Monday, 2 March 2020

‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार – २०१९ जाहीर’...


राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची जयंती दरवर्षी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये साजरी करण्यात येते. त्यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
यावेळी त्यांच्या १०७ व्या जयंतीनिमित्त म्हणजेच १२ मार्च २०२० रोजी यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०१९चे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीचा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०१९ नोबेल पारितोषिक विजेते डॉ. अभिजीत बॅनर्जी यांना जाहीर करण्यात आला आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार हे समारंभाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. या सोहळ्याचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण यांचे प्रकट चिंतन भारत: समाज आणि राजकारण या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. हा सोहळा गुरुवार दिनांक १२ मार्च २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता, यशवंतराव चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई येथे पार पडेल. तरी आपण सर्वांनी या सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे.

Sunday, 1 March 2020

सुप्रसिद्ध गझलकार प्रदीप निफाडकर यांच्या ‘गझलदीप’ कार्यक्रमाचे आयोजन...


नाशिक (दि. २) : महाराष्ट्राचे थोर शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या १०७ व्या जयंतीच्या पुर्वसंध्येला सुप्रसिद्ध गझलकार प्रदीप निफाडकर यांच्या गझलदीपया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, सारस्वत बँक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार ११ मार्च २०२० रोजी सायंकाळी ६.०० वाजता अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास गार्डन), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
उर्दू व हिंदी गझलेपासून सुरू झालेला मराठी गझलपर्यंतचा प्रवास प्रदीप निफाडकर उलगडून दाखविणार आहेत. मराठी गझलेची समृद्ध परंपरा कशी बदलत गेली याचे उदाहरणासह व्याख्यान ते देणार आहेत. अमीर खुस्रो ते माधव जुलियन, सुरेश भट ते आत्ताच्या गझलपर्यंतचा हा प्रवास आहे. गझलेत वात्सल्यता आणणारे आणि प्रेम व दारूत अडकलेल्या गझलेला कौटुंबिकता प्राप्त करून देणारे श्री. प्रदीप निफाडकर हे गझलसम्राट सुरेश भट यांचे अंतरंग शिष्य असून, पत्रकार म्हणूनही ते सुपरिचित आहेत. निफाडकर यांचा पहिला गझलसंग्रह होता स्वप्नमेणा. त्यांनी गझलया काव्यप्रकाराची साद्यंत माहिती देणारे पुस्तक लिहिले; ज्याचे नाव गझलदीप आहे. वेगळे वाटसरू हे त्यांचे व्यक्तिचित्रणाचे पुस्तक प्रसिद्ध झाले. अनाथ मुलांच्या भविष्यावर नजर टाकणार्‍या मालिकेचे आभाळ पेलणारे आयुष्य हे पुस्तक लिहीले आहे. निफाडकर यांनी २४ तीर्थंकरावर गाणी लिहिली आहेत. ती सर्व गीते ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी गायली आहेत. त्या गीतांचे पुस्तकही प्रसिद्ध आहे. गझलसम्राट सुरेश भट आणि... हे गुरूवर्य सुरेश भट यांचे चरित्रात्मक आठवणींचे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. तत्पूर्वी भट यांच्या अप्रकाशित कवितांचे संपादन करण्याचे भाग्य निफाडकर यांना लाभले.
तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित होण्याचे आवाहन मानद अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ. कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा, सदस्य सौ. कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड. नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

Friday, 28 February 2020

अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त विचारमंथन...


लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र सोलापूर, कॉ. अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी समिती, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊंचे जीवन व साहित्य या विषयावर विचारमंथनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम शनिवार दिनांक २९ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ५.३० वाजता छत्रपती भवन, सोलापूर येथे प्रा. कॉ. तानाजी ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई चे कार्यक्रम संयोजक दत्ता बाळसराफ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्लीचे मिलिंद आवाड व बाबुराव गुरव हे प्रमुख वक्ते असणार आहेत.


