Thursday, 11 July 2019

‘नवीन शैक्षणिक धोरण मसुदा २०१९’ वर पुण्याच्या गांधीभवनात चर्चा संपन्न....


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, शिक्षण विकास मंच यांच्या वतीने सदरील शिक्षणकट्टयावर चर्चा  आयोजित करण्यात आली होती. या चर्चेची सुरूवात जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षण विकास मंचचे मुख्य संयोजक मा. डॉ. वसंतराव काळपांडे यांच्या प्रस्ताविकाने झाली. प्रास्ताविकात त्यांनी भारतीय शिक्षण पद्धती, आतापर्यंत आलेले आयोग त्याचा शिक्षणावर झालेला परिणाम, येऊ घातलेले  नवीन शैक्षणिक धोरण यावर मुख्यत्वे मांडणी केली. सोबतच धोरण अंमलबजावणीसाठी समाजाचा सहभाग महत्त्वाचा आहे याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. यानंतर शिक्षण विकास मंचच्या मुख्य सल्लागार श्रीमती बसंती रॉय यांनी नवीन शैक्षणिक धोरणाचा आढावा घेतला यानंतर उपस्थित सदस्यांनी चर्चेत भाग घेतला.
चर्चेच्या सुरूवातीस प्रभाकर खाडिलकर यानी प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच मिळावे. निवृत्त तज्ज्ञ व्यक्तींच्या ज्ञानाचा शिक्षण व्यवस्थेतेने फायदा करून घ्यावा अशी सूचना केली. सोबतच अंगणवाडी - पूर्व प्राथमिक शिक्षण दर्जेदार असणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. यानंतर नीलिमा सप्रे यांनी शिक्षक प्रशिक्षण कसे राबविले जाणार..? प्रशिक्षण जबाबदारी शाळेवर द्यावी तसेच शिक्षकानी स्वतः आपला अभ्यासक्रम तयार करावा. सोबतच पालकांचे उद्बोधन आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेचे कमलाकर महामुनी यांनी कला, क्रीडा शिक्षकांच्या जागा भरण्याकडे शासनाचे दुर्लक्ष होते या धोरणातही याबाबत शंका कायम आहेत. विद्यार्थी शिक्षक होण्यास उत्सुक नाहीत, नाईलाजाने या क्षेत्रात येणारी संख्या वाढली आहे, यावर विचार व्हावा.
भास्कर भुसारी यांनी आपत्ती व्यवस्थापन, अभिमान आणि अपयश या क्षेत्रांचा शिक्षणात अंतर्भाव व्हावा असे मत व्यक्त केले. सुरेखा सोनवणे यांनी  हे धोरण पालक शिक्षकांपर्यंत जायला हवे यावर आणखी चर्चा व्हायला हवी. शाळेत शैक्षणिक साधनांची कमतरता असल्याने आठवी नंतर ज्ञान रचनावादी शिक्षण अवघड जाते. सरकारी शाळांमध्ये मुले पाठवण्यासाठी पालकांनी प्राधान्य द्यायला हवे. याबद्दल आपले मत मांडले. अंजली सोमण यांनी पूर्व प्राथमिक टप्पा सुधारणे अत्यावश्यक आहे. पालकांचा इंग्रजी माध्यमाचा ओढा हा मोठा अडथळा मातृभाषेतून शिक्षणासाठी आहे याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले.
शरद जावडेकर यांनी नवीन धोरणात समतेचा उल्लेख नाही. हे खाजगी शिक्षण सम्राटांचे हितसंबंध राखणारे आहे. स्कूल कॉम्प्लेक्स कल्पना प्रत्यक्षात येणे अवघड असल्याचे निरीक्षण नोंदविले. अनिल कुलकर्णी यांनी शिक्षणाच्या अधिकारामध्ये असलेल्या त्रुटी, कृती आराखडा यावर मत व्यक्त केले. प्रीतेश कांबळे जीवन कौशल्ये प्रशिक्षण आवश्यक, लैंगिक शिक्षण आवश्यक असल्याचे (शिक्षक विद्यार्थी दोघांसाठी) मत व्यक्त केले.
मुकुंद किर्दत आणि इंदापुरकर यांनी  पूर्व प्राथमिक शिक्षण महत्वाचे असल्याचे सांगितले .
रवींद्र झेंडे यांनी ११वी व १२वी व्यवसायधारित शिक्षण पुढे उच्च शिक्षणाशी जोडून घेण्याचा मार्ग कोणता..? याचा धोरणात विचार करावा. डॉ. श्रुती पानसे यांनी  मातृभाषेतून शिक्षण असावे मात्र त्याचा अभ्यासक्रम विद्यार्थ्याचे वय लक्षात घेऊन त्याना सहज समजेल अशा पद्धतीचा असावा, सध्याचा अभ्यासक्रम क्रूर वाटतो असे सांगितले. Scientific temper, बौद्धिक क्षमता आणि आर्थिक क्षमता यातील फरक कसा कमी करता येईल? यासंदर्भात नवीन धोरणात तरतूद असावी ही अपेक्षा व्यक्त केली. प्रसिध्द साहित्यिक राजीव तांबे यांनी मुलांना शिकण्यातला आनंद कळावा, मुलांनी माझा प्रश्न मी सोडवणं आवश्यक आहे सोबतच प्रश्न विचारू शकतील असं वातावरण आवश्यक असल्याचे मत नोंदवले. पुढे ते म्हणाले, शाळा घरात आणि घर शाळेत आले पाहिजे असं वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. वैशाली कार्लेकर महत्त्वाकांक्षी धोरण आहे मात्र खाजगी शाळांवर हे धोरण लागू करणे किती शक्य आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. सर्व शिक्षण मंडळ एकत्र करून देशासाठी एकच शिक्षण मंडळ करणे आवश्यक वाटते, असेही मत नोंदवले.
कार्यक्रमाच्या शेवटी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे कार्यक्रम प्रमुख दत्ता बाळसराफ यांनी उपस्थितांचे आभार मानले. हया धोरणावर आणखीन चर्चा झाली पाहिजे ही अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमास पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, पत्रकार यांची उपस्थिती होती.






No comments:

Post a Comment