Monday 5 August 2019

सौमित्र लिखित ‘बाउल’ काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन



वास्तवाच्या शोधासाठी भटकावेच लागते : इंद्रजित भालेराव
वास्तवाचा शोध घेण्यासाठी भटकावेच लागते. त्याशिवाय जग कळत नाही. प्रत्येक कवी हा बाउल असतो. जो बाउल नसतो तो कवी होऊच शकत नाही. यानुसार आतापर्यंतच्या कोणत्याही महान कवीचे अंतरंग उलगडून पाहिल्यास त्याच्यातील भटकेपणा, बाउलपणा दिसून येईल, असे प्रतिपादन कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद, पॉप्युलर प्रकाशन आणि एमजीएम संस्थेतर्फे प्रख्यात कवी तथा अभिनेते सौमीत्र उर्फ किशोर कदम लिखित बाउलया काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा एमजीएम संस्थेच्या रुक्मिणी सभागृहात शनिवारी (दि. ३ ऑगस्ट) सायंकाळी साडेसहा वाजता रंगला. अध्यक्षस्थानी विभागीय केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम होते. व्यासपीठावर कवी दासू वैद्य, सहकारी संस्था सहनिबंधक संजय राऊत, पॉप्युलर प्रकाशनच्या संपादक अस्मिता मोहिते, डॉ. श्रीरंग देशपांडे, सुहास तेंडुलकर, डॉ. रेखा शेळके यांची उपस्थिती होती. यावेळी प्रा. भालेराव यांनी बाउलकाव्यसंग्रहावर भाष्ये केले. रवींद्रनाथ टागोरांपासून आताच्या सौमित्रपर्यंत प्रत्येक कवी हा बाउल आहे. प्रत्येकाने भटकंती करीतच वास्तव जीवनाचे चित्रण आपल्या कवितेत चितारले आहे. आपले संतही बाउलच होते, बाउलांचा देश आहे. सगळे साधू बाउलच होते. कवीही साधूच असतो. जो कवी साधू नसतो, तो संधीसाधू असतो, असेही भालेराव यांनी सांगितले.
यावेळी सौमित्र म्हणाले, १७ वर्षांनंतर काव्यसंग्रह येत आहे. पहिल्या काव्यसंग्रहाच्या वेळी असणारी धडपड आताही आहे. ही धडपडच आताही आहे. ही धडपडच जिवंत असल्याचे लक्षण असल्याचे सांगितले. उपनिबंधक संजय राऊत यांनी सौमित्र यांच्या विषयची स्वतःचे अनुभव सांगितले. अध्यक्षीय समारोप अंकुशराव कदम यांनी केला. तत्पूर्वी प्रास्ताविकात प्रकाशक अस्मिता मोहिते यांनी काव्यसंग्रहाविषयींचे नाते स्पष्ट केले. सुरवातीला महेश देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन महेश अचिंतलवार यांनी केले, तर दिग्दर्शक शिव कदम यांनी आभार मानले.
दुःख लपवायला कविताचे कामी येते
चित्रपटात किशोर अभिनेता म्हणून उत्तम आहे; पण त्याच्यातील सच्चा सौमित्र कवितांमध्येच उतरला आहे. किशोर अभिनेता म्हणून नव्हे तर सौमित्र बनून अधिक लोकांपर्यंत पोहोचला असल्याचे मतही प्रा. भालेराव यांनी व्यक्त केले. जोयर्पंत प्राध्यापक वर्गात शिकविण्यासाठी जाऊपर्यंत त्याच्या छातीत धडधड होते. तोपर्यंत तो शिक्षक असतो. जेव्हा ती धडधड थांबते, तेव्हा तो निर्ढावलेला असतो, कवीचेही तसेच असते, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्राचे सचिव नीलेश राऊत, सुबोध जाधव, गणेश घुले, मंगेश निरंतर, दीपक जाधव, गिरीश जोशी, श्रीराम पोतदार, स्वप्नील जोशी, उमेश राऊत, निखिल भालेराव, राजेंद्र वाळके, डॉ. रुपेश मोरे, श्रीकांत देशपांडे आदींनी परिश्रम घेतले.






No comments:

Post a Comment