Sunday, 24 November 2019

सर्वसामान्य माणसाची आर्थिक व सामाजिक सुरक्षितता जपणे देशापुढे आव्हान…


सर्वसामान्य माणसाची आर्थिक व सामाजिक सुरक्षितता
जपणे देशापुढे आव्हान

  - यमाजी मालकर
नाशिक (दि. २४) : जागतिकरणाचा वेग प्रचंड वाढला होता आणि त्यासोबत भारताचा आर्थिक विकासाचा दर कमी होता. यांची सांगड घालणे आपल्याला अवघड गेले. त्याचा परिणाम कृषी क्षेत्रावर झाला आणि त्यातूनच कृषी मालाला कमी भाव, शेतकरी आत्महत्या यांचे प्रमाण वाढले. परकीय चलन कमी आले. लोकसंख्येची अनियमित वाढ झाली आणि त्याचा स्वाभाविक परिणाम अर्थ व्यवस्थेवर झाला आहे. सरकारी धोरणे आणि आर्थिक व्यवस्थापन यांचा समन्वय साधणे हे आज देशापुढे मोठे आव्हान आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, सारस्वत बँक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे थोर शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या ३५ व्या पुण्यतिथीच्या पुर्वसंध्येला ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर यांच्या सर्वसामान्य माणूस आणि भारतीय अर्थव्यवस्थाया विषयावरील व्याख्यानाचे आयोजन अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे करण्यात आले होते.
मालकर पुढे म्हणाले की, शेतकरी, शेतमजूर हा फार मोठा वर्ग आपल्या देशात आहे. त्याचबरोबर मध्यमवर्गीय हा वर्ग आर्थिक विकासात महत्त्वाचा घटक आहे. सर्वसामान्य माणसाची या अर्थव्यवस्थेत दखल घेणे व त्याला आर्थिक पत मिळवून देणे, त्याला सामाजिक सुरक्षितता देणे गरजेचे आहे. सर्वसामान्यांची विविध पातळ्यांवर आर्थिक कोंडी होऊ न देणे महत्त्वाचे आहे. रोजगाराच्या संधी निर्माण होणे ही काळाची गरज आहे. शेअर बाजार, म्युच्युअल फंड या विषयी समाजात आर्थिक सुरक्षितता म्हणून एक नवा दृष्टीकोन येत आहे तो महानगरांबरोबरच गावपातळीवर हयेत आहे. हा एक बदल दिलासा देणाराही आहे. ऑनलाईन मार्केटींगकडेही लोक आकर्षित होत आहे.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा यांनी केले. प्रतिष्ठान विषयी प्रास्ताविक प्रतिष्ठानचे सचिव डॉ. कैलास कमोद यांनी केले. यमाजी मालकर यांचा सत्कार डॉ. कैलास कमोद यांनी केला. तर अंजली यमाजी मालकर यांचा सन्मान प्रतिष्ठानचे सदस्य अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी केला. यमाजी मालकर यांचा परिचय डॉ. सुधीर संकलेचा यांनी केला.
कार्यक्रमास संजय करंजकर, डॉ. शंकर बोर्‍हाडे, अ‍ॅड. संजय मुंदडा, सतीश गायधनी, बीएसएनएलचे महाव्यवस्थापक नितीन महाजन, धारा मालुंजकर, डॉ. हेमंत कोतवाल, सुधीर पगार, मंगेश जगताप उपस्थित होते.




No comments:

Post a Comment