Wednesday, 27 February 2019

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार वितरण सोहळ्याचे दि. ३ मार्च रोजी पुणे येथे आयोजन

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार वितरण सोहळ्याचे दि. ३ मार्च रोजी पुणे येथे आयोजन

प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा मा. खा. सौ. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार वितरण
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने मागील एकवीस वर्षांपासून सामाजिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या युवक युवतींना राज्यस्तरीय युवा पुरस्कार दिले जातात. यंदाच्या यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार-२०१९ ची घोषणा करण्यात आलेली होती. यामध्ये राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार व राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कारांचा समावेश आहे.
या पुरस्कारांचा वितरण सोहळा रविवार, दि. ३ मार्च २०१९ रोजी,  सायं ५ वा., लोकनेते ना. शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय भवन, धनकवडी, पुणे येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या पुरस्कारांचे वितरण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा मा. खा. सौ. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याप्रसंगी पुणे विभागीय केंद्राचे अध्यक्ष अजित निंबाळकर, सचिव अंकुश काकडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. क्रीडा पुरस्कारातून वेदांगी कुलकर्णी, साक्षी चितलांगे, किशन तडवी तर सामाजिक पुरस्कारातून स्नेहल चौधरी व अभिजीत दिघावकर यंदाचे मानकरी ठरले आहेत. 
यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय विशेष युवा क्रीडा पुरस्काराकरीता डोंबिवलीतील वेदांगी विवेक कुलकर्णी या एकोणवीस वर्षीय सायकलपटूची निवड करण्यात आलेली आहे. वेदांगीने आपल्या सायकलस्वारीने संपूर्ण जगभरात भारताचे नाव उंचावले असून १५९ दिवसात सायकलवरून २९ हजार किलोमिटरचे अंतर पूर्ण करीत तिने जगाला प्रदक्षिणा घातली आहे.  गिनीजच्या नियमानुसार सायकलवरून जगप्रदक्षिणा करताना २९ हजार किलोमीटर (विषववृत्तावरील भूभागाएवढे) अंतर पूर्ण करावे लागते. वेदांगीने ऑस्ट्रेलियातून सायकलींग सुरू केल्यानंतर न्यूझीलंड, कॅनडा, ग्रीनलॅण्ड, स्पेन, फिनलॅण्ड, रशिया आणि भारत अशा चौदा देशांमध्ये तिने सायकल चालविली. स्पेनमध्ये तिच्यावर चाकू हल्ला झाला. पैसे लूटले गेले. आईसलॅण्डमध्ये ती हिमवादळातही सापडली, पण तीने जिद्द सोडली नाही. विशेष म्हणजे तीची ही जगप्रदक्षिणा शिक्षण सुरू असतानाच झाली आहे. करीअरच्या मानसिकतेतून बाहेर जाऊन केलेली वेदांगीची ही धडपड उल्लेखनीय व प्रेरणादायी आहे.
या कारणास्तव प्रतिष्ठानच्या कार्यकारी समितीने वेदांगीची यंदाच्या विशेष युवा क्रीडा पुरस्कारासाठी निवड केलेली आहे. ५१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार (युवक) या पुरस्काराकरीता अक्कलकुवा, जि. नंदुरबार येथील धावपटू किसन नरशी तडवी याची निवड करण्यात आलेली आहे. बावीस वर्षीय किसनने अतिशय प्रतिकुल परिस्थितीतून येऊन जगभरात भारताचे नाव उंचावले आहे. किसनने ५२ व्या नॅशनल क्रॉसकंट्री स्पर्धेत विजेतेपद मिळविले असून तैपई, चीन येथे झालेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम मध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावलेली आहे. त्याचबरोबर ३३व्या नॅशनल ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स चॅम्पीयनशिपमध्ये पाच हजार मिटर व दहा हजार मिटर स्पर्धेत किसनने विजेतेपद पटकावलेले आहे. किसन सध्या २०२० सालच्या ऑलिम्पीक गेमची तयारी करीत असून भारताला किसन कडून त्याच्या खेळ प्रकारात मोठ्या अपेक्षा आहेत. २१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे किसनला मिळालेल्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यशवंतराव चव्हाण युवा क्रीडा पुरस्कार (युवती) २०१९ ची मानकरी औरंगाबाद येथील युवा बुद्धीबळ पटू साक्षी दिनेश चितलांगे ही ठरली असून अवघ्या १५ व्या वर्षी शिवछत्रपती पुरस्कार मिळविणारी सर्वांत युवा खेळाडू साक्षी ठरलेली आहे. आठ आंतरराष्ट्रीय, अकरा राष्ट्रीय व अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये पदके जिंकून साक्षीने महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. २०१५ साली जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून (एफआयडीई) वूमन इंटरनॅशनल मास्टर हा किताब तसेच याच संघटनेकडून २०१४ साली वूमन फिडे मास्टर हा किताब साक्षीने पटकाविलेला आहे. २०१७ साली एअरपोर्ट अ‍ॅथोरिटी ऑफ इंडियाकडून त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देखील साक्षीने पटकाविलेला आहे. २१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे साक्षीला मिळालेल्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार (युवक) २०१९ करीता नाशिक येथील युवा कार्यकर्ता अभिजीत सदानंद दिघावकर याची निवड करण्यात आलेली असून अभिजीतने पर्यावरण विषयक व वृक्षतोडीच्या विरोधात उल्लेखनीय कार्य केलेले आहे. तळागाळातील गरजूंना आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून आरोग्य क्षेत्रातील विविध संस्थांना सोबत घेऊन महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करून अभिजीतने गरजूंना आरोग्य विषयक लाभ मिळवून दिलेले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय युवक समितीने आयोजित केलेल्या परिषदेमध्ये अभिजीतने भारताचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. २१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे अभिजितला मिळालेल्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार (युवती) २०१९ करीता मंगरूळपीर, जि. वाशिम येथील स्नेहल चौधरी कदम या युवतीची निवड करण्यात आलेली आहे. अभियांत्रीकीचे शिक्षण झालेल्या स्नेहलने आपल्या नोकरीचा त्याग करून ग्रामिण भागातील आपल्या भगिनींकरीता क्षितीज संस्थेच्या माध्यमातून युवती व महिलांच्या मासिक पाळी संदर्भात मागील पाच वर्षांपासून ‘ब्लिड द सायलेन्स’ या अभियानाअंतर्गत स्वच्छता नियोजनाचे अनेक उपक्रम राबविले आहे. आजवर विविध शाळा, कॉलेज, ग्रामिण भागात, आदीवासी भागात, शहरी भागातील वस्त्या यामध्ये दहा हजार युवती व महिलांसमवेत संवाद साधून त्यांना मासिक पाळीत घ्यावयाची काळजी याबाबत महत्त्व पटवून दिले आहे. २१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे स्नेहलला मिळालेल्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
निवड झालेल्या सर्व पुरस्कारार्थींचे प्रतिष्ठानच्या कार्यकारी समितीने अभिनंदन केले आहे. सदरील कार्यक्रमास युवक युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.


Monday, 25 February 2019

साहित्य मंदिर सभागृहात रंगला ‘स्वर तीर्थ’...


साहित्य मंदिर सभागृहात रंगला स्वर तीर्थ...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबई केंद्रातर्फे पु. ल. देशपांडे, सुधीर फडके व ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने मेघ मल्हार यांचा स्वर तीर्थ हा कार्यक्रम शनिवार दिनांक २३ फेब्रुवारी रोजी साहित्य मंदिर सभागृह, वाशी येथे विनामूल्य आयोजित करण्यात आला होता. गायिका सोनाली कर्णिक, दीप्ती रेगे, सानिया पंडित यांनी स्वरसाज चढविला त्यामुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. यावेळी नचिकेत देसाईं यांनी कानडा राजा पंढरीचा हा ग.दि.मा., बाबुजींचा अभंग प्रस्तुत केला. या मंत्रमुग्ध संगीतमय कार्यक्रमाला श्रोत्यांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला. यावेळी सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ मालदार, मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ, वाशीचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी, गझलकार अप्पा ठाकूर, पंडित आगरकर बुवा, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नवी मुंबई  केंद्राचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड व सचिव डॉ अशोक पाटील, कुसुमाग्रज वाचनालय नेरुळचे अध्यक्ष व कवी ललित पाठक आदि उपस्थित होते.

विधी साक्षरता कार्यशाळा संपन्न

विधी साक्षरता कार्यशाळा संपन्न...यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम, मुंबई व ठाणे सब कॅम्पस, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २४ फेब्रुवारी रोजी एम.एस. डब्ल्यु. (मास्टर ऑफ सोशल वर्क) च्या विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय विधी साक्षरता कार्यशाळा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, खारघर येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये भारतीय संविधान व पर्यावरण विषयक तरतुदी, महिला व बालक यांच्या लैंगिक शोषणाविरोधी कायदेशीर तरतुद, बाल गुन्हेगारी संबंधित परिस्थिती आणि कायदेशीर तरतुदी, ज्येष्ठ नागरीकांसंबंधी विविध तरतुदी, ग्राहक संरक्षण विषयक तरतुदी व उपाय या पाच विषयांवर मराठी व इंग्रजी भाषांमध्ये व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. नेमका कायदा काय असतो त्याविषयी सखोल ज्ञान मिळावे म्हणून सदर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.  एम.एस. डब्ल्यु. (मास्टर ऑफ सोशल वर्क) च्या जवळपास ९० विद्यार्थ्यांनी यावेळी उपस्थिती दर्शवली. त्याच्याकडून संविधान सरनाम्याचे सामूहिक वाचन करवून घेण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना कार्यशाळेचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरमचे सचिव विनायक कांबळे अॅड. प्रमोद ढोकळे, अॅड. प्रॉस्पर डिसुजा, अॅड.प्रकाश धोपटकर, अॅड. भूपेश सामंत, अॅड. डॉ. प्रकाश देशमुख, आदि उपस्थित होते.

