Thursday, 12 March 2020

कोरोना : उद्योगांसाठी संकट नव्हे संधी

सुनिल किर्दक यांचे प्रतिपादन, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन
औरंगाबाद दि. १२ : कोरोना व्हायरसमुळे जागतिक बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला असून, भारताने त्या संदर्भात चिंता करण्याऐवजी आपल्या औद्योगिक धोरणात सकारात्मक बदल केल्यास चीनला पर्याय म्हणून भारत पुढे येऊ शकतो, असे प्रतिपादन उद्योजक सुनील किर्दक यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानस, मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद आणि एमजीएम जनसंवाद आणि वृत्तपत्रविद्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात किर्दक बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय केंद्राचे अध्यक्ष तथा एमजीएम विद्यापीठाचे कुलपती मा. अंकुशराव कदम, तर प्रमुख पाहुणे म्हणून एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. सुधीर गव्हाणे यांची उपस्थिती होती. 'व्यापार उद्योगाला कोरोना व्हायरसचा फायदा की तोटाया विषयावर सुनील किर्दक यांनी मांडणी केली. ते म्हणाले की, कुठलीही साथ कोणत्याही देशात असली तरी त्यात कुणाचाही फायदा बघणे योग्य नाही. जागतिक बाजारपेठेवर चीनचे वर्चस्व असून जवळपास सर्वच देश चीनवर च्या उत्पादनांवर अवलंबून आहेत. कोरोनाच्या साथीमुळे या देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणे साहजिक आहे. भारताच्या दृष्टीने विचार केल्यास चीनला पर्याय म्हणून भारत पुढे येऊ शकतो, मात्र त्यासाठी औद्योगिक धोरणात मोठे बदल करून त्या दृष्टीने पावले उचलावे लागतील. चीनची उत्पादन क्षमता आणि पुरवठा हे स्वस्त दराच्या भुमिकेवर अवलंबून आहेत. त्या स्पर्धेत उतरण्यासाठी आपण मागणी आणि आपल्या क्षमतेचा विचार करून धोरणांची आखणी करायला हवी. मात्र हे एका रात्रीत होणे शक्य नसून भविष्याच्या दृष्टीने ही संधी समजून घेत आताच पावले उचलायला हवीत.
यावेळी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कर्तृत्वावर प्रकाशझोत टाकला. यशवंतराव चव्हाण यांनी सर्व समाजाचा विचार करून घेतलेले निर्णय हे दूरगामी परिणाम करणारे होते, हे आता सिद्ध झाले आहे, असे ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोपात अंकुशराव कदम यांनी यशवंतराव चव्हाण यांचे व्यक्तीमत्त्व आणि कर्तृत्त्व समजून घेण्यासाठी त्यांच्यावरील ग्रंथांचा अभ्यास करावा, असे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर विभागीय केंद्राचे सचिव नीलेश राऊत, प्रा. डॉ. रेखा शेळके, सुहास तेंडुलकर, शिव कदम, राजकुमार तांगडे यांची उपस्थिती होती. प्रारंभी नीलेश राऊत यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेश देशमुख यांनी केले.
No comments:

Post a Comment