Tuesday, 4 February 2020

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार जाहीर


कुलदिप आंबेकर व लतिका राजपुत सामाजिक पुरस्कार तर अक्षय राऊत
व समृद्धी वामन क्रीडा पुरस्कार लवकरच मा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानातर्फे दरवर्षी दिल्या जाणा-या यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक व क्रीडा पुरस्कार २०१९ ची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी युवा आंदोलनाच्या क्षेत्रात विधायक व रचनात्मक काम करणा-या युवक-युवतींना सामाजिक युवा पुरस्कार देण्यात येतो तसेच महाराष्ट्रातील उत्कृष्ट खेळाडूंच्या कार्याचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे हे क्रीडा पुरस्काराचे उद्दिष्ट आहे. सदरील पुरस्कारांचे वितरण नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या निमंत्रक व प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे व इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.
या वर्षीचा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक युवा पुरस्कार कुलदिप आंबेकर, भूम, जि. उस्मानाबाद (सध्या पुणे) (महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील शहरात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यासाठी मोफत मेस उपलब्ध करून देणे. तसेच त्यांना खाजगी व शासकीय वसतिगृहात जागा मिळवून देणे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणात आर्थिक मदत करणे. तसेच शिक्षण घेत असताना गरजू व होतकरू विद्यार्थी-विद्यार्थिनींना अर्धवेळ नोकरी मिळवून देणे.) व लतिका राजपुत, धडगाव, जि. नंदुरबार (आदिवासी भागात अतिदुर्गम ठिकाणी वसलेल्या नर्मदा जीवनशाळांचे २०१० पासून व्यवस्थापन व समन्वय. प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन व मदत.) तर क्रीडा पुरस्कार युवक व युवती क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अक्षय राऊत, अंबाजोगाई, ता. बीड (सध्या मुंबई) (बॅडमिंटन - राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये पारितोषिके) व समृद्धी वामन, सावेडी, अहमदनगर (धनुर्विद्या - राज्य व राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पारितोषिके) यांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक युवा व क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी २१ हजार रु. रोख, व सन्मानपत्र असे आहे. यंदाचे हे पुरस्काराचे २३ वे वर्ष आहे.

No comments:

Post a Comment