Friday, 28 April 2017

१९ मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाहसोहळ्याचे आयोजन

१९  मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाहसोहळ्याचे आयोजन
अंबाजोगाई : मागील वर्षीच्या पावसाने थोडासा दिलासा दिल्यामुळे शेतकरी सावरतो ना सावरतो तोच यावर्षी पुन्हा गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी खचला आहे. अनेक  शेतक-र्‍यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबविला. नैसर्गिक संकटामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी येथील मानवलोक संस्था, आई प्रतिष्ठान अंबाजोगाई, वसुंधरा सेवा प्रतिष्ठान आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने १९ मे रोजी अंबाजोगाई येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मानवलोकच्या पुढाकाराने सामुदायिक विवाह सोहळ्याचे हे चौथे वर्ष आहे. मागील काही वर्षापासून बेभरवश्याच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी, गारपीट यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. अशा सततच्या नैसर्गिक आघाताने खचलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या उद्देशासून चार वर्षापूर्वी सामुदायिक विवाह सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. तीन वर्षापूर्वी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील रोटरी क्लबच्या पाच शाखांनी पुढाकार घेत ८ मे २०१४ रोजी मानवलोक कार्यालयात पहिला सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळा यशस्वीरित्या पार पाडला. १३ जणांचे लग्न लावून या जोडप्यांना संसारोपयोगी साहित्य दिले होते. त्यानंतर २०१५ साली १६ जोडप्यांचे विवाह पार पाडण्यात आले. मागील वर्षी म्हणजेच १ मे २०१६ रोजी तब्बल ३० जोडप्यांचे विवाह लावून देण्यात आले. हीच परंपरा कायम ठेवत यावर्षी देखील सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्याचा निर्णय मानवलोक संस्था, आई प्रतिष्ठान अंबाजोगाई, वसुंधरा सेवा प्रतिष्ठान आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई या सामाजिक संस्थांनी घेतला आहे. या सोहळ्यासाठी शुक्रवार, दि. १९ मे २०१७ रोजी सायंकाळी ६.५४ वाजताचा मुहूर्त निश्चित करण्यात आला असून इच्छुक जोडप्यांच्या नोंदणीस सुरुवात झाली आहे. विवाह सोहळा अंबाजोगाईतील रिंग रोडवरील मानवलोकच्या मुख्यालयात पार पडणार आहे.
या विवाह सोहळ्यात लग्न करू इच्छिणाऱ्या जोडप्यांसाठी ७ हजार एवढे नाममात्र शुल्क आकारण्यात येणार आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य, दिव्यांग आणि पुनर्विवाह करणारांसाठी नोंदणी मोफत आहे, त्यांनी कोणतेही शुल्क जमा करण्याची आवश्यकता नाही. यात सामील होणाऱ्या जोडप्यातील वराला सफारी ड्रेस ,टॉवेल, टोपी, हळदीचा ड्रेस तर वधुला हळदीची व लग्नाची साडी, मनी मंगळसुत्र, जोडवी तसेच संसार उपयोगी साहित्य आणि गॅस कनेक्शन देण्यात येणार आहे. या विवाह सोहळ्यात इच्छुक वधू-वरांची १० मे २०१७ रोजी पर्यंत नोंद करणे गरजेचे आहे. नोंदणी करताना वराचा वयाची २१ वर्षे  आणि वधूचा वयाची १८ वर्षे पूर्ण केली असल्याचा कागदोपत्री पुरावा देणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी मानवलोक मुख्यालयात अथवा अनिकेत लोहिया (७७७००१५०११), ॲड. जयसिंग चव्हाण (९८२२०२२८४४), ॲड. संतोष लोमटे (९८५०५४४२००), वैजनाथ देशमुख (९४२२७४४१८१), डॉ. नरेंद्र काळे (९४२२७४२६२८) आणि अभिजीत गाठाळ (९७६४०३३११) यांच्याकडे संपर्क करावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Sunday, 23 April 2017

