नाशिक (दि. १८) : सिनेमा हे सर्व कलांचा संगम असून अविष्काराची अनेक रूपे त्यात असतात. सादरीकरणाच्या शक्यता सामावलेल्या असतात. त्यामुळे सिनेमाच्या कुतुहलामुळे या माध्यमाकडे वळलो आणि तो जगण्याचा भाग झाला. फिल्म सोसायटीची चळवळ माझ्यासाठी जगण्याचं,सिनेमाचे विद्यापीठच होय. त्यातून मी घडत गेलो. आजचा सिनेमा बदलला असून आजच्या पिढीची दृश्याविषयीचे आकलन बदलले आहे. त्यामुळे दृश्यभाषा बदलली आहे. वाढते चॅनेल्स,सिनेमांची निर्मिती वाढली आहे. त्यातून सिनेमाविषयीची व्याख्याच बदलली आहे. नवे प्रश्न, काळाचे प्रश्न घेऊन येणार्या सिनेमांना रसिकांची मागणी आहे असे प्रतिपादन ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक अशोक राणे यांनी केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक,विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट,नाशिक,सारस्वत बँक,रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ व विश्वास गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने अशोक राणे यांच्या ‘सिनेमा पाहिलेला माणूस’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी अशोक राणे यांची मुलाखत डॉ. कैलास कमोद यांनी घेतली. यावेळी त्यांनी आपला जीवन प्रवास कथन केला. विश्र्वास हब येथे हा कार्यक्रम झाला१९९० पासून सिनेमा बदलत असून अॅक्टीव्ह ऑडीअन्स तयार झाला आहे. आजच्या तरूण दिग्दर्शकांनी जुने मराठी-हिंदी सिनेमे आवर्जुन बघावेत व परंपरा समजून घ्यावी व आपले वेगळेपण दिग्दर्शनातून सिद्ध क रावे. मेहनत व अभ्यास करावा. मल्याळी चित्रपट क्षेत्र आधुनिक असून त्यात नव-नवीन व आशय प्रधान सिनेमे तयार होत आहेत. प्रादेशिक सिनेमे बघावेत व आपली जाण समृद्ध करावी.समाजातील बदलत्या प्रश्नांचा वेध दिग्दर्शकांनी घ्यावा,दादासाहेब फाळके या चित्रमहर्षींनी आपल्याला सिनेमाचे नवे जग दाखवले व जगण्याला नवा विचार,आनंद दिला त्याची आपण जपणूक करावी असेही ते म्हणाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व अशोक राणे यांचा परिचय यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे नाशिकचे कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा यांनी केला. प्रतिष्ठानचे सचिव डॉ. कैलास कमोद यांनी अशोक राणे व विवेक गरूड यांचा सन्मान केला. कार्यक्रमास विश्वास ज्ञान प्रबोधिनी व रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. मनोज शिंपी,मिलींद धटिंगण,रघुनाथ फडणीस,श्रीकांत वाबळे,गजानन ढवळे,रणजीत गाडगीळ,आशिष चव्हाण,विश्वास को-ऑप. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद पाटील चित्रपट रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment