'निवड : शाळेची आणि माध्यमाची' या विषयावर यशवंतराव चव्हाण
प्रतिष्ठान आणि ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान यांच्या वतीने १३
ऑक्टोबर २०१९ रोजी पुण्यातील गांधीभवन येथे पालक मेळावा संपन्न झाला. सुरुवातीला
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कार्यक्रम प्रमुख दत्ता बाळसराफ यांनी हा विषय
ठेवण्यामागची भूमिका मांडली. सोबतच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान शैक्षणिक व इतर
अन्य क्षेत्रात जे उल्लेखनीय कार्य करीत आहे त्या बाबतचे विवेचन केले. वैशाली
सरवणकर यांनी ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानच्या कार्याची ओळख सर्वाना करून दिली.
यानंतर मेळाव्यास उपस्थित असलेल्या तीन
पालकांनी प्रतिनिधीक स्वरूपात आपली मनोगते व्यक्त केली त्यातून सध्या पालक किती
जागृत झाले आहेत हे दिसून आले. यानंतर मनोज खंडरे यांनी महाराष्ट्र व भारतातील इतर
राज्ये यांची इंग्रजी माध्यमाचे प्रमाणात बाबत योग्य व सविस्तर माहिती दिली. यातून दक्षिण भारतात जसे साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे
तसे इंग्रजीतून शिकणाऱ्यांचेही प्रमाण जास्त आहे, असे निरीक्षण मांडले. अजित
तिजोरे सर यांनी जि.प. तसेच मराठी माध्यमाच्या शाळेमधून शिकलेल्या कर्तबगार तरुण
तरुणींचे सादरीकरण केले.
मेंदूविज्ञान व भाषाशिक्षण या विषयावर
डॉ.श्रुती पानसे यांनी अभ्यासपूर्ण माहितीच्या आधारे सहजपणे सर्वाशी संवाद साधला. खरेतर
मेंदूसारखा अवघड विषय परंतु अंत्यंत सोप्या पध्दतीने समजून सांगण्याची कुशलता
विलक्षण आहे ती सर्वाना आवडली.
जेवणानंतर सत्रात श्रीमती धनवंती
हर्डीकर यांनी शिक्षण भाषांचे आणि भाषांमधून या विषयाबाबत सखोल विश्लेषण केले. त्यांनी
सहज गतीने आणि ओघवत्या वाणीने माध्यमाबाबत फक्त मराठीच नको तर विचार करून माध्यम
ठरवा हा संदेश सर्वापर्यंत पोहचविला. आपण इतक्या खोलवर जाऊन खरेच माध्यमाबाबत खरेच
निर्णय घेतो का ..?
असा विचारप्रवण प्रश्र त्यांनी उपस्थित केला.
मेळाव्याच्या अखेरच्या भागात
महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या पालकांच्या मनात जे प्रश्न होते त्यावर
चर्चा झाली. या चर्चांना डॉ. वसंतराव काळपांडे, बसंती रॉय, धनवंती
हर्डीकर, डॉ. श्रुती पानसे, अजित तिजोरे यांनी उत्तरे दिली.
या मेळाव्याचा समारोप करीत असताना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या
शिक्षण विकास मंचचे मुख्य संयोजक मा. वसंतराव काळपांडे यांनी दिवसभर चाललेल्या
चर्चेचा आढावा घेतला. सर्व उपस्थितांचे आणि मेळाव्यासाठी ज्यांनी मदत केली त्या
सर्वाचे आभार शिक्षण विकास मंचाचे समन्वयक माधव सूर्यवंशी यांनी मानले.
No comments:
Post a Comment