पुष्प संपन्न...


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत विसावे पुष्प, व्याख्याते डॉ. सोमक रॉय चौधरी यांचे 'विश्वातील सर्वात मोठी आकाशगंगा' या विषयावर चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, नरिमन पॉईंट, मुंबई व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. विशेषम्हणजे नेमकी म्हणजे आकाशगंगा हे समजून घेण्यासाठी अधिक विद्यार्थ्यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.
सुरुवातीला चौधरी यांनी 'विश्वातील सर्वात मोठी आकाशगंगा' म्हणजे नेमकं काय हे समजावून सांगितलं. त्यानंतर त्यानी आकाश संदर्भात संशोधन करत असताना त्यांना आलेले अनुभव उपस्थितांना सांगितले.
आकाशात काही ग्रह कधी कधी उलटे फिरताना दिसतात. वास्तविक सर्वच ग्रह सूर्याभोवती घड्याळाच्या काट्याच्या विरुध्द दिशेने फिरतात. पण पृथ्वीवरून पाहताना काही ग्रह मधेच उलटे जाताना दिसतात. असं का होतं हेही त्यांनी उदाहरणं देऊन स्पष्ट केलं.
चंद्रकक्षेपलीकडील, सूर्यमालेतील पोकळी म्हणजे चंद्रकक्षेपासून आपल्या सूर्यमालेच्या शेवटच्या ग्रहाच्या कक्षेपर्यंतच्या पोकळीस अंतरिक्ष म्हणू या. सूर्य हा आपल्या सूर्यमालेचा केन्द्र आहे, म्हणून त्याच्या पृष्ठभागापासून ते सूर्यमालेच्या परीघापर्यंत अंतरिक्षाची मर्यादा होते. शुक्र, मंगळ, गुरू, शनि, युरेनस, नेपच्यून वगैरे ग्रहांचे, ज्या यानांतून वेध घेतले गेले ती अंतरिक्ष याने, अंतराळ याने नव्हेत. आपल्या सूर्यमालेतील सर्व ग्रह आणि त्यांचे अुपग्रह, प्लुटोसारखे बटुग्रह, लघुग्रहांचा पट्टा आणि त्यातील लघुग्रह, अशनी वगैरे वस्तू अंतरिक्षात भ्रमण करतात. पृथ्वीही अंतरिक्षातच भ्रमण करते. असंही सोमक यांनी सांगितलं.

‘चित्रपट चावडी’तर्फे चित्रपटप्रेमींसाठी शनिवारी ‘अनिकी बोबो’


नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार २८ ऑक्टोबर २०१८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध पोर्तुगाल दिग्दर्शक मॅन्युएल डी. ऑलीवेरा यांचा ‘अनिकी बोबो’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वासलॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक - ४२२०१३ येथे दाखविण्यात येणार आहे.
ऑलीव्हेरांचा हा अगदी सुरूवातीचा पोर्तुगीज चित्रपट पुढे येऊ घातलेल्या इटालीयन नव वास्तववादाची नांदीच होती. चित्रपटातील सर्व पात्रे खरंतर लहान मुलेच आहेत. पण त्यांचे बालखेळ मात्र मोठ्यांचे प्रतिबींबच आहेत. लहान मुलांचा निरागसपणा व खेळकरपणा मात्र शेवटी प्रेक्षकांची मने जिंकतो.
पोर्तुगीज चित्रपट दिग्दर्शक मन्युअल डी. ऑलीवेरा हे जागतिक चित्रपट सृष्टीतील एक आश्चर्यच म्हटले पाहिजे. १०६ वर्षांचे प्रदिर्घ आयुष्य लाभलेले ऑलीवेरा ८० वर्षे चित्रपट सृष्टीत कार्यरत राहीले. मूक चित्रपट ते २१ वे शतक असा खूप मोठा कालखंड त्यांनी पाहिला. त्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता  तशी उशीराच मिळाली. पण पोर्तुगालमधील हुकुमशाही राजवटीमुळे सुरूवातीला चित्रपटासाठी लागणारे पोषक वातावरण नव्हते. एकंदरीत सामाजिक आशयाचा चित्रपट तसेच लघुपट व माहितीपटांची अखंड निर्मिती केली.
१९४२ मध्ये पोर्तुगीज येथे प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी ७१ मिनीटांचा आहे. ‘अनिकी बोबो’ हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

Wednesday, 25 October 2017

मा. यशवंतराव चव्हाण यांची ३३ वी पुण्यतिथी...


आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते व धुरंधर राष्ट्रीय नेते मा. यशवंतराव चव्हाण यांच्या ३३ वी पुण्यतिथी निमित्त शनिवारी दिनांक २५ नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी ५.३० वाजता कार्यक्रमांचे आयोजन चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईन्ट मुंबई येथे करण्यात आले आहे.
 यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई पुरस्कृत न्यायमूर्ती वाय्. व्ही. चंद्रचूड पारितोषिक वितरण,
मा. यशवंतराव चव्हाण यांच्या "भूमिका" व "माझ्या विद्यार्थी मित्रांनो"ऑडिओ सीडीचे प्रकाशन,
 वि. का. राजवाडे यांच्या साहित्याच्या वेबसाईटचे उद्घाटन, "लोकमान्य ते महात्मा" या पुस्तकाच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन,
यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक २०१७ प्रदान करणे, राज्यस्तरीय पारितोषिक स्वीकाराचे भाषण,
यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०१७ जाहीर करणे,
अध्यक्षांचे भाषण.

Tuesday, 24 October 2017

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार – २०१८

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार – २०१८
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियान यांचा उपक्रम

दरवर्षी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार दिले जातात. सामाजिक व क्रीडा विभागात एक युवक व एक युवती यांना विशेष कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार’ (युवक व युवती) व ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार’ (युवक व युवती) असे एकूण चार पुरस्कार दिले जातात. क्रीडा व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करून इतर युवांसमोर एक आदर्श ठेवणाऱ्या युवा वर्गाच्या कर्तुत्वाची दाखल घेऊन त्यांना सन्मानित करण्याचा यामागे उद्देश आहे. पुरस्काराचे यंदाचे अठरावे वर्ष आहे.

महाराष्ट्रातील उत्कृष्ट खेळाडूंच्या कार्याचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे, हे या क्रीडा पुरस्काराचे उद्दिष्ट आहे. तसेच महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी युवा आंदोलनाच्या क्षेत्रात विधायक व भरीव कार्य करणाऱ्या युवक-युवतींची समाजाला ओळख व्हावी हे या सामाजिक युवा पुरस्काराचे उद्दिष्ट आहे. २१,०००/-चा धनादेश, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारासाठी व्यक्तीचे वय ३१ डिसेंबर २०१६ अखेरीस ३५ वर्षांच्या आत असले पाहिजे. पुरस्कारासंबंधीची संपूर्ण माहिती व फॉर्म www.ycpmumbai.com या वेबसाईटवरून डाऊनलोड करावे. आपले प्रस्ताव व अर्ज संपूर्ण माहितीनिशी दिलेल्या फॉर्मवर भरून दि. १० डिसेंबर २०१७ च्या आत संघटक, नवमहाराष्ट्र युवा अभियान, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई – २१ या पत्त्यावर, अथवा navmaharashtra@gmail.com या मेल आयडीवर पाठवावेत. या पुरस्कारासंबंधी अधिक माहितीकरिता कार्यालयामध्ये ०२२-२२०२८५०८ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा श्री. सुबोध जाधव (९८२३०६७८७९) व श्रीमती मनीषा खिल्लारे (९०२२७१६९१३) व रमेश मोरे (९००४६५२२६२) यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई नवमहाराष्ट्र युवा अभियानाचे संयोजक दत्ता बाळसराफ, सहसंयोजक विश्वास ठाकूर, विजय कान्हेकर व संघटक नीलेश राऊत यांनी केले आहे.

