Friday, 10 May 2019

शाहीर अनंत फंदी यांच्या कार्यावर व्याख्यानाचे आयोजन…



प्रख्यात शाहीर अनंत फंदी यांच्या द्विशताब्दी स्मृतीवर्षानिमित्त अनंत फंदी-चरित्र व कार्य या विषयांवर सुप्रसिद्ध लेखक प्रा. शिरीष गंधे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, ग्रंथ तुमच्या दारी सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.  शनिवार, ११ मे २०१९ रोजी सायं. ६.०० वाजता अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
अनंत फंदी हे पेशवाईतील एक दरबारी कवी होते. सन १७४४ मधे जन्मलेल्या फंदींचा मृत्यू १८१९ मधे झाला. त्यांच्या मृत्यूला आता दोनशे वर्षे पूर्ण होत आहेत. होनाजी या तत्कालीन प्रतिभावंत कवीने अनंत कवनांचा सागरअशा शब्दात तारीफ केली आहे. अनंत फंदी हा मुळात तमासगीर शाहीर. बहुश्रुतता, वक्तृत्व आणि भाषेवरील प्रभुत्व यामुळे ते पुढे कीर्तनकार झाले. फंदींनी लावण्या, पोवाडे, कटाव आणि फटके रचले. त्यापैकी फक्त सात पोवाडे, आठ लावण्या आणि काही फटके आज उपलब्ध आहेत. श्लोक, ओव्या, आर्या आणि पदे अशाही रचना त्यांच्या नावावर आहेत. रावबाजीवरील लावणी, नाना फडणवीसाचा पोवाडा आणि फटका या फंदींच्या काही गाजलेल्या रचना. फंदींना मराठीतील फटका या काव्यप्रकाराचे जनक म्हटले जाते. बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको, संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरू नको हा त्यांचा उपदेशपर फटका फार प्रसिद्ध आहे.
विश्वास ग्रृपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर हे या कार्यक्रमाचे आयोजक असून, संयोजक विनायक रानडे आहेत. तरी कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.



No comments:

Post a Comment