Monday, 2 December 2019

‘यशवंराव चव्हाण गौरव पुरस्कार’ युथ कौन्सिल, नेरुळ या संस्थेस प्रदान...


नवी मुंबई, दि. ३० : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नवी मुंबई केंद्रातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार यावर्षी नेरुळ, नवी मुंबई येथील यूथ कौन्सिल या समाजसेवी युवा संस्थेस, नेरूळ येथील स्टर्लिंग कॉलेजच्या सभागृहात दिनांक ३० नोव्हेंबर २०१९ रोजी अध्यक्ष प्रमोद कर्नाड व कविवर्य अशोक नायगावकर यांच्या हस्ते युथ कौन्सिलचे संस्थापक सचिव सुभाष हांडेदेशमुख यांना समारंभ पूर्वक अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्वक प्रदान करण्यात आला. प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे सचिव डॉ. अशोक पाटील, कार्यकारिणी सदस्य अविनाश शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते. रोख रुपये १५,०००/- व सन्मानपत्र असे स्वरुप असलेला हा पुरस्कार गतवर्षी मराठी साहित्य संस्कृती कलामंडळ यांना प्रदान करण्यात आला होता.
युथ कौन्सिल, नेरूळ या संस्थेने वृक्षारोपण, श्रमदान व रक्तदान शिबीरे, ग्राम/ पाडे दत्तक घेऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासह तेथील युवकांना सक्षम करणे, तेथील ग्रामस्थांच्या घरी दिवाळीत गोड पदार्थ घेऊन जाऊन दिवाळी साजरी करणे, वंचितांचे पुनर्वसन, वृक्षदिंडी, आरोग्य शिबीरे अशी कामे केल्याचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबई केंद्राचे अध्यक्ष, प्रमोद कर्नाड यांनी मानपत्र वाचन करताना सांगितले. तत्पूर्वी प्रास्ताविकात त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान करीत असलेल्या सामाजिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. प्रसंगी युथ कौन्सिलच्या वरिष्ठ सदस्यांचा सत्कारही पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास कार्यवाहुल्यामुळे व सद्यराजकीय स्थितीमुळे जाहीर करुनही दिलीप वळसेपाटील समारंभास उपस्थित राहू शकले नाहीत.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अजित मगदूम यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. अशोक पाटील यांनी केले.
पुरस्कार समारंभानंतर कवि अशोक नायगावकर यांची धमाल काव्यमैफल झाली. त्यास उपस्थित रसिकांनी भरभरून दाद दिली. याप्रसंगी अनेक काव्य रसिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.






Sunday, 1 December 2019

सृजन विभागातर्फे आरोग्य शिबीराचे आयोजन...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, सृजन विभाग आणि न्यू होरायझन्स हेल्थ अँड रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार १ डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे आरोग्य शिबीर संपन्न झाले.





Saturday, 30 November 2019

मोफत प्रथमोपचार व सीपीआर प्रशिक्षण कार्यक्रम

click here, to watch full video

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, महाराष्ट्र महिला व्यासपीठ आणि AAA हेल्थकेअरच्या वतीने फर्स्ट एड आणि सीपीआर फ्री ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, महाराष्ट्र महिला व्यासपीठच्या कार्यकारी संयोजिका ममता कानडे, AAA हेल्थकेअर च्या संस्थापिका डॉ. रसिका, डॉ. कामत उपस्थित होते. डॉ. रसिका यांनी AAA हेल्थकेअर विषयी माहिती दिली. पुढे डॉ. कामत यांनी first aid विषयी माहिती देताना घरच्या घरी उपाय करताना कोणत्या गोष्टी करायला पाहिजे, कोणत्या गोष्टी करु नये याविषयी माहिती दिली. तसेच heart attack, stroke, heart failure आणि CPR विषयी प्रेझेंटेशनद्वारे आणि प्रात्यक्षिक दाखवून माहिती दिली.
शेवटी डॉ. कामत यांनी उपस्थितांना CPR प्रात्यक्षिक दाखविले. उपस्थित प्रत्येकाने वैयक्तिक करून पाहिले.



 


Friday, 29 November 2019

बाल दिनानिमित्त सायबर सुरक्षा आणि बाल विश्व याविषयावर जाणीवजागृती कार्यक्रम…

विकास अध्ययन केंद्र आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र औरंगाबाद यांच्या वतीने नॅशनल उर्दू हायस्कूल, जोगेश्वरी, मराठा हायस्कूल, चौराहा, श्री सरस्वती भुवन प्रशाळा, वेनुताई चव्हाण हायस्कूल, एमजीएम संस्कार विद्यालय आणि शारदा मंदिर कन्या शाळा येथे बाल दिनानिमित्त इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसोबत सायबर सुरक्षा आणि बाल विश्व याविषयावर आठवडाभर जाणीवजागृती कार्यक्रम घेण्यात आला. मूल सोशल मीडिया कोणता वापरतात हे जाणून घेतले. तेव्हा टिकटॉक वापरणारे मुले सगळ्यात जास्त होती. बरेच विद्यार्थी फेसबुक आणि टिकटॉकचे युजर्स आहेत. फेसबुक फ्रेंडस किती आहेत हे जाणून घेतले असता १००० ते १२०० चा आकडा मुलांनी सांगितला. आपल्या देशात सायबर पॉलिसी आहे का?, कायदा कोणता आहे? असे प्रश्न मुलांनी विचारले. मोबाइल आणि इंटरनेटच्या वापराने मुलांचे ज्ञान अफाट आहे, अशी माहिती रेनूका कड यांनी दिली. त्या पुढे म्हणाल्या की, मुलांमध्ये टिकटॉकचा वापर जास्त प्रमाणात आहे. १५ दिवसांत एकूण ३०० व्हिडिओ मुलांकडून टाकले जातात. एका दिवसात ही मूल जवळपास २० व्हिडिओ शेयर करतात. टिकटॉक विडिओला जास्तीत जास्त लाईक्स मिळविण्यासाठी ही मूल अनेक उपाय करतात.




Thursday, 28 November 2019

तुषार गांधी : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे व्याख्यान...


समाजाने नीतीमूल्यांवर अढळ श्रद्धा ठेवावी..
तुषार गांधी : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे व्याख्यान...
नांदेड : महात्मा गांधी यांचे विचार जगाला आजही तितकेच प्रेरणादायी आहेत. महात्मा गांधींनी विचार आणि तत्व मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही. आजचा समाज त्यांच्याकडे प्रेरणा म्हणून बघत असेल तर समाजाने नीतिमूल्यावर अढळ श्रद्धा ठेवताना जे चांगले आहे ते चांगले आणि जे वाईट आहे त्या विरोधात सर्वांनी मिळून आवाज उठवलाच पाहिजे, असे मत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नांदेड विभागीय केंद्राच्या वतीने यशवंतराव चव्हाण यांच्या ३५ व्या स्मृतिदिनानिमित्त तुषार गांधी याचे 'गांधीजींना व त्यांच्या विचारांना आपणास कसे जोडता येईल' या विषयावर शंकरराव चव्हाण सभागृहात व्याख्यान पार पडले. यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नांदेड विभागाचे अध्यक्ष माजी मंत्री कमलकिशोर कदम, उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर, बापू दासरी, देविदास फुलारी, डॉ. गीता लाठकर, मनोरमा चव्हाण, कल्पना डोंगळीकर यावेळी उपस्थित होते.






Monday, 25 November 2019

प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना ‘यशवंतराव चव्हाण पुरस्कार’ प्रदान...


कराड, दि. २५ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई तर्फे दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत मा. प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना ज्येष्ठ नेते, माजी कृषी मंत्री, भारत सरकार मा. शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे मा. शरद काळे, मा. अरुण गुजराथी, डॉ. अनिल काकोडकर, मा. राम खांडेकर, डॉ. सदानंद गोडसे, मा. दिलीप माजगावकर, मा. आ. बाळासाहेब पाटील, मा. सौ. सरोज (माई) पाटील, मा. मीनाताई जगधने, मा. खा. श्रीनिवास पाटील, मा. कल्लाप्पाआण्णा आवाडे, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. डॉ. अनिल पाटील, अॅड. रवींद्र पवार, मा. आबासाहेब देशमुख, मा. अरुण लाड, सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे, सहसचिव डॉ. विजयसिंह सावंत, प्राचार्य डॉ. माहन राजमाने, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे पदाधिकारी, मा. प्रभाकर देशमुख उपस्थित होते.
पुरस्काराला उत्तर देताना प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले की, यशवंतराव चव्हाणांच्या जीवनातील अनेक घडामोडी मी जवळून पाहिल्या आहेत. त्यांच्या राजकारणाची जडण-घडण मी अनुभवली आहे. ते उदारमतवादी होते. अशा महान व्यक्तीच्या नावाने दिला जाणार पुरस्कार माझ्या आयुष्यातील सर्वोच्च पुरस्कार आहे. मिळालेल्या पुरस्कारातील एक लाख रुपये माझी मातृसंस्था रयत शिक्षण संस्थेला देत आहे. तसेच इचलकरंजी येथील वाचनालयाच्या इमारतीसाठी एक लाख रुपये देत आहे, असे त्यांनी जाहीर केले.
मा. शरदचंद्रजी पवार म्हणाले की, आजचा दिवस भाग्याचा आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतींना उजाळा देणारा व त्यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यांनी राज्याचे व देशाचे नेतृत्व केले. आंतराष्ट्रीय परिषदेत त्यांनी भारताचे नेतृत्व केले. चव्हाण साहेब उत्तम वाचक होते, साहित्यिक होते. अशा व्यक्तिच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत काम केले, शेतकरी कामगार प्रश्नांसाठी अविरत कार्यरत राहिले, सहकार खात्याचा सखोल अभ्यास, स्वतःच्या कामापेक्षा लोकहिताला प्राधान्य देणारे व कर्मवीर आण्णांच्या विचारांशी बाधिलकी माणून कर्मवीरांचे विचार अमलात आणणारे ज्येष्ठ विचारवंत मा. प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना पुरस्कार बहाल करताना मनस्वी आनंद होत आहे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मा. अरुण गुजराथी यांनी केले. यावेळी राम खांडेकर लिखित सत्तेच्या पडछायेत या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. मानपत्राचे वाचन शरद काळे यांनी केले. यावेळी राम खांडेकर, डॉ. अनिल काकोडकर यांनी मनोगत व्यक्त केले. पुढील वर्षीचा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई तर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार प्रो. अभिजीत बॅनर्जी यांना घोषित करण्यात आला. या समारंभास सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शेवटी शरद काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. रेश्मा व प्रा. डॉ. नंदिनी रणखांबे यांनी केले.



Sunday, 24 November 2019

संविधान दिवस...


भारतीय संविधानाला ७० वर्ष पूर्ण होत आहेत, या निमित्ताने विद्यार्थी मित्र समिती, मुंबई आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, नव महाराष्ट्र युवा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. यशवंत क्षीरसागर, अध्यक्ष, साने गुरुजी बालविकास मंदिर व प्रा. आनंद देवडेकर, संपादक, सध्दम्म पत्रिका यांचे व्याख्यान मंगळवार दिनांक २६ नोव्हेंबर २०१९ रोजी रात्रौ ७ वाजता भारतीय घटनेचा सरनामा स्तंभ चौक, पोलीस स्मारक मैदानाच्याजवळ, नवी बि. डी. डी. चाळ १ समोरील, नायगाव, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी आपण सर्वांनी उपस्थित रहावे, ही विनंती.