८ वर्षापुढील मुला-मुलींसाठी बालनाट्य शिबीर

८ वर्षापुढील मुला-मुलींसाठी बालनाट्य शिबीर

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि विभागीय केंद्र, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने बालनाट्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. २ मे ते ९ मे या कालावधी मध्ये सायंकाळी ४ ते ७ या वेळेत सुप्रसिध्द अभिनेत्री लक्ष्मी पिंगळे या कल्ब हाऊस, विश्वास लॉन्स, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच शिबिरामध्ये ८ वर्षापुढील मुले व मुली सहभागी होऊ शकतात. प्रत्येक उमेदवाराकडून ७०० रूपये प्रवेश फी आकारण्यात येणार आहे. कार्याध्यक्ष विश्वास जयदेव ठाकूर, मनोज शिंपी, विनायक रानडे, कैलास कमोद, राजवर्धन कदमबांडे, कविता कर्डक, गुरमित बग्गा, रउप पटेल, नितिन ठाकरे, सुधीर संकलेचा विक्रम मोरे यांनी अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क राजू देसले ७७२००५२५७२, भूषण काळे ९६५७४३९८३३, जानेश्वर शिरसाठ ९६०४०६१७५८

Thursday, 20 April 2017

विज्ञानगंगाचे पंधरावे पुष्प.. 'बदलते हवामान आणि यंदाचा पावसाळा'

विज्ञानगंगाचे पंधरावे पुष्प.. 'बदलते हवामान आणि यंदाचा पावसाळा'

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत पंधरावे पुष्प, मुंबई वेधशाळेचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर हे 'बदलते हवामान आणि यंदाचा पावसाळा' या विषयावर शुक्रवारी दिनांक १२ मे २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, नरिमन पॉईंट, मुंबई ४०००२१ येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. वरील कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे

Monday, 17 April 2017

नॅचरल आईस्क्रिम बनविण्याचे प्रशिक्षण

नॅचरल आईस्क्रिम बनविण्याचे प्रशिक्षण 

मशीन, केमीकल, जीएमएस आणि सीएमसी पावडर न वापरता १०० % नॅचरल आईस्क्रिम कसे तयार करतात याबाबत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे दोन दिवस क्लासेसचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसामध्ये प्रशिक्षणार्थीला कुल्फी आणि आईस्क्रिमचे तब्बल ३८ प्रकार शिकविण्यात येणार आहेत. तसेच शिकवणी दरम्यान विद्यार्थ्याला छापील पध्दतीच्या नोटस दिल्या जातील. २० (गुरूवार) आणि २१ (शुक्रवार) एप्रिल रोजी दुपारी दोन ते सायंकाळी ५ या वेळेत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट येथे क्लासेस होणार आहेत. यासाठी १५०० रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

Sunday, 16 April 2017

राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई- विभागीय केंद्र औरंगाबाद, शिक्षण विकास मंच व महात्मा गांधी मिशनच्या सहकार्याने राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचा समारोप सोहळा एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष बालाजी इंगळे, संमेलन स्वागताध्यक्ष आ. विक्रम काळे, एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, डॉ श्रीरंग देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे, सुदेश हिंगलासपूरकर, प्रदीप सोळुंके, विजय कान्हेकर, सुहास तेंडुलकर यांची उपस्थिती होती. शिक्षकाच्या अंगी असलेले कलागुण जाणून घेण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक या तिन्ही स्तरातील शिक्षकांना एकत्रित येऊन आपले विचार, कल्पना आणि अनुभव यांची देवाणघेवाण करता यावी. तसेच शिक्षकांना साहित्यिक म्हणून ओळख व्हावी व त्यांच्याकडून अधिकाधिक साहित्य निर्मिती व्हावी या प्रमुख उद्धेशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी रंगनाथ पठारे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्राथमिक पातळीवर मातृभाषेत शिक्षण घेण्याची गरज सध्याच्या घडीला आहे व लुप्त पावत चाललेली आपली मातृभाषा जोपासावी. भाषा मृत झालेली आहे तिला जागृत करण्याची वेळ आली आहे. शिक्षकांच्या अडचणी खूप आहेत त्या लोकप्रतिनिधी समजून घ्यायला हव्यात. निवडणूक, विविध सर्वेक्षण आदी कामात शिक्षकांना लोकप्रतिनिधी राबवून घेतात अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. स्वागताध्यक्ष आ.विक्रम काळे यावेळी बोलताना म्हणाले की, या साहित्य संमेलनामुळे नक्कीच पुढचे साहित्य संमेलन आयोजित करायला ऊर्जा मिळेल. या साहित्य संमेलनाची शिदोरी युवक शिक्षक घेऊन जातील. पुढच्या साहित्य संमेलनाच्या वेळेस महाराष्ट्र सरकारकडे आम्हयी सुट्टी काढण्याचा नक्कीच प्रयंत्न करू असे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले. अध्यक्षीय भाषणात बोलताना संमेलनाध्यक्ष बालाजी इंगळे म्हणाले शिक्षणाची ताकत, शिक्षणाचे फायदे, लिहित्या शिक्षकांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम, साहित्य विषयक लिखाण करायला हे व्यासपीठ प्रोत्साहन देत आहे. 'लिहत राहा, व्यक्त व्हा' असा संदेशही त्यांनी दिला.
या दोन दिवशीय साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने सुरुवात होऊन वि. स. खांडेकर ग्रंथनगरीचे उदघाटन करून कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मराठवाड्यातील साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांचे विशेष सत्कार करण्यात आले. तसेच 'माझ्या लेखन प्रेरणा' हि प्रकट मुलाखत, सोशल मीडियावरील शिक्षकांचे सृजनशील लेखन, 'शब्द झुल्यावर' हे कवी संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, 'खानदेशचा मळा मराठवाड्याचा गळा' हा बहिणाबाईंचे गीतदर्शन असे विविध कार्यक्रमाने पहिला दिवस पार पडला. दुसऱ्या दिवसाची सुरुवात कथाकथनने झाली. त्यानंतर कवी कट्टा, 'पाठ्यक्रमातील साहित्याची निवड व निकष व वाचन संस्कृतीशी मुलांना जोपासण्यासाठी शिक्षकांची भूमिका' या विषयावर विशेष परिसंवाद साधण्यात आला.सायंकाळी ५ वाजता या दोन दिवशीय राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम पोतदार यांनी केले तर कैलास अंभोरे यांनी आभार व्यक्त केले.
या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी डॉ. कैलास अंभुरे, डॉ. वीर राठोड, प्रा. महेश अंचितलवार, सुबोध जाधव, विनोद सिनकर, रुपेश मोरे, मंगेश निरंतर, राजेंद्र वाळके, त्रिशूल कुलकर्णी, गणेश घुले, श्रीराम पोतदार, निखिल भालेराव, विश्वनाथ ससे, मयूर देशपांडे, अक्षय गोरे, अजिंक्य गुंठे, रमेश मोरे, प्रतीक राऊत, संतोष लोमटे यांनी परिश्रम घेतले.

Saturday, 8 April 2017

"आनंदी आनंद गडे जॉय फॉर ऑल-२०१७" संपन्न

"आनंदी आनंद गडे जॉय फॉर ऑल-२०१७" संपन्न 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, अनाम प्रेम, यूएनडीपी, शोधना कंन्सलटन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंथी समूहासाठी "आनंदी आनंद गडे जॉय फॉर ऑल-२०१७" या कार्यक्रमाचे यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला देशभरातून प्रत्येक राज्याचे तृतीयपंथी समूहाचे निमंत्रित प्रतिनिधी उपस्थित होते. विशेष म्हणजे मान्यवरांनी त्यांच्या प्रत्येक समस्येला वाचा फोडण्यात येईल असे आश्वासन दिले. 
  समाजामध्ये मिळत असलेल्या दुय्यम वागणूक, नोकरी समम्या, अर्थिक अडचण, अशा विविध समस्यांवर मान्यवरांकडून समूहाला योग्य मार्गदर्शन करण्यात आलं. सध्या तृतीयपंथी समूहाला कॉर्पोरेट क्षेत्रात कशी संधी मिळवून देण्यात येईल याबाबत समीर घोष यांनी अधिक माहिती सांगितली. उपस्थित मान्यवरांनी प्रश्नउत्तरं जाणून घेण्यावर अधिक भर दिला. एका प्रतिनिधीने नोकरीसाठी  कंपनीमध्ये गेल्यावर आम्हाला बराच वेळ रखडवून ठेवले जाते. तूमच्यामुळे आमच्या पन्नास कर्मचा-यांना आम्हाला मुकावे लागेल असे सांगितले. या कार्यक्रमाला कृपाली बीडये, समीर घोष, केतकी रानडे, पी.पी सोटी, हे मान्यवर उपस्थित होते.    

