Thursday, 3 October 2019

ज्येष्ठांनी आपल्या अनुभवांचा, ज्ञानाचा उपयोग समाजाच्या नव्या जडणघडीसाठी करावा - अ‍ॅड. जयंत जायभावे


ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावा



नाशिक दि. १ : ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या कर्तुत्वाने इतिहास घडवला असून त्या इतिहासाचे आजच्या पिढीस वर्तमानात उपयोग करून भविष्यकाळ उज्वल करावा. आज समाजातील अनेक व्यक्ती सुसंवादापेक्षा अनावश्यक चर्चा करण्यात आनंद मानतात. त्यांतून संस्कारांचा व नैतिकमूल्यांचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. सत्याने बाजूने बोलण्याचे धाडसही समाज हरवत चालला आहे. त्यासाठी ज्येष्ठांनी आपल्या ज्येष्ठत्वाचा अधिकार गाजवण्याची गरज आहे. व आपल्या अनुभवांचा, ज्ञानाचा उपयोग समाजाच्या नव्या जडणघडीसाठी करावा असे प्रतिपादन ख्यातनाम विधिज्ञ अ‍ॅड. जयंत जायभावे यांनी केले.
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने प.सा. नाट्यमंदिर शालिमार येथे आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अ‍ॅड. जायभावे बोलत होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना जायभावे यांनी कायद्या विषयी समाजात असलेले अज्ञान व त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन याविषयी विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा म्हणाले की, आज देशात तरूणांची संख्या जास्त असली तरी ज्येष्ठ नागरिकांनी जीवनाच्या झळा सोसून, लोकजीवनात तळागाळात जाऊन आपल्या आयुष्याला आकार दिला. म्हणूनच त्यांच्या विचारांची देशाला खरी गरज आहे. त्यासाठी ज्येष्ठांनी आपल्या अनुभवांचे योगदान द्यावे. समाजाचा ढासळलेला जीवनस्तर ही समस्या निर्माण झाली आहे.
महात्मा गांधी व भगवान बुद्धाचा विचारच समाजाला तारणार आहे. म्हणून त्यांच्या विचारांची जोपासना करावी. यावेळी भटेवरा यांनी दिल्लीतील व पत्रकारीतेतील अनुभव कथन केले.
स्वागत व प्रास्ताविक करतांना प्रतिष्ठाचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांचे जे मूलभूत प्रश्‍न व जीवनव्यवहारात त्यांना हक्क व सन्मान मिळवून देण्यासाठी या आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणार्‍या ज्येष्ठ नागरीकांना सन्मानित करण्यात आले. त्यात रामचंद्र काशिनाथ बर्वे, कमलाकर शंकरराव सबनीस, शिवाजी पुंजू जाधव, राधाकृष्ण रखमाजी जाधव, अलका खुशाल गारस, जितेंद्र येवले यांचा समावेश होता. सन्मानार्थींच्या वतीने कमलाकर सबनीस यांनी मनोगत व्यक्त केले. लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचाच्या वतीने सचिव रमेश डहाळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री मनोज शिंपी यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रतिष्ठानचे सचिव डॉ. कैलास कमोद यांनी केले. कार्यक्रमास प्रतिष्ठानच्या सदस्या सौ. कविता कर्डक व लोकज्योती  ज्येष्ठ नागरिक मंचचे अध्यक्ष सुरेश विसपुते, उपाध्यक्ष भा.रा. सूर्यवंशी, कार्याध्यक्ष डी.एम. कुलकर्णी तसेच विठ्ठलराव देवरे, देवराम सैंदाणे, वसंतराव पुंड, रंजन शहा, विठ्ठलराव सावंत, अ‍ॅड. दौलतराव घुमरे, रमेश देशमुख व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमासाठी विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन यांचे सहकार्य लाभले आहे.

No comments:

Post a Comment