Monday, 11 March 2019

विशेष व्याख्यान दुष्काळाच्या झळा व निवडणुकीचे राजकारण




निवडणुकीच्या धुराळ्यात दुष्काळाच्या झळा जाणीवपूर्वक दुर्लक्षित होतील : आसाराम लोमटे

संपूर्ण देशात आता लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत आणि याच काळात मराठवाडा भीषण दुष्काळाला तोंड देतोय,निवडणुकीच्या धामधुमीत दुष्काळग्रस्तांचे प्रश्न बाजूला पडण्याची भीती आहे. परंतु ते प्रश्न सजग नागरिक म्हणून आपण लावून धरायला हवे,असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक आसाराम लोमटे यांनी केले.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या १०६ व्या जयंतीच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद व एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. या प्रसंगी प्राचार्य प्रतापराव बोराडे,विभागीय केंद्राचे सचिव नीलेश राऊत,प्राचार्या डॉ.रेखा शेळके,सुहास तेंडुलकर, शिव कदम,डॉ.संदीप शिसोदे प्रमुख उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना श्री.लोमटे यांनी महाराष्ट्रात आजवर पडलेल्या दुष्काळाचा आढावा घेतला व त्या त्या वेळी त्यावेळच्या सुधारकांनी व राज्यकर्त्यांनी दुष्काळाबाबत काय दूरगामी विचार केला होता याची मांडणी केली. यात प्रामुख्याने महात्मा फुले,महाराजा सयाजीराव गायकवाड, राजर्षी शाहू महाराज यांच्या कारकिर्दीचा समावेश होता. 'मराठवाड्याच्या दुष्काळाचा निवारणाचा सातत्याने विचार झाला निर्मूलनाचा आता व्हायला हवा', असे मत त्यांनी मांडले.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी, अभ्यासक उपस्थित होते. यावेळी मॅट्रिक एकांकिका सवाई नाट्य स्पर्धेत प्रथम आल्याबद्दल नाटकाचे लेखक दिग्दर्शक प्रवीण पटेकर यांचा सत्कार आसाराम लोमटे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुबोध जाधव,विशाखा गारखेडकर,उमेश राऊत,अक्षय गोरे आदींनी परिश्रम घेतले.
















No comments:

Post a Comment