Monday, 27 November 2017

यशवंतरावांचे निर्णय राज्याला समृध्द करणारे

सोलापूर : कृषी, उद्योग आणि जलसिंचन यात यशवंतराव चव्हाण यांनी घेतलेले निर्णय महाराष्ट्राला समृध्द करणारे ठरले आहेत. त्यांच्यामुळेच ख-या अर्थाने राज्याची प्रगती झाली आहे, असे विचार डॉ. शंकरराव साळुंखे यांनी व्यक्त केले.

शनिवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र, सोलापूर आणि वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. साळुंखे बोलत होते. या प्रसंगी विभागीय केंद्राचे अध्यक्ष डॉ. गो. मा. पवार, प्राचार्य डॉ. चंद्रकांत चव्हाण, विभागीय केंद्राचे सदस्य दत्ता गायकवाड, प्राचार्य डॉ. संतोष कोटी, केंद्राचे सचिव दिनेश शिंदे, प्रा. संगमेश्वर नीला आणि विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. गो. मा. पवार यांनी यशवंतरावांचे व्यक्तीमत्त्व नव्या पिढीला समजणे किती महत्त्वाचे आहे, याबाबत आपले विचार मांडले.

डॉ. साळुंखे म्हणाले, समाजकारण आणि राजकारण करताना अनेक चढाओढींना यशवंतरावांना तोंड द्यावे लागले. द्विभाषिक राज्य आणि संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांच्याबाबत गैरसमज निर्माण झाले होते. परंतु महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आणि मुंबई महाराष्ट्रात राहण्यासाठी यशवंतराव पंडीत नेहरूंना हे सारे पटवून देण्यात यशस्वी झाले. केवल प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्याचे कौशल्य यशवंतरावांनी साध्य केल्यामुळे ते शक्य झाले. आधूनिक महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, देशाचे संरक्षण, गृह, परराष्ट्र आदी महत्त्वाची खाती संभाळून त्याला योग्य दिशा देण्याचे काम यशवंतरावांनी केले. कला, साहित्य यासाठी त्यांचे योगदान मोठे असून कृषी उद्योग आणि जलसिंचन यात यशवंतरावांनी घेतलेले निर्णय महाराष्ट्राला समजणे कठीण आहे, असे ही ते म्हणाले. चव्हाण यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला. डॉ. रेखा ओव्हाळ यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. 

Sunday, 26 November 2017

आनंदी जगण्यासाठी सुसंवाद, सकारात्मक मानसिकता, सात्विक आहार व व्यायामाची गरज - डॉ. मनोज चोपडा

नाशिक : आजच्या धावपळीच्या जगात जीवनशैलीत वेगाने बदल होत असून ताण-तणावाचे वाढते प्रमाण, सकारात्मक जीवनशैलीचा अभाव, सोशल मिडीयाच्या अतिवापरामुळे आलेले नैराश्य, उदासिनता, व्यायामाचा अभाव, व्यसनांचे वाढते प्रमाण, विसंवाद यामुळे हृदयरोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून ते रोखण्यासाठी आनंदी जीवनासाठी निसर्गाशी मैत्री करून सात्विक आहार, मेडीटेशन, त्याचबरोबर आपल्या मर्यादा ओळखणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ख्यातनाम हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मनोज चोपडा यांनी केले.

महाराष्ट्राचे थोर शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या 33व्या पुण्यतिथीच्या पुर्वसंध्येला ख्यातनाम हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मनोज चोपडा यांचे जीवनशैली व हृदयरोग या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक,विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, सारस्वत बँक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वासलॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर येथे सदर व्याख्यान संपन्न झाले.

ते पुढे म्हणाले की आज ग्लोबल वॉर्मिंग, वाढते ध्वनी प्रदुषण, औद्योगिक प्रदुषण यांचा परिणाम जीवनशैलीवर होत आहे. आज तरूण वयातच हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह यांचे प्रमाण वाढत आहे. ते रोखण्यासाठी तेल, तूप, साखर, मैदा, मीठ यांचे आहारातील प्रमाण कमी करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर योगा, स्वत:साठी वेळ देणे, आवडीचे छंद जोपासणे यांमुळे ताणतणाव कमी करण्यासाठी मदतच होते. शरीर हे जैविक घड्याळ आहे. ते योग्य रितीने चालण्यासाठी जीवनशैलीत शिस्त आणणे महत्त्वाचे आहे. नियमित आरोग्य तपासणी आहाराच्या वेळा निश्‍चित करणे, प्रतिकार शक्ती वाढवणे गरजेचे आहे. वेळेचे व्यवस्थापन करून आनंदी मनाने काम करण्याचे कौशल्य साधता आले पाहिजे. तिच खरी आनंदी जीवनाची गुरूकुल्ली आहे असेही डॉ. चोपडा पुढे म्हणाले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले. डॉ. मनोज चोपडा यांचा परिचय प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा यांनी केला. तर सन्मान प्रतिष्ठानचे सदस्य अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी केला. डॉ. रश्मी चोपडा यांचा सन्मान विश्वास ठाकूर यांनी केला. कार्यक्रमास प्रतिष्ठानचे सदस्य कविता कर्डक, तसेच डॉ. वासुदेव भेंडे, डॉ. मनोज शिंपी, अमर भागवत, गिरीष देवस्थळी, मंगला कमोद, कैलास पाटील, डॉ. सुभाष पवार, विनायक रानडे, रमेश देशमुख आदी उपस्थित होते.

अहमदनगर केंद्रातर्फे यशवंतराव चव्हाणची ३३ वी पुण्यतिथी साजरी...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने स्व.यशवंतराव चव्हाण साहेब यांची ३३ वी पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी केली. तसेच स्व.यशवंतराव चव्हाण यांचे विचार तरूण पिढाला ज्ञात व्हावेत म्हणून स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांचे साहित्य, संस्कृती, शिक्षण, समाजकारण, संरक्षण या क्षेत्रातील योगदानातून महाराष्ट्राने जी घोडदौड केली आहे ती अहमदनगर केंद्रातर्फे विविध उपक्रमांतून दाखविण्यात आली. स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र उभा करण्याचे काम ग्रामीण भागात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुंबई विभागीय केंद्र अहमदनगरच्या माध्यमातून सुरू आहे आज २५ नोव्हेंबर २०१७ रोजी स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांची ३३ वी पुण्यतिथीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा,वाचन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान ही आयोजित करण्यात आले होते.

वार्षिक शिक्षण परिषद संपन्न...

शिक्षण विकास मंच आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक शिक्षण परिषद आयोजित केली होती. या परिषदेमध्ये सेमी-इंग्रजी : काळ, आज आणि उद्या या विषयावर आज दिवसभरात चर्चा करण्यात आली. ह्या कार्यक्रम शनिवारी रंगस्वर' चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्टान, मुंबई, जन. जगन्नाथ भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई येथे राज्यभरातून आलेल्या शिक्षकांच्या उपस्थित पार पडला. या कार्यक्रमामध्ये डॉ.कुमुद बन्सल यांना उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार देण्यात आला आणि व्हाट्सअँपच्या चर्चा-शिक्षण विकासाच्या या शिक्षण विकास मंच या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
सेमी इंग्रजी बद्दल विद्यार्थी आणि शिक्षक यांचा टॉक शो झाला याचे सूत्रसंचालन सुदाम कुंभार यांनी केले. त्यानंतर स्वागत व कार्यक्रमाची रूपरेषा बसंती रॉय यांनी केले. कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी सेमी आणि मराठी याबद्दल लोकांना मार्गदर्शन करून शंकांचे निरसन केले. तर डॉ. वसंत काळपांडे यांनी सेमी-इंग्रजी : काळ, आज आणि उद्या या विषयावर मार्गदर्शन केले. नंतर राज्यातील काही तुरळक शाळांनी केलेले प्रयोग दाखविण्यात आले. प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे यांनी त्यांच्या काळातील शिक्षण क्षेत्रातील अनुभव लोकांना सांगितले.

लवकरच वयाची १०० वर्ष पूर्ण करणारे भुजंगराव कुलकर्णी यांना यशंवतराव चव्हाण राज्यस्तरीय २०१७ पुरस्कार प्रदान...

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ३३ व्या पुण्यतिथीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात शुक्रवारी २५ नोव्हेंबर २०१७ रोजी पार पडला. त्यावेळी खासदार व प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी स्वागत व प्रास्ताविक म्हणून प्रतिष्ठानवतीने शिक्षण, आरोग्य, अपंग व इतर उपक्रमाविषयी थोडक्यात आढावा घेतला यामध्ये विधवा महिला पुनर्वसन उपक्रम 'उमेद'च्या माध्यमातून त्यांची मदत करणे त्यांना जगण्याची उमेद देणे. शिक्षण व शिक्षणक्षेत्रात होणारे बदल प्रतिष्ठानच्या माध्यामतून राबविणे अशा अनेक उपक्रमाविषयी माहिती दिली. तसेच पुढील वर्षी ‘युवा संवाद यात्रा’च्या माध्यामातून यशवंतराव चव्हाण यांची ओळख युवा पिढीला होण्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कॉलेजेसमधून चर्चासत्राचे आयोजन केले जाईल असे यावेळी सांगितले. या कार्यक्रमध्ये वि.का. राजवाडे यांच्या संकेतस्थळाचे अनावरण व सदानंद मोरे लिखीत..“लोकमान्य ते महात्मा”या पुस्तकांचे प्रकाशन प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमात १२ मार्च २०१८ रोजी ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ प्रोफेसर एम. एम शर्मा यांना दिला जाईल अशी घोषणा पुरस्कार समितीचे अध्यक्ष अनिल काकोडकर यांनी केली.
यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०१७
यशवंतराव चव्हाण यांच्या ३३ व्या पुण्यतिथी निमित्त दिला जाणारा ‘यशवंतराव चव्हाण राज्सस्तरीय पुरस्कार २०१७' थोर प्रशासकीय सेवक भुजंगराव कुलकर्णी यांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये शरद पवार यांनी सांगितले की भुजंगराव कुलकर्णी हे दोन महिने अकरा दिवसांनी वयाची १०० वर्षपूर्ण करत आहेत असे सांगितले. या कार्यक्रमासाठी नेहरु सेंटरचे सतिश सहानी उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष हेमंत टकले यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमरिश मिश्रा यांनी केले

Friday, 24 November 2017

३३ व्या पुण्यतिथी निमित्त भव्य पदयात्रा

कराड यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र कराड यांच्या संयुक्त विद्यमाने देशनेते यशवंतरावजी चव्हाण यांची ३३ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून शनिवारी २५ नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी ४ वाजता कराड मध्ये भव्य पदयात्रा काढण्यात येणार आहे. पदयात्रा मार्ग विरंगुळा-विजय चौक-टिळक हायस्कूल-कन्याशाळा-चावडी चौक-समाधी स्थळ असा असेल. त्यानंतर समाधी स्थळी पुष्पांजली व सन्माननियांची आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम होईल. भव्य पदयात्रे मध्ये अधिक लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आमदार बाळासाहेब पाटिल आणि मोहनराव कृष्णाजी डकरे यांनी केले आहे. 

मा. यशवंतराव चव्हाण यांची ३३ वी पुण्यतिथी...

आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते व धुरंधर राष्ट्रीय नेते मा. यशवंतराव चव्हाण यांच्या ३३ वी पुण्यतिथी निमित्त शनिवारी दिनांक २५ नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी ५.३० वाजता कार्यक्रमांचे आयोजन चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईन्ट मुंबई येथे करण्यात आले आहे.
असे कार्यक्रम होतील, वि. का. राजवाडे यांच्या साहित्याच्या वेबसाईटचे उद्घाटन, "लोकमान्य ते महात्मा" या पुस्तकाच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन, यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक २०१७ प्रदान करणे, राज्यस्तरीय पारितोषिक स्वीकाराचे भाषण, यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०१७ जाहीर करणे, अध्यक्षांचे भाषण.