Friday, 28 April 2017

१९ मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाहसोहळ्याचे आयोजन

१९  मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाहसोहळ्याचे आयोजन
अंबाजोगाई : मागील वर्षीच्या पावसाने थोडासा दिलासा दिल्यामुळे शेतकरी सावरतो ना सावरतो तोच यावर्षी पुन्हा गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी खचला आहे. अनेक  शेतक-र्‍यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबविला. नैसर्गिक संकटामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी येथील मानवलोक संस्था, आई प्रतिष्ठान अंबाजोगाई, वसुंधरा सेवा प्रतिष्ठान आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने १९ मे रोजी अंबाजोगाई येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मानवलोकच्या पुढाकाराने सामुदायिक विवाह सोहळ्याचे हे चौथे वर्ष आहे. मागील काही वर्षापासून बेभरवश्याच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी, गारपीट यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. अशा सततच्या नैसर्गिक आघाताने खचलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या उद्देशासून चार वर्षापूर्वी सामुदायिक विवाह सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. तीन वर्षापूर्वी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील रोटरी क्लबच्या पाच शाखांनी पुढाकार घेत ८ मे २०१४ रोजी मानवलोक कार्यालयात पहिला सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळा यशस्वीरित्या पार पाडला. १३ जणांचे लग्न लावून या जोडप्यांना संसारोपयोगी साहित्य दिले होते. त्यानंतर २०१५ साली १६ जोडप्यांचे विवाह पार पाडण्यात आले. मागील वर्षी म्हणजेच १ मे २०१६ रोजी तब्बल ३० जोडप्यांचे विवाह लावून देण्यात आले. हीच परंपरा कायम ठेवत यावर्षी देखील सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्याचा निर्णय मानवलोक संस्था, आई प्रतिष्ठान अंबाजोगाई, वसुंधरा सेवा प्रतिष्ठान आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई या सामाजिक संस्थांनी घेतला आहे. या सोहळ्यासाठी शुक्रवार, दि. १९ मे २०१७ रोजी सायंकाळी ६.५४ वाजताचा मुहूर्त निश्चित करण्यात आला असून इच्छुक जोडप्यांच्या नोंदणीस सुरुवात झाली आहे. विवाह सोहळा अंबाजोगाईतील रिंग रोडवरील मानवलोकच्या मुख्यालयात पार पडणार आहे.
या विवाह सोहळ्यात लग्न करू इच्छिणाऱ्या जोडप्यांसाठी ७ हजार एवढे नाममात्र शुल्क आकारण्यात येणार आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य, दिव्यांग आणि पुनर्विवाह करणारांसाठी नोंदणी मोफत आहे, त्यांनी कोणतेही शुल्क जमा करण्याची आवश्यकता नाही. यात सामील होणाऱ्या जोडप्यातील वराला सफारी ड्रेस ,टॉवेल, टोपी, हळदीचा ड्रेस तर वधुला हळदीची व लग्नाची साडी, मनी मंगळसुत्र, जोडवी तसेच संसार उपयोगी साहित्य आणि गॅस कनेक्शन देण्यात येणार आहे. या विवाह सोहळ्यात इच्छुक वधू-वरांची १० मे २०१७ रोजी पर्यंत नोंद करणे गरजेचे आहे. नोंदणी करताना वराचा वयाची २१ वर्षे  आणि वधूचा वयाची १८ वर्षे पूर्ण केली असल्याचा कागदोपत्री पुरावा देणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी मानवलोक मुख्यालयात अथवा अनिकेत लोहिया (७७७००१५०११), ॲड. जयसिंग चव्हाण (९८२२०२२८४४), ॲड. संतोष लोमटे (९८५०५४४२००), वैजनाथ देशमुख (९४२२७४४१८१), डॉ. नरेंद्र काळे (९४२२७४२६२८) आणि अभिजीत गाठाळ (९७६४०३३११) यांच्याकडे संपर्क करावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Sunday, 23 April 2017

८ वर्षापुढील मुला-मुलींसाठी बालनाट्य शिबीर

८ वर्षापुढील मुला-मुलींसाठी बालनाट्य शिबीर

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि विभागीय केंद्र, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने बालनाट्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. २ मे ते ९ मे या कालावधी मध्ये सायंकाळी ४ ते ७ या वेळेत सुप्रसिध्द अभिनेत्री लक्ष्मी पिंगळे या कल्ब हाऊस, विश्वास लॉन्स, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच शिबिरामध्ये ८ वर्षापुढील मुले व मुली सहभागी होऊ शकतात. प्रत्येक उमेदवाराकडून ७०० रूपये प्रवेश फी आकारण्यात येणार आहे. कार्याध्यक्ष विश्वास जयदेव ठाकूर, मनोज शिंपी, विनायक रानडे, कैलास कमोद, राजवर्धन कदमबांडे, कविता कर्डक, गुरमित बग्गा, रउप पटेल, नितिन ठाकरे, सुधीर संकलेचा विक्रम मोरे यांनी अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क राजू देसले ७७२००५२५७२, भूषण काळे ९६५७४३९८३३, जानेश्वर शिरसाठ ९६०४०६१७५८

Thursday, 20 April 2017

विज्ञानगंगाचे पंधरावे पुष्प.. 'बदलते हवामान आणि यंदाचा पावसाळा'

विज्ञानगंगाचे पंधरावे पुष्प.. 'बदलते हवामान आणि यंदाचा पावसाळा'

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत पंधरावे पुष्प, मुंबई वेधशाळेचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर हे 'बदलते हवामान आणि यंदाचा पावसाळा' या विषयावर शुक्रवारी दिनांक १२ मे २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, नरिमन पॉईंट, मुंबई ४०००२१ येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. वरील कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे

Monday, 17 April 2017

नॅचरल आईस्क्रिम बनविण्याचे प्रशिक्षण

नॅचरल आईस्क्रिम बनविण्याचे प्रशिक्षण 

मशीन, केमीकल, जीएमएस आणि सीएमसी पावडर न वापरता १०० % नॅचरल आईस्क्रिम कसे तयार करतात याबाबत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे दोन दिवस क्लासेसचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसामध्ये प्रशिक्षणार्थीला कुल्फी आणि आईस्क्रिमचे तब्बल ३८ प्रकार शिकविण्यात येणार आहेत. तसेच शिकवणी दरम्यान विद्यार्थ्याला छापील पध्दतीच्या नोटस दिल्या जातील. २० (गुरूवार) आणि २१ (शुक्रवार) एप्रिल रोजी दुपारी दोन ते सायंकाळी ५ या वेळेत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट येथे क्लासेस होणार आहेत. यासाठी १५०० रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

Sunday, 16 April 2017

राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई- विभागीय केंद्र औरंगाबाद, शिक्षण विकास मंच व महात्मा गांधी मिशनच्या सहकार्याने राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचा समारोप सोहळा एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष बालाजी इंगळे, संमेलन स्वागताध्यक्ष आ. विक्रम काळे, एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, डॉ श्रीरंग देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे, सुदेश हिंगलासपूरकर, प्रदीप सोळुंके, विजय कान्हेकर, सुहास तेंडुलकर यांची उपस्थिती होती. शिक्षकाच्या अंगी असलेले कलागुण जाणून घेण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक या तिन्ही स्तरातील शिक्षकांना एकत्रित येऊन आपले विचार, कल्पना आणि अनुभव यांची देवाणघेवाण करता यावी. तसेच शिक्षकांना साहित्यिक म्हणून ओळख व्हावी व त्यांच्याकडून अधिकाधिक साहित्य निर्मिती व्हावी या प्रमुख उद्धेशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी रंगनाथ पठारे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्राथमिक पातळीवर मातृभाषेत शिक्षण घेण्याची गरज सध्याच्या घडीला आहे व लुप्त पावत चाललेली आपली मातृभाषा जोपासावी. भाषा मृत झालेली आहे तिला जागृत करण्याची वेळ आली आहे. शिक्षकांच्या अडचणी खूप आहेत त्या लोकप्रतिनिधी समजून घ्यायला हव्यात. निवडणूक, विविध सर्वेक्षण आदी कामात शिक्षकांना लोकप्रतिनिधी राबवून घेतात अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. स्वागताध्यक्ष आ.विक्रम काळे यावेळी बोलताना म्हणाले की, या साहित्य संमेलनामुळे नक्कीच पुढचे साहित्य संमेलन आयोजित करायला ऊर्जा मिळेल. या साहित्य संमेलनाची शिदोरी युवक शिक्षक घेऊन जातील. पुढच्या साहित्य संमेलनाच्या वेळेस महाराष्ट्र सरकारकडे आम्हयी सुट्टी काढण्याचा नक्कीच प्रयंत्न करू असे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले. अध्यक्षीय भाषणात बोलताना संमेलनाध्यक्ष बालाजी इंगळे म्हणाले शिक्षणाची ताकत, शिक्षणाचे फायदे, लिहित्या शिक्षकांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम, साहित्य विषयक लिखाण करायला हे व्यासपीठ प्रोत्साहन देत आहे. 'लिहत राहा, व्यक्त व्हा' असा संदेशही त्यांनी दिला.
या दोन दिवशीय साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने सुरुवात होऊन वि. स. खांडेकर ग्रंथनगरीचे उदघाटन करून कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मराठवाड्यातील साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांचे विशेष सत्कार करण्यात आले. तसेच 'माझ्या लेखन प्रेरणा' हि प्रकट मुलाखत, सोशल मीडियावरील शिक्षकांचे सृजनशील लेखन, 'शब्द झुल्यावर' हे कवी संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, 'खानदेशचा मळा मराठवाड्याचा गळा' हा बहिणाबाईंचे गीतदर्शन असे विविध कार्यक्रमाने पहिला दिवस पार पडला. दुसऱ्या दिवसाची सुरुवात कथाकथनने झाली. त्यानंतर कवी कट्टा, 'पाठ्यक्रमातील साहित्याची निवड व निकष व वाचन संस्कृतीशी मुलांना जोपासण्यासाठी शिक्षकांची भूमिका' या विषयावर विशेष परिसंवाद साधण्यात आला.सायंकाळी ५ वाजता या दोन दिवशीय राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम पोतदार यांनी केले तर कैलास अंभोरे यांनी आभार व्यक्त केले.
या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी डॉ. कैलास अंभुरे, डॉ. वीर राठोड, प्रा. महेश अंचितलवार, सुबोध जाधव, विनोद सिनकर, रुपेश मोरे, मंगेश निरंतर, राजेंद्र वाळके, त्रिशूल कुलकर्णी, गणेश घुले, श्रीराम पोतदार, निखिल भालेराव, विश्वनाथ ससे, मयूर देशपांडे, अक्षय गोरे, अजिंक्य गुंठे, रमेश मोरे, प्रतीक राऊत, संतोष लोमटे यांनी परिश्रम घेतले.

Saturday, 8 April 2017

"आनंदी आनंद गडे जॉय फॉर ऑल-२०१७" संपन्न

"आनंदी आनंद गडे जॉय फॉर ऑल-२०१७" संपन्न 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, अनाम प्रेम, यूएनडीपी, शोधना कंन्सलटन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंथी समूहासाठी "आनंदी आनंद गडे जॉय फॉर ऑल-२०१७" या कार्यक्रमाचे यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला देशभरातून प्रत्येक राज्याचे तृतीयपंथी समूहाचे निमंत्रित प्रतिनिधी उपस्थित होते. विशेष म्हणजे मान्यवरांनी त्यांच्या प्रत्येक समस्येला वाचा फोडण्यात येईल असे आश्वासन दिले. 
  समाजामध्ये मिळत असलेल्या दुय्यम वागणूक, नोकरी समम्या, अर्थिक अडचण, अशा विविध समस्यांवर मान्यवरांकडून समूहाला योग्य मार्गदर्शन करण्यात आलं. सध्या तृतीयपंथी समूहाला कॉर्पोरेट क्षेत्रात कशी संधी मिळवून देण्यात येईल याबाबत समीर घोष यांनी अधिक माहिती सांगितली. उपस्थित मान्यवरांनी प्रश्नउत्तरं जाणून घेण्यावर अधिक भर दिला. एका प्रतिनिधीने नोकरीसाठी  कंपनीमध्ये गेल्यावर आम्हाला बराच वेळ रखडवून ठेवले जाते. तूमच्यामुळे आमच्या पन्नास कर्मचा-यांना आम्हाला मुकावे लागेल असे सांगितले. या कार्यक्रमाला कृपाली बीडये, समीर घोष, केतकी रानडे, पी.पी सोटी, हे मान्यवर उपस्थित होते.    

Tuesday, 4 April 2017

'विज्ञानगंगा'चे चौदावे पुष्प.. 'प्लास्टिक सर्जरी'

'विज्ञानगंगा'चे चौदावे पुष्प.. 'प्लास्टिक सर्जरी'

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत चौदावे पुष्प डॉ. रवीन थत्ते 'प्लास्टिक सर्जरी' या विषयावर बुधवार  दिनांक १२ एप्रिल २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला. जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे आयोजित केले आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे अशी विनंती यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई तर्फे करण्यात आली आहे.