Sunday, 8 January 2017

सृजन तर्फे "जैवविविधता -संरक्षण आणि संवर्धन" सत्र संपन्न...


दिनांक ८ जानेवारी रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे सृजन विभागामार्फत मुलांबरोबर "जैवविविधता -संरक्षण आणि संवर्धन" या विषयावर सत्र घेण्यात आले. सृष्टीज्ञान या पर्यावरण शिक्षण देणा-या संस्थेच्या कार्यकर्त्या श्रीमती. संगीता खरात यांनी जैवविविधता या विषयावर सादरीकरण केले तसेच फिल्मही दाखवली. जैवविविधता म्हणजे काय, प्राण्यांचे विविध अधिवास, प्राण्यांमधील वर्गीकरण, जैवविविधतेचे आपल्या आयुष्यातील महत्त्व तसेच जैवविविधतेला असलेले धोके याबद्दल या सत्रात माहिती देण्यात आली. जैवविविधतेचा भाग असलेले कीटक, उभयचर प्राणी, पक्षी, सस्तन प्राणी यांचा आपल्या आयुष्याशी असलेला थेट संबंध विद्यार्थ्यांना उलगडून सांगण्यात आला. त्यानंतर याच सादरीकरणावर आधारीत प्रश्नमंजुषा श्री. कुणाल अणेराव यांनी घेतली. त्याचा विद्यार्थ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. विजेत्या विद्यार्थ्यांना वनस्पती, पक्षी, कीटक, फुलपाखरे यांची फिल्म गाइडस् भेट म्हणून देण्यात आली. 

Thursday, 5 January 2017

७ व्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ७५ चित्रपट दाखवले जाणार.



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पुणे फिल्म फाऊंडेशन, मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन २० ते २६ जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे अशी माहिती महोत्सवाचे संचालक जब्बार पटेल यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली.
यंदा महोत्सवाचे हे 7 वे वर्ष असून, या महोत्सवात मुंबई विद्यापीठाचे अधिक सहकार्य असणार असून, कुलगुरु संजय देशमुख हे उद्धाटनाला उपस्थित राहतील अशी माहिती सरचिटणीस शरद काळे यांनी दिली. यंदाच्या चित्रपट महोत्सवात जगभरातील एकूण ७५ सिनेमे दाखवण्यात येणार आहेत. तसेच यावर्षी स्मिता पाटील स्मृति व्याख्यानमालेसाठी दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर व्याख्याते असणार आहेत.
चित्रपट यावर्षी ५२ जागतिक, ३ भारतीय, ३ मराठी, ४ रेट्रो, ७ लेटिन अमेरिका या भाषेतील चित्रपट असणार आहेत. विद्यार्थयानी तयार केलेल्या २९ लघुपट यामध्ये १३ चलचित्र तर १६ एनिमेशन आहे. तसेच व्हिएतनाम देशाचे ५ सिनेमे देखील दाखवण्यात येणार आहेत असे मुख्य समन्वयक महेंद्र तेरेदेसाई यांनी सांगितले. यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे समन्वयक व्यवस्थापक संजय बनसोडे ही उपस्थित होते

Tuesday, 3 January 2017

महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे " स्वयंपाकघरातील रसायनशास्त्र " व्याख्यान संपन्न..



आजच्या घडीला स्त्री 'नोकरी' आणि 'कुटुंब' या दोन्ही तुल्यबळ बाजू हाताळत असताना स्वयंपाक घरातील रसायन शास्त्र तसेच आरोग्याची काळजी याबाबत मार्गदर्शनपर कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठ विभागाकडून आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या रेखा रानडे दिवेकर यांनी सुरुवातीला रसायन शब्दाचे स्पष्टीकरण दिले. रसा मध्ये पृथ्वी म्हणजे रस पूर्ण विश्व म्हणजे रसायनचा समूह आहे. प्रत्येक व्यक्तीच रसायन वेगळ आहे. बाहेरची रसायन घ्यायला नकोत. ते आपल्या आजूबाजूला असतात..

मार्गदर्शनपर व्याख्यानामध्ये स्वयंपाक करत असताना आपण पूर्वी वापरत असलेली लोखंडी भांडी वापरल्यास आपले शरीर अधिक संतुष्ट राहील असा सल्ला त्यांनी महिलांना दिला. नेहमी आपण आहारामध्ये भात खायला हवा, आणि सर्व प्रकारच्या डाळी आपण नियमित खाव्यात. "सदृढ़  शरीरासाठी नाचणी नियमित केली तर अति उत्तम"  अशा त्या म्हणाल्या. तूप हे बुध्दी आणि आरोग्यासाठी चांगले आहे. तर सध्या जेवणात वापरत असलेल्या तेलाची जाहिरात अधिक प्रमाणात करण्यात येत आहे, त्यापासून सावध राहून फिलटर केलेले तेल फक्त वापरावे अशा विविध विषयावरील टिप्स त्यांनी महिलांना दिल्या. या मार्गदर्शनासाठी  महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद होता.

Thursday, 22 December 2016

विज्ञानगंगाचे अकरावे पुष्प.. 'हल्लीच्या फुलांना वास का येत नाही?'


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंग' कार्यक्रमांतर्गत प्रा. नागेश टेकाळे यांचे 'हल्लीच्या फुलांना वास का येत नाही?" या विषयावरील अकरावे पुष्प सोमवार दि. १६ जानेवारी २०१७ रोजी सायंकाळी ५.०० वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालय समोर, नरिमन पॉईंट, मुंबई  येथे आयोजित केलेले आहे. प्रा. नागेश टेकाळे हे वनस्पतीशास्त्रज्ञ असून त्यांनी विपुल लिखाण केले आहे. तरी वरील कार्यक्रमा आपण उपस्थित रहावे ही विनंती. 

Friday, 9 December 2016

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी गिरवले चित्रपट समीक्षणाचे धडे

यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा स्तुत्य उपक्रम- कुलगुरू डॉ. संजय देशमुख


दरवर्षी यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव काहीतरी वेगळे देत असते. या वर्षी या चित्रपट महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे ते महाविद्यालयीन विद्यार्थांनी केलेले चित्रपटाचे समीक्षण. चित्रपट निव्वळ न पाहता तो वाचता देखील यावा या उद्देशाने  महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘चित्रपट समीक्षण कार्यशाळेचे’ आयोजित करण्यात आले होते. दिनांक ९ डिसेंबर २०१६ रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.०० वाजे पर्यंत मुंबई विद्यापीठामधील अल्केश मोदी हॉल येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उदघाटन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी केले. यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल आणि चित्र- नाट्य अभ्यासक समर नखाते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

‘’चित्रपटाचा आस्वाद कसा घ्यावा याकरिता या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठ ७ व्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे सहयोगी आहेत. पुढील वर्षी हा चित्रपट महोत्सव विद्यापीठाच्या आवारात करावा अशी विनंती डॉ. जब्बार पटेलांना करतो’’, असे उदगार डॉ. देशमुख यांनी काढले.

‘’चित्रपट फक्त पाहायचा नसतो तर तो वाचायचा देखील असतो. विशेषतः विद्यार्थ्यांना तो कसा वाचावा हे कळण्यासाठीच या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे’’, असे डॉ. जब्बार पटेल यांनी सांगितले. ‘’चित्रपटाला भाषा नसते, आपल्या महोत्सवामध्ये मराठी चित्रपटांचे परीक्षण विदेशी परीक्षक करतात’’, असे डॉ पटेलांनी अधोरेखित केले.

चित्र- नाट्य अभ्यासक समर नखाते यांनी चित्रपटाचा इतिहास, चित्रपट निर्मितीची प्रक्रिया याविषयी माहिती दिली. तसेच चित्रपट कसा पहावा याचे धडे विद्यार्थ्यांना दिले.

यापूर्वी आम्ही चित्रपट मनोरंजनाचे माध्यम म्हणून पाहत होतो. परंतु आजच्या कार्यशाळेने चित्रपटाकडे पाहण्याची दृष्टी बदलली, असे पत्रकारितेची विद्यार्थिनी दिशा खातू हिने सांगितले. चित्रपट म्हणजे फक्त अभिनेता, अभिनेत्री याभोवतीच फिरतो असे पूर्वी वाटायचे पण त्याचे विविध पैलू खऱ्या अर्थाने आज आम्हांला उमजले, असे जनसंपर्क शाखेचा विद्यार्थी अभिजीत कांबळे म्हणाला.

यावेळी संज्ञापन व पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. सुंदर राजदीप, सहाय्यक प्राध्यापक प्रा. डॉ. संजय रानडे, यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे समन्वयक महेंद्र तेरेदेसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

Wednesday, 7 December 2016

सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापक प्रशिक्षण

महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे
सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापक प्रशिक्षण

मुंबई शहरामध्ये २० ते ४० हजार सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. या सर्व संस्थांचे काम चांगले होण्यासाठी शासनाचे कायदे किंवा उपविधी लोकांना माहिती असणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र महिला व्यापीठातर्फे "'सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापक प्रशिक्षण" दिनांक ३० जानेवारी ते ३ मार्च २०१७ पर्यंत (सोमवार ते शुक्रवार)  दुपारी २ ते ५ या वेळेमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या बेसमेंट हॉलमध्ये  दिले जाणार आहे.  हे प्रशिक्षण मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये असणार आहे.  प्रशिक्षण शुल्क ४५००/- भरून सहभागी होता येईल. तसेच प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणा-यास प्रमाणपत्र दिले जाणार आहे. पूर्णवेळ व अर्धवेळ नोकरी मिळविण्यासाठी सहकार्य केले जाईल असे महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे सांगण्यात आले आहे. या संदर्भात अधिक माहिती व नावनोंदणीसाठी कृपया संजना पवार व संगिता गवारे यांच्याशी ( दूरध्वनी - २२०४५४६० विस्तारित क्र. २४४ अथवा भ्रमणध्वनी ८२९१४१६२१६ ) वर संपर्क साधावा

Sunday, 4 December 2016

'सृजन' ला १३ वर्षंपूर्ण...








यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर 'सृजन' विभागातर्फे विविध कार्यक्रम राबविले जातात याला १३ वर्षंपूर्ण झाल्यानिमित्ताने दिनांक ४ डिसेंबर रोजी   'मॅजिक शो' चे अयोजन करण्यात आले होते ह्यासाठी  १०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.