यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध मार्गदर्शन शिबीरे आयोजित केली जातात. त्यातील एक उपक्रम म्हणजे‘विज्ञानगंगा’. हा उपक्रम प्रतिष्ठान आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जातो.‘विज्ञानगंगा’उपक्रमांतर्गत होणाऱ्या कार्यक्रमाचे सातवे पुष्प प्रतिष्ठानच्या सभागृहात नुकतेच पार पडले. ह्या सातव्या मार्गदर्शन कार्यक्रमाचा विषय होता‘विज्ञान ऑलिंपियाड’, आणिशालेय विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते प्रा. विजय सिंग. हा कार्यक्रम अतिशय रंगला याचे मुख्य कारण म्हणजे त्याला असलेली विद्यार्थी व पालकांची मोठी उपस्थिती. उपस्थित सर्व विद्यार्थी पालकांनी प्रा. विजय सिंग यांनी केलेले मार्गदर्शन लक्षपुर्वक ऐकले. कार्यक्रमाच्या शेवटी शंकासमाधानासाठी वेळ राखीव होता. त्यात विद्यार्थी व पालकांनी अनेक प्रश्न प्रा. विजय सिंग यांना विचारले व त्यांचेकडून अधिक माहिती मिळवली. प्रा. विजय सिंग हे ऑलिंपियाडसंबंधीचे तज्ज्ञ असून त्यांनी त्यासंबंधी अनेक मार्गदर्शनपर पुस्तके लिहीली आहेत.
ऑलिंपियाड हे नेमके काय आहे?
प्रा. विजय सिंग यांनी ऑलिंपियाड म्हणजे काय याची सविस्तर माहिती सुरूवातीस दिली. त्याचा सारांश असाः
विज्ञानाच्या विविध शाखा आहेत. उदाहरणार्थ रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान, जैविकशास्त्र, खगोलशास्त्र वगैरे. विज्ञानाला सतत साथ करणारा विषय म्हणजे गणित. ह्या सर्व विषयांचा अभ्यास शालेय जीवनात सुरू होतो. शाळकरी मुले हे विषय शिकू लागतात. याच मुलांतून पुढे उद्याचे शास्त्रज्ञ तयार होणार असतात. शाळकरी मुलांतील बुद्धीमान व गुणवंत मुलांचा शोध ऑलिपियाडच्या माध्यमातून घेतला जातो. ऑलिंपियाड हा आंतरराष्ट्रीय स्तरावरावरील उपक्रम आहे, व साधारणतः १९५९ पासून विविध विषयांतील ऑलिंपियाड जगभर आयोजित केले जात आहेत. अनेक देशांतील शालेय विद्यार्थी त्यांत भाग घेतात. ती एक प्रकारची त्या त्या विषयातील ज्ञानाची स्पर्धा असते. स्पर्धेतील विजेत्यांना सुवर्णपदक, रौप्यपदक तसेच प्रमाणपत्रे देऊन त्यांचा गौरव केला जातो. या निमित्ताने विविध देशांतील मुले एकत्र येतात व यातून त्यांची विधायक मैत्री बालवयात सुरू होते. ऑलिंपियाड हे फक्त शालेय विद्यार्थ्यांसाठीच आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यात भाग घेता येत नाही.
ऑलिंपियाडमधील भारताचा सहभाग
भारताचा आंतरराष्ट्रीय सहभाग तसा अलिकडचा आहे. गणित (Mathematics)ऑलिंपियाडमध्ये १९८९ मध्ये भारत प्रथमच सहभागी झाला. पुढे पदार्थविज्ञान (सन १९९८), रसायनशास्त्र (१९९९), जैविकशास्त्र (२०००), खगोलशास्त्र (२००४), आणि बालविज्ञान (२००७) असा भारताचा सहभाग पुढे वाढत गेला. दरवर्षी सुमारे १५००० ते ५०,००० मुले ऑलिंपियाडसाठीच्या स्पर्धेत सहभागी होतात. ऑलिंपियाडसाठी भारत सरकार संपुर्ण आर्थिक सहाय्य करते व पुरेपूर प्रोत्साहन त्यासाठी देते. भारतीय ऑलिंपियाडचे मुख्य केंद्र म्हणजे मुंबईतील होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेश (HBCSE)हे होय.HBCSEहे टाटा इन्स्टीट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या अंतर्गत कार्यरत आहे.
ऑलिंपियाड आणि आलिंपिक खेळ यांच्यातले मुख्य साम्य म्हणजे दोन्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर होतात. मात्र, ऑलिंपिक हे चार वर्षांतून एकदा होते, तर ऑलिंपियाड हे दरवर्षी आयोजित होते. विविध विषयांतील ऑलिंपियाड ही वेगवेगळ्या वेळी व वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित होत असतात. प्रत्येक देशाला त्यात सहा विद्यार्थी पाठवता येतात. हे सहा विद्र्यार्थी निवडण्यासाठी इतर देशांप्रमाणेच भारतातही स्पर्धा परिक्षा होतात. त्यातील सर्वोत्तम मुले आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाडसाठी निवडली जातात. भारतातून आजपर्यंत सुमारे ४०० मुले आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाडमध्ये गेली व त्यातील ९९ टक्के मुलांनी पदके व प्रमाणपत्रे मिळवली आहेत. ऑलिंपियाडमध्ये अधिकाधिक शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा व आपल्या गुणवंत व चमकदार मुलांची त्यातून निवड व्हावी यासाठी अधिकाधिक शाळांनी त्यात सहभागी व्हावे असा भारत सरकारचा प्रयत्न असतो. त्या प्रयत्नांना साथ देण्यासाठीच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे मराठी विज्ञान परिषदेच्या सहयोगाने हे शिबीर आयोजित करण्यांत आले होते.
डिसेंबर २०१६ मध्ये भारतात होणार खगोलशास्त्र ऑलिंपियाड
आपला देश आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिपियाड २०१६ चा प्रायोजक आहे. हे ऑलिंपियाड ओरिसा राज्यात भुवनेश्वर येथे होणार असून त्याची तयारी जोरात सुरू आहे.
No comments:
Post a Comment