Sunday, 26 November 2017

आनंदी जगण्यासाठी सुसंवाद, सकारात्मक मानसिकता, सात्विक आहार व व्यायामाची गरज - डॉ. मनोज चोपडा

नाशिक : आजच्या धावपळीच्या जगात जीवनशैलीत वेगाने बदल होत असून ताण-तणावाचे वाढते प्रमाण, सकारात्मक जीवनशैलीचा अभाव, सोशल मिडीयाच्या अतिवापरामुळे आलेले नैराश्य, उदासिनता, व्यायामाचा अभाव, व्यसनांचे वाढते प्रमाण, विसंवाद यामुळे हृदयरोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून ते रोखण्यासाठी आनंदी जीवनासाठी निसर्गाशी मैत्री करून सात्विक आहार, मेडीटेशन, त्याचबरोबर आपल्या मर्यादा ओळखणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ख्यातनाम हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मनोज चोपडा यांनी केले.

महाराष्ट्राचे थोर शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या 33व्या पुण्यतिथीच्या पुर्वसंध्येला ख्यातनाम हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मनोज चोपडा यांचे जीवनशैली व हृदयरोग या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक,विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, सारस्वत बँक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वासलॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर येथे सदर व्याख्यान संपन्न झाले.

ते पुढे म्हणाले की आज ग्लोबल वॉर्मिंग, वाढते ध्वनी प्रदुषण, औद्योगिक प्रदुषण यांचा परिणाम जीवनशैलीवर होत आहे. आज तरूण वयातच हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह यांचे प्रमाण वाढत आहे. ते रोखण्यासाठी तेल, तूप, साखर, मैदा, मीठ यांचे आहारातील प्रमाण कमी करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर योगा, स्वत:साठी वेळ देणे, आवडीचे छंद जोपासणे यांमुळे ताणतणाव कमी करण्यासाठी मदतच होते. शरीर हे जैविक घड्याळ आहे. ते योग्य रितीने चालण्यासाठी जीवनशैलीत शिस्त आणणे महत्त्वाचे आहे. नियमित आरोग्य तपासणी आहाराच्या वेळा निश्‍चित करणे, प्रतिकार शक्ती वाढवणे गरजेचे आहे. वेळेचे व्यवस्थापन करून आनंदी मनाने काम करण्याचे कौशल्य साधता आले पाहिजे. तिच खरी आनंदी जीवनाची गुरूकुल्ली आहे असेही डॉ. चोपडा पुढे म्हणाले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले. डॉ. मनोज चोपडा यांचा परिचय प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा यांनी केला. तर सन्मान प्रतिष्ठानचे सदस्य अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी केला. डॉ. रश्मी चोपडा यांचा सन्मान विश्वास ठाकूर यांनी केला. कार्यक्रमास प्रतिष्ठानचे सदस्य कविता कर्डक, तसेच डॉ. वासुदेव भेंडे, डॉ. मनोज शिंपी, अमर भागवत, गिरीष देवस्थळी, मंगला कमोद, कैलास पाटील, डॉ. सुभाष पवार, विनायक रानडे, रमेश देशमुख आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment