Monday, 27 May 2019

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे बालनाट्य शिबिराचा समारोप





नाट्यशिबीरातून स्वत:ला शोधण्याची व सुसंवादाची प्रक्रिया सुरू होते
                                                                                    - डॉ. मनोज शिंपी
आजच्या इंटरनेटच्या जगात मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी शिबिरे ही मोलाची भूमिका बजावत असतात. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करत असतात. संवाद हरवलेल्या या काळात नाट्य शिबीरातून सुसंवादाची स्वत:ला शोधण्याची प्रक्रीया नव्याने सुरू होते. तेच अशा शिबीरांचे यश आहे. असे प्रतिपादन विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. मनोज शिंपी यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक, सारस्वत बँक लि., विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ व विश्वास गार्डन, ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध नाट्यकलावंत लक्ष्मी पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली बालनाट्य शिबिराचेआयोजन क्लब हाऊस, सावरकरनगर येथे करण्यात आले होते. त्याच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. शिबीराची संकल्पना विश्वास जयदेव ठाकूर यांची होती. 
डॉ. शिंपी पुढे म्हणाले की, मुलांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. मुलांची मानसिकता निरोगी राहावी याकरीता त्यांना आवडत्या क्षेत्रात करियर करण्याची संधी द्यावी. त्यातून त्यांना जीवनाचा खर्‍या अर्थाने आनंद मिळेल.
शिबीर मार्गदर्शक लक्ष्मी पिंपळे म्हणाल्या की, मुलांमधील उपजत गुणांना नाट्यशिबीराच्या माध्यमातून व्यासपीठ मिळत असते व सादरीकरण करण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो.
यावेळी शिबीरार्थींनी विविध नाटीका व कविता सादर केल्या. त्यात माकड व टोपीवाला, लाकुडतोड्या व कुर्‍हाड, तसेच पाऊस, परीची शाळा, फुलपाखरू, सूर्य, चित्ता, पुस्तक हाती घेऊया आदी कवितांचा समावेश होता. त्यानंतर शिबीरार्थींना डॉ. मनोज शिंपी यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.



No comments:

Post a Comment