भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास गौरवशाली आहे. त्याचबरोबर मराठी चित्रपटांचीही मोठी परंपरा असून त्यात प्रामुख्याने सामना, सिंहासन, जैत रे जैत, उंबरठा असे सिनेमे जब्बार पटेल यांच्यासारख्या प्रतिभासंपन्न भारतीय दिग्दर्शकांनी सिनेसृष्टीला देऊन हे क्षेत्र समृद्ध केले तसेच जगात लौकिक वाढवला आहे, असे विचार यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या १०व्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. या महोत्सवात सिनेसृष्टीतील विशेष योगदानाबद्दल गौरविण्यात आलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर या ख-या अर्थाने आजही `सपनों की रानी' असून त्या ज्या राज्यातून आहेत, त्या पश्चिम बंगालने वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक मान्यवर दिले असून देशाच्या विकासात मोलाचे योगदान आहे, असेही विचार त्यांनी व्यक्त केले.भारतीय सिनेमा क्षेत्रात वावरताना चांगले दिग्दर्शक मिळाले, त्यामुळे अभिनय शिकता आला तसेच ह्या क्षेत्राने खूप मानसन्मान मिळवून दिला, त्यामुळे आपण खूप समाधानी आणि आनंदी आहोत, असे उद्गार शर्मिला टागोर यांनी काढले तसेच हा मनाचा पुरस्कार दिल्याबद्दल यशवंतराव चव्हाण सेंटर बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
चित्रपट महोत्सवाचे संचालक जब्बार पटेल यांनी या महोत्सवामागील भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंतराव चव्हाण सेंटरचे सरचिटणीस शरद काळे यांनी केले. या कार्यक्रमास सिनेक्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होती. या महोत्सवात २३जानेवारी २०२०पर्यंत विविध वर्गवारीतील सुमारे ६५चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. भारत, चीन, रशिया, फ्रान्स, इराण, बेल्जियम, अर्जेंटिना, इस्त्रायल,तुर्की आदी देशांतील चित्रपट एकाच ठिकाणी पाहण्याची सुवर्णसंधी सर्वासाठी यशवंत चित्रपट महोत्सवाने उपलब्ध करुन दिली आहे. अशी माहिती महोत्सवाचे मुख्य समन्वयक महेंद्र तेरेदेसाई यांनी दिली.
No comments:
Post a Comment