Tuesday, 14 November 2017

शनिवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी चित्रपट चावडीत ‘हिडन फिगर्स’ चित्रपटाचे प्रदर्शन...



औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद, एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालय आयोजित चित्रपट चावडी या उपक्रमाअंतर्गत ‘हिडन फिगर्स’ हा चित्रपट शनिवार, दि. १८ नोव्हेंबर २०१७ रोजी सायं. ५.०० वा. आईनस्टाईन सभागृह, जेएनईसी महाविद्यालय, एमजीएम परिसर, औरंगाबाद येथे दाखविण्यात येणार आहे.
नासा या अंतराळ संस्थेच्या सुरुवातीच्या काळात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या तीन आफ्रिकन -अमेरिकन वंशाच्या गणित शास्त्रज्ञ महिलांची ही प्रेरणादायी कथा आहे. कॅथेरिन जॉन्सन आणि तिच्या दोन सहकारी डोरोथी व्हॅगन आणि मॅरी जॅक्सन यांनी केलेल्या गणिती आकडेमोडीमुळे अमेरिकेला अंतराळामध्ये पाऊल टाकणे शक्य झाले. त्यामुळेच जॉन ग्लीन या अमेरिकेच्या पहिल्या अंतराळवीराला पृथ्वी प्रदक्षिणा घालता आली.
हे काम करीत असताना कॅथेरिन जॉन्सन आणि तिच्या सहकारी डोरोथी व्हॅगन आणि मॅरी जॅक्सन यांना नासा या प्रतिष्ठित संस्थेतील वंश भेदाचे अनुभवही आले. वंशभेदाच्या मर्यादा ओलांडत त्यांनी नासामध्ये गाजवलेली कारकिर्द अमेरिकन-आफ्रिकेतील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरली. पण त्यांचे हे कर्तृत्व मोठा काळ उलटल्यानंतर म्हणजे २०१६ मध्ये मॉर्गाट ली शटर्ली यांच्या ‘हिडन फिगर्स’ या पुस्तकाने जगासमोर आणले. याच पुस्तकावर आधारीत हा चित्रपट आहे.

चित्रपट सर्वासाठी विनामुल्य असून रसिकांनी या चित्रपटाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबादचे अध्यक्ष अंकुशराव कदम, कोषाध्यक्ष सचिन मुळे, सचिव नीलेश राऊत, कार्यकारिणी सदस्य डॉ. भालचंद्र कांगो, प्रा. अजीत दळवी, डॉ. श्रीरंग देशपांडे, बिजली देशमुख, डॉ. मकदूम फारूकी, सुनील किर्दक, प्रा. दासू वैद्य, विजय कान्हेकर, डॉ. रेखा शेळके, सुहास तेंडुलकर, सुबोध जाधव, रेणुका कड आदींनी केले आहे. ­­

Monday, 13 November 2017

एकल महिलांसाठी 'स्वतंत्र धोरणाची आवश्यकता' राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न...


 यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विकास अध्ययन केंद्र, कोरो, कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट, यांच्या संयुक्त विद्यमाने एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता या विषयावर राज्यस्तरीय चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्यभरातून महिला वर्ग उपस्थित होता. विशेष म्हणजे प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी हजर असलेल्या तृतीयपंथी यांच्याशी संवाद साधला. या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे आणि कार्यक्रम व्यवस्थापक दत्ताबाळ सराफ यांची प्रमुख उपस्थिती होती.








मराठवाड्यात २०१५ व २०१६ या दोन वर्षांमध्ये पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर 'एकल महिला व पाणिप्रश्न' या विषयावर संशोधन अहवाल प्रसिध्द करण्यात आलेला होता. त्या अनुषंगाने औरंगाबाद येथे ९ सप्टेंबर २०१७ रोजी 'एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता' या विषयावर विभागीय चर्चासत्र आयोजित केले होते. या कार्यक्रमात झालेल्या सर्व चर्चेतून एक समान सूर समोर आला तो म्हणजे एकल महिलांसाठी 'स्वतंत्र धोरणाची आखणी' करणे गरजेचे आहे.

त्या अनुषंगाने चर्चा आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यक्रमांच्या अध्यक्ष विद्या बाळ, सुजाता खांडेकर, फिरोज अश्रफ यांनी उपस्थितांना वेगवेगळ्या उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले.
शहरी आणि ग्रामीण भागातील एकल महिलांच्या समस्या या विषयावर मा. दीप्ती राऊत यांनी मार्गदर्शन केले. विशेष समाज घटकातील एकल महिलांच्या या विषयावर सुजाता खांडेकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच मुस्लीम समाज्यातील एकल महिलांच्या समस्या मा. जुलेखा आणि तृतीयपंथी यांच्या समस्या माधुरी सरोदे, दिशा शेख यांनी केले.  

