Friday, 30 March 2018

'विज्ञानगंगा'चे पंचविसावे पुष्प...'पुरातन खगोलशास्त्र'

 यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत पंचविसावे पुष्प शास्त्रज्ञ डॉ. मयांक वाहिया यांचे 'पुरातन खगोलशास्त्र' या विषयावर दिनांक २० एप्रिल २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर नरिमन पॉईंट, मुंबई येथे गुंफणार आहेत. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती.

Thursday, 29 March 2018

अशोक शहाणे यांचे 'विद्रोह आख्यान'

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीयकेंद्र ठाणे आणि साद यांच्या संयुक्तविद्यमाने मराठी साहित्याला मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ विद्रोही लेखक, समीक्षक अशोक शहाणे यांच्या आख्यानाचे आयोजन ठाणे येथील पालिकेच्या बल्लाळ सभागृहात करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवारी १ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र शहाणे यांच्याशी संवाद साधणार आहेत.  

लोकजागर कलापथक गाणी श्रमिकांची कार्यक्रमाला प्रेक्षकांची दाद...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, कचरा वाहतूक श्रमिक संघ, संविधान संवर्धन समिती, स्त्री मुक्ती संघटना, महिला राज्यसत्ता आंदोलन, कोरो-महिला मंडळ फेडरेशन, महाराष्ट्र महिला परिषद, कुसुमताई चौधरी महिला कल्याणी, शहिद भागवत जाधव स्मृती केंद्र, अनुभव मुंबई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कॉ. दत्ता देशमुख जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'लोकजागर कलापथक गाणी श्रमिकांची' या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. दत्ता देशमुख प्रतिष्ठान, संगमनेर जयहिंद लोकचळवळ, संगमनेर यांनी आयोजन केले होते. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून खासदार (राज्यसभा), ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर होते तर प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे, प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, मोहन देशमुख, माधव चव्हाण, सुरेश सावंत इत्यादी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. भारतीय संविधानातील मूल्ये पुस्तकाचं प्रकाशन मा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले.

Tuesday, 27 March 2018

औरंगाबाद शहर कचरा समस्येवर 'कचराकोंडी जागर संवाद'


औरंगाबाद - शहराचा कचरा प्रश्न दिवसेंदिवस अधिक पेटत चाललेला आहे. प्रशासकीय पातळीवर तात्पुरत्या स्वरूपातील इलाज करून हा विषय काही काळाकरीता स्थगित ठेऊन यंत्रणेला या विषयावर यश मिळविता येईल, पण त्यामुळे कायमस्वरूपी हा प्रश्न सुटणारा नाही. औरंगाबादच्या कचराकोंडीवर कायमस्वरूपी उपाय काय असू शकतात? या अनुषंगाने दुरगामी मुलभूत चिंतनाची आवश्यकता आहे. या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - विभागीय केंद्र औरंगाबाद व महात्मा गांधी मिशन, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कचराकोंडी जागर संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन सोमवार, दि. २ एप्रिल २०१८, आर्यभट्ट सभागृह, जेएनईसी महाविद्यालय, एमजीएम परिसर, औरंगाबाद येथे सकाळी साडेनऊ ते दुपारी दोन या वेळेत करण्यात आलेले आहे.

