Friday, 11 October 2019

कायदेविषयक एकदिवशीय व्याख्यानमाला...



सोलापूर १२ : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र सोलापूर, सोलापूर बार असोसिएशन, सोलापूर व यांच्या संयु्क्त विद्यमाने एकदिवशीय कायदेविषयक व्याख्यानमाला शनिवार १२ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ८.३० ते ५ वाजेपर्यंत डॉ. निर्मलकुमार फडकुलक सभागृह सिद्धेश्वर मंदिराजवळ, सोलापूर येथे होणार आहे. उद्घाटन मृनालिनी फडणीस, (कुलगुरु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ) तसेच सोलापूर केंद्राचे अध्यक्ष युन्नुसभाई शेख, प्रमुख पाहुणे प्रदिपसिह रजपूत (जिल्हा सरकारी वकील) उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख व्याख्याते अँड. डॉ. सुधाकर आव्हाड, अँड डॉ. मकरंद आडकर, अँड. डॉ. राजेंद्र अनुभुले असणार आहेत. सर्वांनी या व्याख्यानमालेला सहभाग नोंदवा असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Thursday, 10 October 2019

विज्ञानगंगाचे त्रेचाळीसावे पुष्प ‘रेल्वे पुल'...


 यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञानगंगा’ कार्यक्रमांतर्गत ‘रेल्वे पुल' या विषयावर विनामूल्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्याते डॉ. बी. के. कुशवाह शुक्रवार दि. १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालया समोर, नरिमन पॉईंट मुंबई येथे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती.

रांगोळी कार्यशाळा


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, महाराष्ट्र महिला व्यासपीठ तर्फे प्रसिद्ध रांगोळी कलाकार मंजिरी प्रभुलकर यांच्या रांगोळी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक : शनिवार , १९ ऑक्टोबर २०१९
वेळ : दुपारी २ ते ५
प्रशिक्षण शुल्क : ३००/-
स्थळ : बेसमेंट हॉल, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई.
अधिक माहितीसाठी
संपर्क : संजना पवार ८२९१४१६२१६
कार्यालय : २२०४५४६० विस्तारित २४४.

Sunday, 6 October 2019

‘डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ’ पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन...


 मुंबई : दि. ७ :  सर्व विद्यार्थांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या उद्देशाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचा विभाग शिक्षण विकास मंच मागील काही वर्षांपासून कार्यरत आहे. प्रतिष्ठानच्या शिक्षण विकास मंचाने आतापर्यंत अनेक परिषदा, कार्यशाळा आणि चर्चासत्रे चव्हाण सेंटर मध्ये आयोजित केली आहेत. तसेच शासनाला धोरणात्मक बदल करण्याच्या दृष्टीने शिफारशीही केल्या आहेत.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या शिक्षण विकास मंचतर्फे प्रतिवर्षी शैक्षणिक विषयक लिखाण केलेल्या उत्कृष्ट पुस्तकाचे लेखक आणि प्रकाशक यांना ‘डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ’ पुरस्काराने सन्मानित केले जाते. यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या शिक्षण विकास मंचाकडून उत्कृष्ट शिक्षणविषयक पुस्तकं मागविण्यात आली आहेत. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, शिक्षणाची गुणवत्ता, मूल्यमापन पध्दती, शालेय उपक्रम, समाजाचा सहभाग, शैक्षणिक प्रशासन अशा विषयांना स्पर्श करणारे हे पुस्तक असावे.
तसेच शैक्षणिक प्रश्नांवर उपाययोजना त्यात मांडलेल्या असाव्यात. हे पुस्तक दि. १ ऑक्टोबर २०१८ ते दि. ३० सप्टेंबर २०१९ या कालावधीत प्रकाशित झालेले असावे. तरी संबंधित प्रकाशकांनी/लेखकांनी सदर ग्रंथाच्या दोन प्रती यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुख्य कार्यालयात शनिवार दि. ३१ ऑक्टोबर २०१९ पर्यंत शिक्षण विकास मंच,
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई – २१ येथे पाठवाव्यात अशी विनंती डॉ. वसंत काळपांडे मुख्य संयोजक शिक्षण विकास मंच यांनी केली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : समन्वयक श्री. माधव सूर्यवंशी – ९९६७५४६४९८.

सृजन कार्यशाळा ओरिगामी / पेपर क्राफ्ट


सृजन कार्यशाळा ओरिगामी / पेपर क्राफ्ट या विषयावर दिनांक ६ ऑक्टोबर २०१९ रोजी आयोजित करण्यात आली होती. 
ही कार्यशाळा प्रिती सुद्रिक आणि अभिषेक सुद्रिक या कलाकार दांपत्याने घेतली.
सदर कार्यशाळेत पारंपारिक पद्धतीने कागदापासून कंदिल कसे बनवायचे, ओरिगामी पद्धतीने कंदिलाचे तोरण व त्याचबरोबर पेपर पासून वॉल हँगिंग या गोष्टीचे प्रात्यक्षिक देऊन ते मुलांकडून करुन घेतले.






Friday, 4 October 2019

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे चित्रपटप्रेमींसाठी ‘पर्सेपोलीस’


  ‘चित्रपट चावडी’
नाशिक दि. ४ : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार ५ ऑक्टोबर २०१९ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध इराणी अ‍ॅनिमेशन दिग्दर्शक मार्जेन सत्रापी हीचा ‘पर्सेपोलीस’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे.
चार अ‍ॅनिमेशन पटांच्या मालिकेतील हा दुसरा चित्रपट हाही ‘वॉल्टझ् विथ बशीर’ प्रमाणे आत्मचरित्रात्मक आहे. १९७९ च्या इराणमधील इस्लामिक क्रांतीच्या पार्श्वभूमीवर एका छोट्या संवेदनशील, खेळकर मुलीची धीट आणि ध्येयवेडी कहाणी आहे. ही मुलगी अर्थातच मार्जेन सत्रापी स्वत:च आहे. क्रांतीपर्व इराण हा प्रागतिक होता व एका उचभ्रू घरात रहाणारी मार्जेन अचानकपणे आलेल्या इस्लामिक क्रांतीच्या झंझावाताने हादरून गेली. त्यानंतर ती शिक्षणासाठी फ्रान्समध्ये आली. युरोपमधील मुक्त वातावरण तिला फारसे रूचले नाही. तिला मातृभूमीकडे परतण्याचे वेध लागले. हा तिचा प्रवास वैचारीक आंदोलनाने व भुराजकीय बदलांनी अत्यंत संस्मरणीय होतो. २००८ साली प्रदर्शित झालेल्या या इराणी चित्रपटाचा कालावधी ९६ मिनिटांचा आहे.
हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ. कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा, सदस्य सौ. कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड. नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

Thursday, 3 October 2019

‘भयंकर सुंदर मराठी भाषा’

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र नवी मुंबई आणि कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था, सीवुड- नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागिरी पोर्णिमेनिमित्त ‘भयंकर सुंदर मराठी भाषा’ याविषयावर नामवंत कवी आणि वक्ते अशोक बागवे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक १२ ऑक्टोबर २०१९ रोजी सायंकाळी ७.०० वाजता कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालयाच्या प्रांगणामध्ये हे व्याख्यान पार पडेल.