Friday, 10 November 2017

सिंहासन सिनेमावर चर्चा


ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अरुण साधूंचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या 'सिंहासन' व 'मुंबई दिनांक' या कादंबरी व कथासंग्रहातील निवडक प्रसंगांवर आधारित सिनेमा बनला-"सिंहासन". आपल्या सर्वांचा परिचित चित्रपट. १९७९ ला हा सिनेमा प्रदर्शित झाला... संपूर्णपणे राजकारणच केंद्रबिंदू असलेला हा मराठीतील पहिला चित्रपट...सत्तेच्या सिंहासनासाठी केल्या जाणाऱ्या राजकारणावर आधारित हा सिनेमा आहे..हा सिनेमा नूकताच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये दाखविण्यात आला.
हा सिनेमा संपल्यानंतर समिक्षक व दिगदर्शक अशोक राणे यांनी १९७५ च्या काळातील काही चित्रपट आणि वास्तव यातील काही गोष्टी सांगितल्या. तसेच आता तसे चित्रपट का बनू शकत नाही ? या विचारलेल्या प्रश्नाला सुध्दा त्यांनी सुंदर दिलेलं उत्तर त्या काळात जब्बार पटेल यांना राजकीय विषयावर चित्रपट तयार करावा असं वाटलं होतं. आत्ताच्या तरूणाला वाटतं नाही. ज्येष्ठ पत्रकार सुनिल तांबे यांनी १९७५ च्या काळातील राजकारण आणि संघटना याबाबतच्या घटना सांगून आठवणींना उजाळा दिला.

"दिव्यांग कट्टा" संपन्न...


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई आणि अपंग हक्क विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी १० नोव्हेंबर २०१७ रोजी दुपारी ३ वाजता "दिव्यांग कट्टा"चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये अपंग स्टॉलधारकांच्या समस्या या विषयावर चर्चा करण्यात आली. आलेल्या दिव्यांग व्यक्तींची विचारपूस करून त्यांच्या अपंग स्टॉलधारकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यानंतर शमीद खान यांनी त्यांना मार्गदर्शन केले.

‘चित्रपट चावडी’तर्फे चित्रपटप्रेमींसाठी ‘इक्सेन्ट्रीसीटीज ऑफ ब्लाँड हेअर्ड गर्ल’



नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार ११ नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध पोर्तुगाल दिग्दर्शक मॅन्युएल डी. ऑलीवेरा यांचा ‘इक्सेन्ट्रीसीटीज ऑफ ब्लाँड हेअर्ड गर्ल’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वासलॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-४२२०१३ येथे दाखविण्यात येणार आहे.
‘इक्सेन्ट्रीसीटीज ऑफ ब्लाँड हेअर्ड गर्ल’ हा चित्रपट एका तरूण जोडीचा प्रेमपट आहे. आगगाडीच्या प्रवासात एक तरूण एका मध्यमवयीन सहप्रवासी स्त्रीला त्याच्या आयुष्यात आलेल्या एका सुंदर तरूणीबद्दल सांगतो. चायनीज पंखा धारण करणार्‍या त्या तरूणीच्या प्रेमात पडलेल्या ह्या तरूणाची काय अवस्था होते ते पहाण्यासाठी अवश्य या. २००९ मध्ये पोर्तुगीज येथे प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी ६४ मिनीटांचा आहे.
‘इक्सेन्ट्रीसीटीज ऑफ ब्लाँड हेअर्ड गर्ल’ हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे. 

Thursday, 9 November 2017

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची आढावा बैठक


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक नूकतीच बैठक प्रतिष्ठान मध्ये पार पडली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या राज्यभरातल्या केंद्रांनी केलेल्या कामांची माहिती दिली. २०१८ ची रूपरेषा आगोदरच ठरवावी असं बैठकीत सुचवण्यातं आलं.

"सहकारी गृहनिर्माण संस्था"एकदिवशीय माहिती कार्यशाळा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे "सहकारी गृहनिर्माण संस्था" कायदा आणि नियम यासंदर्भात एकदिवशीय माहिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये कायदा आणि नियम यासंदर्भात प्रभाकर चुरी हे २ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी ११ ते ५ यावेळेत प्रक्षिणार्थींना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत सहभागी होण्या-या प्रक्षिणार्थीं कडून २५० रूपये शुल्क आकारले जाईल. ही कार्यशाळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई जन.जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई येथे होईल. या कार्यशाळेसाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे. संपर्क - ८२९१४१६२१६, २२०४५४६०.