कचराकोंडीवर सातत्याने विविध आंदोलने, चर्चा, जनआंदोलनांची उभारणी होत आहे. त्याबरोबरच चर्चेच्या माध्यमातून या विषयाकडे सोडवणुकीच्या दृष्टीकोनातून पाहण्याची नितांत गरज आहे. या सर्व अनुषंगाने जागर संवादाचे आयोजन करण्यात आलेले असून कचरा प्रश्नावर नेहमीच्या प्रश्नांच्या पुढे जाऊन प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीकोनातून काय मार्ग असू शकतात, याचा वेध घेण्याची या कार्यक्रमामागील भूमिका आहे. मुंबई शहराच्या कचऱ्याच्या प्रश्नावर विविध संस्थांच्या सोबत ज्यांनी अतिशय उल्लेखनीय कार्य केले असे कचरा प्रश्नाचे ज्येष्ठ अभ्यासक व भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर, मुंबई येथील शास्त्रज्ञ, पद्मश्री मा. डॉ. शरद काळे हे या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. तसेच ज्येष्ठ संपादक मा.संजय वरकड हे 'औरंगाबाद शहर व कचरा' या विषयावर मांडणी करतील.या संवाद परिषदेत स्वच्छ, पुणे, स्त्री मुक्ती संघटना, मुंबई, एमजीएम क्लीन इंडिया सेंटर, औरंगाबाद, सीआरटी, औरंगाबाद, औरंगाबाद कनेक्ट टीम, अदर पुनावाला फाऊंडेशन, पुणे, वायु मित्र, पुणे इत्यादी महाराष्ट्रातील विविध स्वयंसेवी संस्थांच्या यशस्वी प्रयोगांचे सादरीकरण देखील करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून महापौर मा. नंदकुमार घोडेले, विभागीय आयुक्त मा. डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त मा. नवलकिशोर राम हे उपस्थित राहणार आहेत.
या जागर संवादास शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबादचे अध्यक्ष अंकुशराव कदम, कोषाध्यक्ष सचिन मुळे, सचिव नीलेश राऊत,एमजीएम क्लीन इंडिया सेंटरचे प्रमुख डॉ.आर.आर.देशपांडे, कार्यकारिणी सदस्य डॉ. भालचंद्र कांगो, प्रा. अजीत दळवी, डॉ. श्रीरंग देशपांडे, बिजली देशमुख, सुनील किर्दक, प्रा. दासू वैद्य, विजय कान्हेकर, डॉ. रेखा शेळके, सुहास तेंडूलकर,आयोजन सदस्य त्रिशूल कुलकर्णी, सुबोध जाधव, डॉ.संदीप शिसोदे,श्रीकांत देशपांडे,प्रवीण देशमुख,मंगेश निरंतर, गणेश घुले, निखिल भालेराव, मयूर देशपांडे, सचिन दाभाडे आदींनी केले आहे.

Monday, 26 March 2018

साहित्यनिर्मितीतून समाज घडविण्याची ताकद - इन्दरजित नंदन (सुप्रसिद्ध पंजाबी कवियत्री)

नाशिक : साहित्य निर्मिती ही आंतरीक शक्तीचा उद्गार असून त्यातून समाज बदलवण्याची ताकद आहे. दिव्यांगांनी आपल्या प्रतिभेतून संघर्षांचा सामना करून जिद्दीने आपले अस्तित्व निर्माण केले आहे. इतिहासापासूनच दिव्यांगांच्या कर्तुत्वाची ओळख समाजाला आहे. आज अनेक क्षेत्रात त्यांना आपले वेगळेपण सिद्ध करूनही मुख्य प्रवाहात येण्यासाठी लढा देण्याची गरज आहे. त्यासाठी दिव्यांगांनी शिक्षण, रोजगारात स्वावलंबी व्हावे. त्यातून त्यांच्या जीवनाच्या कक्षा रूंदावतील. यासाठी समाजाने संवेदनशील बनून त्यांना हात द्यावा. असे प्रतिपादन पंजाबी कवियत्री श्रीमती इन्दरजित नन्दन यांनी केले.

साहित्य व सांस्कृतिक मंडळ, पुणे आयोजित ७ वे अखिल भारतीय दिव्यांग साहित्य संमेलन शनिवार, दि. २४ व रविवार, दि. २५ मार्च २०१८ रोजी विश्वास लॉन्स, गंगापूर रोड येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर सम्मेलनाच्या अध्यक्षा म्हणून श्रीमती नंदन यांनी वरील विचार व्यक्त केले.

इन्दरजित नंदन पुढे म्हणाल्या की निराश आणि हताश होऊन प्रश्‍न सुटत नसतात. त्यातून मार्ग काढणे महत्त्वाचे आहे. साहित्यातून माणसे जोडण्याची चळवळ उभी राहते.
आ. हेमंत टकले म्हणाले की, भाषा व अनुभवाच्या मिश्रणातून दमदार अभिव्यक्ती निर्माण होते. दिव्यांग साहित्य संमेलनातून नव्या जाणिवांचे, भाषिक अवकाशाचे चित्र दिसते आहे. आपल्या लेखनातून समाजात आनंद निर्माण करा, नवा विचार द्या. तेच साहित्य निर्मितीचे खरे मूल्य आहे. ह्या मूल्यांची जोपासना दिव्यांग करत असतात.