Monday, 23 October 2017

सिंहासन सिनेमा व चर्चा...


ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अरुण साधूंचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या 'सिंहासन' व 'मुंबई दिनांक' या कादंबरी व कथासंग्रहातील निवडक प्रसंगांवर आधारित सिनेमा बनला-"सिंहासन". आपल्या सर्वांचा परिचित चित्रपट. १९७९ ला हा सिनेमा प्रदर्शित झाला... संपूर्णपणे राजकारणच केंद्रबिंदू असलेला हा मराठीतील पहिला चित्रपट...सत्तेच्या सिंहासनासाठी केल्या जाणाऱ्या राजकारणावर आधारित हा सिनेमा आहे..राजकीय डाव, बेरीज-वजाबाकी आणि अनुत्तरित गणितंही...हे राजकारण अनेकदा सामान्य माणसांच्या आकलनापलीकडचे असते...पण एक पत्रकार म्हणून खुर्चीभोवतालचे हे डाव टिपता येतात...याचचं यथार्थ चित्रण या सिनेमात आहे.

जब्बार पटेल दिग्दर्शित व विजय तेंडुलकर पटकथा लिखित... निळू फुले, श्रीराम लागू, अरुण सरनाईक, मोहन आगाशे, नाना पाटेकर, रिमा लागू, सतीश दुभाषी, उषा नाडकर्णी यांचा प्रगल्भ अभिनय आणि हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत असलेला हा राजकीय चित्रपट.

सम्यक संवाद व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आयोजित सिंहासन : सिनेमा व चर्चा दिनांक ४ नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी ५.३० वाजता. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मंत्रालयाजवळ, नरीमन पॉईंट येथे दाखविला जाणार आहे व त्यानंतर चर्चा ही होणार आहे अधिक माहितीसाठी व कृपया, येण्यापूर्वी उपस्थिती कळवा. प्रथम येणा-यांस प्राधान्य.  गौरव तोडकर (८४११९९१९११), मनिषा खिल्लारे (९०२२७१६९१३), निलेश खानविलकर (८०९७५४४३२०), सोनाली शिंदे (९००४१२१५९५). 

Sunday, 15 October 2017

यंदाचा राज्यस्तरीय पारितोषिक श्री. भुजंगराव कुलकर्णी यांना जाहिर

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी कृषी औद्योगिक समाजरचना/व्यवस्थापन प्रशासन, सामाजिक एकात्मता/ विज्ञान तंत्रज्ञान, ग्रामीण विकास/ अर्थिक सामाजिक विकास, मराठी साहित्य, संस्कृती/ कला क्रिडा या क्षेत्रांमध्ये  लक्षणीय कामगिरी करणा-या महाराष्ट्रातील व्यक्तीस/ संस्थेस यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक देण्यात येते. रोख रक्कम. रु. २,००,०००/- व मानपत्र असे या पारितोषिकाचे स्वरुप आहे.

वरील क्षेत्रामध्ये लक्षणीय कार्य करणा-या व्यक्ती अगर संस्था यांच्या विषयी प्राप्त झालेल्या शिफारसींचा विचार करुन पारितोषिक निवड समितीने ज्येष्ठ, कार्यक्षम, चारित्र्यसंपन्न व यशस्वी सनदी अधिकारी ( भारतीय प्रशासन सेवा) मा. श्री. भुजंगराव कुलकर्णी यांची या वर्षीच्या पारितोषिकासाठी निवड केलेली आहे. मा. श्री. भुजंगराव कुलकर्णी यांनी त्यांच्या सेवा काळात भूमी सुधारणा (कूळ कायदा)  ची जनगणना, पुणे महानगरपालिका, नागरी विकास व आरोग्य, जलसंपदा, न्हावाशेवा बंदराची संरचना, मराठवाडा विकास योजना, मराठवाडा वैधानिक मंडळ, मागासलेल्या भागाचे सबलीकरण यांसारख्या अनेक शासकीय कार्यक्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे.

या क्षेत्रांतील त्यांचे असाधारण कर्तृत्व लक्षात घेऊन हे पारितोषिक मा. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी २५ नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी ५.३० वाजता चव्हाण केंद्रात आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.श्री. शरद पवार यांच्या हस्ते मा. श्री. भुजंगराव कुलकर्णी यांना देण्यात येणार आहे. 

Friday, 6 October 2017

लघुपट निर्मिती कार्यशाळा संपन्न


सोलापूर : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र सोलापूर, नवमहाराष्ट्र युवा अभियान व प्रयोग मालाड यांच्या संयुक्त विद्यमाने लघुपट निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार होते. या कार्यक्रमांमध्ये निर्मलकुमार फडकुले, अशोक राणे आणि महेंद्र तेरेदेसाई यांनी उपस्थित राहिलेल्या युवा वर्गाला मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्राचे सदस्य युनूसभाई शेख, धर्मणा सादुल, दत्ता गायकवाड आणि राजशेखर शिवादारे यांची प्रमुख उपस्थिती होती. ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी युवा अभियानाचे शिवाजी शेंडगे, आनंद कोलारकर यांनी अधिक परिश्रम घेतले.

‘चित्रपट चावडी’चित्रपटप्रेमींसाठी ‘आय एम गोइंग होम’


नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार ८ऑक्टोबर २०१७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध पोर्तुगाल दिग्दर्शक मॅन्युएल डी. ऑलीवेरा यांचा ‘आय एम गोइंग होम’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वासलॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-४२२०१३ येथे दाखविण्यात येणार आहे.
गिल्बर्ट वॅलन्स हा पॅरीसच्या रंगभुमीवरील सुप्रसिद्ध नट उतरणीच्या वयात आता निवृत्तीचे वेध लागले आहेत. अचानक कोसळलेल्या संकटांमुळे गिल्बर्टला फक्त नातवाचा आधार उरतो. त्याची करूण कहाणी दाखविण्यात आलेली आहे.
पोर्तुगीज चित्रपट दिग्दर्शक मन्युअल डी. ऑलीवेरा हे जागतिक चित्रपट सृष्टीतील एक आश्चर्यच म्हटले पाहिजे. १०६ वर्षांचे प्रदिर्घ आयुष्य लाभलेले ऑलीवेरा ८० वर्षे चित्रपट सृष्टीत कार्यरत राहीले. मूक चित्रपट ते २१ वे शतक असा खूप मोठा कालखंड त्यांनी पाहिला. त्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता  तशी उशीराच मिळाली. पण पोर्तुगालमधील हुकुमशाही राजवटीमुळे सुरूवातीला चित्रपटासाठी लागणारे पोषक वातावरण नव्हते. एकंदरीत सामाजिक आशयाचा चित्रपट तसेच लघुपट व माहितीपटांची अखंड निर्मिती केली.
२००१ मध्ये पोर्तुगीज येथे प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी ९० मिनीटांचा आहे. ‘आय एम गोइंग होम’ हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

Thursday, 5 October 2017

दिग्दर्शक अशोक राणे यांची नगररत्न कार्यशाळा संपन्न


अहमदनगर : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र, अहमदनगर यांच्यातर्फे संपुर्ण वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात. तसेच नवमहाराष्ट्र युवा अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील युवकांच्या कलागुणांना चालना व प्रेरणा मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावी या हेतूने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई व प्रयोग मालाड आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय समिक्षक व दिगदर्शक आशोक राणे यांची एकदिवसीय लघुपट (शॉर्टफिल्म) निर्मिती कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये अशोक राणे आणि महेंद्र तेरेदेसाई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यशवंतराव गडाख, प्रशांतभाऊ गडाख, प्रदीप देवरूखकर, भुषण मंत्री, अजित कोरेगावकर, महेंद्र कुलकर्णी आणि संजिव तनपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेमध्ये अधिक महिला आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 

