Friday, 28 February 2020

अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त विचारमंथन...


लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र सोलापूर, कॉ. अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी समिती, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊंचे जीवन व साहित्य या विषयावर विचारमंथनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम शनिवार दिनांक २९ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ५.३० वाजता छत्रपती भवन, सोलापूर येथे प्रा. कॉ. तानाजी ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई चे कार्यक्रम संयोजक दत्ता बाळसराफ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्लीचे मिलिंद आवाड व बाबुराव गुरव हे प्रमुख वक्ते असणार आहेत.


Tuesday, 25 February 2020

केंद्रीय अर्थसंकल्पात समतोल नाही – अर्थतज्ञ राजगोपाल मिनियार


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र सोलापुर, श्रमिक पत्रकार संघ सोलापुर आणि मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. सदर चर्चेत ज्येष्ठ लेखापरीक्षक राजगोपाल मिनियार, बांधकाम व्यावसायिक राजेंद्र कासवा, टेक्सटाईल फाउंडेशनचे राजेश गोसकी, यंत्रमाग धारक संघाचे पेंटप्पा गडम, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजु राठी यांनी आपले विचार मांडले.
राजेंद्र कासवा यांनी GST हा विषय अर्थसंकल्पाचा भाग नाही परंतु तो किती घाइने आणला तसेच सदर कायद्याचा अर्थ एक राष्ट्र एक करप्रणाली असा असताना कोणकोणते कर आजही लागु आहेत. तसेच सदर कायद्यात होणारे सततचे बदल यामुळे होणारा त्रास यावर आपले विचार मांडले. तर राजगोपाल मिनियार यांनी सार्वजनिक न्यासा साठी घेतलेली खबरदारी योग्य कि अयोग्य तसेच करप्रणाली मध्ये केलेली दिशाभूल विषद केली. वस्त्रउद्योगासाठी सरकारच्या नव्या धोरणात कोणत्या बाबी असल्या पाहिजेत यावर विचार मांडले. तर राजु राठी यांनी तरुणांना करप्रणाली समजावून सांगितली. सदर चर्चेत व्यापारी, पत्रकार  व वाणिज्य व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थी सहभागी झाले होते.

Monday, 24 February 2020

एक अस्सल नाट्यानुभव ‘शब्दांची रोजनिशी’


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नवी मुंबई, मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ, स्त्री मुक्ती संघटना, वी नीड यू सोसायटी, अन्वय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शब्दांची रोजनिशीचे आयोजन करण्यात आले आहे.
नाटकघर, पुणे निर्मित, रामू रामनाथन लिखित, अतुल पेठे दिगदर्शित शब्दांची रोजनिशी ही कलाकृती केतकी थत्ते, अतुल पेठे सोमवार दिनांक २ मार्च २०२० रोजी सायंकाळी ६.३० वाजता मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ सभागृह, सेक्टर ६, वाशी नवी मुंबई येथे सादर करणार आहेत.

मा. शरद काळे यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सत्कार सोहळा...


सहस्त्रचंद्रदर्शन म्हणजे त्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात १००० वेळा पूर्ण चंद्र पाहिला आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे यांचा हा विशेष सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा रंगस्वर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे संपन्न झाला.
शरद काळे यांचे बालपण आणि शालेय शिक्षण पुणे येथे झाले. १९६२ साली पुणे येथे MA गणित विषयात सुवर्ण पदक मिळवून १९६३ साली प्रशासकीय सेवेत दाखल झाले. १९७२ साली हवाई विद्यापिठातून एमबीए ची पदवी प्राप्त केली. शरद काळे हे १९६३ च्या महाराष्ट्र तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. कोल्हापूर जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गोवा मुख्यमंत्र्यांचे सचिव, उद्योग व नियोजन विभागाचे सचिव १९९१ १९९५ मुंबई महानगरपालिका आयुक्त, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे सचिव म्हणून सुद्धा त्यांनी काम सांभाळले आहे. प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर रिझर्व बँक, स्टाफ सिलेक्शन बोर्ड अशा राज्य सरकार आणि भारत सरकारच्या वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण संस्थांच्या समित्यांवरही त्यांनी काम पाहिलेले आहे.
शरद काळे  हे १९६३ साली प्रशासकीय सेवेत रुजू झाले. शरद काळे यांनी १९९८ पासून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कामकाजाची धुरा सांभाळली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान वेगवेगळे उपक्रम पार पाडत आहे.
या सोहळ्याच्या सुरूवातीला अंबरिश मिश्र यांनी साहिर लुधियानवी यांच्या गायनावरचा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष हेमंत टकले यांनी केले. त्यानंतर शरद पवार यांच्या हस्ते शरद काळे यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या मानपत्राचे वाचन दत्ता बाळसराफ यांनी केले. शरद काळे जवळून परिचित असलेले यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, त्यांच्या कन्या सुचित्रा दळवी, ज्येष्ठ शल्यचिकित्सक व लेखक रविन थत्ते यांनी त्यांच्या विषयी अनेक गोष्टींचा उलगडा केला.
शेवटी शरद काळे यांनी आपल्या कारकिर्दीतील, आयुष्यातील अनुभव सांगत मनोगत व्यक्त केले.

Saturday, 22 February 2020

मधुरा बेळे यांच्या स्वरांतून उलगडला जीवन जाणिवांचा आविष्कार


सूर विश्वास
नाशिक (दि. २२) : स्वरांचा अलवार आणि तितकाच सहज नाद, वातावरणातील आल्हाददायकता, सूर व शब्दातील नाते अलगद उलगडले जात होते. गीतांतून जगण्यासाठी लागणारी ऊर्जा निनादत होती. त्यात जवळच्या नात्याला दिलेली हाक आणि ईश्वरभक्तीही होती. सूर विश्वासच्या मैफीलीचे १३ वे पुष्प मधुरा बेळे यांनी गुंफले आणि स्वरांच्या एका वेगळ्या दुनियेची सफर घडवली.
मैफीलीची सुरूवात भैरव रागाने झाली. शब्द होते बालमवा मोरे सैय्यामनातील आर्तता आणि प्रेमाच्या व्यापक विचारांचे दर्शन समर्पण भावनेतून समोर आले. गायनातील सहजता व आर्त स्वरांनी मैफीलीला रंग चढला. त्यानंतर कुकुभ बिलावल-राग सादर केला. झपताल-घनघुमार होता. जाणिवांनी आतल्या उर्मीला दिलेली साद आनंदस्वरांची पर्वणीच होती. मैफीलीचा समारोप संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाने केली. पडिले दुर देशी, मज आठवे मानसीयातून आत्मानुभूती आणि ईश्वर भक्ती यांचा अनोखा संगम व्यक्त झाला. ही नव्या उन्मेषाने जगण्याची प्रार्थनाच होती.
रसिक कुलकर्णी (तबला), संस्कार जानोरकर (संवादिनी) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले. विश्वास ग्रृपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून, संकल्पना विनायक रानडे यांची आहे. सदर कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वास गार्डन, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे संपन्न झाला.
उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान सूरविश्वास मैफिलीत करण्यात येतो. त्यात नागपूर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय टायगरमॅन ह्या ट्रायथलॉन स्पर्धेत वयाच्या ६४ व्या वर्षी प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल डॉ. सुभाष पवार यांचा सन्मान विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इस्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. मनोज शिंपी यांनी केला. मधूरा बेळे यांचा सन्मान डॉ. विजयालक्ष्मी गणोरकर यांनी केला. रसिक कुलकर्णी यांचा सन्मान ओझर मर्चंट बँकेचे संचालक रत्नाकर कदम तर संस्कार जानोरकर यांचा सन्मान राहूल फाटे यांनी केला. स्वराली जोगळेकर यांचा सन्मान माधवबागच्या आरोग्य समन्वयक मार्केटींग हेड मधुरा गुर्जर-वाणी यांनी केला. पंडित अविराज तायडे यांचा सन्मान विश्वास ठाकूर यांनी केला.
कार्यक्रमात मनोगत व्यक्त करतांना पंडित अविराज तायडे म्हणाले की, सूरविश्वास म्हणजे स्वरांचा यज्ञ असून त्या माध्यमातून अनेक प्रतिभावंत कलावंतांना त्यांच्या प्रतिभेला व्यासपीठ मिळत आहे. त्यासाठी सर्वांनी कानसेन म्हणून आपले योगदान द्यावे.
Wednesday, 19 February 2020

क्लायमेट अँबॅसॅडर्स मुंबई –स्टॉकहोमचा समारोप सोहळा...


सृष्टीज्ञान संस्थेने क्लायमेट अँबॅसॅडर्स मुंबई स्टॉकहोम या प्रकल्पाचा २०१९ सालात राबवलेल्या उपक्रमांचा समारोप नुकताच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सहकार्याने संपन्न झाला. २००९ मध्ये मुंबईतीलच नव्हे तर महाराष्ट्रातील पहिला हवामान बदल विषयक शिक्षण आणि कृती प्रकल्प सुरु झाला. त्याला दहा वर्षे पूर्ण झाली. अनुयोग विद्यालय, प्रज्ञाबोधिनी हायस्कूल, आमची शाळा, एस आय इ एस डॉ. एपीजे अब्दुल कलाम मेमोरियल हायस्कूल आणि आर. जे. कॉलेज या प्रकल्पांमध्ये सहभागी महाविद्यालय आणि शाळांचा त्यांच्या सातत्यपूर्ण उपक्रमशीलतेचा गौरव करण्यात आला. या परिषदेमध्ये विद्यार्थ्यांनी हवामान बदल विषयक जलसंवर्धन, सौर उर्जा, कचरा व्यवस्थापन, हवामान पूरक सकस आहार यासारख्या विषयांवर केलेले प्रकल्प मांडले होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे यांनी या प्रकल्प प्रदर्शनाचे उद्घाटन केले.
त्याचबरोबर जलसंवर्धन विषयक नाटिका, भरड धान्यधारित लोकनाट्यातील बतावणी आणि पर्यावरण पूरक परीधानांचा फॅशन शो यासारख्या विविध माध्यमातून विद्यार्थ्यांनी हवामान बदल विषयक आपली जाणीव व्यक्त केली. अनुयोग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाणी विषयावर जल है तो कल है हे नाटक सादर केले. त्यानंतर आमची शाळा ची विद्यार्थिनी प्रतिक्षा ढेरे हिने पाण्याविना या विषयावर तिचे म्हणण व्यक्त केले. आमची शाळा च्या संगीत शिक्षिका यांनी वाघांच मनोगत त्यांच्या वाघांची कैफियत या कवितेतून मांडल.
आपण या संपूर्ण अन्नसाखळीमध्ये स्वत:ला अग्रस्थानी न ठेवता या अन्नसाखळीचा एक भाग म्हणून वावरलो, तर प्राण्यांना अशी कैफियत मांडावी लागणार नाही. कशा प्रकारे आपण आपल्या पर्यावरणाचं संवर्धन करू शकतो, हे आमची शाळा च्या विद्यार्थिंनींनी एका गाण्याच्या माध्यमातून सादर केले.
या प्रकल्पात सहभागी शिक्षक आणि विद्यार्थी यांनी आपली मनोगते व्यक्त केली आणि राबवलेल्या उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले. फ्युचर अर्थ स्वीडन या संस्थेच्या फ्रिडा आणि ज्युलिया या प्रतिनिधींनी या प्रकल्पातील उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच स्वीडनच्या तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या सेकंड हँड वस्तूंच्या दुकानाबद्दल माहिती दिली. प्रतिष्ठानचे कार्यक्रम संयोजक दत्ता बाळसराफ यांनी आपली जीवनशैली ही पर्यावरण पूरक असली पाहिजे, यावर आपल्या भाषणात भर दिला. शेवटी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा सुप्रियाताई सुळे, यांच्या हस्ते शाळातील विद्यार्थी आणि शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

आठवे अखिल भारतीय दिव्यांग साहित्य संमेलन २२ व २३ फेब्रुवारीला...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, अपंग हक्क विभाग च्या सहकार्याने साहित्य व सांस्कृतिक मंडळ, पुणे तर्फे आठवे अखिल भारतीय दिव्यांग साहित्य संमेलन २०२० शनिवार दि. २२ व रविवार २३ फेब्रुवारी २०२० रोजी स्वामी विरजानंद साहित्य नगरी, बाल कल्याण संस्था, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.

आठवे अखिल भारतीय दिव्यांग साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका डॉ. कुसुमलता मलिक यांची तर संमेलन उद्घाटक म्हणून ज्येष्ठ संस्कृत पंडित डॉ. दयाल सिंह पंवार यांची निवड करण्यात आली आहे. तसेच प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत.
दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात परिसंवाद, कवीसंमेलन, कथाकथन, सांस्कृतिक कार्यक्रम, यशस्वी दिव्यांगांच्या यशोगाथा तसेच साहित्य व सांस्कृतिक मंडळाच्या स्मरणिकेचे व दिव्यांग साहित्यिकांच्या साहित्याचे प्रकाशन होणार आहे.
अधिक माहितीसाठी Email : contact@divyangsahitya.org
                                ९९६०१३२२०७ / ९५०३१९८९१९ वर संपर्क करावा.हवामान बदलाचा धोका भारताला जगात पाचवा – अतुल देऊळगावकर


Click Here, to watch full video...

आजपर्यंत आपण अनेक दुष्काळ पाहिले. याच वर्षी महाराष्ट्राच्या अनेक भागात आलेल्या पुरामुळे आपल्याला ओला दुष्काळ परिचित झाला. हाच विषय धरून आपण हे रोखण्यासाठी काय करू शकतो यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगा कार्यक्रमाअंतर्गत अतुल देऊळगावकर यांचे महाराष्ट्रातील दुष्काळ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
दुष्काळ म्हणजे काय? यंदा महाराष्ट्राने दोन्ही दुष्काळ अनुभवले आहेत. दुष्काळाचे दुष्परिणाम काय? दुष्काळाचा शेती, जमीन, पाणी आणिु मानवतेवर काय परिणाम होतो, कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते याची माहिती अतुल देऊळगावकर यांनी आपल्या व्याख्यानातून दिली.
ते पुढे म्हणाले की, अतिवृष्टीमुळे पुराचा धोका निर्माण होतो. सध्या चालू असलेली बेसुमार वृक्षतोड, पाण्याचा अपव्यय, मानवी चुकांमुळे हवामान बदलात वाढ झालेली आहे. आणि याचाच परिणाम म्हणून आपल्यासमोर ओला आणि सुका दुष्काळासारखी संकट समोर येऊन ठेपलेली आहेत.
परदेशात काटेकोर शेती, रोबोट वापरून, विना माती शेती अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केली जाते आहे. भारतात अजूनही अशा तंत्रज्ञानाचा विकास झालेला नाही. अशा तंत्रज्ञानाचा वापर करून आपण भर पावसात सुद्धा टिकेल, अशी शेती करू शकतो. अशा तंत्रज्ञानाची खरी गरज आहे, यामुळे शेतीमुळे होणाऱ्या आत्महत्या होणार नाहीत. महाराष्ट्रात १९९५ पासून शेतकरी विधवांची संख्या ७५,००० आहे. आपण वापरत असलेल्या गोष्टींमध्ये कार्बन आणि वॉटर फुटप्रिंट किती आहेत, त्या आपण कशा कमी करू शकतो, याबाबत आपण विचार केला पाहिजे. अहमदनगर भोजापुरी येथे १९९८ ते २००० सालामध्ये सलग समतोल चराचा वापर करून अवघ्या २०० मिलिमिटर पावसात लाखो झाडे लावली गेली. अशा उपाययोजनेचा वापर करून आपण पाणी साठवणीत वाढ करू शकतो, असेही ते म्हणाले.

Tuesday, 18 February 2020

मराठी ग्रंथ संग्रहालयात रंगले ‘बहुभाषिक काव्यसंमेलन’


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, ठाणे जिल्हा केंद्राच्या वतीने बहुभाषा काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. महेश केळुसकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या संमेलनात शशिकांत तिरोडकर यांनी त्यांची 'मिठी' नदीवरील कविता सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. दिलीप सावंत यांनी त्यांच्या मराठी कवितांचं सादरीकरण केले. तर हरी मृदुल यांनी हिंदीतल्या ''चादर', 'खेल ही खेल में', 'देश की खातिर', 'अमेरिका', 'जेब में गांधी मसलन पांच सौ का नोट', 'मटर की फलियों के बहाने', 'और' अश्या सद्य परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या कविता सादर केल्या. प्राजक्ता सामंत यांनी मालवणी भाषेतून सौ. राजूल भानुशाली यांनी गुजरातीतून तर फिलोमीना यांनी मी जर मुलगा असती तर याविषयावरील कोंकणी कवितेने रसिकांना मंत्रमुग्ध केलं. गझलकार गोविंद नाईक यांनी मराठी गझल सादर करून श्रोत्यांची मन जिंकली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर नाले, उपाध्यक्ष  डॉ. महेश केळुसकर, खजिनदार जवकर, सदस्य श्याम घोरपडे, डॉ. वसुधा सहस्त्रबुध्ये तसेच निमंत्रित मान्यवरांच्या साक्षीने स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर संस्थेचे सचिव श्री. अमोल नाले यांनी उपस्थितांना प्रतिष्ठानच्या ध्येय धोरणांचा तसेच बहुभाषा काव्यसंमेलनासाठी आलेल्या निमंत्रित पाहुण्यांचा थोडक्यात परिचय करून दिला. या सर्व मान्यवरांच संस्थेच्या कार्यकरिणीकडून संस्थेचे अध्यक्ष श्री. मुरलीधर नाले यांनी सत्कार केला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर यांनी केले.
सदर कार्यक्रमास रसिकांनी आवर्जून उपस्थिती लावली असल्यामुळे कार्यक्रम शेवटपर्यंत रंगत गेला. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी, गझलकार चंद्रशेखर सानेकर, पत्रकार आणि रसिक आवर्जून हजर होते. सरतेशेवटी संस्थेचे सचिव अमोल नाले यांनी सर्वांचे आभार मानून राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.मधुरा बेळे यांच्या गायनाचे आयोजन...

सूरविश्वास
नाशिक ; दि. १९ : कलाकारांच्या अविष्काराला हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी सूर विश्वासहा अनोखा उपक्रम विश्वास गृ्रप तर्फे सुरू करण्यात आला आहे. विश्वास ग्रृपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून, संकल्पना विनायक रानडे यांची आहे.
शनिवार दि. २२ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ६.३० वा. मधुरा बेळे यांच्या गायनाचे तेरावे पुष्प गुंफले जाणार आहे. रसिक कुलकर्णी (तबला), संस्कार जानोरकर (संवादिनी) हे साथसंगत करणार आहेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. स्मिता मालपुरे करणार आहेत.
विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
मधुरा बेळे यांनी कै. भास्करराव वाईकर यांच्याकडे संगीत विशारद पर्यंतचे शिक्षण घेतले असून नंतर बी. ए. (संगीत विशारद) पूर्ण केले आहे. पं. अविराज तायडे यांचे मार्गदर्शन घेतल्यानंतर डॉ. अलका देव-मारुलकर यांचेकडे गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेतलेले आहे. सध्या मंजिरी असनारे-केळकर यांचेकडे संगीत साधना सुरु आहे.
संगीतातील प्रयोगशील अभ्यासासाठी भारत सरकारची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. तसेच गानवर्धन संस्थेतर्फे यमुनादेवी शहाणे शास्त्रीय संगीत शिष्यवृत्ती मिळाली आहे. भारतात अनेक ठिकाणी मैफिलीत गायन करत असतात. त्यात नेहरु सेंटर, मुंबईतर्फे कल की खोजमैफल, मल्हार महोत्सव, पारनेर महाराज संगीत महोत्सव, ऋग्वेद तबला अकादमीतर्फे गुरुपौर्णिमा महोत्सव, गोपीकृष्ण महोत्सव तसेच अनेक सन्मान त्यांना प्राप्त झाले असून त्यात मेलडी क्वीन सन्मान, पं. हृदयनाथ मंगेशकर सन्मान, नादब्रह्म सन्मान, सुर-साधना सन्मान, देशदूत गुणवंत पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांनी ईशान संगीत अकादमी स्थापन केली असून शास्त्रीय संगीतात रुची असणार्‍या गायकांना गुरुकुल पद्धतीने शिक्षण दिले जाते.
सदर कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वास ठाकूर व विनायक रानडे यांनी केले आहे.

Monday, 17 February 2020

डॉ. चंद्रकांत पाटील यांची प्रकट मुलाखत...


