Saturday, 28 April 2018

माध्यमांनी जनतेच्या ख-या प्रश्नाकडे लक्ष द्यावे - पद्मभूषण देशपांडे

सोलापूर - सध्याच्या काळात प्रसारमाध्यमे भावनिक प्रश्नांना अधिक महत्त्व देत आहेत, त्याऐवजी माध्यमांनी जनतेच्या ख-या प्रश्नांकडे अधिक लक्ष द्यायला हवे, असे मत ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांनी व्यक्त केले.

सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलात 'समाजाचे प्रश्न आणि प्रसार माध्यमे' या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईचे कार्यक्रम संयोजक दत्ता बाळसराफ, दत्ता गायकवाड, संचालक डॉ. इ. एन. अशोककुमार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

आजचे युग हे वेगवान युग आणि तंत्रज्ञानाचे युग मानले जाते. मात्र तंत्राच्या आहारी जाऊन आशय मागे पडू नये. बदलत्या समाजाप्रमाणे माध्यमांमध्येही बदल होत गेले. त्यामुळे बातम्यांची भाषाही बदलली आहे. यापुढच्या काळात टेलिव्हिजनचे युग संपून मोबाईलचे युग व्यापक होईल, त्यादृष्टीने भावी पत्रकारांनी तंत्रज्ञान कौशल्य मिळवायला हवे असे ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांनी सांगितले.

 एकेकाळी संगणक लोकांना बेरोजगार करील या भीतीतून समाजाच्या उव्‍च स्तरातून नवतंत्रज्ञानाला विरोध झाला. त्यामुळे देशाचे बरेच नुकसान झाले व संगणकाचा देशात प्रसार होण्यास उशीर झाला. यापुढे नवतंज्ञानाला विरोध केला जाऊ नये. सजगपणे नवतंत्रज्ञान स्वीकारावे. कालबाहय झालेले अभ्यासक्रम, पध्दती बदलण्याची गरज असल्याचेही त्यांनी दत्ता बाळसराफ यांनी सांगितले.

जुने ते सर्व वाईट असे मानणे चूक ठरेल. तत्वज्ञानासारख्या अनेक महत्वाच्या विषयांची आजही तेवढीच गरज्‍ आहे. अध्यक्षीय भाषणात प्रा. अशोककुमार म्हणाले की, माध्यमे बदलत असताना , त्यांनी जनतेला योग्य मार्गदर्शन करण्याच्या भूमिकेपासून दूर जाता कामा नये असे मत दत्ता गायकवाड यांनी मांडले.

कार्यकमाचे सूत्रसंचालन जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी केले. सदर कार्यक्रमास नवं महाराष्ट्र युवा अभियानाचे संघटक निलेश राऊत, यशवंतराव चव्हान प्रतिष्ठानचे दिनेश शिंदे, विजय काणेकर, डॉ. माया पाटील, प्रा अंबादास भासके, प्रा मधुकर जक्कन, तेजस्विनी कांबळे आणि विद्यार्थी इत्यादींची उपस्थिती होती. 

तृतीयपंथीयांच्या जाणीव जागृतीचा कार्यक्रम कुलाबा पोलिस ठाण्यात

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि विकास अध्ययन केंद्रातर्फे तृतीयपंथी आणि त्यांचे हक्क याबाबत जाणीव जागृती प्रशिक्षण शिबीरं आणि विविध शासकीय यंत्रणांसोबत ४ मे २०१८ रोजी सकाळी ९ वाजता कुलाबा पोलिस स्टेशन मध्ये कार्यक्रम आयोजीत केला आहे. पहिला टप्पा म्हणजे शालेय शिक्षकांसोबत आम्ही हा कार्यक्रम सुरू केला आहे. आतापर्यंत ४०० पेक्षा अधिक शिक्षकांना तृतीयपंथी आणि त्यांचे हक्क जाणीव जागृती शिबिर मार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे. देण्यात आलेल्या प्रशिक्षणातून अनेक लोकांना तृतीयपंथीयांबद्दल असलेले गैरसमज दूर होण्यास मदत झाली आहे. विविध संस्था, संघटने मध्ये सुध्दा हे प्रशिक्षण दिले आहे. यासोबतच ही कार्यशाळा पोलिस प्रशासनासमोर होणार आहे.

Tuesday, 24 April 2018

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे बालनाट्य शिबिराचा शुभारंभ नाट्य शिबिरातून जगाकडे बघण्याची जाणीव निर्माण होते


नाशिक : नाटक ही कला रोजच्या घडणार्‍या प्रसंगातून निर्माण होणारी कला असून आजुबाजूच्या घटनांचे पडसाद त्यात कलावंत अभिनयातून मांडत असतो. नाट्यशिबिरे ही समाजाकडे डोळस दृष्टीने बघण्याची जाणीव करुन देतात. त्यातून मुलांच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास होतो. नाट्यशिबीरे ही जीवन समजून घेण्याची उपयुक्त कला आहे. त्याचबरोबर आनंद देणारी कला आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध नाट्यलेखक राजा ठाकूर यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक, सारस्वत बँक लि., विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ व विश्वास लॉन्स यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध नाट्यकलावंत लक्ष्मी पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘बालनाट्य शिबिराचे’ आयोजन करण्यात आलेले असून शिबिराच्या शुभारंभप्रसंगी राजा ठाकूर हे बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, नाटक ही मेहनत व कष्टातून शिकण्याची कला आहे. साध्या प्रसंगातून मोठा विचार त्यातून व्यक्त होतो. समाज परिवर्तनाचे ते प्रभावी माध्यम आहे. मराठी रंगभूमी ही समृद्ध असून अनेक महान कलावंतांनी योगदान दिलेले आहे. त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा. या शिबिराची संकल्पना प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष श्री. विश्वास ठाकूर यांची आहे.
स्वागत व प्रास्ताविक करतांना श्री. विनायक रानडे म्हणाले की, आजच्या व्हॉटसअ‍ॅपच्या व चॅनलच्या जमान्यात मुलांना खरा आनंद अशा शिबिरातून मिळतो म्हणूनच बालनाट्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर शिबीर 8 वर्षापुढील मुला-मुलींसाठी असून रविवार 22 ते शनिवार 28 एप्रिल 2018 या कालावधीत सायं. 4 ते 7 या वेळेत क्लब हाऊस (विश्वास लॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे सुरु आहे.

Sunday, 22 April 2018

कोचिंग क्लासेस मुलांच्या सृजनशीलतेला मारक...


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि शिक्षण विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने या वेळच्या शिक्षणकट्टयात "खाजगी कोचिंग क्लासेस" या विषयावर चर्चा झाली. न्यायालयाकडून खाजगी कोचिंग क्लासेस वरती नियंत्रण ठेवण्याचे निर्देश शासनास दिल्याने शासनातर्फे विधेयकाचा कच्चा मसुदा तयार झाला आहे. त्यावर शिक्षणकट्टयात चर्चा करण्यात आली.

ही चर्चा का ठेवण्यात आली ..? या विषयीची भूमिका श्रीमती बसंती रॉय यांनी उपस्थितांना सांगितली. कोचिंग क्लासेस ही आजच्या समाजाची भावनिक गरज बनली आहे. यास पालक , शिक्षक आणि आजची परीक्षा पद्धती कारणीभूत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक छळ होतो. म्हणून हे धोरण ठरविताना विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवावा. त्याचा विकास शाळा आणि क्लास दोघांच्याही समन्वयाने करावा. या विधेयकातून लहान आणि मराठी माध्यमाचे क्लासेस वगळण्यात यावेत. अशीही धारणा काही सदस्यांनी शिक्षणकट्टयात व्यक्त केली.

खाजगी क्लासेस मुलांना परीक्षार्थी बनवतात तोच तो अभ्यासक्रम पुन्हा पुन्हा करून घेतात याने मुलांची सृजनशीलता मरून जाते याकडे शिक्षण विकास मंचचे संयोजक डॉ. वसंतराव काळपांडे यानी लक्ष वेधले. या कार्यक्रमास मोठया प्रमाणात शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक,पालक, पत्रकार याची उपस्थिती होती. शेवटी उपस्थितीचे आभार समन्वयक माधव सूर्यवंशी यांनी मानले.

Wednesday, 18 April 2018

१० वी, १२ बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत सेमीनार

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनी विभागातर्फे १० वी आणि १२ बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी चव्हाण सेंटरमध्ये मोफत करिअर मार्गदर्शन सेमीनारचे आयोजन करण्यात आले आहे. सेमीनार १२ मे २०१८ रोजी शनिवारी सकाळी ११ वाजता सुरू होईल.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईतर्फे देवराष्ट्रे येथे विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईतर्फे देवराष्ट्रे, जि. सांगली येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबीर २५, २६ एप्रिल २०१८ रोजी सकाळी ९ ते ५ यावेळेत होईल. दोन दिवसीय कार्यशाळेसाठी तब्बल १५० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. कार्यशाळेत स्व. यशवंतराव चव्हाण यांचा जीवन प्रवास, व्यवसाय मार्गदर्शन, स्टडी गाईडंस (अभ्यास कसा करावा), वयात येतांना, पालकांसाठी जनजागृती सत्र, गीत कलापथक निर्मिती आणि अंधश्रद्धा आणि विज्ञान या विषयावर वक्ते मार्गदर्शन करणार आहे

चव्हाण सेंटर मध्ये सुट्टीच्या काळात कंम्प्यूटर कोर्सेस

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी खास कंम्प्यूटर कोर्सेसचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रवेश खुला असून प्रथम येणा-या विद्यार्थ्यांस प्राधान्य दिले जाईल. basic computing Course, Multimedia & Animation Course, kLiC Certificate Course, kids Course इत्यादी कोर्सेस शिकवले जातील. अधिक माहितीसाठी - अकादमी इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी, 9769256343, 22817975, 22043617