Monday 25 November 2019

प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना ‘यशवंतराव चव्हाण पुरस्कार’ प्रदान...


कराड, दि. २५ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई तर्फे दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत मा. प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना ज्येष्ठ नेते, माजी कृषी मंत्री, भारत सरकार मा. शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे मा. शरद काळे, मा. अरुण गुजराथी, डॉ. अनिल काकोडकर, मा. राम खांडेकर, डॉ. सदानंद गोडसे, मा. दिलीप माजगावकर, मा. आ. बाळासाहेब पाटील, मा. सौ. सरोज (माई) पाटील, मा. मीनाताई जगधने, मा. खा. श्रीनिवास पाटील, मा. कल्लाप्पाआण्णा आवाडे, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. डॉ. अनिल पाटील, अॅड. रवींद्र पवार, मा. आबासाहेब देशमुख, मा. अरुण लाड, सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे, सहसचिव डॉ. विजयसिंह सावंत, प्राचार्य डॉ. माहन राजमाने, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे पदाधिकारी, मा. प्रभाकर देशमुख उपस्थित होते.
पुरस्काराला उत्तर देताना प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले की, यशवंतराव चव्हाणांच्या जीवनातील अनेक घडामोडी मी जवळून पाहिल्या आहेत. त्यांच्या राजकारणाची जडण-घडण मी अनुभवली आहे. ते उदारमतवादी होते. अशा महान व्यक्तीच्या नावाने दिला जाणार पुरस्कार माझ्या आयुष्यातील सर्वोच्च पुरस्कार आहे. मिळालेल्या पुरस्कारातील एक लाख रुपये माझी मातृसंस्था रयत शिक्षण संस्थेला देत आहे. तसेच इचलकरंजी येथील वाचनालयाच्या इमारतीसाठी एक लाख रुपये देत आहे, असे त्यांनी जाहीर केले.
मा. शरदचंद्रजी पवार म्हणाले की, आजचा दिवस भाग्याचा आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतींना उजाळा देणारा व त्यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यांनी राज्याचे व देशाचे नेतृत्व केले. आंतराष्ट्रीय परिषदेत त्यांनी भारताचे नेतृत्व केले. चव्हाण साहेब उत्तम वाचक होते, साहित्यिक होते. अशा व्यक्तिच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत काम केले, शेतकरी कामगार प्रश्नांसाठी अविरत कार्यरत राहिले, सहकार खात्याचा सखोल अभ्यास, स्वतःच्या कामापेक्षा लोकहिताला प्राधान्य देणारे व कर्मवीर आण्णांच्या विचारांशी बाधिलकी माणून कर्मवीरांचे विचार अमलात आणणारे ज्येष्ठ विचारवंत मा. प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना पुरस्कार बहाल करताना मनस्वी आनंद होत आहे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मा. अरुण गुजराथी यांनी केले. यावेळी राम खांडेकर लिखित सत्तेच्या पडछायेत या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. मानपत्राचे वाचन शरद काळे यांनी केले. यावेळी राम खांडेकर, डॉ. अनिल काकोडकर यांनी मनोगत व्यक्त केले. पुढील वर्षीचा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई तर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार प्रो. अभिजीत बॅनर्जी यांना घोषित करण्यात आला. या समारंभास सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शेवटी शरद काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. रेश्मा व प्रा. डॉ. नंदिनी रणखांबे यांनी केले.









No comments:

Post a Comment