Sunday, 15 December 2019

अनिता माजगावकर-कुलकर्णी यांच्या स्वरांतून निथळली पहाट स्वरांची हळूवार लकेर...


सूर विश्वास
नाशिक (दि. १४ ) : पहाट स्वरांची हळूवार लकेर, वातावरणात धुके दाटलेले आणि अशा वेळी स्वरांचा अनोखा माहौल दाटून आलेला होता. स्वरांची जादू नकळत रसिकांच्या मनावर अधिराज्य करत होती. स्वर होते अनिता माजगांवकर-कुलकर्णी यांचे.
विश्वास गृपतर्फे सूरविश्वासचे अकरावे पुष्प अनिता माजगांवकर-कुलकर्णी यांनी गुंफले. मैफिलीची सुरूवात भैरव रागातील बडा ख्यालाने केली. विलंबित एक ताल शब्द होते. बलमवा मोरे सैय्याप्रेमाच्या नात्याची आर्त धून आणि त्यातून येणार्‍या स्वराची आस प्रभावीपणे मांडली. त्यानंतर तीन तालातील छोटा ख्याल सादर केला. जागो मोहन प्यारेस्वरांचे अलवारपण आणि ईश्वर भक्तीची आस यातून प्रतीत झाली. या भक्तीमय वातावरणानंतर वंदे गणपती विघ्न विनाशनया रागावर आधारित गीताने मनातील इच्छा, आकांक्षा पूर्ण होवोत ही मागणी केली. मैफलीचा समारोप शंकरी चरण मेया अहिर भैरव रागातील गीताने झाली. जीवन जगण्याचे नवे भान आणि अध्यात्माची सांगड हे मैफलीचे प्रमुख सूत्र होते.
नितीन वारे (तबला), ईश्वरी दसककर (संवादिनी) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले. विश्वास ग्रृपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून, संकल्पना विनायक रानडे यांची आहे. सदर कार्यक्रम क्लब हाऊस, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे संपन्न झाला.
उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान सूरविश्वास मैफिलीत करण्यात येतो. त्यात आज इगतपूरी तालुका ग्रामीण साहित्य संमेलनाध्यपदी निवडीबद्दल लेखक विवेक उगलमुगले यांचा सन्मान करण्यात आला. कलावंतांचा सन्मान संजीवनी  कुलकर्णी, अनुराग केंगे, राजा पाटेकर, प्रियांगी गोसावी यांचे हस्ते करण्यात आला. आभार प्रदर्शन विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. मनोज शिंपी यांनी केले.
सदर कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला.





No comments:

Post a Comment