Tuesday, 4 April 2017

'विज्ञानगंगा'चे चौदावे पुष्प.. 'प्लास्टिक सर्जरी'

'विज्ञानगंगा'चे चौदावे पुष्प.. 'प्लास्टिक सर्जरी'

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत चौदावे पुष्प डॉ. रवीन थत्ते 'प्लास्टिक सर्जरी' या विषयावर बुधवार  दिनांक १२ एप्रिल २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला. जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे आयोजित केले आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे अशी विनंती यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई तर्फे करण्यात आली आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे चित्रपटप्रेमींसाठी ‘लॅण्डस्केप इन द मिस्ट’

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे चित्रपटप्रेमींसाठी ‘लॅण्डस्केप इन द मिस्ट’

नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शुक्रवार ७ एप्रिल २०१७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध ग्रीस दिग्दर्शक थिओ अ‍ॅन्जेलोपुओलॉस यांचा ‘लॅण्डस्केप इन द मिस्ट’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास लॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे.
दोन लहान मुले आपल्या जर्मनीत असलेल्या वडीलांच्या शोधात निघतात. खरंतर त्यांच्या मनातील अज्ञात व काल्पनिक भासांचा हा प्रवास आहे. रेल्वे, मोटारीने ते दोघे हा प्रवास करतात. जग म्हणजे काय असते? याचाच हा शोध आहे. ज्या व्यक्तींना समाजात अस्तित्त्व नाही, स्थान नाही. धुक्यात हरवलेल्या शोधाची ही कहाणी आहे. हा प्रवास पूर्ण होतो का? वडीलांचा शोध लागला का? या उत्तरासाठी हा सिनेमा बघायलाच हवा. सन १९८८ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी १२७ मिनिटांचा आहे.
‘लॅण्डस्केप इन द मिस्ट’ हा चित्रपट बघण्यास नाशिककर रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.मनोज शिंपी, कोषाध्यक्ष विनायक रानडे, सदस्य डॉ.कैलास कमोद, राजवर्धन कदमबांडे, सौ.कविता कर्डक, गुरमित बग्गा, रऊफ पटेल, अ‍ॅड. नितीन ठाकरे, डॉ. सुधीर संकलेचा व विक्रम मोरे यांनी केले आहे.

राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचे दि. १५ व १६ एप्रिल २०१७ रोजी औरंगाबाद येथे आयोजन दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन, संमेलनस्थळी राज्यातील शिक्षक साहित्यिकांची मांदियाळीऔरंगाबाद विभाग : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई-विभागीय केंद्र औरंगाबाद, शिक्षण विकास मंच व महात्मा गांधी मिशनच्या सहकार्याने राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध शिक्षक साहित्यिक बालाजी मदन इंगळे (उमरगा, जि. उस्मानाबाद ) यांची निवड करण्यात आलेली आहे. प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे संमेलनाच्या निमंत्रक असून या संमेलनाचे स्वागताध्यक्षपदी मराठवाडा शिक्षक मतदासंघाचे आ. विक्रम काळे यांची निवड संयोजन समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे. औरंगाबाद येथे शनिवार, दि. १५ व रविवार दि १६ एप्रिल २०१७ रोजी सदरील संमेलन कै. वसंतराव काळे स्मृती साहित्यनगरी, रुख्मिणी सभागृह, एमजीएम परिसर, सेव्हन हिल्स, औरंगाबाद या ठिकाणी संपन्न होईल. राज्यभरातील दिड हजाराहून अधिक साहित्यप्रेमी शिक्षक या संमेलनात सहभागी होणार आहेत.

