Thursday, 29 September 2016

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंद मेळावा व चालण्याची स्पर्धा..


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, कोकण विभागीय केंद्र व रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघ, रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने १ ऑक्टोबर 'ज्येष्ठ नागरिक दिना' च्या निमित्ताने ज्येष्ठांसाठी आनंद मेळावा भारत शिक्षण मंडळाच्या ठाकूर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या आनंद मेळाव्यानिमित्त सर्व ज्येष्ठांसाठी चालण्याची स्पर्धा भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन हायस्कूलच्या मैदानावर घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा पुरुष व महिला अशा दोन गटात घेण्यात येणार आहे. या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ त्याच दिवशी सायं ०३.३० वा. भारत शिक्षण मंडळाचे ठाकूर सभागृहात ज्येष्ठांसाठी आयोजित आनंद मेळाव्यात होणार आहे. या आनंद मेळाव्यात सौ. वैजयंती पाटील तसेच श्री. संजय पाटणकर व श्री. प्रविण डोंगरे यांच्या गायनाचा कार्यक्रम व ज्येष्ठांसाठी प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना आपल्या कलेचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार  आहे.

जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी स्पर्धेत भाग घेऊन ज्येष्ठांसाठी आयोजित केलेल्या आनंदमेळाव्याला दि. १ ऑक्टोबर २०१६ रोजी उपस्थित रहाण्याचे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे वतीने करण्यात आले आहे.

'महात्मा फुले यांचे स्त्री शिक्षण विषयक विचार, सामाजिक कार्य व आजची स्त्री' व्याख्यान संपन्न..यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - कोकण विभागीय केंद्र व आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरुख जिल्हा रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने दि. २८ सप्टेंबर २०१६ रोजी आठवल्ये-सप्रे-प्रित्रे महाविद्यालयाचे सभागृहात महिलांसाठी व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला. 'महात्मा फुले यांचे स्त्री शिक्षण विषयक विचार, सामाजिक कार्य व आजची स्त्री' या विषयावर डॉ. वर्षा फाटक यांनी महिलांना मार्गदर्शन केले. 

Wednesday, 28 September 2016

'शिक्षक दिन' कार्यक्रम संपन्न..'गुरु' हा एक अर्थपूर्ण शब्द आहे. गुरु या संकल्पने संदर्भात महत्त्वपूर्ण प्रश्न संभवतो : गुरु कोणास म्हणावे ?
एखादी विद्या आचरणारा, त्या विद्येचे रहस्य विद्यार्थ्याला समजावून देणारा, ती विद्या आत्मसात होईपर्यंत त्या विद्यार्थ्याला सोबत देणारा, अधिकारी व्यक्ती म्हणजे गुरु, असे म्हणता येईल. त्याचे श्रेष्ठत्व आचारावर अधिष्ठित असते. ज्याने विद्येचे रहस्य जाणलेले असते व अनुभवलेले असते तोच करा गुरु होय.
'गुरु' ही संज्ञा परमार्थ क्षेत्रात अधिक रुढ आहे. या गुरुविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिनांक ५ सप्टेंबर 'शिक्षक दिना' चे औचित्य साधून दि. २४ सप्टेंबर २०१६ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, कोकण विभागीय केंद्र व वराडकर-बेलोसे महाविद्यालय, दापोली यांचे संयुक्त विद्यमाने वराडकर - बेलोसे महाविद्यालयाचे सभागृहात सकाळी ११.३० वा. कार्यक्रम संपन्न झाला.
प्रथम उपस्थित मान्यवरांचे शुभहस्ते दिपप्रज्वलन करुन स्व. यशवंतराव चव्हाण साहेब, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व सरस्वती मातेचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कोकण विभागीय केंद्राचे अध्यक्ष मा. श्री. राजाभाऊ लिमये यांनी भूषविले. यावेळी वराडकर बेलोसे महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. सुरेश निंबाळकर, कोकण विभागीय समिती दापोलीच्या सदस्या मा. श्री. जानकीताई बेलोसे श्री. प्रकाश काणे, सौ. युगंधरा राजेशिर्के, श्री. विश्वंभर कमळकर, वराडकर बेलोसेचे श्री. दशरथ भोसले, श्री. शिवाजी शिगवण, श्री. राजाराम कदम, श्री. कुणाल शेवरे, श्रीकांत मुंगशे, गणेश केळकर आदी मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी उपस्थितांसाठी श्री. धनंजय चितळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
वराडकर बेलोसे महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. सुरेश निंबाळकर यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. श्री. जानकीताई बेलोसे यांनी केले. यावेळी त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे वतीने होणा-या कार्यकमांची माहिती दिली त्याचप्रमाणे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची थोडक्यात ओळख करुन दिली.
यानंतर शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. अनुक्रमे सौ. प्रिया अनिल पवार-प्राथमिक शिक्षिका, श्री. प्रमोद प्रभाकर गमरे-माध्यमिक शिक्षक व श्री. प्रशांत पंडीत जाधव - उच्च माध्यमिक शिक्षक यांचा स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे वतीने पुरस्कार देऊन गौरव केल्याबद्दल धन्यवाद दिले.
ज्ञान, चारित्र्य, राष्ट्रनिष्ठा, समाजसेवा, भाषाप्रभुत्व, वक्तृत्व, नेतृत्व अशी गुणसंपदा प्राप्तीसाठी शिक्षण आता राहीले नाही. शिक्षणामुळे विद्यार्थी घडला पाहिजे हा आग्रह आता उरला नाही. सध्या शिक्षणाची घराणी अस्तंगत झाली आहेत. या सर्वांवर मात करण्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांना श्री. धनंजय चितळे यांनी 'सध्याचे शिक्षण आणि संत वाङ्मय यावर संदर मार्गदर्शन केले. आपण इतिहास पाहिला तर आपल्याला समजेल की आपली नेतेमंडळी खूप अभ्यासक होती. आजचा विद्यार्थी निबर व कोरडा होत चालला आहे. विद्यार्थ्यांची संवेदनशीलता जागृत करण्याचे काम शिक्षकांचे आहे. शिक्षकांचाही शिष्यभाव नेहमी जागृत रहायला पाहिजे. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये मिळालेल्या मार्कांना 'गुण' न म्हणता प्राप्तांक म्हटले पाहिजे. विद्यार्थ्यांची परिस्थितीशी झुंजारची ताकद म्हणजे 'गुण' असेही त्यांनी सांगितले. 'जगावे कसे' हे शिकून घ्यायचे असेल तर दासबोध पहावा. वाचनाने अनेक सदर्भ मिळतात. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, दासबोध या ग्रंथातील काही दाखले देत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी मार्गदर्शन केले. काही साध्य करायचे असेल तर टी.व्ही., मोबाईल यामधून फक्त दहा मिनिटे वाचनाला दया असाही सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक वृत्ती निर्माण करण्यासाठी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात मा. श्री. राजाभाऊ लिमये यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासारखी विद्वत्ता मिळवावी व यशवंतराव चव्हाण साहेबांसारखे कर्तृत्वान बनावे असे आवाहन केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान हे यशवंतरावांच्या किर्तीमान कार्याची ओळख भावी पिढीला करून देत आहे. शिक्षकांनी युवापिढी अष्टपैलू बनवावी असे प्रतिपादन त्यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कोकण विभागीय केंद्र जिल्हा समिती रत्नागिरीचे सदस्य श्री. विश्वंभर कमळकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. शेवटी उपस्थित मान्यवरांचे व शिक्षकांचे आभार मानून व पसायदान होऊन कार्यक्रम समाप्त झाला. 

डॉ. दिलिप गरुड लिखित 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर'पुस्तकावर प्रश्नमंजुषेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न..

पुणे विभागीय:  २४ सप्टेंबर रोजी  राष्ट्रहितैषी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या डॉ. गरुड लिखित पुस्तकावरील प्रश्नमंजुषा मध्ये  ७५ शाळांमधील ३५०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला  होता, त्यांतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याशिवाय  १. टीन एजर्सचे मनांत २. बुद्धी वर्धन (मन:शक्ती ) ३. आरोग्यम् धनसंपदा याशिवाय राष्ट्रहितैषी डॉ. बाबासाहेब या विषयावर प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षण अन्य सेवक यांचेकडून दोन हजार शब्दसंख्या मर्यादेपर्यंचे निबंध मागविण्यात आले आहेत. त्यांतील विजेत्या शिक्षकांना पारितोषिक देऊन गौरव करण्यात आले.

Wednesday, 21 September 2016

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाडसाठी मार्गदर्शन शिबीर


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध मार्गदर्शन शिबीरे आयोजित केली जातात. त्यातील एक उपक्रम म्हणजे‘विज्ञानगंगा’. हा उपक्रम प्रतिष्ठान आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जातो.‘विज्ञानगंगा’उपक्रमांतर्गत होणाऱ्या कार्यक्रमाचे सातवे पुष्प प्रतिष्ठानच्या सभागृहात नुकतेच पार पडले. ह्या सातव्या मार्गदर्शन कार्यक्रमाचा विषय होता‘विज्ञान ऑलिंपियाड’, आणिशालेय विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते प्रा. विजय सिंग. हा कार्यक्रम अतिशय रंगला याचे मुख्य कारण म्हणजे त्याला असलेली विद्यार्थी व पालकांची मोठी उपस्थिती. उपस्थित सर्व विद्यार्थी पालकांनी प्रा. विजय सिंग यांनी केलेले मार्गदर्शन लक्षपुर्वक ऐकले. कार्यक्रमाच्या शेवटी शंकासमाधानासाठी वेळ राखीव होता. त्यात विद्यार्थी व पालकांनी अनेक प्रश्न प्रा. विजय सिंग यांना विचारले व त्यांचेकडून अधिक माहिती मिळवली. प्रा. विजय सिंग हे ऑलिंपियाडसंबंधीचे तज्ज्ञ असून त्यांनी त्यासंबंधी अनेक मार्गदर्शनपर पुस्तके लिहीली आहेत.
ऑलिंपियाड हे नेमके काय आहे?
प्रा. विजय सिंग यांनी ऑलिंपियाड म्हणजे काय याची सविस्तर माहिती सुरूवातीस दिली. त्याचा सारांश असाः
विज्ञानाच्या विविध शाखा आहेत. उदाहरणार्थ रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान, जैविकशास्त्र, खगोलशास्त्र वगैरे. विज्ञानाला सतत साथ करणारा विषय म्हणजे गणित. ह्या सर्व विषयांचा अभ्यास शालेय जीवनात सुरू होतो. शाळकरी मुले हे विषय शिकू लागतात. याच मुलांतून पुढे उद्याचे शास्त्रज्ञ तयार होणार असतात. शाळकरी मुलांतील बुद्धीमान व गुणवंत मुलांचा शोध ऑलिपियाडच्या माध्यमातून घेतला जातो. ऑलिंपियाड हा आंतरराष्ट्रीय स्तरावरावरील उपक्रम आहे, व साधारणतः १९५९ पासून विविध विषयांतील ऑलिंपियाड जगभर आयोजित केले जात आहेत. अनेक देशांतील शालेय विद्यार्थी त्यांत भाग घेतात. ती एक प्रकारची त्या त्या विषयातील ज्ञानाची स्पर्धा असते. स्पर्धेतील विजेत्यांना सुवर्णपदक, रौप्यपदक तसेच प्रमाणपत्रे देऊन त्यांचा गौरव केला जातो. या निमित्ताने विविध देशांतील मुले एकत्र येतात व यातून त्यांची विधायक मैत्री बालवयात सुरू होते. ऑलिंपियाड हे फक्त शालेय विद्यार्थ्यांसाठीच आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यात भाग घेता येत नाही.
ऑलिंपियाडमधील भारताचा सहभाग
भारताचा आंतरराष्ट्रीय सहभाग तसा अलिकडचा आहे. गणित (Mathematics)ऑलिंपियाडमध्ये १९८९ मध्ये भारत प्रथमच सहभागी झाला. पुढे पदार्थविज्ञान (सन १९९८), रसायनशास्त्र (१९९९), जैविकशास्त्र (२०००), खगोलशास्त्र (२००४), आणि बालविज्ञान (२००७) असा भारताचा सहभाग पुढे वाढत गेला. दरवर्षी सुमारे १५००० ते ५०,००० मुले ऑलिंपियाडसाठीच्या स्पर्धेत सहभागी होतात. ऑलिंपियाडसाठी भारत सरकार संपुर्ण आर्थिक सहाय्य करते व पुरेपूर प्रोत्साहन त्यासाठी देते. भारतीय ऑलिंपियाडचे मुख्य केंद्र म्हणजे मुंबईतील होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेश (HBCSE)हे होय.HBCSEहे टाटा इन्स्टीट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या अंतर्गत कार्यरत आहे.
ऑलिंपियाड आणि आलिंपिक खेळ यांच्यातले मुख्य साम्य म्हणजे दोन्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर होतात. मात्र, ऑलिंपिक हे चार वर्षांतून एकदा होते, तर ऑलिंपियाड हे दरवर्षी आयोजित होते. विविध विषयांतील ऑलिंपियाड ही वेगवेगळ्या वेळी व वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित होत असतात. प्रत्येक देशाला त्यात सहा विद्यार्थी पाठवता येतात. हे सहा विद्र्यार्थी निवडण्यासाठी इतर देशांप्रमाणेच भारतातही स्पर्धा परिक्षा होतात. त्यातील सर्वोत्तम मुले आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाडसाठी निवडली जातात. भारतातून आजपर्यंत सुमारे ४०० मुले आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाडमध्ये गेली व त्यातील ९९ टक्के मुलांनी पदके व प्रमाणपत्रे मिळवली आहेत. ऑलिंपियाडमध्ये अधिकाधिक शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा व आपल्या गुणवंत व चमकदार मुलांची त्यातून निवड व्हावी यासाठी अधिकाधिक शाळांनी त्यात सहभागी व्हावे असा भारत सरकारचा प्रयत्न असतो. त्या प्रयत्नांना साथ देण्यासाठीच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे मराठी विज्ञान परिषदेच्या सहयोगाने हे शिबीर आयोजित करण्यांत आले होते.
डिसेंबर २०१६ मध्ये भारतात होणार खगोलशास्त्र ऑलिंपियाड
आपला देश आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिपियाड २०१६ चा प्रायोजक आहे. हे ऑलिंपियाड ओरिसा राज्यात भुवनेश्वर येथे होणार असून त्याची तयारी जोरात सुरू आहे.