Tuesday, 3 October 2017

समीक्षक व दिग्दर्शक अशोक राणे यांची नगररत्न कार्यशाळा

                     
अहमदनगर : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र अहमदनगर यांच्यातर्फे संपुर्ण वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात. नवमहाराष्ट्र युवा अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील युवकांच्या कलागुणांना चालना व प्रेरणा मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावी या हेतूने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई व प्रयोग मालाड आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र अहमदनगर यांच्या संयुक्त विघमाने आंतरराष्ट्रीय समिक्षक व दिगदर्शक आशोक राणे यांची एकदिवसीय लघुपट (शॉर्टफिल्म) निर्मिती कार्यशाळा आयोजीत करण्यात आली आहे. गुरूवारी दिनांक ५ आॉक्टोबर २०१७ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत ही कार्यशाळा हॉटेल सिंगरेसिडन्सी तारकपुर बसस्टॅंड शेजारी  येथे होणार असून याप्रसंगी लघुपट निर्मितीबाबतच्या सर्व बाबींवर प्रात्यक्षिकासह अशोक राणे मार्गदर्शन करणार आहेत. यानिमित्ताने अशोक राणे पहिल्यांदाच नगररत्न कार्यशाळा घेत आहेत. त्यामुळे चित्रपटनिर्मिती क्षेत्रात करिअर करू इच्छिणा-या व्यक्तीना लघुपट म्हणजे काय, पटकथालेखन, दृश्ये, अभिनय व इतर तांत्रिक बाजू समजण्यास मदत होणार आहे . जागतिक दर्जाचे लघुपट अहमदनगर जिल्हयातून निर्माण व्हावेत व लघुपटाविषयी माहिती युवकापर्यंत पोहचावी हा या कार्यशाळेचा प्रमुख हेतू आहे. त्यामुळे अधिक लोकांनी या कार्यशाळेस उपस्थित रहावे असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र अहमहनगरचे सचिव प्रशांत गडाख यांनी केले आहे. या कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणा-या व्यक्तिंनी नाव नोंदणीसाठी  ८८८८०८०८८१४ व ७७२००१३३२४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे अवाहन करण्यात आले आहे. तसेच सदर कार्यशाळेसाठी प्रवेश पुर्णपणे विनामुल्य आहे.