अभ्यासक्रमाशी संबंधित विषयांवर, शैक्षणिक विषयांवर लिहिणारे ( शिक्षणातील नवीन प्रवाह, शैक्षणिक समस्या, इत्यादी ) आणि ललित साहित्य (कथा, कविता, नाटक, कादंब-या इत्यादी ) अशा तिन्ही अंगांनी लेखन करणारे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या तिन्ही स्तरांवर काम करणारे अनेक शिक्षक महाराष्ट्रात आहेत. अशा शिक्षकांना एकत्र येऊन आपले विचार, कल्पना आणि अनुभव यांची देवाण-घेवाण करता यावी, अशा लिहित्या शिक्षकांना साहित्यिक म्हणून ओळख मिळावी व त्यांच्याकडून अधिकाधिक साहित्य निर्मिती व्हावी, हा या संमेलन आयोजनाचा प्रमुख उद्देश आहे. यापुर्वी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद ) आणि शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने २०१२ साली पुण्यात पहिले राज्यस्तरीय शिक्षकांचे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले होते. याचबरोबर वाचन संस्कृती वाढावी व विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठीही हे संमेलन निश्चितच दिशादर्शक ठरेल. पहिल्या शिक्षक साहित्य संमेलनात केवळ प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचाच सहभाग घेण्यात आला होता. यावेळी उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांची मागणी लक्षात घेऊन दुस-या शिक्षक साहित्य संमेलनात त्यांनासुद्धा सहभागी करुन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या दोन दिवसीय  संमेलनात विविध परिसंवाद, प्रकट मुलाखत, कवीसंमेलन, कथाकथानासह सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर होणार आहेत. शनिवार, दि. १५ एप्रिल २०१७ रोजी सकाळी ९ वा. संत तुकाराम नाट्यगृह, सिडको ते रुक्मिणी सभागृह, एम.जी.एम. परिसर या मार्गार ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे. विविध शाळांमधील विद्यार्थ्यांसह राज्यातील नामवंत शिक्षक साहित्यिक या ग्रंथदिंडीत सहभागी होतील. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राज्यातील प्रमुख प्रकाशकांचा समावेश असलेल्या 'वि.स.खांडेकर ग्रंथनगरी' या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल.

रुक्मिणी सभागृहातील 'सावित्रीबाई फुले विचारमंचा'वर संमेलनाचा उद्घाटन सोहळा सकाळी १० वा. संपन्न होईल. महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सभापती मा. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. या प्रसंगी संमेलनाध्यक्ष मा. बालाजी मदन इंगळे, राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष मा. बाबा भांड, प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष मा. आ. हेमंत टकले, संमेलनाचे स्वागताध्यक्ष मा. आ. विक्रम काळे, ज्येष्ठ साहित्यिक मा. प्रा. रां. रं. बोराडे, विभागीय केंद्राचे अध्यक्ष मा. नंदकिशोर कागलीवाल, एम.जी.एम. चे विश्वस्त मा. अंकुशराव कदम, मा. सचिन मुळे, संयोजक मा. डॉ. वसंत काळपांडे, मा. बसंती रॉय, मा. दत्ता बाळसराफ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याप्रसंगी राज्यातील शिक्षक साहित्यिकांनी लिहिलेल्या विविध पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल. शिक्षण विकास मंचच्या वतीने दरवर्षी देण्यात येणा-या 'कुमूद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कारांचे' देखील वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल.

उद्घाटन सोहळ्यानंतर दुपारी १.३० वा. राज्यातील प्रसिद्ध शिक्षक साहित्यिकांची 'माझ्या लेखन प्रेरणा' हि प्रकट मुलाखत घेण्यात येईल. निशाणी डावा अंगठाकार प्रसिद्ध साहित्यिक मा. रमेश इंगळे उत्रादकर (बुलडाणा), प्रसिद्ध साहित्यिक मा. कृष्णात खोत (कोल्हापूर ), प्रसिद्ध साहित्यिक मा. प्रविण बांदेकर (सिंधुदुर्ग ), प्रसिद्ध साहित्यिक मा. संजीवनी तडेगावंकर या नामवंत शिक्षक साहित्यिकांच्या मुलाखती मा. केशव खटिंग (परभणी) व मा. संदीप जगदाळे ( औरंगाबाद) हे घेतील.

यानंतर दुपारी तीन वाजता परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले असून 'शिक्षकांचे सोशल मिडीयावरील सृजनशील लेखन' या विषयावरील परिसंवाद संपन्न होईल. या सत्राच्या अध्यक्षा मा. प्रज्ञा देशपांडे (नागपूर) या असतील तर मा. अनिल सोनुने (जालना), मा. वृषाली विनायक (मुंबई ), मा. भाऊसाहेब चासकर (अहमदनगर) हे शिक्षक प्रतिनिधी या सत्रात आपले विचार व्यक्त करतील. मा. रुपेश मोरे (औरंगाबाद) हे या सत्राचे संचालन करतील.
या सत्राबरोबरच आईन्स्टाईन हॉल येथे दुपारी तीन वाजता 'कवी कट्टा' या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले असून, राज्यभरातून आलेल्या शिक्षक कवींना या कट्ट्यावर आपल्या कविता सादर करता येतील.
सायंकाळी पाच वाजता निमंत्रितांच्या कवी संमेलनाचे आयोजन आलेले असून, प्रसिद्ध कवी मा. अशोक कोतवाल ( जळगाव ) हे या सत्राचे अध्यक्ष असतील, मा. चंद्रशेखर मलकमपट्टे (लातूर) व मा. भारत सातपुते (लातूर ) हे कवी संमेलनाचे संचालन करतील. मा. अरुण पवार ( बीड) मा. गोविंद पाटील (कोल्हापूर ), मा शब्बीर शेख (औरंगाबाद), मा. सतिष दराडे (अकोला), मा. कविता नरवडे ( जालना), मा. स्वाती शिंदे पवार (सातारा), मा. अनिल साबळे (पुणे), मा. आशा पैठणे, मा. सुनंदा कांबळे ( सिंधुदूर्ग ), मा. कैलास दौंड ( अहमदनगर), मा. कविता मोरवणकर (मुंबई), मा. राजेंद्र दिघे (नाशिक), मा. मनिषा घेवडे (मुंबई), मा. जिजा शिंदे (औरंगाबाद), मा सलील सिद्धीकी (लातूर), मा. अप्पा जगताप (हिंगोली), मा. लतिका चौधरी (धुळे ), मा. तृप्ती अंधारे (उस्मानाबाद), मा. माधव सुर्यवंशी (मुंबई ), मा. इंद्रजित घुले (सोलापूर), रविंद्र मालूंजकर (नाशिक), मा. बालाजी फड (धुळे), मा. लता गुठ्ठे (मुंबई), मा. शिवदास पोटे (हिंगोली), मा. सुरेश हिवाळे (परभणी), मा. प्रमोद माने (उस्मानाबाद ) मा. बी.एन. चौधरी (जळगाव), मा. मैत्रेयी केळकर (मुंबई ), मा. अशोक कोळी ( जळगाव), मा. मोहन कुंभार (सिंधुदुर्ग ) मा. शेषराव धांडे (वाशिम), मा. हरीष हातवटे (बीड), मा. सारिका उबाळे (अमरावती) हे सहभागी होतील. रात्री साडे आठ वाजता प्रा. अशोक जोंधळे निर्मिती 'खान्देशचा मळा, मराठवाड्याचा गळा' हा काव्यसंगीतावर आधारित सुप्रिसद्ध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होईल.

संमेलनाच्या दुस-या दिवशी दि. १६ एप्रिल २०१७ रोजी सकाळी नऊ वाजता कथाकथन सत्र आयोजित करण्यात आलेले आहे. नामवंत शिक्षक कथाकार या सत्रात आपला सहभाग नोंदवतील. मा. एकनाथ आव्हाड (मुंबई), मा. बाबासाहेब परीट (सोलापूर) मा. संभाजी आंधळे (धुळे), मा. अनिता येलमटे (लातूर) हे आपल्या कथा या सत्रात सादर करतील. मा. बबन माळी (औरंगाबाद ) हे या सत्राचे संचालन करतील.

सकाळी साडे दहा वाजता 'पाठ्यक्रमातील साहित्याची निवड व निकष' या परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. मा. श्रृती चौधरी (पुणे) या सत्राच्या अध्यक्षा असतील तर मा. गजानन पळसुळे देसाई (रत्नागिरी), मा. विठ्ठल भुसारे (परभणी) व मा. सोमनाथ वाळके (बीड) हे मान्यवर या सत्रात आपले विचार व्यक्त करतील. मा. विनोद सिनकर (औरंगाबाद) हे या सत्राचे संचालन करतील.

