Thursday, 13 September 2018

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे चित्रपटप्रेमींसाठी शनिवारी ‘पेशन्स स्टोन’

नाशिक (प्रतिनिधी) : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार १५ सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध दिग्दर्शक अतिकी रहीमी यांचा ‘पेशन्स स्टोन’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.

सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे.

अफगाणिस्तानमध्ये घडलेली ही एक नाजूक आणि हृदयद्रावक कहाणी आहे. एक स्त्री आपल्या मूक पतीजवळ तिच्या जगण्याचा रहस्यमय, रोमांचकारी सत्यप्रवास कथन करते. त्यातूनच हा चित्रपट पुढे सरकत जातो. यात स्त्रीचे बालपण, एकाकीपण, तिची अपूर्ण स्वप्ने, इच्छा आकांक्षा मांडते. नात्यामधील असलेली जगण्याची आस आणि प्रेमभावना याचे विलक्षण मिश्रण यात आहे.

सन २०१२ मध्ये अफगाणिस्तान येथे प्रदर्शित झालेल्या या पर्शियन चित्रपटाचा कालावधी १०० मिनिटांचा आहे.

हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

Tuesday, 11 September 2018

'बलुतं'ची चाळीशी

आता तुम्हीच प्रकाशाचे पुंजके व्हा
अन क्रांतीचा जयजयकार करा...

पद्मश्री दया पवार प्रतिष्ठान, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (मुंबई) आणि ग्रंथाली वाचक चळवळ.....
आयोजित

'बलुतं'ची चाळीशी

कधी - गुरुवार, २० सप्टेंबर २०१८
सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत
कुठे - रंगस्वर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

सविस्तर तपशिल लवकरच..


Thursday, 6 September 2018

विज्ञानगंगाचे तिसावे पुष्प कृत्रिम बुध्दिमत्ता

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगा कार्यक्रमांतर्गत तिसावे पुष्प शास्त्रज्ञ सचिन सातपुते यांचे कृत्रिम बुध्दिमत्ता या विषयावरील व्याख्यान शुक्रवार दि २१ सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी ५. वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालया समोर, नरिमन पॉईंट मुंबई येथे गुंफणार आहे. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती.

बालाजी सुतार यांच्या कथेवर, कवितांवर आधारीत ‘गावकथा’ नाट्य-सादरीकरणाचा ९ सप्टेंबरला प्रयोग....

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - विभागीय केंद्र औरंगाबाद व स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालय, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ९ सप्टेंबर २०१८ रोजी सायं. ६ ते ८ या वेळेत, गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमी सभागृह, स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालय, औरंगाबाद येथे ‘गावकथा’ हा बालाजी सुतार यांच्या कथांचे, ललित गद्याचे अंश आणि कविता यांच्यावर आधारित संहितेच्या नाट्य-सादरीकरण प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.हा नाट्यप्रयोग सध्या राज्यभर गाजत असून मुंबई पुण्यासह राज्यातील अनेक शहरांत या कार्यक्रमाचे प्रयोग झालेले आहेत.ग्रामीण महाराष्ट्रातील गाव-खेड्यांचा भोवताल, मागच्या दोन-तीन दशकांत अतिशय झपाट्याने बदलून गेला आहे.
सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक मूल्यभानाचा र्‍हासही खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे. शेतीची बिकट अवस्था, स्त्रियांचं अवघड आयुष्य, दिशाहीन तरूणाई आणि मूल्यविहीन ग्रामीण राजकारण अशा अनेक अंगांनी गावाचा वेध घेणारी ही रंगमंचीय मांडणी आहे. ‘रंगदृष्टी, पुणे’या संस्थेने या प्रयोगाची निर्मिती केली असून संजय मोरे यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. प्रयोगाला मयुर मुळे, दीप डबरे यांचे संगीत असून, संगीत साथ शिवानी कंधारकर, अनिरुद्ध गोरे, गोपाळ तिवारी यांनी केली आहे. यामध्ये संजय ठाकुर, महेंद्र प्रकाश, विनोद वणवे, अनिता डेंगळे, श्रीकांत शिवाजी, ऋताली वैद्य, रश्मी साळवी, तुषार हांडे, हर्षा ए.जी., अरबाज मुलानी आदी एकूण १६ कलाकारांचा चमू असून प्रयोगाचा वेळ साधारणपणे ऐंशी मिनिटांचा आहे. प्रवेश सर्वासाठी खुला असून नाट्यरसिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, काव्यरसिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबादचे अध्यक्ष अंकुशराव कदम, कोषाध्यक्ष सचिन मुळे, सचिव नीलेश राऊत, डॉ. श्रीरंग देशपांडे, स. भु. कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जगदीश खैरनार, कार्यकारिणी सदस्य डॉ. भालचंद्र कांगो, प्रा. अजीत दळवी, बिजली देशमुख, डॉ. अपर्णा कक्कड, डॉ. मुस्तजीब खान, सुनील किर्दक, प्रा. दासू वैद्य, विजय कान्हेकर, डॉ. रेखा शेळके, सुहास तेंडूलकर, एमजीएम फिल्म आर्ट विभाग प्रमुख शिव कदम, सुबोध जाधव,गणेश घुले,मंगेश निरंतर,श्रीकांत देशपांडे, महेश अचिंतलवार,श्रीराम पोतदार आदींनी केले आहे

शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि विभागीय केंद्र ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम शनिवारी ८ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ११ वाजता मो. ह. विद्यालय ठाणे येथे होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे प्रभारी अध्यक्ष चंद्रशेखर ओक आणि संवादक प्रा. दीपा ठाणेकर या असतील. 

सौ. वंदना मिश्रा चतुर्वेदी, सौ. प्राजक्ता पं सामंत, श्री. भगवान दत्तात्रय चक्रदेव, श्री. नरेंद्र वाबळे आणि डॉ. मृदुला निळे या शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे. ठाणे विभागीय केंद्राचे अध्यक्ष मुरलीधर नाले, उपाध्यक्ष महेश केळुसकर आणि सचिव अमोल नाले यांनी कार्यक्रमाला अधिक संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

दिव्यांग व्यक्तींसाठी युनिक आयडी कार्ड (स्वालंबन कार्ड) नोंदणी शिबीराचे आयोजन


परभणी : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, अपंग हक्क विकास मंच, समाज कल्याण विभाग, जि. प. परभणी व महात्मा गांधी सेवा संघ परभणी संचलीत अपंग पुनर्वसन केंद्र परभणी यांच्या संयुक्त विद्यामाने परभणी जिल्ह्यातील अपंग व्यक्तींसाठी "स्वालंबन कार्ड/युनिक आयडी कार्डची ऑनलाईन नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. ८ सप्टेंबर २०१८ रोजी जि. प. कन्या प्रशाला, स्टेशन रोड, परभणी येथे सकाळी ११ वाजल्या पासून ते सायंकाळी ४ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. तरी कार्डसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे दिव्यांग ऑनलाईन प्रमाणपत्र, आधार कार्ड, सही/अंगठा, शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, फोटो इत्यादी कागदपत्रे घेवून उपस्थितीत रहावे असे मा. जि. समाज कल्याण अधिकारी जि. प. परभणी. मा. श्री. आर. जी. गायकवाड (वै. सा. का. परभणी) आणि मा. श्री. विजय कान्हेकर (संचालक तथा सचिव म. गा. से. सं. परभणी) यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मा. श्री. विष्णू वैरागड संपर्क - ९८५०१४१४३१

Wednesday, 5 September 2018

स्व-संरक्षण प्रशिक्षण वर्ग

आजच्या काळात आत्मरक्षण अथवा स्व-संरक्षण ही बाब महिला, पुरूष, मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. आज महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यावर होणारे हल्ले ही चिंताजनक बाब लक्षात घेऊन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या नवमहाराष्ट्र अभियानातर्फे स्व-संरक्षण प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण वर्गाचा कार्यक्रम शनिवारी १५ सप्टेंबर २०१८ रोजी दुपारी २ ते ५ यावेळेत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई येथे होईल. प्रवेश विनामुल्य असून संपर्क अरविंद खैरे यांच्याशी साधावा - ९८१९५०१५३२