Tuesday, 20 September 2016

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, कोकण विभागातर्फे शिक्षक दिन कार्यक्रम..


कोकण विभाग : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, कोकण विभागीय केंद्र रत्नागिरी व वराडकर-बेलोसे महाविद्यालय, दापोली, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने 'शिक्षक दिन' कार्यक्रम दिनांक २४ सप्टेंबर २०१६ वराडकर-बेलोसे महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी ११.३० वा. आयोजित करण्यात आला आहे.
या शिक्षक दिनानिमित्त मा. श्री. धनंजय चितळे यांचे व्य़ाख्यान आयोजित केले असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रतिष्ठानच्या कोकण विभागीय समितीचे अध्यक्ष मा. श्री. राजाभाऊ लिमये भूषविणार आहेत.

Monday, 19 September 2016

फोल्डींग्सच्या साह्याने ग्रीटींग्स व फ्रेम्स बनविण्याचे विनामूल्य प्रशिक्षण..


ओरिगामी प्रात्यक्षिक च्या यशस्वी प्रतिसादानंतर पुन्हा एकदा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे टी बॅग फोल्डींग्स, आयरिस फोल्डींग्स, पेपर क्विलिंग व थ्रेड आर्ट चे विनामूल्य प्रात्यक्षिक प्रशिक्षण गुरुवार, दिनांक २२ सप्टेंबर २०१६ रोजी दुपारी २ ते ५ ह्या वेळेत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, बेसमेंट हॉल, नरिमन पाँईट, मुंबई -४०००२१ येथे आयोजित केले आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी कार्यालयीन वेळ सकाळी ११ ते संध्याकाळी ६ या वेळेमध्ये कृपया संजना पवार व संगिता गवारे यांच्याशी (दूरध्वनी - २२०४५४६० विस्तारित क्र. २४४ अथवा भ्रमणध्वनी ८२९१४१६२१६) वर संपर्क साधावा.

Wednesday, 7 September 2016


'विज्ञानगंगा'चे सातवे पुष्प...


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत होमी भाभा केंद्राचे प्रा. विजय सिंग यांचे विज्ञान ऑलिम्पियाड म्हणजे काय याची माहिती संक्षिप्तपणे सांगणारे 'विज्ञान ऑलिम्पियाड' या विषयावरील सातवे पुष्प बुधवार दिनांक २१ सप्टेंबर २०१६ रोजी दुपारी ३.०० वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, ४ था मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, नरिमन पॉईट, मुंबई - ४०००२१ येथे आयोजित केलेले आहे. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे.

Sunday, 4 September 2016

मातीपासून इको फ्रेंडली पद्धतीने गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा संपन्न...


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर 'सृजन' विभागातर्फे तसेच देवदत्त मलमे यांच्या सहकार्याने पर्यावरण स्नेही हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन मातीपासून इकों फ्रेंडली पद्धतीने गणेशमूर्ती बनविण्याची प्रशिक्षण कार्यशाळा ४ सप्टेंबर २०१६ रोजी  आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेमध्ये ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. देवदत्त मलमे यांनी मातीपासून वेगवेगळ्या गणेशमूर्ती सोप्या पद्धतीने बनविण्याचे प्रशिक्षण दिले.

नवमहाराष्ट्र युवा अभियान व सम्यक संवाद आयोजित लोकसंवाद .....


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभाग नवमहाराष्ट्र युवा अभियान आणि सम्यक संवाद आयोजित ‘लोकसंवाद’ उपक्रमांतर्गत आज महाश्वेतादेवी यांना आदरांजली देण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात तसेच सूत्रसंचालन सम्यक संवादच्या सोनाली शिंदे यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत प्रतिष्ठानचे कार्यक्रम संयोजक दत्ता बाळसराफ यांनी केले. महाश्वेतादेवी यांच्या जीवनातील संघर्ष व कार्य या विषयावर चर्चा करण्यात आली. ही चर्चा करतांना मा. प्रा. इलीना सेन यांनी उपस्थितांशी संवाद साधला. महाश्वेतादेवी ह्या फ़क़्त लेखिका किंवा सामाजिक कार्यकर्त्याच नव्हत्या तर त्या एक पत्रकार, साहित्यिक तसेच विचारवंत व आंदोलनधर्मी ही होत्या. इ.स. २००२ मध्ये साहित्यातील योगदानाबद्दल यांना ऑफिसर ऑफ आर्टस अँड लिटरेचर हा फ्रान्सचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी किताब जाहीर केला गेला होता. याशिवाय भारतातही त्यांना साहित्य अकादमी ने सन्मानित केले आहे. त्यांना इ.स. १९९६ सालचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. अश्या त्यांच्या बद्दल ब-याच गोष्टी प्रा. इलीना सेन यांनी त्यांच्या चर्चा सत्रातून मांडल्या. यानंतर सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी त्यांच्या नून या कथेचे वाचन केले. ह्या कार्यक्रमाचे आभार व कविता वाचन श्री. दत्ता बाळसराफ यांनी केले व कार्यक्रमाची सांगता महाश्वेतादेवी यांच्या प्रसिद्ध कादंबरी ‘ हजार चौरासी कि मॉ’ च्या फिल्म स्क्रीनिंग ने झाले. या कार्यक्रमासाठी श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद होता. या कार्यक्रमास प्रतिष्ठानचे सरचिटणीस श्री. शरद काळे, सामाजिक कार्यकर्ते सुरेशजी सावंत, प्रा. महेश कांबळे, पत्रकार समीर परांजपे, नीला उपाध्ये, श्री. सचदेव, शंकर खरात, भारती शर्मा, हेमांगी जोशी, संगीता मालशे, संगीता खरात,. सम्यक संवादचे निलेश खानविलकर, तसेच तसेच इतर मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.