दुपारी बारा वाजता 'वाचन संस्कृतीशी मुलांना जोडण्यासाठी शिक्षकांची भुमिका' या विषयावरील परिसंवाद संपन्न होईल. मा. नरेंद्र लांजेवार (बुलडाणा) हे या सत्राचे अध्यक्ष असतील. मा. शिवाजी अंबुलगेकर (नांदेड), अरविंद शिंगाडे (बुलडाणा) व फारुख काझी (सोलापूर) हे मान्यवर या सत्रात आपले विचार व्यक्त करतील. मा. दयानंद कांबळे हे या सत्राचे संचालन करतील.

दुपारी तीन वाजता या संमेलनाचा समारोप सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. प्रसिद्ध साहित्यिक मा. रंगनाथ पठारे हे या समारोप सोहळ्यास प्रमुख मार्गदर्शन करतील. यावेळी संमेलनाध्यक्ष मा. बालाजी मदन इंगळे, स्वागताध्यक्ष मा. आ. विक्रम काळे, स. भु. शिक्षण संस्थेचे सहचिटणीस मा. डॉ. श्रीरंग देशपांडे, एम.जी.एम.चे विश्वस्त मा. प्राचार्य प्रताप बोराडे, डॉ. अपर्णा कक्कड यांची प्रमुख उपस्थिती असेल.
इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिकवणा-या आणि ललित किंवा शैक्षणिक विषयावर लेखन करणा-या शिक्षकांना या संमेलनात सहभागी होता येईल. नाममात्र प्रतिनिधी शुल्कात निवास, भोजन व्यवस्था करण्यात आलेली आहे. ज्या शिक्षकांना या संमेलनात प्रतिनिधी म्हणून सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी shikshaksahitva@gmail.com या मेल आयडीवर अथवा अभ्युदय फाऊंडेशन, कासलीवाल सुवर्णयोग, व्यंकटेश मंगल कार्यालयासमोर, सुतगिरणी रोड, गारखेडा परिसर, औरंगाबाद - ४३१००५ (दूरध्वनी क्र. ०२४०-२३५१७७९ ) येथे संपर्क साधावा.

संमेलनात सर्व साहित्यप्रेमी व शिक्षक साहित्यिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष आ. विक्रम काळे, संमेलनाचे कार्यवाह नीलेश राऊत, आयोजन समितीचे विजय कान्हेकर, डॉ. दासू वैद्य, डॉ. कैलाश अंभुरे, डॉ. वीर राठोड, सौ. शुभांगी काळे, डॉ. रेखा शेळके, सुहास तेंडुलकर, डॉ. नरेंद्र काळे, प्रा. महेश अचिंतलवार, सुबोध जाधव, दिलीप सुर्यवंशी, रुपेश मोरे, विनोद सिनकर, राजेंद्र वाळके, गणेश घुले, एच.बी. सोमवंशी, बबन माळी, धर्मराज शिंदे, पी.जी. राजपूर, पी.जी. डोणगावे, एन.सी. कवडे आदींनी केले आहे.

Sunday, 2 April 2017

शिक्षण विकास मंच तर्फे

शिक्षण विकास मंच तर्फे

‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम' याविषयावर चर्चासत्र संपन्न...
शिक्षणप्रेमींनी शिक्षणाविषयी काही औपचारिक आणि काही अनौपचारिक पद्धतीने चर्चा करण्याचे ठिकाण म्हणजेच 'शिक्षणकट्टा या कार्यक्रमामध्ये शिक्षणतज्ज्ञ , मुख्याध्यापक, शिक्षक, पत्रकार, पालक, विद्यार्थी यांना घेऊन हा कट्टा गेली पाच वर्ष सुरू आहे. यावेळी हा कट्टा बोर्ड रूम ,पाचवा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिक्षण कट्ट्यावर ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम 'ह्या विषयावर राज्यातून आलेल्या शिक्षक मंडळी कडून चर्चा करण्यात आली. सुरुवातीला चार शासन परिपत्राचे वाचन करण्यात आले. त्यानंतर त्याचे विश्लेषण करुन पटवून देण्यात आले. राज्यातील शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आज कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांनी प्रगत शिक्षणाबाबत बोलताना हा कार्यक्रम शाळास्तरावर कशा प्रकारे सुरु आहे, या कार्यक्रमामुळे शाळांमध्ये कोणते बदल दिसून येत आहेत, अंमलबजावणी करताना आलेले अनुभव अशी वेगवेगळ्या मुद्यावर चर्चा करण्यात आली यावेळी ‘शिक्षण विकास मंच’ चे मुख्य संयोजक डॉ. वसंत काळपांडे यांची विशेष उपस्थिती होती.

गोविंदराव तळवलकरांच्या आठवणीचे स्मरण...

गोविंदराव तळवलकरांच्या आठवणीचे स्मरण...

ज्येष्ठ पत्रकार, महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक गोविंदराव तळवलकर यांची स्मृतीसभा १ एप्रिल २०१७ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्यातर्फे आयोजित करण्यात आली होती. प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार, मा. मंत्री विनायकराव पाटील, माजी क्रिकेटर माधव आपटे, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक अशोक पानवलकर, ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे, कोषाध्यक्ष हेमंत टकले यांनी तळवलकरांच्या आठवणींना उजाळा दिला.
तळवलकरांच्या विषयी बोलताना प्रताप आसबे म्हणाले की मुंबईत मटामध्ये कामाला आलो आणि हिमालयाच्या पायथ्याशी आलो असे मला वाटले. 'समाजवादी लक्ष भोजन' हा त्यांचा अग्रलेख वाचून मी प्रेरित झालो होतो. तळवलकरांनी लिहिताना कुणाचीही पर्वा कधीच केली नाही. जवळच्या लोकांवर तर अधिक टिका केली. तळवलकर कट्टर लिबरल डेमोक्रॅट होते असे उद्गार प्रताप आसबे यांनी काढले...
महाराष्ट्र टाइम्स चे संपादक अशोक पानवलकर यांनी माझ्या संपादकीय कारकिर्दीत तळवलकर यांच्या दु:खद निधनाची बातमी येऊ नये. पण ती आली त्याला पर्याय नव्हता असे पानवलकर म्हणाले.
विनायकराव पाटील तळवलकरांविषयी बोलताना म्हणाले की तळवलकर ज्याला जसे भेटले त्याला तसे वाटले. पत्रकारांचे, संपादकांचे, राजकीय पुढा-यांचे, साहित्यिक, कलाकारांना वेगवेगळे तळवलकर भेटत गेले. मला विचाराल तर हे सर्व तळवलकर एकच होते. उत्तम पत्रकारिता हे तळवलकरांचे ध्येय होते. म्हणून त्यांच्याकडून उत्कृष्ट पत्रकारिता होऊ शकली.
लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी तळवळकरांच्या आठवणींना उजाळा देताना असे म्हणाले की अलिकडे चांगली पत्रकारिता ही चांगला व्यवसाय होऊ शकत नाही. असं मानलं जात पण यातला आदर्श म्हणजे गोविंद तळवलकर.. त्यांच्या अंगी लिहिण्याचा जो निर्भीड भाव होता, तो आजच्या संपादकांमध्ये असण आवश्यक आहे.
प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष शरद पवार म्हणाले की ही श्रद्धांजली सभा नाही. गोविंदरावांना असले शब्द आवडत नव्हते. खरंतर त्यांच्या आठवणीचे स्मरण करण्यासाठी ही स्मृतीसभा आयोजित केली आहे. गोविंदरावांचे अग्रलेख हे महाराष्ट्राला चर्चेचा विषय असायचे. गोविंदराव असे एकमेव संपादक असतील ज्यांचे अग्रलेख २५ वर्षांनंतरही लक्षात राहिले आहेत. फक्त आपले स्वत:चेच नाही तर दुस-यांनी लिहिलेले चांगले अग्रलेख देखील ते छापायचे. गोविंदरावाचे अग्रलेख राज्याला दिशा देणारे असायचे. महाराष्ट्राच्या अनेक हिताच्या निर्णयाच्या मागे गोविंदराव होते. त्यांचा सल्ला आम्ही घ्यायचो. त्याचा फायदा आम्हाला झाला पण त्याचे श्रेय त्यांनी स्वत: कधी घेतले नाही. गोविंदराव उरळीकांचन इथल्या बापू कांचन या सामान्य शेतक-यांपासून ते इंदिरा गांधीचे माध्यम सल्लागार शारदा प्रसाद पर्यंत सर्वच लोकांसोबत संवाद ठेवायचे हा त्यांचा विशेष गुण होता अशा वेगवेगळ्या अष्टपैलू गुणाना उजाळा दिला.