Friday, 19 July 2019

दिव्यांग बांधवांमध्ये आत्मविश्वास व ध्येय निर्माण करावे - विश्वास ठाकूर


दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी जाणिवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे असून त्यांच्यासाठी असलेल्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याबरोबरच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे व त्यांना आधुनिक जीवन जाणिवांचे भान देणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र, नाशिकचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले.
सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकार, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान-अपंग हक्क विकास मंच मुंबई, महात्मा गांधी सेवा संघ परभणी, समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद, नाशिक व विश्वास ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने विविध प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना आवश्यक कृत्रिम अवयव व साधनांचे मोफत वाटप करण्यासाठी शिबीराचे आयोजन कुसुमाग्रज स्मारक येथे करण्यात आले त्याप्रसंगी श्री. ठाकूर बोलत होते. ते म्हणाले की, दिव्यांग व्यक्तींनी अनेक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने वेगळेपण निर्माण केले आहे. ते समाजासाठी आदर्शवत आहेत.
शिबिरात १५० हून अधिक दिव्यांग व्यक्तींना व्हील चेअर, श्रवण यंत्र, कुबडी, एमआर किट, कॅलिपर स्प्लिट, जयपूर फूट, कमोड चेअर, वॉकर एल्बो’, क्रचेस इ. सहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना जिल्हा परिषदेचे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील यांनी शासनाच्या दिव्यांग व्यक्तिंसाठी विविध योजनांची माहिती दिली व अशा शिबिरांच्या माध्यमातून होणार्‍या फायद्यांची माहिती दिली. याप्रसंगी प्रकल्प संयोजक के.एस. उईके उपस्थित होते. तसेच जितेंद्र दाभाडे, ज्ञानेश्वर जाधव, शेख कलिम, नसिम खान यांनी शिबीरार्थींची तपासणी करून साहित्यांचे वाटप केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मनीषा पगारे यांनी केले.





No comments:

Post a Comment