आ. देवयानी फरांदे म्हणाल्या की, विज्ञानाने आज प्रगती केली असून स्टीफन हॉकींगसारखे शास्त्रज्ञ दिव्यांगाचे प्रेरणास्थान आहेत. दिव्यांग व्यक्तींना आपल्यासोबत घेऊन त्यांना मदतीचा हात देणे, त्यांचे प्रश्‍न सोडवणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. साहित्य संमेलनातून त्यांच्यातील सुप्त गुणांना व्यासपीठ मिळत असते. लोकचळवळ उभी राहते. आपुलकी, प्रेम या बळांवर दिव्यांगांमध्ये आपण आत्मविश्वास निर्माण करावा. दिव्यांगांनी प्रकाशित केलेल्या अनेक साहित्यकृती अभिजात आहेत. अशा संमेलनातून नवोदित लेखक, कवी समोर येतील.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष विश्वास ठाकूर म्हणाले की, दिव्यांगांना नव्हे तर सर्वसामान्य प्रत्येकाला समान सन्मान, प्रेम, आस्था, आपुलकी हवी असते. तीच त्यांना हवी असते. त्यामुळे दिव्यांगांच्या मनातील न्यूनगंड वाढत नाही. त्याच्यावर विश्वास व्यक्त केला तर तो वेगळ्या पद्धतीने आपली उर्जा क्रियाशील करू शकतो. सर्जक करू शकतो. उत्पादित करू शकतो. दिव्यांगांना समान सन्मान आणि संधी हवी असते. दया आणि सहानूभूती या गोष्टी त्यांच्या उमेदीचे खच्चीकरण करतात. त्यामुळे समाजाने त्यांना समान सन्मान आणि समान संधी द्यावी. दिव्यांग अचंबीत करून दाखवेल, अशी प्रगती करू शकतो. देशाचा जबाबदार आणि समर्थ नागरिक होऊन दाखवू शकतो.

कवी किशोर पाठक म्हणाले की, मराठी साहित्यांचे प्रतिनिधीत्व करणारे अस्सल प्रतिभेचे लेखक, कवी, दिव्यांग साहित्य संमेलनातून आले आहेत. मनाच्या जाणिवेतून आलेला अविष्कार वास्तवाची जाणीव करून देणार असतो. ते सारं यांच्या लेखनात आलं आहे. भारतीय नव्हे तर जागतिक पातळीवर दिव्यांगांच्या साहित्यकृती आदर्श आहेत.

डॉ. रविंद्र नांदेडकर यांनी दिव्यांगाचे प्रश्‍न व ते सोडवण्यासाठी शासन पातळीवर झालेल्या प्रयत्नांचा वेध घेतला. दिव्यांगांकडे बघण्याची दृष्टी बदलत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सुहास तेंडुलकर म्हणाले की, दिव्यांगांच्या हक्कांसाठी मागण्यांसाठी चळवळ उभारली आहे. त्याला आज योग्य दिशा मिळाली आहे. नवे अस्त्विाचे भान निर्माण होण्यासाठी अशा संमेलनांची व्याप्ती वाढवावी असेही तेंडूलकर म्हणाले.

याप्रसंगी विजय कान्हेकर यांनी सम्मेलनाच्या आतापर्यंतच्या झालेल्या प्रवासाबद्दल माहिती दिली व संमेलनाच्या व्यवस्थापन कौशल्याबद्दल माहिती दिली.

स्वागत व प्रास्ताविक बापूसाहेब बोभाटे यांनी केले. सुनील पानमंद यांनी संमेलन अयोजनामागची भूमिका मांडली व विधायक व सकारात्मक लढा देण्यावर भर देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी साहित्य व सांस्कृतिक मंडळाच्या संकेत स्थळाचे उद्घाटन करण्यात आले व पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. सम्मेलनासाठी भारतातील विविध राज्यांतून दिव्यांग आलेले आहेत. संमेलनाचे सुत्रसंचालन सुनील रूणवाल यांनी केले तर आभार भावना विसपुते यांनी मानले.

Friday, 23 March 2018

कॉ. दत्ता देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त... 'लोकजागर कलापथक गाणी श्रमिकांची' या कार्यक्रम

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, कचरा वाहतूक श्रमिक संघ, संविधान संवर्धन समिती, स्त्री मुक्ती संघटना, महिला राज्यसत्ता आंदोलन, कोरो-महिला मंडळ फेडरेशन, महाराष्ट्र महिला परिषद, कुसुमताई चौधरी महिला कल्याणी, शहिद भागवत जाधव स्मृती केंद्र, अनुभव मुंबई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कॉ. दत्ता देशमुख जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'लोकजागर कलापथक गाणी श्रमिकांची' या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. दत्ता देशमुख प्रतिष्ठान, संगमनेर जयहिंद लोकचळवळ, संगमनेर यांनी केले आहे. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून खासदार (राज्यसभा), ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आहेत. हा कार्यक्रम गुरूवारी दिनांक २९ मार्च २०१८ रोजी दुपारी ३ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात होणार आहे. अधिक माहिती संपर्क प्रफुल्ल शिंदे - ८८९८८८२७८६, ०२२२२०२८५९८,

कॉ. दत्ता देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त थोडक्यात माहिती...
०२-०९-२०१७ ते ०२-०९-२०१८
मागच्या पिढीतील ज्येष्ठ साम्यवादी विचारवंत, कामगार शेतक-यांचे नेते, शेती व पाणी व्यवस्थापनातील मार्गदर्शक व लाल निशाण पक्षाचे नेते दिवंगत कॉ. दत्ता देशमुख हे आधुनिक महाराष्ट्राच्या शिल्पकारांपैकी एक महत्वाचे लोकप्रतिनिधी (आमदार) होते. ते त्या काळातील (१९४२ ते १९९४) महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक पटलावरील अत्यंत प्रभावशाली असे मार्क्सवादी विचाराचे, सर्व सामान्य जनतेचे नेते होते.
त्यांचा प्रवास : जवळे कडलग (ता. संगमनेर जि. अहमदनगर) येथे एक अत्यन्त गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या दत्तांनी, उच्च बुद्धिमत्तेच्या जोरावर १९४३ मध्ये पुणे विद्यापीठाची सिव्हिल इंजिनियरची पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली.
म. गांधीजींच्या १९४२ च्या 'चले जाव!' आंदोलनात भाग घेतल्यामुळे त्यांना १५ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा भोगावी लागली होती.
तुरुंगात असतानाच त्यांनी इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली होती. इंजिनिअर झाल्यावर त्यांनी बड्या पगाराची नोकरी सोडून जाणीवपूर्वक शेतकरी व कामगार कष्टक-यांच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले.
त्यांचा ठसा : १९४६ ते १९६२ अशी १६ वर्षे त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत संगमनेरचे आमदार प्रतिनिधी म्हणून काम केले. परंतु फक्त संगमनेरचाच विचार न करता सम्पूर्ण महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपल्या घणाघाती भाषणांनी विधानसभा गाजवली. त्यांची भाषणे ऐकण्यासाठी त्या त्या काळातील काँग्रेसचे मुख्यमंत्री व इतर सर्व मंत्री आवर्जून सभागृहात उपस्थित रहात असत. विधानसभेत आणि विधानसभेबाहेरही त्यांनी केलेल्या राजकीय कामगिरीचा एक वेगळा ठसा उमटलेला होता.
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात साथी एस. एम. जोशी आणि कॉ. डांगे या दोन्ही नेत्यांना एकत्र आणण्याचे अवघड काम करून या आंदोलनाला कामगार कष्टक-यांची ताकदही मिळवून दिली होती.
मुंबई विधानसभेच्या आमदारांनी १९५२ च्या मार्चमध्ये राज्यसभेसाठी १७ खासदार निवडून दिले. कामगार किसान पक्षाचे दोन आमदारदत्ता देशमुख आणि बॅ. व्ही. एन. पाटील यांनीही डॉ. आंबेडकरांना मते दिल्यामुळे राज्यसभेची निवडणूक डॉ. आंबेडकरांना सहज जिंकता आली. दत्ता देशमुखांकडून २९ मार्चला आलेल्या अभिनंदन पत्राचे उत्तर पाठविताना डॉ. आंबेडकरांनी राज्यसभा निवडणुकीतील पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
खरा सहकारी : डॉ. बाबासाहेबांनी जनरल जागांवर आम्हाला निवडून आणाल काय? असा खोचक वाटणारा प्रश्न शिष्टमंडळात सर्वात वयाने लहान असणा-या दत्तांना विचारला तेव्हा दत्तांनी, 'जरुर प्रयत्न करु बाबासाहेब, जी काही जूट या प्रश्नावर बांधायची आहे त्यामुळे जनरल जागांवरही लोक निवडून देतील असे उत्तर दिले. ...आणि पुढे खरोखरच ज्या १९५७ च्या निवडणुका झाल्या त्यात नगरमधून जनरल जागेवर खासदार म्हणून बाबासाहेबांचे तरुण सहकारी बॅ. बी. सी. कांबळे यांना निवडून दिले.
पुढे १९६२ मध्ये निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर या प्रामाणिक तत्वनिष्ठ नेत्याने निवडणुकीच्या राजकारणाला रामराम ठोकून दुष्काळी महाराष्ट्राच्या प्रश्नांचा आणखी सखोल अभ्यास केला. दुष्काळ निवारण व निर्मूलन, रोजगार हमी योजना आखण्यात पुढाकार घेतला. शेती आणि पाणी या कळीच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत केले आणि महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला नवी दिशा दिली. परंतु इतके मूलगामी काम करूनही ते अप्रसिद्धच राहिले, कारण प्रसिद्धीच्या झोतापासून त्यांनी स्वतःला जाणीवपूर्वक दूर ठेवले होते.
मानवी चेह-यांचे कम्युनिष्ट : विसाव्या शतकातील उपेक्षित राहिलेल्या मानक-यांचा आढावा घेतल्यास त्या यादीत कॉ. दत्तांचे नाव फार वरचे राहील. वास्तविक वैयक्तिक लाभाच्या अनेक मोठ्या संधी, (अगदी मुख्यमंत्री पदाचीसुद्दा) चालून आली असतानासुद्धा या तत्वनिष्ठ नेत्याने त्या निस्पृहपणे नाकारल्या ही गोष्ट त्यांच्या पिढीतील सर्वानाच माहीत होती. त्यामुळेच त्यांच्या काही विचाराबद्दल मतभेद असणारे इतर पक्षातील नेतेही त्यांच्याबद्दल मनापासून आदर बाळगीत. आदर्श विरोध आणि विरोधक कसा असावा याचा वस्तुपाठच त्यांनी आपल्या कृतीतून आणि उक्तीतून दाखवून दिला होता. ते 'पोथीनिष्ठ' कम्युनिस्ट नव्हते तर 'मानवी चेहरा असलेले कम्युनिस्ट' होते. त्यामुळेच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचेपासून सर्वच मुख्यमंत्र्यांनी त्यांचा आदच केला.

१ नोव्हेंबर १९९४ रोजी दत्तांचे दुःखद निधन झाले.

बारामती येथील शिबिरात अधिक ज्येष्ठ नागरिकांची तपासणी

सामाजिक न्याय एवं अधिकरीता मंत्रालय, भारत सरकार भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलिम्को) कानपूर जिल्हा परिषद, पुणे जिल्हा प्रशासन, पुणे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वयोश्री योजने अंतर्गत ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना वयोपरत्वे येणा-या अपंगत्वाचे तपासणी शिबीर आज बारामती येथे सुरू आहे. शिबिरामध्ये अंतर्गत ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तपासणी करून घेत आहेत.
२४ मार्च इंदापूर, २५ मार्च दौंड, २६ मार्च भोर, २७ मार्च वेल्हा आणि २८ मार्च मुळशी या ठिकाणी सुध्दा शिबीर होणार आहे. शिबीरामध्ये चालण्याची काठी, आधार काठी (कुबडी), तिपाई काठी, कवळी चष्मे, ऐकण्याचे यंत्र, स्वयंचलित कृत्रिम दांडी आणि चाकाची खुर्ची इत्यादी साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे. आरोग्य तपासणीची वेळ - (सकाळी १० ते सायंकाळी ६ )

वयोश्री योजनेसाठी खालील कोणत्याही एका अटीची पूर्तता आणि आधार कार्ड आवश्यक आहे.
१. ग्रामसभेतील गरिबातील गरिब दाखला.
२. १ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या तहसीलदाराचा दाखला.
३. प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी असलेला दाखला.
४. कलेक्टर मार्फत असलेल्या इंदिरा गांधी पेन्शन लाभार्थी योजनेचा दाखला.
५. संजय गांधी निराधार योजना लाभार्थी दाखला.
६. दारिद्र्य रेषेखालील दाखला

Thursday, 22 March 2018

वृद्धत्व विरोधी वैद्यकीय व नैसर्गिक उपचार याविषयी डॉ पूर्णिमा म्हात्रे मार्गदर्शनयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठतर्फे वृद्धत्व विरोधी वैद्यकीय व नैसर्गिक उपचार याविषयी मोफत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे होते. २२ वर्ष स्वत: त संशोधन करून तयार केलेल्या औषधांनी रूग्णांवरती कशा पध्दतीने उपचार केले, आणि काम करत असताना आलेले अनुभव डॉ पूर्णिमा म्हात्रे यांनी उपस्थितांना सांगितले. 

