Wednesday, 11 March 2020

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान...


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद व एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
उद्योजक व मसीआ माजी अध्यक्ष सुनील किर्दक व्यापार-उद्योगाला करोनाचा फायदा की तोटा? या विषयावर गुरुवार, १२ मार्च २०२०, दुपारी १२ वाजता आचार्य विनोबा भावे सभागृह, एमजीएम पत्रकारिता महाविद्यालय, एमजीएम परिसर, औरंगाबाद येथे व्याख्यान देणार आहेत.

Tuesday, 10 March 2020

महिलांनी संतुलित आहार व सकारात्मक जीवनशैलीचा स्वीकार करावा... - डॉ. सौ. कल्पना संकलेचा


जागतिक महिला दिन
नाशिक (दि. ९) : आजच्या धावपळीच्या युगात महिलांनी आरोग्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे असून मनाची व शरीराची काळजी घेणे म्हणजेच जीवनाचा आनंद घेण्यासाठी सक्षम होणे होय. त्यासाठी जीवनसत्वयुक्त आहार, व्यायाम व सकारात्मक जीवनशैलीचा स्वीकार करावा. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. कल्पना सुधीर संकलेचा यांनी केले.
विश्वास को-ऑप.बँक लि. नाशिक, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई,विभागीय केंद्र नाशिक, सारस्वत बँक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त महिला व आरोग्यया विषयांवर डॉ. सौ. कल्पना संकलेचा यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. सदर कार्यक्रम विश्वास हब येथे संपन्न झाला.       
डॉ. सौ. संकलेचा यांनी यावेळी अ‍ॅनेमिया, फायब्रॉइड, विविध कॅन्सर या आजारांची लक्षणे व वेळीच घ्यायची काळजी तसेच रक्तदाब, हिमोग्लोबिन, बोन डेन्सीटी या तपासण्यांची गरज सांगितली व उपस्थित महिलांच्या प्रश्‍नांना उत्तरे दिली.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करतांना विश्वास ठाकूर म्हणाले की, कुटुंबाला घरपण देणारी महिला, अनेक आघाड्यांवर मेहनतीने, निरपेक्षपणे लढत असते. तिचे आरोग्य उत्तम तरच कुटुंबाचे आरोग्य उत्तम असते. म्हणूनच महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे.
यावेळी कोरोना व्हायरस विषयी जनप्रबोधनपर माहिती व उपायांविषयी माहिती देण्यात आली. बँकेच्या कर्मचारी, अधिकार्‍यांना हँड सॅनिटायझर, ग्लोजचे वाटप करण्यात आले.
डॉ. कल्पना संकलेचा यांचे स्वागत वैशाली जामदार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बँकेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सारिका देशपांडे, प्रियंका ठाकूर आदिंनी परिश्रम घेतले.






Monday, 9 March 2020

यशवंतराव चव्हाण यांनी वेणूताईंना लिहिलेल्या पत्रांच्या अभिवाचनाचे आयोजन...


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, जिल्हा केंद्र ठाणे तर्फे राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या १०७ व्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण यांनी वेणूताईंना लिहिलेल्या पत्रांच्या अभिवाचनाचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रांचे अभिवाचन डॉ. वसुधा सहस्त्रबुद्धे आणि मकरंद सावंत सादर करणार आहेत. रविवार दिनांक १५ मार्च २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता, ठाणे नगर वाचन मंदिर, टेंभीनाका, ठाणे (पश्चिम) येथे विनामूल्य हा कार्यक्रम पार पडणार आहे.

