Wednesday, 19 February 2020

क्लायमेट अँबॅसॅडर्स मुंबई –स्टॉकहोमचा समारोप सोहळा...


सृष्टीज्ञान संस्थेने क्लायमेट अँबॅसॅडर्स मुंबई स्टॉकहोम या प्रकल्पाचा २०१९ सालात राबवलेल्या उपक्रमांचा समारोप नुकताच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सहकार्याने संपन्न झाला. २००९ मध्ये मुंबईतीलच नव्हे तर महाराष्ट्रातील पहिला हवामान बदल विषयक शिक्षण आणि कृती प्रकल्प सुरु झाला. त्याला दहा वर्षे पूर्ण झाली. अनुयोग विद्यालय, प्रज्ञाबोधिनी हायस्कूल, आमची शाळा, एस आय इ एस डॉ. एपीजे अब्दुल कलाम मेमोरियल हायस्कूल आणि आर. जे. कॉलेज या प्रकल्पांमध्ये सहभागी महाविद्यालय आणि शाळांचा त्यांच्या सातत्यपूर्ण उपक्रमशीलतेचा गौरव करण्यात आला. या परिषदेमध्ये विद्यार्थ्यांनी हवामान बदल विषयक जलसंवर्धन, सौर उर्जा, कचरा व्यवस्थापन, हवामान पूरक सकस आहार यासारख्या विषयांवर केलेले प्रकल्प मांडले होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे यांनी या प्रकल्प प्रदर्शनाचे उद्घाटन केले.
त्याचबरोबर जलसंवर्धन विषयक नाटिका, भरड धान्यधारित लोकनाट्यातील बतावणी आणि पर्यावरण पूरक परीधानांचा फॅशन शो यासारख्या विविध माध्यमातून विद्यार्थ्यांनी हवामान बदल विषयक आपली जाणीव व्यक्त केली. अनुयोग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाणी विषयावर जल है तो कल है हे नाटक सादर केले. त्यानंतर आमची शाळा ची विद्यार्थिनी प्रतिक्षा ढेरे हिने पाण्याविना या विषयावर तिचे म्हणण व्यक्त केले. आमची शाळा च्या संगीत शिक्षिका यांनी वाघांच मनोगत त्यांच्या वाघांची कैफियत या कवितेतून मांडल.
आपण या संपूर्ण अन्नसाखळीमध्ये स्वत:ला अग्रस्थानी न ठेवता या अन्नसाखळीचा एक भाग म्हणून वावरलो, तर प्राण्यांना अशी कैफियत मांडावी लागणार नाही. कशा प्रकारे आपण आपल्या पर्यावरणाचं संवर्धन करू शकतो, हे आमची शाळा च्या विद्यार्थिंनींनी एका गाण्याच्या माध्यमातून सादर केले.
या प्रकल्पात सहभागी शिक्षक आणि विद्यार्थी यांनी आपली मनोगते व्यक्त केली आणि राबवलेल्या उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले. फ्युचर अर्थ स्वीडन या संस्थेच्या फ्रिडा आणि ज्युलिया या प्रतिनिधींनी या प्रकल्पातील उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच स्वीडनच्या तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या सेकंड हँड वस्तूंच्या दुकानाबद्दल माहिती दिली. प्रतिष्ठानचे कार्यक्रम संयोजक दत्ता बाळसराफ यांनी आपली जीवनशैली ही पर्यावरण पूरक असली पाहिजे, यावर आपल्या भाषणात भर दिला. शेवटी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा सुप्रियाताई सुळे, यांच्या हस्ते शाळातील विद्यार्थी आणि शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.











No comments:

Post a Comment