नवी मुंबई, दि. ३० : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नवी मुंबई
केंद्रातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘यशवंतराव
चव्हाण गौरव पुरस्कार’ यावर्षी नेरुळ, नवी मुंबई
येथील ‘यूथ कौन्सिल’ या समाजसेवी युवा संस्थेस, नेरूळ येथील स्टर्लिंग
कॉलेजच्या सभागृहात दिनांक ३० नोव्हेंबर २०१९ रोजी अध्यक्ष प्रमोद कर्नाड व कविवर्य
अशोक नायगावकर यांच्या हस्ते युथ कौन्सिलचे संस्थापक सचिव सुभाष हांडेदेशमुख यांना
समारंभ पूर्वक अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्वक प्रदान करण्यात आला. प्रसंगी
व्यासपीठावर संस्थेचे सचिव डॉ. अशोक पाटील, कार्यकारिणी सदस्य अविनाश शिंदे आदि
मान्यवर उपस्थित होते. रोख रुपये १५,०००/-
व सन्मानपत्र असे स्वरुप असलेला हा पुरस्कार गतवर्षी मराठी साहित्य संस्कृती कलामंडळ
यांना प्रदान करण्यात आला होता.
युथ कौन्सिल, नेरूळ या
संस्थेने वृक्षारोपण, श्रमदान व रक्तदान शिबीरे, ग्राम/ पाडे दत्तक घेऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासह
तेथील युवकांना सक्षम करणे, तेथील ग्रामस्थांच्या घरी दिवाळीत गोड पदार्थ घेऊन
जाऊन दिवाळी साजरी करणे, वंचितांचे पुनर्वसन, वृक्षदिंडी, आरोग्य शिबीरे अशी कामे
केल्याचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबई केंद्राचे अध्यक्ष, प्रमोद कर्नाड
यांनी मानपत्र वाचन करताना सांगितले. तत्पूर्वी प्रास्ताविकात त्यांनी यशवंतराव
चव्हाण प्रतिष्ठान करीत असलेल्या सामाजिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. प्रसंगी
युथ कौन्सिलच्या वरिष्ठ सदस्यांचा सत्कारही पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास
कार्यवाहुल्यामुळे व सद्यराजकीय स्थितीमुळे जाहीर करुनही दिलीप वळसे–पाटील समारंभास उपस्थित राहू शकले नाहीत.
संपूर्ण कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन प्रा. डॉ. अजित मगदूम यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. अशोक पाटील
यांनी केले.
पुरस्कार समारंभानंतर कवि
अशोक नायगावकर यांची धमाल काव्यमैफल झाली. त्यास उपस्थित रसिकांनी भरभरून दाद
दिली. याप्रसंगी अनेक काव्य रसिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment