औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद, एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालय आयोजित चित्रपट चावडी या उपक्रमाअंतर्गत ‘हिडन फिगर्स’ हा चित्रपट शनिवार, दि. १८ नोव्हेंबर २०१७ रोजी सायं. ५.०० वा. आईनस्टाईन सभागृह, जेएनईसी महाविद्यालय, एमजीएम परिसर, औरंगाबाद येथे दाखविण्यात येणार आहे.
नासा या अंतराळ संस्थेच्या सुरुवातीच्या काळात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या तीन आफ्रिकन -अमेरिकन वंशाच्या गणित शास्त्रज्ञ महिलांची ही प्रेरणादायी कथा आहे. कॅथेरिन जॉन्सन आणि तिच्या दोन सहकारी डोरोथी व्हॅगन आणि मॅरी जॅक्सन यांनी केलेल्या गणिती आकडेमोडीमुळे अमेरिकेला अंतराळामध्ये पाऊल टाकणे शक्य झाले. त्यामुळेच जॉन ग्लीन या अमेरिकेच्या पहिल्या अंतराळवीराला पृथ्वी प्रदक्षिणा घालता आली.
हे काम करीत असताना कॅथेरिन जॉन्सन आणि तिच्या सहकारी डोरोथी व्हॅगन आणि मॅरी जॅक्सन यांना नासा या प्रतिष्ठित संस्थेतील वंश भेदाचे अनुभवही आले. वंशभेदाच्या मर्यादा ओलांडत त्यांनी नासामध्ये गाजवलेली कारकिर्द अमेरिकन-आफ्रिकेतील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरली. पण त्यांचे हे कर्तृत्व मोठा काळ उलटल्यानंतर म्हणजे २०१६ मध्ये मॉर्गाट ली शटर्ली यांच्या ‘हिडन फिगर्स’ या पुस्तकाने जगासमोर आणले. याच पुस्तकावर आधारीत हा चित्रपट आहे.
चित्रपट सर्वासाठी विनामुल्य असून रसिकांनी या चित्रपटाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबादचे अध्यक्ष अंकुशराव कदम, कोषाध्यक्ष सचिन मुळे, सचिव नीलेश राऊत, कार्यकारिणी सदस्य डॉ. भालचंद्र कांगो, प्रा. अजीत दळवी, डॉ. श्रीरंग देशपांडे, बिजली देशमुख, डॉ. मकदूम फारूकी, सुनील किर्दक, प्रा. दासू वैद्य, विजय कान्हेकर, डॉ. रेखा शेळके, सुहास तेंडुलकर, सुबोध जाधव, रेणुका कड आदींनी केले आहे.
No comments:
Post a Comment