यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि संविधान संवर्धन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २० जुलै २०१९ रोजी दुपारी २ वाजता ज्येष्ठ कवी व पत्रकार हरी भक्त परायण शामसुंदर सोन्नर महाराज यांचे कीर्तन सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, नरीमन पॉईंट, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
Friday, 12 July 2019
शामसुंदर सोन्नर महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि संविधान संवर्धन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २० जुलै २०१९ रोजी दुपारी २ वाजता ज्येष्ठ कवी व पत्रकार हरी भक्त परायण शामसुंदर सोन्नर महाराज यांचे कीर्तन सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, नरीमन पॉईंट, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
Thursday, 11 July 2019
‘नवीन शैक्षणिक धोरण मसुदा २०१९’ वर पुण्याच्या गांधीभवनात चर्चा संपन्न....
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, शिक्षण विकास मंच यांच्या वतीने सदरील शिक्षणकट्टयावर
चर्चा आयोजित करण्यात आली होती. या
चर्चेची सुरूवात जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षण विकास मंचचे मुख्य संयोजक मा. डॉ. वसंतराव
काळपांडे यांच्या प्रस्ताविकाने झाली. प्रास्ताविकात त्यांनी भारतीय शिक्षण पद्धती, आतापर्यंत आलेले आयोग त्याचा शिक्षणावर झालेला परिणाम, येऊ घातलेले नवीन
शैक्षणिक धोरण यावर मुख्यत्वे मांडणी केली. सोबतच धोरण अंमलबजावणीसाठी समाजाचा सहभाग
महत्त्वाचा आहे याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. यानंतर शिक्षण विकास
मंचच्या मुख्य सल्लागार श्रीमती बसंती रॉय यांनी नवीन शैक्षणिक धोरणाचा आढावा
घेतला यानंतर उपस्थित सदस्यांनी चर्चेत भाग घेतला.
चर्चेच्या सुरूवातीस प्रभाकर खाडिलकर
यानी प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच मिळावे. निवृत्त तज्ज्ञ व्यक्तींच्या ज्ञानाचा
शिक्षण व्यवस्थेतेने फायदा करून घ्यावा अशी सूचना केली. सोबतच अंगणवाडी - पूर्व
प्राथमिक शिक्षण दर्जेदार असणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. यानंतर नीलिमा
सप्रे यांनी शिक्षक प्रशिक्षण कसे राबविले जाणार..? प्रशिक्षण जबाबदारी शाळेवर द्यावी तसेच
शिक्षकानी स्वतः आपला अभ्यासक्रम तयार करावा. सोबतच पालकांचे उद्बोधन आवश्यक
असल्याचे मत व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेचे कमलाकर महामुनी यांनी
कला,
क्रीडा शिक्षकांच्या जागा भरण्याकडे शासनाचे दुर्लक्ष होते या
धोरणातही याबाबत शंका कायम आहेत. विद्यार्थी शिक्षक होण्यास उत्सुक नाहीत, नाईलाजाने या क्षेत्रात येणारी संख्या वाढली आहे, यावर विचार
व्हावा.
भास्कर भुसारी यांनी आपत्ती व्यवस्थापन,
अभिमान आणि अपयश या क्षेत्रांचा शिक्षणात अंतर्भाव व्हावा असे मत व्यक्त केले. सुरेखा
सोनवणे यांनी हे धोरण पालक शिक्षकांपर्यंत
जायला हवे यावर आणखी चर्चा व्हायला हवी. शाळेत शैक्षणिक साधनांची कमतरता असल्याने आठवी
नंतर ज्ञान रचनावादी शिक्षण अवघड जाते. सरकारी शाळांमध्ये मुले पाठवण्यासाठी
पालकांनी प्राधान्य द्यायला हवे. याबद्दल आपले मत मांडले. अंजली सोमण यांनी पूर्व
प्राथमिक टप्पा सुधारणे अत्यावश्यक आहे. पालकांचा इंग्रजी माध्यमाचा ओढा हा मोठा
अडथळा मातृभाषेतून शिक्षणासाठी आहे याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले.
शरद जावडेकर यांनी नवीन धोरणात समतेचा
उल्लेख नाही. हे खाजगी शिक्षण सम्राटांचे हितसंबंध राखणारे आहे. स्कूल कॉम्प्लेक्स
कल्पना प्रत्यक्षात येणे अवघड असल्याचे निरीक्षण नोंदविले. अनिल कुलकर्णी यांनी शिक्षणाच्या
अधिकारामध्ये असलेल्या त्रुटी, कृती आराखडा यावर मत व्यक्त केले. प्रीतेश कांबळे जीवन
कौशल्ये प्रशिक्षण आवश्यक, लैंगिक शिक्षण आवश्यक असल्याचे (शिक्षक विद्यार्थी
दोघांसाठी) मत व्यक्त केले.
मुकुंद किर्दत आणि इंदापुरकर यांनी पूर्व प्राथमिक शिक्षण महत्वाचे असल्याचे
सांगितले .
रवींद्र झेंडे यांनी ११वी व १२वी
व्यवसायधारित शिक्षण पुढे उच्च शिक्षणाशी जोडून घेण्याचा मार्ग कोणता..?
याचा धोरणात विचार करावा. डॉ. श्रुती पानसे यांनी
मातृभाषेतून शिक्षण असावे मात्र त्याचा अभ्यासक्रम विद्यार्थ्याचे वय
लक्षात घेऊन त्याना सहज समजेल अशा पद्धतीचा असावा, सध्याचा अभ्यासक्रम क्रूर वाटतो
असे सांगितले. Scientific
temper, बौद्धिक
क्षमता आणि आर्थिक क्षमता यातील फरक कसा कमी करता येईल? यासंदर्भात
नवीन धोरणात तरतूद असावी ही अपेक्षा व्यक्त केली. प्रसिध्द साहित्यिक राजीव तांबे
यांनी मुलांना शिकण्यातला आनंद कळावा, मुलांनी माझा प्रश्न मी सोडवणं आवश्यक आहे
सोबतच प्रश्न विचारू शकतील असं वातावरण आवश्यक असल्याचे मत नोंदवले. पुढे ते
म्हणाले, शाळा घरात आणि घर शाळेत आले पाहिजे असं वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे.
वैशाली कार्लेकर महत्त्वाकांक्षी धोरण आहे मात्र खाजगी शाळांवर हे धोरण लागू करणे
किती शक्य आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. सर्व शिक्षण मंडळ एकत्र करून
देशासाठी एकच शिक्षण मंडळ करणे आवश्यक वाटते, असेही मत नोंदवले.
कार्यक्रमाच्या शेवटी यशवंतराव चव्हाण
प्रतिष्ठान,
मुंबईचे कार्यक्रम प्रमुख दत्ता बाळसराफ यांनी उपस्थितांचे
आभार मानले. हया धोरणावर आणखीन चर्चा झाली पाहिजे ही अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमास
पालक, शिक्षक,
मुख्याध्यापक, पत्रकार यांची उपस्थिती होती.
महाविद्यालयीन नियतकालिक हे विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीचे माध्यम : आसाराम लोमटे
विद्यार्थी दशेत तुम्ही जे लिहाल जर
त्यात सत्व असेल तर ते सगळे स्वीकारतील, आपण त्यासाठी आपले निरीक्षण व अनुभव
समृद्ध करायला हवे. महाविद्यालयीन नियतकालिक त्या लिखाणाची सुरुवात करण्याची योग्य
संधी आहे. त्यातून आपण अभिव्यक्त व्हावे, असे आवाहन साहित्य अकादमी पुरस्कार
विजेते प्रसिद्ध लेखक व पत्रकार आसाराम लोमटे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयीन
नियतकालिक स्पर्धा २०१८ च्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाप्रसंगी ते प्रमुख अतिथी
म्हणून बोलत होते. मानवत जि. परभणी येथील के.के.एम महाविद्यालयास यंदाचा
उत्तेजनार्थ पुरस्कार या स्पर्धेत मिळाला आहे, त्याच्या वितरण प्रसंगी लोमटे बोलत
होते.
मा. आसाराम लोमटे यांच्या हस्ते
महाविद्यालयास पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह,
सन्मानपत्र व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष
विजयकुमारजी कत्रूवार, सचिव बालकिशन चांडक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भास्कर
मुंडे, प्रतिष्ठानचे कार्यक्रम संयोजक दत्ता बाळसराफ,
परभणी केंद्राचे सचिव विजय कान्हेकर, नांदेड केंद्राचे सचिव शिवाजी गावंडे,
अंकाच्या संपादक डॉ.शारदा राऊत, डॉ.दुर्गेश रवंडे, प्रा.अनंत मोगल याप्रसंगी उपस्थित होते.
नवमहाराष्ट्र्र युवा अभियानाचे राज्य
संघटक नीलेश राऊत यांनी याप्रसंगी उपस्थितांचे स्वागत केले. विद्यार्थी व
प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Wednesday, 10 July 2019
अर्थसंकल्प २०१९ : उद्योजकांसाठी
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई,
विभागीय केंद्र औरंगाबाद, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड
अॅग्रीकल्चर, मराठवाडा उद्योग आणि कृषी चेंबर, महात्मा गांधी मिशन यांच्या संयुक्त
विद्यमाने प्रसिद्ध अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांचे ‘अर्थसंकल्प २०१९ : उद्योजकांसाठी’ या विषयावर सोमवार दिनांक १५ जुलै २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजता
आईन्स्टाईन हॉल, जेएनईसी महाविद्यालय, एमजीएम कॅम्पस, औरंगाबाद येथे व्याख्यान
आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर
चे अध्यक्ष संतोष मंडलेचा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
वारी : एक आनंदयात्रा छायाचित्र प्रदर्शन उद्घाटन समारंभ व मास्टर क्लास
वारकर्यांच्या चेहर्यावरील आनंदातच
विठ्ठल!
समाजामध्ये जे आहे, तेच
आपण टिपण्याचा प्रयत्न करत असतो. पाहणार्याला आपल्या फोटोतून विषयाचे आकलन झाले पाहिजे, तरच
ती छायाचित्रकारिता बोलकी आणि प्रभावी होते, असा संदेश प्रख्यात छायाचित्रकार संदेश
भंडारे यांनी हौशी छायाचित्रकारांना दिला. वारीतून खूप काही शिकायला मिळाले. आपण
विठ्ठलाचा एकही फोटो काढला नाही;
पण वारकर्यांच्या चेहर्यावरील निखळ आनंदातच विठ्ठल दिसला, असेही
ते म्हणाले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
विभागीय केंद्र औरंगाबाद,
एमजीएम पत्रकारिता महाविद्यालय आणि कलर्स ऑफ औरंगाबादतर्फे
एमजीएम कलादीर्घा आर्ट गॅलरीत मंगळवारपासून (ता. नऊ) संदेश भंडारे यांचे ‘वारी
: एक आनंदयात्रा’
हे छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. क्लोव्हर डेल
स्कूलच्या संचालक अपर्णा कक्कड यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
तत्पूर्वी चित्रपती व्ही. शांताराम सभागृहात संदेश भंडारे यांनी युवा
छायाचित्रकारांसाठी मास्टर क्लास घेतला. प्रास्ताविक प्रतिष्ठानच्या विभागीय
केंद्राचे सचिव नीलेश राऊत यांनी केले.
एमजीएम फिल्म आर्ट विभागाचे प्रमुख शीव
कदम, डॉ. आर. आर. देशपांडे, अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे शहाजी
भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. हे प्रदर्शन सोमवार (ता. १५) खुले
राहणार असून,
शहरातील कलारसिकांनी आस्वाद घेण्याचे आवाहन सुबोध जाधव, अॅड.
स्वप्नील जोशी,
श्रीकृष्ण पाटील, ज्ञानेश्वर पाटील, आदित्य
दिवाण, उमेश राऊत,
महेश अचिंतलवार,
मंगेश निरंतर,
सचिन दाभाडे,
निखिल भालेराव,
प्रतीक राऊत आदींनी केले आहे.
Monday, 8 July 2019
नवी मुंबईत रंगली कविमय पावसाळी सायंकाळ...
आषाढस्य प्रथम दिवसे निमित्ताने कवी
कुसुमाग्रज वाचनालय व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबई केंद्राच्या संयुक्त
विद्यमाने काव्य वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात यशवंतराव
चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, नवी मुंबई केंद्राचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड
"खेकडे" ही उपहासगर्भ कविता सादर केली. यावेळी आर. जे. व युवा कवी प्रणव चव्हाण, गझलकार
आप्पा ठाकूर यासह अनेक नामवंत व तसेच नवकवी सहभागी झाले होते .
ललित पाठक, डॉ अशोक पाटील, प्रवीण पाटील यांसह अनेक रसिकांनी त्यांस भरभरुन दाद दिली.
प्रज्ञा लालिंगकर यांचे ओघवते सूत्र संचलन कार्यक्रमाची उंची वाढवत गेले.
Sunday, 7 July 2019
फिनलंडची शाळा भरली पुण्याच्या गांधीभवनात...
शिक्षण विकास मंच, यशवंतराव
चव्हाण प्रतिष्ठान,
मुंबई यांच्या वतीने आज पुण्यातील गांधीभवनात "फिनलंडची
शिक्षण पद्धती" या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी फिनलंड येथील शिक्षणतज्ज्ञ डॉ. हेरंब
आणि सौ. डॉ. शिरीन कुलकर्णी उपस्थित होते.
ही कार्यशाळा आयोजित करण्यामागची काय भूमिका आहे, यासंदर्भातील विवेचन जेष्ठ
शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षण विकास मंचचे मुख्य संयोजक डॉ. वसंतराव काळपांडे यांनी
केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कार्यक्रम प्रमुख मा. दत्ता बाळसराफ यांनी
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान समाजातील विविध विषयांसोबत शिक्षण या विषयावर
महाराष्ट्रभर कसे काम करते आहे याचा आढावा घेवून चव्हाण सेंटरसारख्या संस्था हया
महाराष्ट्राचे भूषण आहे,
सोबतच जात, धर्म, राजकारण या पलिकडे जावून ही संस्था
कशारितीने कार्यरत आहे याचाही आढावा घेतला. यावेळी फिनलंडची शिक्षण पद्धती या
विषयावरील पुस्तकाच्या भारतीय आवृत्तीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.
फिनलंड सारखा एक छोटासा देश १९७० नंतर
शिक्षणातील बदलामुळे कसा प्रगतशील झाला? आज जगातल्या टॉप ५ देशासोबत या देशाचा GDP कशारितीने तुलनात्मक
वाढला आहे याचा संख्यात्मक तपशील त्यानी मांडला. तेथील शाळा, शिक्षण, शिक्षक, शिक्षण पॉलिसी सर्वात मुख्य म्हणजे तिची अंमलबजावणी
यासंबंधीची मांडणी PPT च्या सहाय्याने त्यांनी केली. मुलांना सहज, सोप्या पद्धतीने
कसे शिकायचे याचेही सादरीकरण ABL
माध्यमातून केले. त्यांचा अभ्यासक्रम, आराखडा,
पुस्तके, अध्यापन, शिक्षक
भरती त्याची रचना, वेतन आदी बाबतीतील विवेचन त्यांनी केले. तिथे इयत्ता बारावीची
एकच परीक्षा होते तिचा अभ्यासक्रम, पुस्तके, प्रश्नपत्रिका
आदीची सोदाहरण चर्चा-संवाद उपस्थितांसोबत साधला. एकूणच दिवसभर अतिशय उत्साहात तितक्याच
गंभीरपणे ही कार्यशाळा पार पडली. अध्यापनाचा एक नवीन दृष्टिकोन, आत्मविश्वास घेवून
उपस्थित प्रतिनिधींनी आयोजक आणि प्रमुख वक्ते यांचे आभार मानले.
कार्यशाळेचा समारोप शिक्षण विकास
मंचच्या मुख्य सल्लागार श्रीमती बसंती रॉय यांनी उपस्थिताचे आभार मानून केले. कार्यक्रमाचे निवेदन समन्वयक माधव सूर्यवंशी यांनी केले.
Subscribe to:
Posts (Atom)






















