Wednesday, 16 January 2019

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे राज्यस्तरीय युवा पुरस्कार जाहीर...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे राज्यस्तरीय युवा पुरस्कार जाहीर...वेदांगी कुलकर्णी विशेष युवा क्रीडा पुरस्काराची; तर किसन तडवी, साक्षी चितलांगे क्रीडा पुरस्कार आणि अभिजीत दिघावकर व स्नेहल चौधरी सामाजिक पुरस्काराचे मानकरी.


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने मागील एकवीस वर्षांपासून सामाजिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या युवक युवतींना राज्यस्तरीय युवा पुरस्कार दिले जातात. यंदाच्या यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार-२०१९ ची घोषणा करण्यात आलेली असून यामध्ये राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार व राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कारांचा समावेश आहे. 
यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय विशेष युवा क्रीडा पुरस्काराकरीता डोंबिवलीतील वेदांगी विवेक कुलकर्णी या एकोणवीस वर्षीय सायकलपटूची निवड करण्यात आलेली आहे. वेदांगीने आपल्या सायकलस्वारीने संपूर्ण जगभरात भारताचे नाव उंचावले असून १५९  दिवसात सायकलवरून २९ हजार किलोमिटरचे अंतर पूर्ण करीत तिने जगाला प्रदक्षिणा घातली आहे.  गिनीजच्या नियमानुसार सायकलवरून जगप्रदक्षिणा करताना २९ हजार किलोमीटर (विषववृत्तावरील भूभागाएवढे) अंतर पूर्ण करावे लागते. वेदांगीने ऑस्ट्रेलियातून सायकलींग सुरू केल्यानंतर न्यूझीलंड, कॅनडा, ग्रीनलॅण्ड, स्पेन, फिनलॅण्ड, रशिया आणि भारत अशा चौदा देशांमध्ये तिने सायकल चालविली. स्पेनमध्ये तिच्यावर चाकू हल्ला झाला. पैसे लूटले गेले. आईसलॅण्डमध्ये ती हिमवादळातही सापडली, पण तीने जिद्द सोडली नाही. विशेष म्हणजे तीची ही जगप्रदक्षिणा शिक्षण सुरू असतानाच झाली आहे. करीअरच्या मानसिकतेतून बाहेर जाऊन केलेली वेदांगीची ही धडपड उल्लेखनीय व प्रेरणादायी आहे. या कारणास्तव प्रतिष्ठानच्या कार्यकारी समितीने वेदांगीची यंदाच्या विशेष युवा क्रीडा पुरस्कारासाठी निवड केलेली आहे. 51 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 
यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार (युवक) या पुरस्काराकरीता अक्कलकुवा, जि. नंदुरबार येथील धावपटू किसन नरशी तडवी याची निवड करण्यात आलेली आहे. बावीस वर्षीय किसनने अतिशय प्रतिकुल परिस्थितीतून येऊन जगभरात भारताचे नाव उंचावले आहे. किसनने ५२ व्या नॅशनल क्रॉसकंट्री स्पर्धेत विजेतेपद मिळविले असून तैपई, चीन येथे झालेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम मध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावलेली आहे. त्याचबरोबर 33व्या नॅशनल ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स चॅम्पीयनशिपमध्ये पाच हजार मिटर व दहा हजार मिटर स्पर्धेत किसनने विजेतेपद पटकावलेले आहे. किसन सध्या २०२० सालच्या ऑलिम्पीक गेमची तयारी करीत असून भारताला किसन कडून त्याच्या खेळ प्रकारात मोठ्या अपेक्षा आहेत. २१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे किसनला मिळालेल्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यशवंतराव चव्हाण युवा क्रीडा पुरस्कार (युवती) २०१९ ची मानकरी औरंगाबाद येथील युवा बुद्धीबळपटू साक्षी दिनेश चितलांगे ही ठरली असून अवघ्या १५ व्या वर्षी शिवछत्रपती पुरस्कार मिळविणारी सर्वांत युवा खेळाडू साक्षी ठरलेली आहे. आठ आंतरराष्ट्रीय, अकरा राष्ट्रीय व अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये पदके जिंकून साक्षीने महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. २०१५ साली जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून (एफआयडीई) वूमन इंटरनॅशनल मास्टर हा किताब तसेच याच संघटनेकडून २०१४ साली वूमन फिडे मास्टर हा किताब साक्षीने पटकाविलेला आहे. २०१७ साली एअरपोर्ट अ‍ॅथोरिटी ऑफ इंडियाकडून त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देखील साक्षीने पटकाविलेला आहे. २१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे साक्षीला मिळालेल्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार (युवक) २०१९ करीता नाशिक येथील युवा कार्यकर्ता अभिजीत सदानंद दिघावकर याची निवड करण्यात आलेली असून अभिजीतने पर्यावरण विषयक व वृक्षतोडीच्या विरोधात उल्लेखनीय कार्य केलेले आहे. तळागाळातील गरजूंना आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून आरोग्य क्षेत्रातील विविध संस्थांना सोबत घेऊन महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करून अभिजीतने गरजूंना आरोग्य विषयक लाभ मिळवून दिलेले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय युवक समितीने आयोजित केलेल्या परिषदेमध्ये अभिजीतने भारताचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. २१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे अभिजितला मिळालेल्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार (युवती) २०१९ करीता मंगरूळपीर, जि. वाशिम येथील स्नेहल चौधरी कदम या युवतीची निवड करण्यात आलेली आहे. अभियांत्रीकीचे शिक्षण झालेल्या स्नेहलने आपल्या नोकरीचा त्याग करून ग्रामिण भागातील आपल्या भगिनींकरीता क्षितीज संस्थेच्या माध्यमातून युवती व महिलांच्या मासिक पाळी संदर्भात मागील पाच वर्षांपासून ‘ब्लिड द सायलेन्स’ या अभियानाअंतर्गत स्वच्छता नियोजनाचे अनेक उपक्रम राबविले आहे. आजवर विविध शाळा, कॉलेज, ग्रामिण भागात, आदीवासी भागात, शहरी भागातील वस्त्या यामध्ये दहा हजार युवती व महिलांसमवेत संवाद साधून त्यांना मासिक पाळीत घ्यावयाची काळजी याबाबत महत्त्व पटवून दिले आहे. २१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे स्नेहलला मिळालेल्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
निवड झालेल्या सर्व पुरस्कारार्थींचे प्रतिष्ठानच्या कार्यकारी समितीने अभिनंदन केले असून फेब्रुवारी महिन्यात पुणे येथे प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या पारितोषीकांचे वितरण करण्यात येणार असल्याचे नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने कळविण्यात आलेले आहे. 

No comments:

Post a Comment