साहित्य-संवाद
मुंबई ; दि. १७ : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई तर्फे डॉ. चंद्रकांत पाटील यांच्या मुलाखतीचं आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दिनांक ६ मार्च २०२० रोजी दुपारी ३ वाजता, रंगस्वर सभागृह, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई, नरिमन पॉइंट, मुंबई ४०० ०२१ येथे ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि अभ्यासक सुनील तांबे मुलाखत घेणार आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी वनस्पतीशास्त्रात पदव्युत्तर पदवी संपादन केले असून बायोकेमिस्ट्रीया विषयात पी. एच. डी. केली आहे. मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये त्यांची कविता प्रकाशित झाली आहे. भीष्म सहानी यांचीतमसही कादंबरी, चंद्रकांत देवताले, पाश इत्यादी नामवंत कवींचे मराठी अनुवाद, मराठी कवितांचे हिंदी अनुवाद, परदेशातील कवींच्या निवडक कवितांचे मराठी अनुवाद, मराठी आणि हिंदी भाषेत लिहीलेली साहित्य समीक्षा, वर्तमानपत्रांतून स्तंभ लेखन असा त्यांच्या कार्याचा व्याप आहे. हिंदीतील अखिल भारतीय पातळीवरील महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा 'महाराष्ट्र भारतीहा सर्वोच्च पुरस्कार त्यांना २०१२ साली देण्यात आला. मध्य प्रदेश शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने देण्यात येणारा ‘राष्ट्रीय हिंदी सन्मान’ हा पुरस्कार त्यांना १४ सप्टेंबर, २०१९ रोजी प्रदान करण्यात आला. अहिंदी भाषिक लेखकांनी आपल्या सृजनशील लेखनातून हिंदी भाषेला समृद्ध केले आहे, अशा ज्येष्ठ आणि लिहित्या लेखकांसाठी हा सन्मान गेल्या तीन वर्षांपासून दिला जातो. हिंदी आणि मराठी भाषेत चंद्रकांत पाटील यांची आजवर ५० पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.
समकालीन
 कविता, कादंबरी, समीक्षा यांचा साक्षेपी आढावा घेणार्‍या या कार्यक्रमाला आपण अवश्य उपस्थित राहावे, ही विनंती.


Sunday, 16 February 2020

क्लायमेट अँबॅसॅडर्स विद्यार्थ्यांची परिषद...


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, वसुंधरा पर्यावरण कक्ष तर्फे १८ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी १० ते १ या वेळेत क्लायमेट अँबॅसॅडर्स विद्यार्थ्यांची परिषद आयोजित करण्यात आली आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, सरचिटणीस शरद काळे, कोषाध्यक्ष हेमंत टकले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सदर परिषद यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरिमन पॉईंट, मुंबई येथे होईल.

Saturday, 15 February 2020

सिद्धार्थ धर्माधिकारींचे व्यवसाय व करियर मार्गदर्शन


दि. १५ : व्यक्तीमत्व विकास व व्यवसाय व करियर मार्गदर्शन ह्यावर स्टर्लिंग कॉलेज येथे जुनिअर कॉलेज व सिनियर कॉलेज च्या ८० विद्यार्थ्यांना चाणक्य मंडळ परिवाराचे सिद्धार्थ अविनाश धर्माधिकारी आणि त्यांच्या टिमने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबई केंद्राचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड, सचिव डॉ. अशोक पाटील, समिती सदस्य डॉ. अजित मगदूम, कांचन शितोळे, प्राचार्य एम. जी. गोंडा आदि उपस्थित होते.


Friday, 14 February 2020

अंमली पदार्थ सेवनाविरोधात जनजागृती रॅली...


बहुतांश शाळा कॉलेजातील मुले ही अंमली पदार्थ सेवनाच्या आहारी जातात. वाईट संगतीत राहून आयुष्य खराब करून घेतात. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नवी मुंबई व अन्वय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने SIES महाविद्यालयातील विध्यार्थ्यांच्या माध्यमातून अंमली पदार्थ सेवना विरुद्ध शनिवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजता SIES कॉलेज ते नेरुळ रेल्वे स्टेशन व परत अशी सुमारे ६ किलोमीटरची रॅली (मोर्चा) काढण्यात आली.
यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबई केंद्राचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड, अन्वय प्रतिष्ठानचे डॉ. अजित मगदूम, प्रा. वृशाली मगदूम, कॉलेजचे प्राचार्य, अध्यापक व भाग घेणारे सुमारे २०० विद्यार्थी - विद्यार्थिनी उपस्थित होते.