प्रख्यात मेडीकल कॉस्मोलोजीस्ट डॉ पूर्णिमा म्हात्रे यांच्या मुंबईमध्ये क्लिनिक जॉरजेअस नावाच्या ब-याच ठिकाणी शाखा आहेत. या शाखांमध्ये मुंबईतील विविध ठिकाणाहून उपचारांसाठी लोक येत असतात. चेह-यावरचे डाग, केस गळणे, वजन कमी करणे आणि बदलत्या शैलीनूसार फीट राहणे यासाठी माझा सल्ला घेऊन उपचार घेत असतात असं म्हात्रे म्हणाल्या.

वैद्यकीय आणि नैसर्गिक उपचारानंतर रूग्णांवरती २२ वर्षांच्या कालावधी मध्ये काणताही साईड इफेक्ट झाला नाही. तसेच उपचारानंतर रूग्ण खूष होतात. असंही म्हात्रे त्यांनी सांगितलं. विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी अचूक उत्तरेही दिली.

Sunday, 18 March 2018

ज्येष्ठ नागरिकांना वयोपरत्वे येणा-या अपंगत्वाचे तपासणी शिबीर


वयोश्री योजने अंतर्गत साहित्य वाटप

सामाजिक न्याय एवं अधिकरीता मंत्रालय, भारत सरकार भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलिम्को) कानपूर जिल्हा परिषद, पुणे जिल्हा प्रशासन, पुणे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वयोश्री योजने अंतर्गत ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना वयोपरत्वे येणा-या अपंगत्वाचे तपासणी शिबीर ९ दिवसांचे होणार आहे.

२० मार्च खडकवासला, २१ मार्च हवेली, २२ मार्च पुरंदर, २३ मार्च बारामती, २४ मार्च इंदापूर, २५ मार्च दौंड, २६ मार्च भोर, २७ मार्च वेल्हा आणि २८ मार्च मुळशी या पध्दतीने शिबीर होईल. चालण्याची काठी, आधार काठी (कुबडी), तिपाई काठी, कवळी चष्मे, ऐकण्याचे यंत्र, स्वयंचलित कृत्रिम दांडी आणि चाकाची खुर्ची इत्यादी साहित्याचं वाटप शिबीरामध्ये तालुका ग्रामीण रूग्णालयांमध्ये करण्यात येणार आहे. आरोग्य तपासणीची वेळ - (सकाळी १० ते सायंकाळी ६ )

वयोश्री योजनेसाठी खालील कोणत्याही एका अटीची पूर्तता आणि आधार कार्ड आवश्यक आहे.
१. ग्रामसभेतील गरिबातील गरिब दाखला.
२. १ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या तहसीलदाराचा दाखला.
३. प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी असलेला दाखला.
४. कलेक्टर मार्फत असलेल्या इंदिरा गांधी पेन्शन लाभार्थी योजनेचा दाखला.
५. संजय गांधी निराधार योजना लाभार्थी दाखला.
६. दारिद्र्य रेषेखालील दाखला

Saturday, 17 March 2018

‘चित्रपट चावडी’ तर्फे चित्रपटप्रेमींसाठी शनिवारी ‘द एलिफंट मॅन’

नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार १७ मार्च २०१८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध अमेरीकन दिग्दर्शक डेव्हीड लींच यांचा ‘द एलिफंट मॅन’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वासलॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक- ४२२०१३ येथे दाखविण्यात येणार आहे.
दिग्दर्शक डेव्हीड लिंच सत्यघटनेवर आधारीत चित्रपटात मानवी देहाचा सोहळाच साजरा करतो. देह, मन, बुद्धी आणि लोकमनातील दृढ संकल्पनांना छेद देत तो एका विद्रुप शरीराच्या माणसाची गोष्ट सांगतो. ह्या ‘एलिफंट मॅन’ ची गाठ एकोणाविसाव्या शतकातील व्हिक्टोरीयन इंग्लडमधील एका डॉक्टरशी पडते. सौंदर्य, विद्रुपता, प्रेम, सहवेदना, तिरस्कार अशा संमिश्र भावनांचा पटच ह्या चित्रपटात उलगडतो.
डेव्हीड लींच खरंतर प्रथम चित्रकार व नंतर चित्रपट दिग्दर्शक त्याच्या चित्रपटातील विलक्षण चित्र व्यवस्था मानवी शरीराचे एक वेगळेच ‘दर्शन’ गूढ, अतिवास्तव वातावरण निर्मिती, अस्वस्थता आणि मानवी व्यवहारांचा अजब खेळ एका वेगळ्याच जगात घेऊन जातो. ‘द एलिफंट मॅन’ १९८० मध्ये अमेरीका येथे प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी १२४ मिनीटांचा आहे.
‘द एलिफंट मॅन’ हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

