Monday, 10 June 2019

दिव्यांग बांधवांच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज - विश्वास ठाकूर



दिव्यांग बांधवांचे पुर्नवसन हा समाजासाठी मुलभूत जाणिवेचा भाग असून यासाठी प्रत्येकाने जबाबदारी घेणे गरजेचे आहे. तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकत्त्वाचा दृष्टीकोन जोपासण्याचीही गरज आहे. त्यांच्यात आत्मविश्वास व बळ निर्माण करण्याबरोबरच त्यांना हक्क मिळवून देण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिकचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले.
सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान अपंग हक्क विकास मंच, मुंबई, महात्मा गांधी सेवा संघ, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, नाशिक आणि विश्वास ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रवर्गातील गरजू दिव्यांग बंधु-भगिनींना आवश्यकतेनुसार लागणार्‍या कृत्रिम अवयव व साधने वाटप करण्यासाठी मोफत नाव नोंदणी व मोजमाप/तपासणी शिबीराचे आयोजन कुमुसाग्रज स्मारक येथे करण्यात आले होते. या तपासणी शिबीरामध्ये व्हिल चेअर, श्रवणयंत्र, कुबडी, एम.आर.किट, कॅलिपर, स्प्लिंट, जयपुर फुट, कमोड चेअर, वॉकर, चष्मा, एल्बो क्रचेस, वॉकिंग स्टिक, अंधचष्मा, अंधकाठी, ब्रेलकिट इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. सदर शिबिराच्या शुभारंभा प्रसंगी विश्वास ठाकूर बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, आज सर्व क्षेत्रात दिव्यांग बांधवांनी आपल्या कतृत्वाने नावलौकिक संपादन केला आहे व आपले वेगळेपण सिध्द केले आहे. समाजाचा आपण काही देणे लागतो. या भावनेने त्यांच्याशी आपण नाते जोडावे. शिबिरात 300 हून अधिक दिव्यांग बंधु भगिनींनी सहभाग नोंदवला.
या प्रसंगी मार्गदर्शन करतांना जिल्हा परिषद नाशिक समाज कल्याण विभागाचे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील म्हणाले की
, दिव्यांगांसाठी शासनाच्या अनेक योजना कार्यरत असून त्यांना अशा शिबिराच्या माध्यमातून लाभ मिळत आहेत व त्यांचे जीवन सुखकर होत आहे.
शिबिरात तपासणी प्रकल्प समन्वयक-जितेंद्र दाभाडे , तंत्रज्ञ-वसीम खान व असिस्टंट तंत्रज्ञ कलीम शेख यांनी काम पाहिले.




No comments:

Post a Comment