पाथरी तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना मोफत वैश्विक ओळखपत्र वाटप शिबीर

पाथरी तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना मोफत वैश्विक ओळखपत्र वाटप शिबीर...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र,परभणी तर्फे दि. २२ फेब्रुवारी २०१९ रोजी पंचायत समिती पाथरी ता.पाथरी जि. परभणी येथे 'दिव्यांगअस्मिता' अभियानांतर्गत पाथरी तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना मोफत वैश्विक ओळख पत्र वाटपासाठी नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीराच्या उदघाटनाला मा.श्री.राजेश ढगे(सभापती पंचायत समिती,पाथरी) अध्यक्ष म्हणून तर प्रमुख पाहुणे मा.श्री.घुगे साहेब(गट विकास अधिकारी पंचायत समिती पाथरी)मा.श्री.तांगडे(उपसभापती,पंचायत समिती पाथरी)मा.श्री गुंडरे साहेब(प्रशासन अधिकारी,पंचायत समिती पाथरी)तर प्रमुख माग॔दशक म्हणून मा.श्री.आर.जी.गायकवाड (वै.सा.का.जि.स.क.जि.प.परभणी)व मा.श्री.विष्णू आर.वैरागड(समन्वयक,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र परभणी)मा.देवल्लींग अप्पा देवडे (जिल्हा अध्यक्ष,प्रहार अपंग क्रांती आंदोलन,परभणी)व मा.संजय भौसले(टेक्निशियन प्रमुख कम्प्युटर ऑपरेट जि.प.परभणी) यांच्या प्रमुख उपस्थितीत सात दिव्यांगाना प्रातनिधिक स्वरूपात वैश्विक कार्ड वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पाथरी तालुक्यातील २७५ दिव्यांगानी वैश्विक ओळख पत्रासाठी(UDID) नोंदणी केली.यावेळी मा.सौ.भावनाताई नखाते(उपाध्यक्ष,जि.प.परभणी तथा महिला व्यासपीठ प्रमुख, य.च.प्र.वि.केंद्र,परभणी)यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी पाथरी तालुक्यातील दिव्यांग संघटनेचे विविध पदाधिकारी व विशेष शाळेतील कर्मचारी या प्रसंगी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Thursday, 21 February 2019

साहित्य मंदिर सभाग्रृहात रंगणार ‘स्वर तीर्थ’..

साहित्य मंदिर सभाग्रृहात रंगणार ‘स्वर तीर्थ’...
पु. ल. देशपांडे, सुधीर फडके व ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने मेघ मल्हार यांचा ‘स्वर तीर्थ’ हा कार्यक्रम शनिवार दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वा. साहित्य मंदिर सभाग्रृह, वाशी येथे आयोजित करण्यात आला आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबई केंद्रातर्फे आयोजित करण्यात येणा-या या दर्जेदार कार्यक्रमाचा विनामूल्य आस्वाद घेता येणार आहे.

जिंतूर तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना मोफत वैश्विक ओळखपत्र वाटप नोंदणी शिबीर


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र परभणी यांच्यातर्फे दि. २१ फेब्रुवारी २०१९ रोजी पंचायत समिती जिंतूर ता.जिंतूर जि. परभणी येथे ‘दिव्यांगअस्मिता’ अभियानांतर्गत जिंतूर तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना मोफत वैश्विक ओळख पत्र वाटपासाठी नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबीराच्या उदघाटनाला मा.श्री.आर.जी.गायकवाड(वै.शा.का.जि.प.परभणी) अध्यक्ष म्हणून तर प्रमुख पाहुणे मा.श्री.विष्णू वैरागड (समन्वयक, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र परभणी)मा.श्री.शेख साहेब(गट विकास अधिकारी,जिंतूर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिव्यांगाना प्रातनिधिक स्वरूपात वैश्विक कार्ड वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी जिंतूर तालुक्यातील ३६५ दिव्यांगानी वैश्विक ओळख पत्रासाठी नोंदणी केली.या कार्यक्रमासाठी जिंतूर तालुक्यातील दिव्यांग संघटनेचे विविध पदाधिकारी व विशेष शाळेतील कर्मचारी या प्रसंगी मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा.श्री.ताटे सर(विशेष शिक्षक)तर आभार प्रदर्शन मा.श्री.अपुर्वा सर यांनी केले.Wednesday, 20 February 2019

'दिव्यांगअस्मिता' अभियानांतर्गत दिव्यांग व्यक्तींना मोफत वैश्विक ओळख पत्र वाटप नोंदणी शिबीर

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,आयुक्त,अपंग कल्याण म.रा.पुणे,जिल्हा समाज कल्याण जि.प.परभणी व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र परभणी व महात्मा गांधी सेवा संघ परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आज २० फेब्रुवारी २०१९ रोजी जि.प.कन्या प्रशाला परभणी येथे "दिव्यांगअस्मिता अभियानांतर्गत परभणी तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना मोफत वैश्विक ओळख पत्र वाटपासाठी नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबीरासाठी उदघाटनाला मा.श्री.पृथ्वीराज बी.पी.(मुख्यकाय॔कारी अधिकारी जि.प.परभणी)हे अध्यक्ष म्हणून तर प्रमुख पाहुणे मा.डाॅ.सौ.संध्याताई दूधगावकर(प्राचार्य तथा अध्यक्ष यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र,परभणी)मा.सौ.एस.के.भोजने(जि.स.क.जि.प.परभणी)मा.श्री.विजयरावजी कान्हेकर(सचिव य.च.प्र वि.के.परभणी)मा.श्री.ढोकणे(गट विकास अधिकारी,परभणी)मा.श्री.आर.जी.गायकवाड (वै.सा.का.जि.प.परभणी)यांच्या प्रमुख उपस्थितीत दिव्यांगाना प्रातनिधिक स्वरूपात वैश्विक काड॔ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी परभणी तालुक्यातील २५० दिव्यांगानी वैश्विक ओळख पत्रासाठी नोंदणी केली.या कार्यक्रमासाठी परभणी तालुक्यातील दिव्यांग संघटनेचे विविध पदाधिकारी व विशेष शाळेतील कम॔चारी या प्रसंगी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.श्री.घायाळ सर(विशेष शिक्षक)तर आभार प्रदर्शन मा.श्री.विष्णू वैरागड(समन्वयक,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र परभणी)यांनी केले.

शनिवार, 23 फेब्रुवारीला चित्रपट चावडीत अमेरिकन चित्रपट ‘रोप’चे प्रदर्शन


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद व एमजीएम पत्रकारीता महाविद्यालय संचलीत एमजीएम फिल्म आर्ट्स विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चित्रपट चावडी उपक्रमाअंतर्गत, शनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019 रोजी सायं. 6 वा. ‘रोप’ हा चित्रपट चित्रपती व्ही. शांताराम प्रेक्षागृह, एमजीएम फिल्म आर्ट विभाग, एमजीएम पत्रकारीता महाविद्यालय, औरंगाबाद येथे दाखविण्यात येणार आहे.Friday, 15 February 2019

'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत पस्तीसावे पुष्प... 'जमिनीखालील तेलवाहिन्या'

संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत पस्तीसाव्या पुष्पाचे आयोजन करण्यात आले होते. श्री अनंत पांडुरंग देशपांडे यांनी 'जमिनीखालील तेलवाहिन्या' या विषयावर व्याख्यान दिले. त्यांनी माहितीचे प्रेझेंटेशन सादर केले. अगदी दोन दशकांपूर्वीपासून ते आतापर्यंत तेलवाहिन्यांमधून वाहतूक कशा प्रकारे केली जाते, त्यांचा वापर कसा करून घेतला जातो, त्यांची निगा कशी ठेवली जाते अशा प्रकारची माहिती त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितली. याबरोबरच याचे फायदे व तोटे देखील त्यांनी सांगितले.Thursday, 7 February 2019

'आरती थाळी सजावट' विनामूल्य कार्यशाळा संपन्न...


संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठ तर्फे विनामूल्य आरती थाळी सजावट या एकदिवसीय विनामूल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 'क्रिएटिव्ह आर्ट, ऑफ वीणा म्हात्रे संस्था' च्या संस्थापिका विणा म्हात्रे या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका होत्या. त्यांनी उपस्थित महिलांना उत्तमरित्या मार्गदर्शन केले. महिलांनी या कार्यशाळेला अतिशय चांगला प्रतिसाद दिल्याने सदर कार्यशाळा उत्साहवर्धक स्थितीत पार पडली.
को-ऑपरेटिव्ह सोसायटीला जीएसटी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे...रमेश प्रभू

संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे बुधवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी को-ऑपरेटिव्ह सोसायटी संबंधीत इनकम टॅक्स आणि जीएसटी या विषयावरती विनामूल्य मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशन (MSWA) चे अध्यक्ष, सीए रमेश प्रभू यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. GST कधी भरावा लागतो? का भरावा लागतो? किती मर्यादेपर्यंत GST भरणे अनिवार्य आहे? अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.


ले. शेवटी प्रश्नोत्तर सत्र घेण्यात आले.