Saturday, 3 September 2016

मातीपासून वेगवेगळ्या वस्तू बनविण्याची कार्यशाळा...


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर 'सृजन' विभागामार्फत शालेय विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास आणि विविध  कलांची तोंड ओळख करून त्यांचे विद्यार्थी जीवन समृध्द व्हावे याकरिता सृजनचा माध्यमातून दिनांक 4 सप्टेंबर 2016 (रविवार ) रोजी  सकाळी 10 ते 12.30  ह्या वेळेत मातीपासून वेगवेवगळ्या वस्तू बनविण्याची कार्याशाळा घेतली जाणार आहे.  जे जे स्कूल ऑफ आर्टस् चे विद्यार्थी या कार्यशाळेला मार्गदर्शन करणार आहेत. 

Thursday, 1 September 2016

मुंबई नवमहाराष्ट्र युवा अभियान विभागातर्फे समाज कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग


समाजातील चालू घडामोडी, सामाजिक चळवळ, आणि प्रबोधनात्मक या संदर्भातील माहिती समाजातील तरुण वर्गापर्यंत पोहोचावी. आपल्यासारख्या सुजाण नागरिकांनी, तरुणांनी आपल्या देशाबद्दल, समाजाबद्दल, कायद्यांबद्दल, जाणून घ्यावे, आपण जीवन जगत असतांना आपणास वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक, राजकीय, तसेच शासकीय, खाजगी, स्वयंसेवी संस्था, शाळा, विद्यालय, महाविद्यालय, लहान मुलांचे हक्क व अधिकार, पोलीस, सरकारी दवाखाने, न्यायालये, वेगवेगळे सरकारी कार्यालय त्यांचे कामकाज व कार्यप्रणाली यांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी आणि या प्रशिक्षणातून प्रामाणिक समाज कार्यकर्ता घडून यावा म्हणून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई नवमहाराष्ट्र युवा अभियान विभागातर्फे समाज कार्यकर्ता प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यास वर्गचे आयोजन केले आहे.

हे वर्ग महिन्याच्या प्रत्येक रविवारी होणार असून अठरा वर्षावरील तसेच किमान लिहिता-वाचता येणारे कोणीही स्त्री-पुरुष यात सहभागी होऊ शकतात.या कोर्सेचे उद्दिष्ट सध्या हाताळले जाणारे विषय केवळ वैचारिक अथवा बौद्धिक पातळीवर असून सध्याची समाजस्थिती लक्ष्यात घेता सदर विषयाची योग्य ती सांगड व्यावहारिक विषयांशी केली जाणार असून केवळ ऐकण्यावर भर दिला जाणार नसून प्रशिक्षाणार्थिकडून कार्यक्रम आणि प्रशिक्षकांच्या स्वरुपात कृती व त्याच्या प्रत्यक्ष सहभागावर भर दिला जाणार आहे. यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शनासाठी लाभणार आहेत.सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गासाठी एकदिवसीय विशेष मोफत सत्राचे आयोजन शुक्रवार दिनांक ०९ सप्टेंबर २०१६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे.संपर्क –मनिषा खिल्लारे -९६७३९६१५६६/२२०२८५९८-विस्तारित क्र.२१३