दिवंगत अरूण साधू यांना प्रतिष्ठानतर्फे आदरांजली


‘ग्रंथाली’ व यशवंत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंत चव्हाण प्रतिष्ठानच्या ‘रंगस्वर’ सभागृहात दिवंगत अरुण साधू यांना आदरांजली वाहण्यासाठी ‘जना-मनातले साधू’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या लेखणीने समाजातील उपेक्षित घटकांची वास्तवस्थिती साहित्यातून मांडणारे चतुरस्त्र प्रतिभेचे लेखक-पत्रकार अरुण साधू यांनी मराठी माणसांच्या मनात विशिष्ट स्थान निर्माण केले, अशी भावना प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.
डॉ. रवींद्र थत्ते, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ‘ग्रंथाली’चे दिनकर गांगल, लेखिका मीना गोखले, माजी मंत्री अरुण गुजराथी, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल प्रतिष्ठानचे सरचिटणीस अध्यक्ष शरद काळे, ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
राजकीय, सामाजिक प्रश्नांची आखणी करताना त्यामागील इतिहास व साहित्यप्रवाहाचा व्यासंगपूर्ण अभ्यास असणाऱ्यांमध्ये साधू यांचे नाव अग्रभागी होते. मराठी साहित्यात वैविध्यपूर्ण लेखन करणाऱ्या मोजक्या साहित्यिकांत साधू यांचा समावेश होतो, असे सांगून डॉ. जब्बार पटेल यांनी ‘सिंहासन’ चित्रपटाच्या वेळेस अरुण साधू यांच्यासोबतच्या काही आठवणींना उजाळा दिला. तर प्रा. मीना गोखले म्हणाल्या, अरुण साधू यांच्या निवडक कथांचे संपादन करताना लेखक आणि माणूस म्हणून जाणून घेण्याची संधी मिळाली. त्यांचे लिखाण ‘लोकल ते ग्लोबल’ अशा स्वरुपाचे होते. त्यांना कवितेचीही विशेष आवड होती.
‘‘पत्रकारितेत सत्य किती सांगायचे यात मोठी आडकाठी असते. अशावेळी सत्याला कल्पनेच्या कोषात गुंडाळून मांडण्याचा कलात्मक मार्ग अरुण साधू यांनी पुढच्या पिढीला दाखविला’’, असे ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर म्हणाले.
लढणाऱ्या व्यक्तींबद्दल साधू यांना अतिशय आदर व आस्था होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या लेखनातून न्याय दिला नाही अशी खंत त्यांना कायम वाटत होती. ती कमतरता त्यांनी डॉ. जब्बार पटेलांच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण केली. कलेचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व जपणारा, कथा, कांदबरी, नाटक, एकांकिका या सहित्यप्रकारात चाकोरीबाहेरच्या वाटा चोखाळणारा अरुण साधू पुन्हा होणे नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी साधू यांना श्रद्धांजली वाहिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘असा साधू होणे नाही’ ही साधू यांच्या कार्य कर्तृत्वाचा आढावा घेणारी ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली. या कार्यक्रमास साधू यांचे कुटुंबीयही उपस्थित होते.

Sunday, 1 October 2017

'विज्ञानगंगा'चे विसावे पुष्प 'विश्वातील सर्वात मोठी आकाशगंगा'

|
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत विसावे पुष्प, व्याख्याते डॉ. सोमक रॉय चौधरी यांचे 'विश्वातील सर्वात मोठी आकाशगंगा' या विषयावर शुक्रवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, नरिमन पॉईंट, मुंबई - ४०००२१ येथे गुंफणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे.

७०० कर्णबधिर मुलांना डिजिटल श्रवणयंत्राचे वाटप...


स्टार्की फाऊंडेशन अमेरिका, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, अपंग हक्क विकास मंच, आरव्हीएस एज्युकेशनल अॅण्ड चॅरिटेबल फाउंडेशन, नरोत्तम सक्सेरीया फाउंडेशन मुंबई, ठाकरसी ग्रुप मुंबई, विद्या प्रतिष्ठान बारामती, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई आणि महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील ७०० कर्णबधिर मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना मोफत वैद्यकीय तपासणी करून आधुनिक डिजिटल श्रवणयंत्राचे नूकतेच वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम ग. दि. माडगुळकर सभागृह, विद्या प्रतिष्ठान, एम. आय. डी. सी. बारामती, पुणे येथे लोकांच्या उपस्थित पार पडला. विशेष म्हणजे स्टार्की हिअरींग फाउंडेशन अमेरीका यांच्यावतीने आधुनिक डिजीटल श्रवणयंत्र उपलब्ध करून दिले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा. विजय कान्हेकर, (संयोजक, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई अपंग हक्क विकास मंच) यांनी केले. या कार्यक्रमासाठी मा. सुमित्राताई पवार, नगराध्यक्षा मा. पोर्णिमा तावडे, डॉ. कल्याणी मांडके, मा. वैशाली नागवडे, श्री. बी. एम. तायडे, श्री. मोटा, श्री. शिवाजीराव पोमन, सौ. वनिता बनकर आदी मान्यवर उपस्थित होते.