Tuesday, 25 February 2020

केंद्रीय अर्थसंकल्पात समतोल नाही – अर्थतज्ञ राजगोपाल मिनियार


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र सोलापुर, श्रमिक पत्रकार संघ सोलापुर आणि मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. सदर चर्चेत ज्येष्ठ लेखापरीक्षक राजगोपाल मिनियार, बांधकाम व्यावसायिक राजेंद्र कासवा, टेक्सटाईल फाउंडेशनचे राजेश गोसकी, यंत्रमाग धारक संघाचे पेंटप्पा गडम, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजु राठी यांनी आपले विचार मांडले.
राजेंद्र कासवा यांनी GST हा विषय अर्थसंकल्पाचा भाग नाही परंतु तो किती घाइने आणला तसेच सदर कायद्याचा अर्थ एक राष्ट्र एक करप्रणाली असा असताना कोणकोणते कर आजही लागु आहेत. तसेच सदर कायद्यात होणारे सततचे बदल यामुळे होणारा त्रास यावर आपले विचार मांडले. तर राजगोपाल मिनियार यांनी सार्वजनिक न्यासा साठी घेतलेली खबरदारी योग्य कि अयोग्य तसेच करप्रणाली मध्ये केलेली दिशाभूल विषद केली. वस्त्रउद्योगासाठी सरकारच्या नव्या धोरणात कोणत्या बाबी असल्या पाहिजेत यावर विचार मांडले. तर राजु राठी यांनी तरुणांना करप्रणाली समजावून सांगितली. सदर चर्चेत व्यापारी, पत्रकार  व वाणिज्य व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थी सहभागी झाले होते.

Monday, 24 February 2020

एक अस्सल नाट्यानुभव ‘शब्दांची रोजनिशी’


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नवी मुंबई, मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ, स्त्री मुक्ती संघटना, वी नीड यू सोसायटी, अन्वय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शब्दांची रोजनिशीचे आयोजन करण्यात आले आहे.
नाटकघर, पुणे निर्मित, रामू रामनाथन लिखित, अतुल पेठे दिगदर्शित शब्दांची रोजनिशी ही कलाकृती केतकी थत्ते, अतुल पेठे सोमवार दिनांक २ मार्च २०२० रोजी सायंकाळी ६.३० वाजता मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ सभागृह, सेक्टर ६, वाशी नवी मुंबई येथे सादर करणार आहेत.

मा. शरद काळे यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सत्कार सोहळा...


सहस्त्रचंद्रदर्शन म्हणजे त्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात १००० वेळा पूर्ण चंद्र पाहिला आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे यांचा हा विशेष सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा रंगस्वर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे संपन्न झाला.
शरद काळे यांचे बालपण आणि शालेय शिक्षण पुणे येथे झाले. १९६२ साली पुणे येथे MA गणित विषयात सुवर्ण पदक मिळवून १९६३ साली प्रशासकीय सेवेत दाखल झाले. १९७२ साली हवाई विद्यापिठातून एमबीए ची पदवी प्राप्त केली. शरद काळे हे १९६३ च्या महाराष्ट्र तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. कोल्हापूर जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गोवा मुख्यमंत्र्यांचे सचिव, उद्योग व नियोजन विभागाचे सचिव १९९१ १९९५ मुंबई महानगरपालिका आयुक्त, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे सचिव म्हणून सुद्धा त्यांनी काम सांभाळले आहे. प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर रिझर्व बँक, स्टाफ सिलेक्शन बोर्ड अशा राज्य सरकार आणि भारत सरकारच्या वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण संस्थांच्या समित्यांवरही त्यांनी काम पाहिलेले आहे.
शरद काळे  हे १९६३ साली प्रशासकीय सेवेत रुजू झाले. शरद काळे यांनी १९९८ पासून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कामकाजाची धुरा सांभाळली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान वेगवेगळे उपक्रम पार पाडत आहे.
या सोहळ्याच्या सुरूवातीला अंबरिश मिश्र यांनी साहिर लुधियानवी यांच्या गायनावरचा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष हेमंत टकले यांनी केले. त्यानंतर शरद पवार यांच्या हस्ते शरद काळे यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या मानपत्राचे वाचन दत्ता बाळसराफ यांनी केले. शरद काळे जवळून परिचित असलेले यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, त्यांच्या कन्या सुचित्रा दळवी, ज्येष्ठ शल्यचिकित्सक व लेखक रविन थत्ते यांनी त्यांच्या विषयी अनेक गोष्टींचा उलगडा केला.
शेवटी शरद काळे यांनी आपल्या कारकिर्दीतील, आयुष्यातील अनुभव सांगत मनोगत व्यक्त केले.













Saturday, 22 February 2020

मधुरा बेळे यांच्या स्वरांतून उलगडला जीवन जाणिवांचा आविष्कार


सूर विश्वास
नाशिक (दि. २२) : स्वरांचा अलवार आणि तितकाच सहज नाद, वातावरणातील आल्हाददायकता, सूर व शब्दातील नाते अलगद उलगडले जात होते. गीतांतून जगण्यासाठी लागणारी ऊर्जा निनादत होती. त्यात जवळच्या नात्याला दिलेली हाक आणि ईश्वरभक्तीही होती. सूर विश्वासच्या मैफीलीचे १३ वे पुष्प मधुरा बेळे यांनी गुंफले आणि स्वरांच्या एका वेगळ्या दुनियेची सफर घडवली.
मैफीलीची सुरूवात भैरव रागाने झाली. शब्द होते बालमवा मोरे सैय्यामनातील आर्तता आणि प्रेमाच्या व्यापक विचारांचे दर्शन समर्पण भावनेतून समोर आले. गायनातील सहजता व आर्त स्वरांनी मैफीलीला रंग चढला. त्यानंतर कुकुभ बिलावल-राग सादर केला. झपताल-घनघुमार होता. जाणिवांनी आतल्या उर्मीला दिलेली साद आनंदस्वरांची पर्वणीच होती. मैफीलीचा समारोप संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाने केली. पडिले दुर देशी, मज आठवे मानसीयातून आत्मानुभूती आणि ईश्वर भक्ती यांचा अनोखा संगम व्यक्त झाला. ही नव्या उन्मेषाने जगण्याची प्रार्थनाच होती.
रसिक कुलकर्णी (तबला), संस्कार जानोरकर (संवादिनी) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले. विश्वास ग्रृपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून, संकल्पना विनायक रानडे यांची आहे. सदर कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वास गार्डन, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे संपन्न झाला.
उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान सूरविश्वास मैफिलीत करण्यात येतो. त्यात नागपूर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय टायगरमॅन ह्या ट्रायथलॉन स्पर्धेत वयाच्या ६४ व्या वर्षी प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल डॉ. सुभाष पवार यांचा सन्मान विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इस्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. मनोज शिंपी यांनी केला. मधूरा बेळे यांचा सन्मान डॉ. विजयालक्ष्मी गणोरकर यांनी केला. रसिक कुलकर्णी यांचा सन्मान ओझर मर्चंट बँकेचे संचालक रत्नाकर कदम तर संस्कार जानोरकर यांचा सन्मान राहूल फाटे यांनी केला. स्वराली जोगळेकर यांचा सन्मान माधवबागच्या आरोग्य समन्वयक मार्केटींग हेड मधुरा गुर्जर-वाणी यांनी केला. पंडित अविराज तायडे यांचा सन्मान विश्वास ठाकूर यांनी केला.
कार्यक्रमात मनोगत व्यक्त करतांना पंडित अविराज तायडे म्हणाले की, सूरविश्वास म्हणजे स्वरांचा यज्ञ असून त्या माध्यमातून अनेक प्रतिभावंत कलावंतांना त्यांच्या प्रतिभेला व्यासपीठ मिळत आहे. त्यासाठी सर्वांनी कानसेन म्हणून आपले योगदान द्यावे.