Friday, 16 March 2018

'विज्ञानगंगा'चे चोविसावे पुष्प संपन्न

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत चोविसावे पुष्प श्री. ऋषिकेश जोगळेकर यांचे 'अतिनवतारा' याविषयावर व्याख्यानाचे आयोजन चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर नरिमन पॉईंट, मुंबई येथे करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जोगळेकर यांनी स्टीफन हॉकिंग यांच्याबाबत लोकांना थोडक्यात माहिती सांगितली. हॉकिंग यांना न्यूरॉन सारखा भयानक आजार झालेला असतानाही त्यांनी केलेल्या कार्याला सलाम करायला हवा असे जोगळेकर म्हणाले. त्यानंतर उपस्थित असलेल्या लोकांनी हॉकिंग यांना श्रद्धांजली वाहिली.

जोगळेकर यांनी अतिनवतारा म्हणजे नेमकं काय, त्याचं नेमकं कार्य काय आहे, त्याचा उपयोग काय, त्याच वजन किती असतं याबाबत विविध उदाहरणे देऊन उपस्थितांना समजावून सांगितले. अतिनवताराचे वैज्ञानिक दृष्टिकोन उपस्थितांना सांगितले.

Thursday, 15 March 2018

भाषा, साहित्य, संस्कृती : माझ्या पक्षाची भूमिका आणि धोरण विषयावर चर्चासत्र


मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीबाबत मराठी भाषिक समाजाचा निर्धारपूर्वक आणि सातत्यपूर्ण  दबाव निर्माण होण्याची गरज आहे.  विशेषतः आपले राजकीय पक्ष व जनप्रतिनिधी यांनी याबाबत सातत्याने जनतेला साक्षर व उद्‍बोधित करण्याची गरज आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी त्यादृष्टीने अधिक प्रयत्नशील आहेत. या कार्याला गती देण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भाषा, साहित्य, संस्कृती : माझ्या पक्षाची भूमिका आणि धोरण या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले आहे. चर्चासत्र शनिवारी  दिनांक २४ मार्च २०१८ दुपारी २.०० ते ४.०० या वेळेत समिती कक्ष, पाचवा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, नरीमन पोईंट, मुंबई येथे होईल.  

Wednesday, 14 March 2018

लोकशाही की कॉर्पोरेटशाही विषयावरती देसाईचे मार्गदर्शन

लोकशाही की कॉर्पोरेटशाही विषयावरती देसाईचे मार्गदर्शन

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद, एमजीएम वृत्तपत्र विद्या व जनसंपर्क महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजीत कार्यक्रमात लोकशाही की कॉर्पोरेटशाही या विषयावरती ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी लोकांना मार्गदर्शन केले.

यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन...


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र अंबाजोगाई आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने आज यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जयंती निमित्त प्रा.महादेव गव्हाणे यांचे 'आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते यशवंतराव चव्हाण' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

Tuesday, 13 March 2018

एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता या विषयावर मान्यवरांचे मार्गदर्शन


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विकास अध्ययन केंद्र, कोरो मुंबई आणि कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता या विषयावर चव्हाण सेंटर मध्ये राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विद्याताई चव्हाण, निशा शिवूरकर, आशा भिसे, दीप्ती राऊत, सुरेश शेळके आणि महेंद्र रोकडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक रेणुका कड यांनी केले. तर एकल महिला कौटुंबिक, सामाजिक प्रश्न, उपजीविका आणि अर्थिक स्थिती या विषयावर आशालता देशपांडे, भाग्यश्री रणदिवे आणि राम शेळके यांनी मार्गदर्शन केले. 'एकल महिला आणि शासकीय योजना' या विषयावर विजय जाधव यांनी मार्गदर्शन केले. 'भटके विमुक्त समाजातील एकल महिला या विषयावर वैशाली भांडवलकर आणि पल्लवी रेणके त्यांना आलेले अनुभव उपस्थितांना सांगितले. 'एकल महिला आणि लैंगिक शोषण' या विषयावर मनीषा तोकले यांनी मार्गदर्शन केले. 'एकल महिलांच्या पाल्यांचे प्रश्न' या विषयावर करूणा महांतारे यांनी मार्गदर्शन केले. शहरी आणि ग्रामीण भागातील अविवाहीत एकल महिलांचे प्रश्न या विषयावर दिप्ती राऊत यांनी मोजक्या शब्दात मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला आलेल्या लोकांचे गट तयार करून चर्चा करण्यास सांगितले. त्यानंतर प्रमुख मार्गदर्शन निशा शिवूरकर यांनी केले तर अध्यक्षीय समारोप आमदार विद्या चव्हाण यांनी केले. पुढील कृती आराखडा आणि आभारप्रदर्शन दत्ता बाळसराफ यांनी केले.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरास सुरूवात


यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र अमहदनगर आणि कृषी महाविद्यालय सोनाई यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरास सुरूवात करून जयंती साजरी केली. 

Wednesday, 7 March 2018

साहित्यकारण आणि राजकारण विषयावर मुक्त संवाद

ठाणे : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र ठाणे आणि कोकण मराठी साहित्य परिषद (मध्यवर्ती) यांच्या संयुक्त विद्यमाने विंदा करंदीकर जीवनगौरव सन्मान प्राप्त पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा सत्कार आणि ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांचा मधुभाईंशी साहित्यकारण आणि राजकारण विषयावर मुक्त संवादाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम १२ मार्च २०१८ रोजी सायंकाळी ६ ते ८ यावेळेत सहयोग मंदिर सभागृह, २ रा मजला, घंटाळी, ठाणे (पश्चिम) होणार आहे. नमिता कीर, अमोल नाले, महेश केळुसकर आणि मुरलीधर नाले यांनी कार्यक्रमाला अधिक संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

'लोकशाही की कॉर्पोरेटशाही ?' विषयावरती व्याख्यान

औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद व एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 'लोकशाही की कॉर्पोरेटशाही ?' या विषयावरती १२ मार्च २०१८ रोजी, दुपारी १२ वाजता, आईन्स्टाईन सभागृह, जेएनईसी महाविद्यालय, एमजीएम परिसर, औरंगाबाद येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते यशवंतराव चव्हाण यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त 'लोकशाही की कॉर्पोरेटशाही ?'या विषयावरती ज्येष्ठ पत्रकार मा. हेमंत देसाई ' मार्गदर्शन करणार आहेत. तर औरंगाबाद विभागीय केंद्राचे अध्यक्ष मा. अंकुशराव कदम यांनी कार्यक्रमाला लोकांनी अधिक संख्येने उपस्थित असे आवाहन केले आहे.

Monday, 5 March 2018

'विज्ञानगंगा'चे चोविसावे पुष्प...'अतिनवतारा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत चोविसावे पुष्प श्री. ऋषिकेश जोगळेकर यांचे 'अतिनवतारा' या विषयावर दिनांक १६ मार्च २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर नरिमन पॉईंट, मुंबई येथे गुंफणार आहेत. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती.

वृद्धत्व विरोधी वैद्यकीय व नैसर्गिक उपचार याविषयी मोफत व्याख्यान

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठतर्फे वृद्धत्व विरोधी वैद्यकीय व नैसर्गिक  उपचार याविषयी मोफत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिनांक २२ मार्च २०१८ रोजी गुरुवारी दुपारी २ ते ५ यावेळेत सांस्कृतिक सभागृह, ४था माळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, सचिवालय जिमखाना जवळ नरीमन पॉईटं, मुंबई येथे होईल. या कार्यक्रमात प्रख्यात मेडीकल कॉस्मोलोजीस्ट डॉ पूर्णिमा म्हात्रे या मार्गदर्शन करतील. अधिक माहितीसाठी संपर्क संजना पवार -२२०४५४६० (विस्तारित २४४) ८२९१४१६२१६ ( वेळ ११ ते ६)