Sunday 1 March 2020

सुप्रसिद्ध गझलकार प्रदीप निफाडकर यांच्या ‘गझलदीप’ कार्यक्रमाचे आयोजन...


नाशिक (दि. २) : महाराष्ट्राचे थोर शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या १०७ व्या जयंतीच्या पुर्वसंध्येला सुप्रसिद्ध गझलकार प्रदीप निफाडकर यांच्या गझलदीपया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, सारस्वत बँक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार ११ मार्च २०२० रोजी सायंकाळी ६.०० वाजता अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास गार्डन), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
उर्दू व हिंदी गझलेपासून सुरू झालेला मराठी गझलपर्यंतचा प्रवास प्रदीप निफाडकर उलगडून दाखविणार आहेत. मराठी गझलेची समृद्ध परंपरा कशी बदलत गेली याचे उदाहरणासह व्याख्यान ते देणार आहेत. अमीर खुस्रो ते माधव जुलियन, सुरेश भट ते आत्ताच्या गझलपर्यंतचा हा प्रवास आहे. गझलेत वात्सल्यता आणणारे आणि प्रेम व दारूत अडकलेल्या गझलेला कौटुंबिकता प्राप्त करून देणारे श्री. प्रदीप निफाडकर हे गझलसम्राट सुरेश भट यांचे अंतरंग शिष्य असून, पत्रकार म्हणूनही ते सुपरिचित आहेत. निफाडकर यांचा पहिला गझलसंग्रह होता स्वप्नमेणा. त्यांनी गझलया काव्यप्रकाराची साद्यंत माहिती देणारे पुस्तक लिहिले; ज्याचे नाव गझलदीप आहे. वेगळे वाटसरू हे त्यांचे व्यक्तिचित्रणाचे पुस्तक प्रसिद्ध झाले. अनाथ मुलांच्या भविष्यावर नजर टाकणार्‍या मालिकेचे आभाळ पेलणारे आयुष्य हे पुस्तक लिहीले आहे. निफाडकर यांनी २४ तीर्थंकरावर गाणी लिहिली आहेत. ती सर्व गीते ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी गायली आहेत. त्या गीतांचे पुस्तकही प्रसिद्ध आहे. गझलसम्राट सुरेश भट आणि... हे गुरूवर्य सुरेश भट यांचे चरित्रात्मक आठवणींचे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. तत्पूर्वी भट यांच्या अप्रकाशित कवितांचे संपादन करण्याचे भाग्य निफाडकर यांना लाभले.
तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित होण्याचे आवाहन मानद अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ. कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा, सदस्य सौ. कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड. नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment