Sunday, 20 January 2019

नवव्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा शानदार शुभारंभ

नवव्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा शानदार शुभारंभ
प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल प्रमुख पाहुणे



















यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे शानदार उदघाटन रविवार दिनांक २० जानेवारी रोजी सायंकाळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल उपस्थित होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरदराव पवार, सरचिटणीस शरद काळे, यशवंत चित्रपट महोत्सवाचे मार्गदर्शक व समन्वयक डॉ. जब्बार पटेल आणि कार्यकारी समन्वयक महेंद्र तेरेदेसाई यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

"मा. यशवंतराव चव्हाण राजकारण व समाजकारणात व्यग्र असले तरी साहित्य व कलाक्षेत्रात त्यांना विशेष रूची होती. यशवंतरावांच्या स्मरणार्थ हा चित्रपट महोत्सव गेली नऊ वर्षे सातत्याने आयोजित करण्यांत येत आहे” असे मा. शरद काळे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
“चित्रपट महोत्सवाला जगभरातून अतिशय भरगच्च प्रतिसाद मिळाला असे सांगून ११८ निवडक चित्रपटांतून अंतिमतः ४२ उत्तम चित्रपट आम्ही यंदाच्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यासाठी निवडले आहेत” अशी माहिती मुख्य समन्वयक डॉ. जब्बार पटेल यांनी दिली.

मा. शरद पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की “आपल्या व्यग्रतेतून चित्रपट पाहण्यासाठी यशवंतराव आवर्जुन वेळ काढत असत. चित्रपट तंत्राची त्यांना चांगली जाण होती. अनेक चित्रपट निर्माते दिग्दर्शक त्यांचे मित्र होते व त्यांचेशी चित्रपटांसंबंधी यशवंतराव चर्चा करीत असत. श्याम बेनेगल यांचे सर्व चित्रपट आपण पाहिले असून त्यातील काही चित्रपटांमुळे आपण अस्वस्थ झालो होतो” असे शरद पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले.

मा. श्याम बेनेगल यांनी आपल्या भाषणात सांगितले की “आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांची भूमिका फार महत्वाची आहे. जगभरच्या अनेक देशांत बनलेले चित्रपटच आपण त्यात पाहतो असे नाही, तर जगभरच्या संस्कृतीचे दर्शन त्यातून आंतरराष्ट्रीय समुदायापुढे सादर होत असते. यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत महाराष्ट्रात तीन ठिकाणी जगभरचे चित्रपट रसिकांना पहायला मिळतात. हा चित्रपट महोत्सव आणखीही अनेक शहरांमध्ये पसरावा” अशा शब्दात श्याम बेनेगल यांनी चित्रपट महोत्सवास शुभेच्छा दिल्या.
मा. अंबरीश मिश्र यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments:

Post a Comment