Friday, 6 March 2020

डॉ. चंद्रकांत पाटील यांच्या मुलाखतीचं आयोजन

संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

मुंबई ; दि. ६ : चंद्रकांत नागेशराव पाटील यांचा जन्म ०३ सप्टेंबर १९४४ रोजी अंबाजोगाई, बीड येथे झाला. ते मराठी कवी, अनुवादक आणि समीक्षक आहेत. महाराष्ट्रातील १९६० नंतरच्या पिढीला मध्यवर्ती प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी लघुनियतकालिकांच्या चळवळीच्या माध्यमाद्वारे केलेले लेखन हे त्यांचे मराठी साहित्यातील महत्त्वाचे योगदान आहे. मराठीप्रमाणेच ते हिंदी भाषेतील नामवंत कवी आणि समीक्षक म्हणून परिचित आहेत. हिंदीतील अखिल भारतीय पातळीवरील महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा 'महाराष्ट्र भारती' हा सर्वोच्च पुरस्कार त्यांना २०१२ साली देण्यात आला आहे. मध्य प्रदेश शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने देण्यात येणारा ‘राष्ट्रीय हिंदी सन्मान’ हा पुरस्कार त्यांना १४ सप्टेंबर, २०१९ रोजी प्रदान करण्यात आला आहे.
मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये त्यांची कविता प्रकाशित झाली आहे. भीष्म सहानी यांचीतमसही कादंबरी, चंद्रकांत देवताले, पाश इत्यादी नामवंत कवींचे मराठी अनुवाद, मराठी कवितांचे हिंदी अनुवाद, परदेशातील कवींच्या निवडक कवितांचे मराठी अनुवाद, मराठी आणि हिंदी भाषेत लिहीलेली साहित्य समीक्षा, वर्तमानपत्रांतून स्तंभ लेखन अशा माध्यमांतून ते व्यक्त होत असतात. हिंदी आणि मराठी भाषेत चंद्रकांत पाटील यांची आजवर ५० पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई तर्फे करण्यात आले होते. त्यांची ही मुलाखत ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि अभ्यासक सुनील तांबे यांनी घेतली.
या मुलाखतीत कविता, संमेलने, अनुवाद, वाचनीयता, साहित्य व्यवहार या अनुषंगाने डॉ. चंद्रकांत पाटील यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्यांनी त्यांच्या साहित्याबद्दलचा, त्याच्या लेखनाबद्दलचा, त्यांनी केलेल्या लेखनाचा, अनुभवांचा उलगडा केला.
आयुष्यातल्या गुंतागुंतीच्या अनुभवांचं प्रभावी शब्दांकन करणं आणि कमीत कमी शब्दांत शब्दांकन करणं आणि त्याच्या आधारे एक सृष्टी निर्माण करणं, एक जग निर्माण करण हिच माझी कवितेबद्दलची भूमिका आहे, असं संक्षिप्त मत त्यांनी व्यक्त केलं.
यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे, कवी वसंत गुर्जर, श्याम मनोहर, रामदासजी भटकळ, राम दुतोंडे आदि मान्यवर उपस्थित होते.





Tuesday, 3 March 2020

एक अस्सल नाट्यानुभव ‘शब्दांची रोजनिशी’ संपन्न...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नवी मुंबई, मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ, स्त्री मुक्ती संघटना, वी नीड यू सोसायटी, अन्वय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाटकघर, पुणे निर्मित, रामू रामनाथन लिखित, अतुल पेठे दिगदर्शित शब्दांची रोजनिशीहा नाट्याविष्कार वाशी येथे केतकी थत्ते, अतुल पेठे यांनी सादर केला. नाट्य रसिकांनी दिलेल्या अप्रतिम प्रतिसादामुळे सभागृह गच्च भरले होते.
जगातूनच अस्सल भाषेचा ऱ्हास होत आहे. मराठी भाषेबद्दल तर हे अधिकच अधोरेखित होतं. विविध भाषा, त्यावर होणाऱ्या अन्य भाषेंची अतिक्रमणे व ह्यातून मूळ भाषेतील शब्दांचे लुप्त होणे व एकूणच भाषेचा ऱ्हास होत जाणे, ह्यावर मार्मिक भाष्य करणारं प्रायोगिक व दुर्बोधतेतुन सरलतेकडे नेणारा अतुल पेठे व केतकी थत्ते ह्यांच्या थक्क करणाऱ्या अभिनयाने नटलेला नाट्याविष्कार म्हणजे शब्दांची रोजनिशी हे नाटक. दिड तासाचा हा प्रयोग नवी मुंबई केंद्राच्या सह प्रायोजकत्वातून वाशीच्या साहित्य मंदिर वातानुकूलित सभागृहात पार पडला, तेव्हा पूर्ण वेळ निशब्द शांतता पसरली होती, रसिक प्रयोग पाहण्यात गुंतून गेले होते. अध्यक्ष प्रमोद कर्नाड यांच्या प्रयत्नाने नवी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, नवी मुंबई विभागीय केंद्राच्या माध्यमातून असे सुरेख सांस्कृतिक कार्यक्रम रसिकांना पहायला मिळत आहेत.




Monday, 2 March 2020

‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार – २०१९ जाहीर’...


राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची जयंती दरवर्षी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये साजरी करण्यात येते. त्यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
यावेळी त्यांच्या १०७ व्या जयंतीनिमित्त म्हणजेच १२ मार्च २०२० रोजी यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०१९चे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीचा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०१९ नोबेल पारितोषिक विजेते डॉ. अभिजीत बॅनर्जी यांना जाहीर करण्यात आला आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार हे समारंभाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. या सोहळ्याचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण यांचे प्रकट चिंतन भारत: समाज आणि राजकारण या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. हा सोहळा गुरुवार दिनांक १२ मार्च २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता, यशवंतराव चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई येथे पार पडेल. तरी आपण सर्वांनी या सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे.

Sunday, 1 March 2020

सुप्रसिद्ध गझलकार प्रदीप निफाडकर यांच्या ‘गझलदीप’ कार्यक्रमाचे आयोजन...


नाशिक (दि. २) : महाराष्ट्राचे थोर शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या १०७ व्या जयंतीच्या पुर्वसंध्येला सुप्रसिद्ध गझलकार प्रदीप निफाडकर यांच्या गझलदीपया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, सारस्वत बँक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार ११ मार्च २०२० रोजी सायंकाळी ६.०० वाजता अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास गार्डन), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
उर्दू व हिंदी गझलेपासून सुरू झालेला मराठी गझलपर्यंतचा प्रवास प्रदीप निफाडकर उलगडून दाखविणार आहेत. मराठी गझलेची समृद्ध परंपरा कशी बदलत गेली याचे उदाहरणासह व्याख्यान ते देणार आहेत. अमीर खुस्रो ते माधव जुलियन, सुरेश भट ते आत्ताच्या गझलपर्यंतचा हा प्रवास आहे. गझलेत वात्सल्यता आणणारे आणि प्रेम व दारूत अडकलेल्या गझलेला कौटुंबिकता प्राप्त करून देणारे श्री. प्रदीप निफाडकर हे गझलसम्राट सुरेश भट यांचे अंतरंग शिष्य असून, पत्रकार म्हणूनही ते सुपरिचित आहेत. निफाडकर यांचा पहिला गझलसंग्रह होता स्वप्नमेणा. त्यांनी गझलया काव्यप्रकाराची साद्यंत माहिती देणारे पुस्तक लिहिले; ज्याचे नाव गझलदीप आहे. वेगळे वाटसरू हे त्यांचे व्यक्तिचित्रणाचे पुस्तक प्रसिद्ध झाले. अनाथ मुलांच्या भविष्यावर नजर टाकणार्‍या मालिकेचे आभाळ पेलणारे आयुष्य हे पुस्तक लिहीले आहे. निफाडकर यांनी २४ तीर्थंकरावर गाणी लिहिली आहेत. ती सर्व गीते ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी गायली आहेत. त्या गीतांचे पुस्तकही प्रसिद्ध आहे. गझलसम्राट सुरेश भट आणि... हे गुरूवर्य सुरेश भट यांचे चरित्रात्मक आठवणींचे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. तत्पूर्वी भट यांच्या अप्रकाशित कवितांचे संपादन करण्याचे भाग्य निफाडकर यांना लाभले.
तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित होण्याचे आवाहन मानद अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ. कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा, सदस्य सौ. कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड. नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.