Thursday, 12 March 2020

गझल कवितांतून जीवन समृद्ध करण्याचे सामर्थ्य - प्रदीप निफाडकर


नाशिक (दि. ११) : मराठी-उर्दू-हिंदी शायरांनी जगण्याचं प्रतिबिंब आपल्या लेखनातून तरलपणे मांडले आणि साहित्य विश्व समृद्ध केले. सर्वसामान्यांच्या कष्टप्रद जीवनाला चव दिली, आशय दिला. शब्दांच्या विलक्षण छटा आणि जीवनाचे तत्वज्ञान दिले. माधव ज्युलियन, सुरेश भट, फैज, मीर, हसरत मोहानी, गुलाम अली शायरांच्या  एकाहून एक सरस गझलांतून गझलकार प्रदीप निफाडकरांनी सायंकाळ सोनेरी केली. निमित्त होते गझलदीपमैफिलीचे. उष:काल होता होता काळरात्र झाली, आत्ता पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली...  अशी चेतना जागवणारे सुरेश भट आणि तितक्याच तरलपणे प्रेमाची महतीही भटांनी विशद केली. कवी असतो म्हणून झाडं बहरतात अशा आशावाद निफाडकरांनी गझलेतून मांडला. सूर्याला सकाळी उठवण्याचे काम किंवा चंद्राला निजवण्याचे काम कवी आपल्या शब्दांतून करतो आणि आपले वेगळेपण व्यक्त करतो, प्रतिभेची ताकद व शक्यता व्यक्त करतो. कवीचं जगणं असो किंवा सामान्यांची जगरहाटीची वाताहातही कवी प्रभावीपणे शब्दांतून मांडतो व ते नंतर जीवनाचे सार होते.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, सारस्वत बँक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे थोर शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या १०७ व्या जयंतीच्या पुर्वसंध्येला सुप्रसिद्ध गझलकार प्रदीप निफाडकर यांच्या गझलदीपया कार्यक्रमाचे आयोजन विश्वास हब येथे करण्यात आले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकचे पोलीस अधिक्षक सुनिल कडासने म्हणाले की,भाषा ही माणसांमधील पूल आहे. त्यातून माणूस जोडण्याचे काम होते. एकमेकांविषयी आपुलकी, विश्वास निर्माण होतो. भाषा ही आईसारखीच असून ती प्रेम, वात्सल्य यांचा अनोखा मिलाफ आहे. मराठी, हिंदी, उर्दू यांच्या समन्वयातून जीवनाचा नवा अर्थ रसिकांना सापडत असतो. अनेक शायरांनी एकात्मभावाची, समाजनतेची शिकवण दिली व नवा विचार दिला. यावेळी श्री. कडासने यांनी उर्दू, हिंदी भाषेच्या बंधूत्वाची ओळख विविध शेर व कवितांतून करून दिली आणि रसिकांची वाहवा मिळवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले. प्रास्ताविक व आभार प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले. सुनिल कडासने, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकचे पोलीस अधिक्षक यांचा परिचय डॉ. हरीभाऊ कुलकर्णी यांनी केला. सुनिल कडासने यांचा सन्मान बी. एस. एन. एल. चे महाप्रबंधक नितीन महाजन यांनी केला. प्रदीप निफाडकर यांचा परिचय यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे नाशिकचे कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा यांनी केला. तसेच प्रदीप निफाडकर यांचा सन्मान डॉ. मनोज शिंपी यांच्या हस्ते करण्यात आला. मा. डॉ. सुभाष पवार यांचा सन्मान प्रदीप निफाडकर यांच्या हस्ते करण्यात आला. 
कार्यक्रमास कार्यक्रमास विश्वास ज्ञान प्रबोधिनी व रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. मनोज शिंपी, प्रतिष्ठानचे सदस्य  नितीन ठाकरे, बी. एस. एन. एल. चे महाप्रबंधक नितीन महाजन, विश्वास बँकेचे संचालक विक्रम उगले, डॉ. वासुदेव भेंडे, विश्वास को-ऑप. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद पाटील, कवी संजय चौधरी, नरेश महाजन, सोमनाथ साखरे, सुशिला संकलेचा, अश्विनी बोरस्ते, अ‍ॅड. मिलींद चिंधडे, विलास पंचभाई, रघुनाथ साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment