Friday 6 September 2019

नव्या तरुणाईने गाजविली ‘यशवंत शब्दगौरव वकृत्त्व स्पर्धा’


अमरावती विभागीय फेरीत जीवन गावंडे, आकांक्षा असनारे, साक्षी इंगोले,ऋतुजा हरणे आणि अक्षय सुरोसे ठरले पारितोषिकांचे मानकरी
दि. ६ (अमरावती) : आजच्या काळात विचारमंथन घडणे आवश्यक आहे, असे पाच जीवंत विषय आणि या पाच विषयांची ८३ स्पर्धकांनी आपापल्या शैलीत केलेली अभ्यासपूर्ण मांडणी व या मांडणीतून आजच्या ज्वलंत विषयांच्या बाबत समोर आलेली तरुणाईचा मनातील गंभीरता याने आज येथील श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयात दिवसभर चाललेली यशवंत शब्दगौरवमहाविद्यालयीन वकृत्त्व स्पर्धेची अमरावती विभागीय फेरी प्रचंड गाजली. जीवन प्रकाश गावंडे या विद्यार्थ्याने या स्पर्धेचा प्रथम पुरस्कार पटकावला तर कु.आकांक्षा अविनाश असनारे व कु. साक्षी राजकुमार इंगोले यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय पारितोषिक पटकावले. कु. ऋतुजा सुभाष हरणे आणि अक्षय अजय सुरोसे यांनी उत्तेजनार्थ पुरस्कार पटकावून मुंबई येथे होणाऱ्या अंतिम स्पर्धेसाठी आपली निवड पक्की केली.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई नवमहाराष्ट्र युवा अभियान व श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने यशवंत शब्दागौरवमहाविद्यालयीन वकृत्त्व स्पर्धेच्या अमरावती विभागीय फेरीचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय लोकशाही व निवडणूक व्यवस्था, यशवंतराव चव्हाण यांची कारकीर्द : शोध आणि बोध, महाराष्ट्राच्या महिला धोरणाची २५ वर्षे, जातीचं काय करायचं? व्यवस्थापन की निर्मुलन आणि सोशल मिडिया : मी आहे नेहमी ऑनलाईन या पाच विषयावर अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम व यवतमाळ या पाच जिल्ह्याच्या विविध महाविद्यालयातील एकूण ८३ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.स्मिता देशमुख यांच्या हस्ते झाले तर श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले यांच्या अध्यक्षतेत आणि सुप्रसिद्ध कवी बबन सराडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण समारोह झाला.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ यांनी समारोपीय कार्यक्रमात या स्पर्धेच्या आयोजनामागची भूमिका विशद केली तर दिलीपबाबू इंगोले, बबन सराडकर, प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख यांनी आपल्या भाषणातून सहभागी स्पर्धकांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. स्पर्धेचे परीक्षक म्हणून महेश अंचितलवार, प्रा. दिपाली देशमुख, क्षीप्रा मानकर व प्रा. विनय सोनुले यांनी काम पहिले. डॉ. जयराम गायकवाड यांनी कार्यक्रमाचे संचालन व डॉ. वर्षा चिखले, प्रा.सिमा चोपडे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे आणि स्पर्धेचे समन्वयक निलेश राऊत, प्रा. कविता पाटील, डॉ. सुवर्णा गाडगे, डॉ. महेंद्र मेटे, डॉ. कुमार बोबडे, डॉ. व्ही. एच. भटकर, डॉ. मनोज जोशी, प्रा. गजानन केतकर, डॉ. अपर्णा सरोदे, प्रफुल्ल घवळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणारा श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाचा विद्यार्थी जीवन गावंडे याला रु. पाच हजार रोख, स्मृतीचिन्ह, ग्रंथ व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. दुसरा क्रमांक पटकाविणारी विद्यार्थिनी कु. आकांक्षा असनारे हिला रु. तीन हजार रोख, स्मृतीचिन्ह, ग्रंथ व प्रमाणपत्र देण्यात आले. तृतीय क्रमांक मिळविणारी प्रा. राम मेघे महाविद्यालय, बडनेराची विद्यार्थिनी कु. साक्षी इंगोले हिला रु. दोन हजार रोख, स्मृतीचिन्ह, ग्रंथ व प्रमाणपत्र आणि उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त करणारी श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. ऋतुजा हरणे आणि फुलसिंग नाईक महाविद्यालय, यवतमाळचा अक्षय सुरोसे याला रु. एक हजार रोख, स्मृतिचिन्ह, ग्रंथ व प्रमाणपत्र देण्यात आले.या विभागीय स्पर्धेत विजयी झालेल्या पाचही स्पर्धकांची मुंबई येथे होणाऱ्या अंतिम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.






No comments:

Post a Comment