स्मिता पाटील यांच्या अभिनयात एवढी ताकत होती की, संभाषण न करताही त्यांच्यातील भावमुद्रावरून आपल्याला त्यांच्या भावना समजत होत्या, त्या काळी सोशल मिडिया नसतानाही त्यांना मिळालेली लोकप्रियता ही त्यांच्यातील अभिनयाचे सामर्थ्य सिद्ध करते, अशा अभिनेत्री दुर्मिळ आहेत, असे विचार ज्येष्ठ अभिनेत्री विद्या बालन यांनी १०व्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्ता आयोजित स्मिता पाटील यांच्यावरील स्मृती कार्यक्रमात बोलताना सांगितले. यावेळी महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी त्यांच्याशी संवाद साधला. चित्रपटसृष्टीत वावरताना आपल्याला प्रत्येक गोष्टींचे सूक्ष्म बारकावे समजून घ्यावे लागतात,हा एक निरंतर अभ्यासू वृत्ती जोपासण्याचा प्रकार आहे. त्यासाठी खूप मेहनतदेखील आवश्यक आहे. वेगवेगळ्या भाषांमध्ये,वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट करताना आपल्यातील कौशल्याचा कस लागतो. त्यासाठी तितक्या ताकदीने आपण काम केले तर रसिकांपर्यंत आपले विचार व तो प्रसंग पोहचविणे शक्य होते. आजच्या जमान्यात रसिकवर्ग देखील अधिक प्रगल्भ आहे. चर्चादेखील मोठ्या प्रमाणावर होत असते. त्यामुळे इतकी वर्षे होऊनसुद्धा आपण स्वतःला अपडेट ठेवत असतो. हे प्रत्येक कलाकाराने ठेवलेच पाहिजे, असेही विद्या बालन यांनी सांगितले. कलाकारांचे जीवन ग्लॅमरस वाटत असले तरी त्यामागे खडतर मेहनत आहे,अनेक प्रवास,खाण्यापिण्याबाबत करावी लागणारी तडजोड तसेच खासगी आयुष्यावर येणारे निर्बंध याची जाणीव अनेकदा इतरांना नसते. त्यामुळे हे क्षेत्र अधिक आव्हानात्मक आहे. या क्षेत्रात येऊ इच्छिणा-यांनी या गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजे,या मुद्द्यावर भर देताना त्यांनी आपल्या चित्रपट प्रवासातील अनेक आठवणी तसेच किस्से सांगितले. त्याचबरोबर आलेल्या अनेक आव्हानांतून कसे सामोरे गेलो,याचाही ऊहापोह केला.
No comments:
Post a Comment