यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या नवमहाराष्ट्र युवा अभियान विभागातर्फे आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राज्य युवा धोरण’ या चर्चासत्रामध्ये खा. सुप्रिया सुळे बोलत होत्या. महाराष्ट्र राज्याचे युवा धोरण सन २०१२ साली बनविण्यात आले होते. त्याला ५ वर्ष होत आली, परंतु आजही त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नाही. दर दोन वर्षांनी युवा धोरणाचे पुनरावलोकन केले पाहिजे. यासंबंधी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, नवमहाराष्ट्र युवा अभियानच्या माध्यमातून सदर युवा धोरणाच्या अंमलबजावणीतील त्रुटी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या जातील असेही त्या म्हणाल्या.
आज पार पडलेल्या या चर्चासत्रामध्ये महाराष्ट्र राज्य युवा धोरणाची वैशिष्ट्ये, शासनातर्फे आजपर्यंत राबविण्यात आलेले उपक्रम, अंमलबजावणीबद्दलचे पुनरावलोकन या विषयांवर सविस्तर मांडणी करण्यात आली. सविस्तरपणे बनविलेल्या युवा धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये मोठी कमतरता राहिली आहे. युवा विकासासाठी नाममात्र निधीची तरतूद गेल्या दोन वर्षांमध्ये झाली आहे ही निराशाजनक बाब आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या लक्षात घेता प्रत्येक युवा मागे केवळ २० ते ३० रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे. तसेच धोरणामध्ये नमूद केलेले अनेक उपक्रम अजूनही कागदोपत्रीच अस्तित्वात आहेत. सदर युवा धोरण बनविताना पाच वर्षांनी धोरणाचे पुनरावलोकन करण्याचे ठरलेले असतांना त्यासंबंधी कोणतीही कार्यवाही होतांना दिसत नाही.
याबाबी लक्षात घेऊन आणि युवा दिनाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेने पुढाकार घेण्याचे ठरविले आणि महाराष्ट्रातील विविध युवा संस्थांना सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत निर्मला निकेतन, सी.वाय.डी.ए. पुणे, अनुभव मुंबई, युवा, कोरो मुंबई, सृष्टीज्ञान, उमंग, संगिनी, एम.आय. टी.एस.एम, आवाज, यासांरख्या युवांबरोबर काम करणा-या संस्था तसेच विद्यार्थ्यांनी या चर्चासत्रामध्ये सहभाग घेतला. सदर चर्चासत्रामध्ये युवा धोरणाच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चासत्रासाठी खा. सुप्रिया सुळे, मुंबई विद्यापीठातील राजीव गांधी केंद्राचे डॉ. चंद्रकांत पुरी, युवा विकास अभ्यासक मॅथ्यू मट्टम, प्रतिष्ठानचे कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ, दिनेश शिंदे, डॉ. नरेंद्र काळे, निलेश राऊत, निलेश पुराडकर, महेंद्र रोकडे, नितीन काळेल आदि उपस्थित होते. निलेश राऊत यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली तर भूषण राऊत यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment