Monday, 5 August 2019

काव्यवेगातील दृकश्राव्य माध्यमांच्या आधारे उलगडले ‘बाउल’ : सौमित्र


वळू नकोस माघारी, दम खाऊ नकोस,
मरगळू नकोस, चालत राहा निर्हेतुक
सभागृह तुडुंब भरलेले... सर्वत्र अंधार.. काही वेळात अंधाराला भेदत प्रकाशकिरणे भेट बाउलवर पडली... आणि मग उजळला अभिनय आणि दृकश्राव्य माध्यमातून कवितेचा पाऊणतासाचा प्रवास. दर्‍याखोर्‍यातील रस्ते, धडधडत्या मायानगरीची रक्तवाहिनी असलेल्या रेल्वेची वास्तवता, गावातल्या शेवटच्या माणसाचं नातं, कुटुंबातील मोबाईल क्रांती, नात्यातील दुरावा... हे सर्व सादर करण्याची किमया साधली प्रसिद्ध अभिनेता तथा बाउलचे लेखक सौमित्र ऊर्फ किशोर कदम यांनी. निमित्त होते प्रकाशन सोहळ्याचे.
बाउल काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाल्यानंतर सौमित्र यांनी दृकश्राव्य स्वरूपात काव्यसंग्रहातील कवितांचे सादरीकरण केले. प्रत्येक कवितेच्या समारोपाला संगीताचा आधार होता. कविता सादर करताना रसिकांना प्रत्यक्ष कवितेच्या विश्वात घेऊन जाणारे चित्र दाखवून खिळवून ठेवण्यात आले. कवीच्या विचारचक्राचा आणि आयुष्याचा प्रवास कसा सुरू होत, या प्रवासात, एकांतात, लोकांतातही त्यांच्या भावविश्वाला जे भिडते, भेडसावते, त्या प्रसंगांचे चित्रण शब्दबद्ध करण्यात आले. आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेल्या प्रवासात वळू नकोस माघारी, दम खाऊ नकोस, मरगळू नको, चालत राहा निर्हेतुकअसा संदेश सौमित्र यांनी काव्यरसिकांना दिला.
गावातला शेवटचा माणूस
झोपलेला असताना निघावं,
पाय म्हणलं की रस्ता, 
रस्ता म्हटलं की, 
आपली कमिटमेंट साली
एकटेपणाशी असते,
घर जितकं दूर तिककं
यिसरायला सोपं जातं, 
रस्त्याच्या कडेला उभा राहून तू
असाच का रडतो आहेस, आधी खूप
रस्ते होते, खूप चांगले होते...
अशा एकाहून एक सरस कवितांच्या प्रत्येक सादरीकरणाला रसिकांच्या टाळ्यांचा गजर होत होता. अशा या काव्य मैफीचा शेवट कवी सौमित्र यांच्या सादरीकरणाला दाद देऊनच झाला. या काव्यवेगातील सादरीकरणाचे दिग्दर्शन सचिन शिंदे यांनी केले. संगीत संयोजन रोहित सरोदे यांनी केले. प्रकाश योजना राहूल गायकवाड यांची होती. दृकश्राव्य माध्यमासाठी लक्ष्मण कोकणे यांनी मदत केले. कार्यक्रमाला शहरातील साहित्य, संस्कृती, शिक्षण, समाजकारण आदी क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती होती.











सौमित्र लिखित ‘बाउल’ काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन



वास्तवाच्या शोधासाठी भटकावेच लागते : इंद्रजित भालेराव
वास्तवाचा शोध घेण्यासाठी भटकावेच लागते. त्याशिवाय जग कळत नाही. प्रत्येक कवी हा बाउल असतो. जो बाउल नसतो तो कवी होऊच शकत नाही. यानुसार आतापर्यंतच्या कोणत्याही महान कवीचे अंतरंग उलगडून पाहिल्यास त्याच्यातील भटकेपणा, बाउलपणा दिसून येईल, असे प्रतिपादन कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद, पॉप्युलर प्रकाशन आणि एमजीएम संस्थेतर्फे प्रख्यात कवी तथा अभिनेते सौमीत्र उर्फ किशोर कदम लिखित बाउलया काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा एमजीएम संस्थेच्या रुक्मिणी सभागृहात शनिवारी (दि. ३ ऑगस्ट) सायंकाळी साडेसहा वाजता रंगला. अध्यक्षस्थानी विभागीय केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम होते. व्यासपीठावर कवी दासू वैद्य, सहकारी संस्था सहनिबंधक संजय राऊत, पॉप्युलर प्रकाशनच्या संपादक अस्मिता मोहिते, डॉ. श्रीरंग देशपांडे, सुहास तेंडुलकर, डॉ. रेखा शेळके यांची उपस्थिती होती. यावेळी प्रा. भालेराव यांनी बाउलकाव्यसंग्रहावर भाष्ये केले. रवींद्रनाथ टागोरांपासून आताच्या सौमित्रपर्यंत प्रत्येक कवी हा बाउल आहे. प्रत्येकाने भटकंती करीतच वास्तव जीवनाचे चित्रण आपल्या कवितेत चितारले आहे. आपले संतही बाउलच होते, बाउलांचा देश आहे. सगळे साधू बाउलच होते. कवीही साधूच असतो. जो कवी साधू नसतो, तो संधीसाधू असतो, असेही भालेराव यांनी सांगितले.
यावेळी सौमित्र म्हणाले, १७ वर्षांनंतर काव्यसंग्रह येत आहे. पहिल्या काव्यसंग्रहाच्या वेळी असणारी धडपड आताही आहे. ही धडपडच आताही आहे. ही धडपडच जिवंत असल्याचे लक्षण असल्याचे सांगितले. उपनिबंधक संजय राऊत यांनी सौमित्र यांच्या विषयची स्वतःचे अनुभव सांगितले. अध्यक्षीय समारोप अंकुशराव कदम यांनी केला. तत्पूर्वी प्रास्ताविकात प्रकाशक अस्मिता मोहिते यांनी काव्यसंग्रहाविषयींचे नाते स्पष्ट केले. सुरवातीला महेश देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन महेश अचिंतलवार यांनी केले, तर दिग्दर्शक शिव कदम यांनी आभार मानले.
दुःख लपवायला कविताचे कामी येते
चित्रपटात किशोर अभिनेता म्हणून उत्तम आहे; पण त्याच्यातील सच्चा सौमित्र कवितांमध्येच उतरला आहे. किशोर अभिनेता म्हणून नव्हे तर सौमित्र बनून अधिक लोकांपर्यंत पोहोचला असल्याचे मतही प्रा. भालेराव यांनी व्यक्त केले. जोयर्पंत प्राध्यापक वर्गात शिकविण्यासाठी जाऊपर्यंत त्याच्या छातीत धडधड होते. तोपर्यंत तो शिक्षक असतो. जेव्हा ती धडधड थांबते, तेव्हा तो निर्ढावलेला असतो, कवीचेही तसेच असते, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्राचे सचिव नीलेश राऊत, सुबोध जाधव, गणेश घुले, मंगेश निरंतर, दीपक जाधव, गिरीश जोशी, श्रीराम पोतदार, स्वप्नील जोशी, उमेश राऊत, निखिल भालेराव, राजेंद्र वाळके, डॉ. रुपेश मोरे, श्रीकांत देशपांडे आदींनी परिश्रम घेतले.






Friday, 2 August 2019

मी कार्यकर्ता...




यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, ठाणे जिल्हा केंद्र तर्फे कार्यकर्ता या भूमिकेतून विविध क्षेत्रात तळमळीने काम करून लोकप्रिय झालेल्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद म्हणून मी कार्यकर्ता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जयवंत वाडकर, किरण वालावलकर, डॉ. अरुण पाटील, विद्याधर ठाणेकर, लतिका भानुशाली, पोर्णिमा शेंडे आणि डॉ. महेश केळुसकर यांचा सहभाग असणार आहे. शनिवार दिनांक १० ऑगस्ट २०१९ रोजी सायंकाळी ५.३० वाजता मंगला हॉल, १ ला मजला, ठाणे पूर्व येथे हा कार्यक्रम विनामूल्य संपन्न होणार असून आदिवासी लोकांना जुने कपडे, पुस्तके व चांगली भांडी देण्याची इच्छा असल्यास कार्यक्रमाठिकाणी या वस्तू स्विकारल्या जातील.



Thursday, 1 August 2019

स्वातंत्र्याचे गीत नव्याने गाऊ...




यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र नाशिक तर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्य विषयावरील कविता सादरीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. स्वातंत्र्याचे गीत नव्याने गाऊ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी रविंद्र मालुंजकर करणार आहेत. गुरुवार १५ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी ११ वाजता कवीवर्य नारायण सुर्वे कवी कट्टा, नाशिक कवी, काव्य मंच नाशिक, माझी कविता परिवार संवाद नाशिक आणि नाशिक मधील इतर कवी अॅडमिनिस्ट्रेटीव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड ट्रंनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, गंगापूर रोड, नाशिक येथे कविता सादर करणार आहेत.


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे चित्रपटप्रेमींसाठी शनिवारी नॉस्टॅलजिया’



चित्रपट चावडी

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट चावडीउपक्रमांतर्गत शनिवार ३ ऑगस्ट २०१९ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध रशियन दिग्दर्शक आंद्रे तारकोवस्की यांचा नॉस्टॅलजियाहा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे.
हा चित्रपट म्हणजे रशियन कवी आंद्रे गोर्शकोव्ह व त्याची दुभाषी युजेनिया यांचा अठराव्या शतकातील इटली मधील एका छोट्या स्पा असलेल्या शहरातील रशियन संगीतकाराचा  शोधाचा प्रवास आहे. तिथे त्यांची गाठ वेडसर असलेल्या डॉमिनिकोशी होते. डॉमिनिको, आंद्रेई व युजेनिया यांचा प्रवास एक स्वप्नवत वाटावा असा आहे.
शांततेचा अतिशय प्रभावीपणे केलेला वापर, अप्रतिम छायाचित्रण व अतिताची ओढ ह्यामुळे नॉस्टॅलजिया एक अविस्मरणीय अनुभव देऊन जातो.
१९८३ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा कालावधी १२५ मिनिटांचा आहे. हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ. कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.



साहित्य हे माणुस म्हणून जगण्याची प्रेरणा देते - प्रसिद्ध कवी ज्ञानेश वाकुडकर



विद्यार्थ्यांनी आपल्या लिखानात सहजता आणावी, त्यामुळे ते लोकांचे लिखाण होईल, सर्वसामान्यांना त्यांचे वाटेल. त्यासाठी लिखाणाचे तंत्र देखील समजून घ्यायला हवे, याकरीता पुस्तके आपली मित्र बनवा. साहित्य हे तुम्हाला माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा देते. जे विद्यार्थी आता विविध प्रकारे अभिव्यक्त होत असतील, त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! व पुढील काळात यांच्यातूनच साहित्याच्या नव्या प्रवाहांची निर्मिती व्हावी, असे मत प्रसिद्ध कवी ज्ञानेश वाकुडकर यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई नवमहाराष्ट्र युवा अभियान यांच्या वतीने आयोजित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयीन नियतकालीक स्पर्धेच्या पारितोषीक वितरण समारंभात ते बोलत होते. नागपूर येथील कमला नेहरू कॉलेज ऑफ आर्ट, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स या महाविद्यालयास नियतकालीक स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे राज्यस्तरीय पारितोषीक मिळाले असून त्यानिमित्ताने विशेष समारंभ महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा मा. सुहासिनी वंजारी यांची उपस्थिती होती. तर प्रतिष्ठानचे कार्यक्रम व्यवस्थापक मा. दत्ता बाळसराफ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक कांबळे, उपप्राचार्य डॉ. प्रदिप दहीकर, अंकाचे संपादक सिद्धेश देव, सुहास तेंडुलकर, निशिकांत काशीकर आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी नवमहाराष्ट्र युवा अभियानाचे संघटक नीलेश राऊत व अभिजीत राऊत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विद्यार्थी व प्राध्यापकांची मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थिती होती.








विद्यार्थ्यांनी अभिव्यक्त होण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करावा - रविंद्र भैय्या पाटील


आज तंत्रज्ञानाने समाजातील विविध माध्यमे विद्यार्थ्यांना आपले मतप्रदर्शन करण्याकरीता व आपल्या साहित्यकृती लोकांपर्यंत पोहोचविण्याकरीता उपलब्ध झाली आहेत. त्याचा योग्य वापर करून अभिव्यक्त व्हावे व चांगल्या दर्जाची कलाकृती घडवावी, असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र जळगावचे अध्यक्ष मा. रविंद्र भैय्या पाटील यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई नवमहाराष्ट्र युवा अभियान यांच्या वतीने आयोजित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयीन नियतकालीक स्पर्धेच्या पारितोषीक वितरण समारंभात ते बोलत होते. भुसावळ येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय या महाविद्यालयास नियतकालीक स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांकाचे राज्यस्तरीय पारितोषीक मिळाले असून त्यानिमित्ताने विशेष समारंभ महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मिनाक्षी वायकोळे या उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संदीप पाटील यांनी परीश्रम घेतले.