Thursday, 3 October 2019

'पृथ्वीचे वाढते तापमान आणि आपण'

'पृथ्वीचे वाढते तापमान आणि आपण' व्याख्यान संपन्न…

click here, to watch full video


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई तर्फे 'पृथ्वीचे वाढते तापमान आणि आपण' या विषयावर विनामूल्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. हवामानात होत चाललेला बदल, झाडांची होणारी कत्तल, बांधकामे, एकूणच या सर्व –हासाला कारणीभूत ठरणा-या मानवी कृती आटोक्यात आणता याव्यात याविषयी व्याख्याते अतुल देऊळगावकर यांनी भावी पिढीला हवामान बदलाविषयी जागृकता निर्माण व्हावी यासाठी मार्गदर्शन केले. या गोष्टीचा गंभीर विचार करायचा असेल तर याविषयीच गांभीर्य येणा-या पिढीला कळायला पाहिजे अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.









ज्येष्ठांनी आपल्या अनुभवांचा, ज्ञानाचा उपयोग समाजाच्या नव्या जडणघडीसाठी करावा - अ‍ॅड. जयंत जायभावे


ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावा



नाशिक दि. १ : ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या कर्तुत्वाने इतिहास घडवला असून त्या इतिहासाचे आजच्या पिढीस वर्तमानात उपयोग करून भविष्यकाळ उज्वल करावा. आज समाजातील अनेक व्यक्ती सुसंवादापेक्षा अनावश्यक चर्चा करण्यात आनंद मानतात. त्यांतून संस्कारांचा व नैतिकमूल्यांचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. सत्याने बाजूने बोलण्याचे धाडसही समाज हरवत चालला आहे. त्यासाठी ज्येष्ठांनी आपल्या ज्येष्ठत्वाचा अधिकार गाजवण्याची गरज आहे. व आपल्या अनुभवांचा, ज्ञानाचा उपयोग समाजाच्या नव्या जडणघडीसाठी करावा असे प्रतिपादन ख्यातनाम विधिज्ञ अ‍ॅड. जयंत जायभावे यांनी केले.
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने प.सा. नाट्यमंदिर शालिमार येथे आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अ‍ॅड. जायभावे बोलत होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना जायभावे यांनी कायद्या विषयी समाजात असलेले अज्ञान व त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन याविषयी विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा म्हणाले की, आज देशात तरूणांची संख्या जास्त असली तरी ज्येष्ठ नागरिकांनी जीवनाच्या झळा सोसून, लोकजीवनात तळागाळात जाऊन आपल्या आयुष्याला आकार दिला. म्हणूनच त्यांच्या विचारांची देशाला खरी गरज आहे. त्यासाठी ज्येष्ठांनी आपल्या अनुभवांचे योगदान द्यावे. समाजाचा ढासळलेला जीवनस्तर ही समस्या निर्माण झाली आहे.

Monday, 30 September 2019

शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान डोंबिवली आयोजित पालक मेळावा


शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान, डोंबिवली आयोजित पालक मेळावा        

 विषय :- निवड : शाळेची आणि माध्यमाची
रविवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०१९
सकाळी १०:०० ते सायंकाळी ४:००
स्थळ : गांधीभवन, कोथरूड, पुणे.
पालक मेळाव्यामागील भूमिका
बदलती जीवनशैली, बदलतं जग, ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानाच्या संपर्कात आलेले आपण आणि सर्वांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारी भाषा म्हणजे इंग्रजी! आपल्या मुलांना चांगली इंग्रजी आलीच पाहिजे अशी सर्वच पालकांची तीव्र इच्छा असते, आणि ती रास्तच आहे. परंतु इंग्रजी माध्यमात शिकल्यानेच इंग्रजी भाषा येते असा गैरसमजही निर्माण झाला आहे. शिक्षक आणि पालक यांनी योग्य पद्धती वापरल्या तर इंग्रजी माध्यमात न शिकताच  जास्त प्रभावीपणे इंग्रजी शिकणे शक्य आहे. त्यासाठी या दोन्ही घटकांचे उद्बोधन होणे आवश्यक आहे. 
ज्या भाषेतून मुलांना सहजतेने अभिव्यक्त होता येते तीच भाषा शिक्षणाचे माध्यम म्हणून सर्वात चांगली. आपल्या पाल्याला  आजच्या युगात अव्वल स्थानावर ठेवायचे असल्यास घरच्या/परिसर भाषेतून अर्थात मराठी माध्यमातून शिक्षण घेणे आणि त्याचबरोबर उत्तम इंग्रजी शिकवणे हाच पर्याय सर्वोत्तम आहे.
हाच माध्यमनिवडीचा विषय घेऊन आम्ही हा पालक मेळावा आयोजित करत आहोत.
सहभागी होऊ शकणारे पालक
(१) ज्यांनी माध्यमनिवड केली नाही, असे नवपालक
(२) ज्यांची मुले मराठी किंवा इंग्रजी माध्यमात शिकत आहेत, परंतु मनात माध्यम निवडीबद्दल संभ्रम आहे, असे पालक.
(३) इंग्रजी माध्यम निवडले आहे, परंतु त्याबाबत समाधानी नाहीत, असे पालक.
(४)इंग्रजी माध्यमातून मराठी माध्यमाकडे वळण्याची इच्छा असणारे पालक.
(५) मराठी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले इंग्रजी कसे येईल याचे मार्ग जाणून घेण्याची इच्छा असलेले पालक.
शिक्षक
मराठी माध्यमाच्या प्राथमिक किंवा माध्यमिक शाळांत शिकवणारे शिक्षक
इतर
या विषयात कार्य करणारे किंवा रस असणारे शिक्षणप्रेमी.
टीप: सेमी-इंग्रजी हे वेगळे माध्यम नाही. ज्या शाळांमध्ये सेमी-इंग्रजी पद्धत सुरू आहे, त्या शाळा मराठी माध्यमाच्याच आहेत.
खालील गुगल लिंक भरून सहभाग नोंदवावा :
लिंक - https://tinyurl.com/yxwv28vh
टीप
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे नोंदणी शुल्क नाही.
प्रवेशक्षमता मर्यादित असल्यामुळे  दिनांक २ ऑक्टोबर २०१९ पासून गुगल फॉर्ममध्ये नोंदणी केलेल्या व्हाट्सऍप नंबरवर/ईमेल वर निमंत्रणे पाठवण्यात येतील.
निमंत्रित सदस्यांचा एक तात्पुरता व्हाट्सऍप ग्रुप निर्माण करण्यात येईल, त्यात आयोजनाच्या विविध पैलूंबाबत चर्चा केली जाईल.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ नागरिकांचा आनंद मेळावा...

  दि. ३०, नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंच, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक १ ऑक्टोंबर २०१९ रोजी दुपारी ३ वाजता परशुराम साईखेडकर नाट्यमंदिर, शालीमार, नाशिक येथे ज्येष्ठ नागरिकांचा आनंद मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
याप्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. जयंत जायभावे हे या समारंभाचे अध्यक्ष असणार आहेत. तर ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल निवडक ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला आहे.
ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान अधिकाधिक आनंददायी करणे व त्यांचा सन्मान करणे, त्यांना मायेचा आधार देणे, समाजातील ज्येष्ठ व्यक्ती म्हणून त्यांच्या विचारांची जोपासना करणे या जाणिवेतून ज्येष्ठ नागरिकदिन साजरा केला जातो.
सदर कार्यक्रमासाठी विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन यांचे सहकार्य लाभले आहे.
तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपथित राहण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे तसेच लोकज्योती ज्येष्ठ नागरीक मंचचे अध्यक्ष सुरेश विसपुते, उपाध्यक्ष भा.रा. सूर्यवंशी, कार्याध्यक्ष डी.एम. कुलकर्णी, सचिव रमेश डहाळे, कोषाध्यक्ष जितेंद्र येवले यांनी केले आहे. 

Sunday, 29 September 2019

'पृथ्वीचे वाढते तापमान आणि आपण' याविषयावर व्याख्यान...


 यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञानगंगा’ कार्यक्रमांतर्गत 'पृथ्वीचे वाढते तापमान आणि आपण' या विषयावर विनामूल्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्याते अतुल देऊळगावकर गुरुवार दिनांक ३ ऑक्टोबर २०१९ रोजी सायंकाळी ५.३० वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालया समोर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती.

सूर विश्वास मैफीलीत ज्ञानेश्वर कासार यांच्या शब्दसूरांतून निथळली आनंद पर्वणी


नाशिक दि. २८ : शब्द आणि शब्दातील आशय स्वरांतून निथळतांना होणारी रूणझूण रसिकांना आनंद देत होती आणि गाण्यातील गोडवा अनोखी स्वरानुभुती देत होता. शब्दसूरांतून ओठांवर रेंगाळणारी जाणीव रसिकांनी अलगद आणि नकळतपणे जपूनही ठेवली. निमित्त होते ‘सूरविश्वास’चे आठवे पुष्प गायक ज्ञानेश्वर कासार यांनी गुंफले. डॉ. आशिष रानडे (हार्मोनियम), रसिक कुलकर्णी (तबला),
श्रीपाद घोलप (तानपुरा), जागृती नागरे (तानपुरा), यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विनायक रानडे व डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले. ‘विश्वास ग्रृप’चे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून, संकल्पना विनायक रानडे यांची आहे.
मैफीलीची सुरूवात ‘राग मियांकी तोडी’ या रागाने केली. शब्द होते ‘अब तो मोरे राम’ यातून अल्हाददायक वातावरण निर्माण झाले. शब्दांची, लयीची नजाकत यातून समोर आली. त्यानंतर बंदिश सादर केली. ‘मै सन लागी’, आर्तता आणि आठवणींचा माहौल याची वीण अलगद उसवली गेली. या बंदिशीनंतर ज्ञानेश्वर कासार यांनी आपली रचना सादर केली. ‘कासे कहु मन की बिचरा’तून मनाची खोलवर अवस्था व्यक्त झाली. सुरांची ही मैफल राग अहिर भैरव रागापर्यंत येऊन ठेवली. प.अविराज तायडे यांची रचना सादर झाली. शब्द होते ‘आवरे अव शाम’ मैफीलीचा समारोप पं. जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेल्या अभंगांनी केला. अभंग होते ‘सुखाचे जे सुख, चंद्रभागे तटी, पुंडलीका पाठी उभे ठाके’ व ‘अनंता तुला कोण पाहू शके, तुला गातसा वेद झाले मुके’.
सदर कार्यक्रम अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास गार्डन शेजारी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे संपन्न झाला.
कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.  त्यात संगीत विषयात डॉक्टररेट पदवी प्राप्त केल्याबद्दल डॉ.आशिष रानडे, नृत्य विषयात डॉक्टररेट मिळाल्याबद्दल डॉ. सुमुखी अथनी, नवी दिल्ली येथील स्वर्ण भारत ट्रस्ट तर्फे शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल ‘नेक्स्ट जनरेशन अवॉर्ड’ मिळाल्याबद्दल विजया लक्ष्मी मणेरीकर यांचा सन्मान अनुक्रमे सी.एल. कुलकर्णी, डॉ. मनोज शिंपी, पं. अविराज तायडे यांच्या शुभहस्ते करण्यता आला. कलाकारांचा सन्मान पं. जयंत नाईक, श्रीराम तत्त्ववादी, एन.सी. देशपांडे, मोहन उपासनी,  माधुरी कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.
सदर कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला.